वर्ष १९६१ मध्ये स्थापन झालेली ओडिशा राज्यातील ही एक मोठी खाणकाम कंपनी. इंडियन मेटल्स अ‍ॅण्ड फेरो अ‍ॅलॉइज ही केवळ ओडिशातीलच नव्हे तर भारतातीलदेखील फेरो अ‍ॅलॉइजचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. गेल्या पन्नास वर्षांत कंपनीने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर अनेक मोठय़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपल्या मांदियाळीत सामावून घेतले आहे. यात दक्षिण कोरियाची पॉस्को, जपानच्या मारूबेंनी कॉर्पोरेशन आणि निशिन स्टील तसेच चीन आणि तैवानच्या कंपन्यांचा समावेश होतो. याखेरीज भारतातील जिंदाल स्टेनलेस आणि शहा अ‍ॅलॉय या मोठय़ा कंपन्यादेखील कंपनीच्या मोठय़ा ग्राहक आहेत. कंपनी आपले फेरो क्रोमचे बहुतांशी उत्पादन जगातील सर्वात मोठे पोलाद उत्पादक राष्ट्र अर्थात चीनला निर्यात करते. तसेच फेरो क्रोमच्या उत्पादनासाठी कंपनीने पॉस्कोशी ७६:२४ प्रमाणातील भागीदारीत संयुक्त प्रकल्प सुरू केला आहे. हे उत्पादन खरेदी करण्यासाठी पॉस्कोने कंपनीशी दीर्घकालीन करार केला आहे.

एकंदरीत सध्या कंपनी आपले उत्पादन निर्यात करीत असली तरीही आगामी कालावधीत कंपनीच्या उत्पादनांना देशांतर्गत चांगली मागणी असेल. कारण सध्या भारतात माणशी केवळ ६३ किलो स्टील वापरले जाते. प्रगत देशांत किंवा चीन, कोरिया आणि जपानमध्ये हेच प्रमाण ४०० किलोच्या वर आहे. येत्या दहा वर्षांत आपल्याकडेदेखील दरडोई प्रमाण वाढेल अशी आशा आहे. स्टील उत्पादनात आपला देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे हे विशेष. खरे तर गेली काही वर्षे धातू कंपन्यांमध्ये अनिश्चितता आहे. इंडियन मेटल मात्र गेल्या दोन वर्षांत आपली चांगली कामगिरी टिकवून आहे. कंपनीने सरलेल्या २०१६-१७ या आर्थिक वर्षांत १६७२.३५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २४६.८८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला होता, तर नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत ४२२.६५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ९९.९२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. अर्थात खाणकाम उद्योगात बरीच नियंत्रणे असल्याने तसेच किमतीतील चढ-उतारांमुळे अनिश्चितता खूप आहे. गेल्या वर्षी याच काळात कंपनी तोटय़ात होती. म्हणून कंपनीने जून-सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर ते अभ्यासून खरेदी करावी. अर्थात ज्या गुंतवणूकदारांना धोका पत्करायचा असेल ते आतादेखील खरेदी करू शकतात.

इंडियन मेटल्स अ‍ॅण्ड फेरो अ‍ॅलॉइज लिमिटेड

(बीएसई कोड ५३३०४७)

स्मॉल कॅप

धातू आणि खाणकाम व्यवसाय

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                                         ५८.८८

परदेशी गुंतवणूकदार                      ०.२३

बँक/ म्यु. फंड / सरकार                  ८.०२

इतर / सार्वजनिक                          ३२.८७

 

बाजारभाव (रु.)                                      ६५८.९०

उत्पादन / व्यवसाय                               खाणकाम

भरणा झालेले भागभांडवल (रु.)             २८.९८ कोटी

पुस्तकी मूल्य (रु.)                                    ३८६.७

दर्शनी मूल्य (रु.)                                       १०/-

लाभांश (%)                                              २००%

प्रति समभाग उत्पन्न (रु.)                         १३९.८

पी/ई गुणोत्तर                                            ४.८

समग्र पी/ई गुणोत्तर                                  १२.४

डेट/इक्विटी गुणोत्तर                                  ०.९०

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर                            ७.७२

रिटर्न ऑन नेटवर्थ (%)                                २६.९८

बीटा                                                             १.३

बाजार भांडवल (कोटी रु.)                             १८५८

५२ आठवडय़ातील उच्चांक/ नीचांक (रु.)      ८२३/१६३

सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.