मागील अभ्यास वर्गामध्ये आपण पर्यायांवर परिमाण करणाऱ्या घटकांचा व कॉल खरेदीचा सविस्तर अभ्यास केला. आजच्या अभ्यास वर्गामध्ये आपण पुट खरेदीच्या नियमांचा अभ्यास करू.
वाचकांनी आपला दृष्टिकोन बाजारवर जाईल म्हणजेच तेजीचा असेल किवा मंदीचा असेल त्याचप्रमाणे अस्थिरतेची दिशा तेजीची किवा मंदीची असेल याचा विचार करून डावपेच आखावेत, असे मागील अभ्यास वर्गामध्ये सांगितले होते. अनेक वाचकांनी हा दृष्टिकोन व दिशा कशी ओळखावी अशी विचारणा केली आहे. सध्या आपला अभ्यासक्रम हा विकल्पाच्या सर्व डावपेचांचा अभ्यास करणारा आहे व बाजाराची दिशा व दृष्टिकोन कसा ओळखावा, याविषयी आपण सविस्तर अभ्यास वर्ग नंतर घेण्यात येतील.
जेव्हा खरेदीदार किवा विक्रेता केवळ एकच विकल्प विकत घेतो किंवा विकतो तेव्हा त्या विकल्पांना विकल्पाच्या परिभाषेमध्ये नग्न विकल्प (Naked Options) असे म्हणतात. सर्वसाधारणपणे व्यावसायिक खरेदी व विक्रीदार नग्न विकल्प टाळतात व मुख्यत्वे ते डावपेचांचे धोरण अंगीकारतात.
लॉंग पुट (Long put)
लॉंग पुट (Long put) : दिशा मंदीची असेल व वेगाच्या संकल्पनेमुळे अस्थिरता (volatility) सुद्धा वाढणार असेल व हे सर्व लवकरात लवकर होणार असेल तरच लॉग पुट घ्यावा. कारण –
डेल्टा परिणाम – निर्देशांक/शेअर्स खाली आल्यास पुटची किंमत वाढते.
वेगा परिणाम – अस्थिरता (volatility) वाढल्यास पुटची किंमत वाढते.
थीटा परिणाम – दिवसागणिक पुटची किंमत कमी होते.
केव्हा खरेदी करावी : सर्वाचा एकत्रित परिणाम लक्षात घेता जर बाजार/शेअर्स कमीत कमी दिवसात येणाऱ्या काही विशिष्ट घटनांमुळे खाली येणार असेल किवा Contrarian Theory  नुसार बीअर पुश एरियामध्ये किंवा आपल्या पद्धतीप्रमाणे आता बाजार खाली जाईल, असे वाटत असल्यास पुट घ्यावेत.
नफा : अमर्याद
तोटा : जास्तीत जास्त भरलेला प्रीमियम.
केव्हा बाहेर पडावे:
बाजार/शेअर्स/स्टोकची दिशा लवकरात लवकर मंदीची/बेअरिश होत नसल्यास संपूर्ण प्रीमियमचे नुकसान करण्यापेक्षा झालेला तोटा बुक करून बाहेर पडावे किंवा अगोदरच ठरवलेला तोटा किंवा फायदा झाल्यास बाहेर पडावे.
उदाहरणार्थ : २७/०२/२०१५ रोजी आयटीसीच्या शेअर्सची किंमत रु. ३९५ आहे. मला असे वाटते की, या शेअर्सची किंमत नजीकच्या कालावधीमध्ये रु. ३८० पर्यंत येऊ शकते. म्हणजे १) माझा दृष्टिकोन मूलभूत व तांत्रिक विश्लेषणानुसार मंदीचा आहे. त्याचप्रमाणे अर्थसंकल्पाच्या वातावरणामुळे अस्थिरतेमध्ये (Volatility) वाढ होणार आहे. म्हणजे २) अस्थिरतेचा दृष्टिकोन तेजीचा आहे. या दोन्ही गोष्टींचा विचार करता मी पुट खरेदीचा पर्याय स्वीकारणार आहे.
विकल्प साखळीतील काही विकल्पांचा अभ्यास

वरील विकल्प साखळीचा अभ्यास करता आयटीसी या शेअर्सच्या भावामध्ये प्रत्येकी एक रुपयाची घसरण झाली असता ३९०च्या पुटमध्ये ०.४१ पशाचा नफा होईल. तसेच ३८० व ३७०च्या विकल्पामध्ये अनुक्रमे ०.३० व ०.२० पशाचा फायदा होईल. त्याच वेळी विकल्प साखळी ३९० तसेच ३८० व ३७०च्या विकल्पामध्ये दिवसागणिक वरील तक्त्याप्रमाणे रुपये ०.२, ०१९ व ०.१६चा तिथिऱ्हास होऊन तोटा होईल. या ठिकाणी सध्या वेगा आणि गॅमाचा विचार केला नाही.
वरील गोष्टींचा विचार करता मी विकल्प साखळीतील विविध स्ट्राइकपकी स्ट्राइक रुपये २९०, ज्याच्या पुटचा प्रीमियम रु. ११.८० आहे तो खरेदीसाठी निवडतो व त्याची लॉट संख्या १,००० आहे. त्यामुळे माझी एकंदर गुंतवणूक ११,८०० आहे. केवळ ११,८०० रुपये भरून मी एकंदर रु. ३,९५,०००च्या आयटीसीच्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवू शकतो (३९५ ७ १०००=३९५०००) व प्रसंगी कितीही भाव उतरले तरी २६ मार्च २०१५ला विकण्याचा अधिकार वापरू शकतो. २६ तारखेपर्यंत केव्हाही माझा अंदाज खरा ठरला असता डेल्टामुळे, अधिक अस्थिरतेमुळे विकल्पच्या किमतीमध्ये झालेली वाढ, उणे थीटामुळे झालेला ऱ्हास यांचा एकंदरीत परिणाम होऊन सदर पुटचा भाव कमीत कमी रु. १८-२५ झाला असेल. म्हणजेच केवळ ११,८०० भरून मी ८,००० ते १५,००० रुपयांचा नफा मी कमवू शकतो.
—————————-
(विशेष सूचना : सदर लेख २७ फेब्रुवारी २०१५ म्हणजे संसदेत मांडण्यात आलेल्या अर्थसकंल्पापूर्वी लिहिला आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी. बाजारातील शेअरचे उदाहरण केवळ संकल्पना समजून सांगण्यासाठी घेतलेले आहे. कृपया वाचकांनी हा लेखकाने दिलेला सल्ला अथवा खरेदीची शिफारस आहे असे समजू नये. तथापि योग्य सल्लागाराकडून मार्गदर्शन घेऊनच व्यवहार करावा.)
info@primetechnicals.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buy a put rules
First published on: 09-03-2015 at 01:05 IST