वसंत माधव कुळकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एलआयसी एमएफ बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंड साधारण रोखे बाजारात एखादा घोटाळा झाला की त्या घोटाळ्यात कोणते फंड बाधित झाले आहेत, कोणत्या फंड घराण्यांची किती रक्कम त्यात अडकली आहे याची चर्चा सुरू असते. ताजा ‘येस बँके’चा अपघात याला अपवाद नव्हता. येस बँकेसारख्या संकटानंतर कोणी गुंतवणूकदार निश्चित उत्पन्न  देणाऱ्या गुंतवणूक साधनांचा विचार करीत असतील तर रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांचा ‘बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंड’ हा एक उदयोन्मुख फंड प्रकार जरूर विचारात घ्यावा. रोकडसुलभतेसह कमी जोखीम आणि फंड मालमत्ता मूल्यात कमी अस्थिरता असलेला हा फंड प्रकार आहे. गेल्या वर्षी या स्तंभात, एकूण उपलब्ध १७ फंड घराण्यांच्या बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंडांपैकी ‘एलआयसी एमएफ बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंडा’ची गुंतवणुकीसाठी शिफारस अन्य दोन फंड घराण्यांच्या बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंडांसोबत केली होती.

रोखे गुंतवणुकीत रोख्यांची पत कमी होण्याचा आणि व्याजदराशी निगडित जोखीम असते. व्याजदर किंवा महागाई वाढल्यास रोख्यांच्या किंमती कमी होतात. ‘अल्ट्रा-शॉर्ट-टर्म डेट फंड’ हे कमी-कालावधीच्या रोख्यांत गुंतवणूक करीत असल्याने व्याज दर किंवा महागाई दरात बदलाशी निगडित जोखीम कमी असते. ही जोखीम मध्यम मुदतीच्या (३ ते ५ वर्षे मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करणारे) फंडांना थोडा अधिक तर त्याहून अधिक जोखीम ‘लाँग टर्म’ (५ वर्षांहून अधिक मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करणारे) फंडात असते.

बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंड हे उच्च पत असलेल्या आणि रोख्यांची उर्वरित मुदत तीन वर्षांदरम्यान असलेल्या रोख्यांत गुंतवणूक करत असल्याने व्याजदर बदलाशी संलग्न जोखीम (डय़ुरेशन रिस्क) सर्वात कमी असते. हे फंड गुंतवणुकीत दोन प्रकारे उत्पन्न मिळवितात. गुंतवणूक केलेल्या रोख्यांवर देय असलेले व्याज हा उत्पन्नाचा पहिला प्रकार असून दुसऱ्या प्रकारात बँकांच्या ठेवी प्रमाणपत्र (सीडी) जे भांडवली लाभ देतात. गतवर्षी रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या व्याजदराच्या कपातीमुळे भांडवली लाभाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली.

कुठल्याही रोखे गुंतवणुकीत, मुख्य जोखीम गुंतवणूक कालावधीत रोख्यांची पत कमी (क्रेडिट रिस्क) होण्याची असतेच. पत जोखीम जोखण्याचे कौशल्य (क्रेडिट अण्डररायटिंग स्कील) हा रोखे गुंतवणूक करणाऱ्या निधी व्यवस्थापनाचा आत्मा असतो. पत जोखीम जोखणे म्हणजे एखादी व्यक्ती किंवा संस्था किती रकमेची आणि किती कालावधीसाठी आर्थिक जोखीम आणि रोख्यांवर देय असलेला व्याजदर हे किती संतुलित आहे याचा अंदाज बांधत गुंतवणूक करायची किंवा नाही याचा अंदाज बांधणे. एलआयसी एमएफ इन्कम प्लस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून ऑगस्ट २०१६ मध्ये विद्यमान मर्झबान इराणी यांची फंड घराण्याने नियुक्ती केली. ‘सेबी’च्या फंड सुसूत्रीकरणपश्चात हा फंड ‘एलआयसी एमएफ बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंड’ या नावाने ओळखला जाऊ लागला. या फंडाचे निधी व्यवस्थापक मर्झबान इराणी यांचे रोख्याची पत जोखण्याचे कौशल्य वाखाणण्याजोगे असल्याने अनेक मातबर अर्थसंस्था आणि विपुल रोकडसुलभता असलेल्या कंपन्या एक ते तीन वर्षे गुंतवणूक कालावधीसाठी या फंडाची निवड करीत आहेत. परिणामी वर्षभरात फंड मालमत्ता २०० कोटींवरून ३१ जानेवारी रोजी १,४५६ कोटींपर्यंत पोहोचली आहे. ‘निफ्टी बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंड इंडेक्स’ हा फंडाचा मानदंड असून फंडाने मानदंडापेक्षा सातत्याने सरस कामगिरी केली आहे. एलआयसी एमएफ बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंड ‘रेग्युलर ग्रोथ’ विकल्पास मॉर्निगस्टारने ‘फोर स्टार’ मानांकन, तर व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइनने ‘फाइव्ह स्टार रेटिंग’ दिले असून या फंडाचे क्रिसिल मानांकन ‘सीपीआर-२’ आहे. यापैकी बहुतेक फंडांनी दीर्घकाळात स्थिर अथवा वाढत्या व्याजदराचा सामना केलेला नाही. या फंडाचा परतावा ‘अल्ट्रा-शॉर्ट-टर्म फंडां’पेक्षा फारसा वेगळा नसला तरी ‘अल्ट्रा-शॉर्ट-टर्म फंडां’नी गुंतवणुकीपेक्षा बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंडांनी गुंतवणूक केलेल्या रोख्यांची पत अधिक सुरक्षित आहे. या फंडाने मागील १२ महिन्यांच्या नियोजनबद्ध गुंतवणुकीवर (एसआयपी) फंडाने वार्षिक ९.०९ टक्के, तीन वर्षांच्या गुंतवणुकीवर वार्षिक ८.३१ टक्के तर पाच वर्षांच्या गुंतवणुकीवर वार्षिक ८.१६ टक्के परतावा मिळाला आहे. पाच वर्षांपूर्वीच्या १० लाखांच्या गुंतवणुकीवर दरमहा एक हजार रुपये ‘सिस्टेमॅटिक विथड्रॉवल (एसडब्ल्यूपी)’ पद्धतीने काढून घेतल्यावर, १३ मार्च २०२०च्या रेग्युलर ग्रोथ ‘एनएव्ही’नुसार गुंतवणूक मूल्य १४,५९,९०९ रुपये असून परताव्याचा वार्षिक दर ७.५७ टक्के आहे (कोष्टक पाहा). मागील दोन वर्षांत निधी व्यवस्थापकांच्या पत जोखीम जोखण्याच्या कौशल्यामुळे हा फंड कलंकित रोख्यांतील गुंतवणुकीपेक्षा कायम दूर राहिला असल्याने अधिकची जोखीम न घेता बँक ठेवींद्वारे उपलब्ध व्याजदराहून जास्त परतावा अपेक्षित असलेल्या आणि किमान तीन वर्षे गुंतवणूक कालावधी असलेल्या गुंतवणूकदरांसाठी जोखिमांकानुसार एक पर्याय आहे.

shreeyachebaba@gmail.com

*   म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

Web Title: Article on banking and psu debt funds abn
First published on: 16-03-2020 at 04:10 IST