आज ज्यांचे नियोजन जाणून घेणार आहोत ते अमोल रॉड्रिग्ज (३०) व ज्युलिया डिसिल्वा (२८) हे आठ दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेले नवदाम्पत्य आहे. साधारण सहा महिन्यांपूर्वी त्यांनी आपले विवाहानंतरचे नियोजनाची चाचपणी करणारी मेल पाठविली होती.
अमोल हे नवी मुंबईत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांतील एका कंपनीत तर ज्युलिया या नवी मुंबईतील एका खाजगी शाळेत शिक्षिका आहेत. अमोल यांचे वार्षकि उत्पन्न १३ लाख असून ज्युलिया यांचे वार्षकि उत्पन्न साडे तीन लाख आहे. अमोल व ज्युलिया यांनी संयुक्तरित्या कर्ज काढून नवीन पनवेल इथे एक सदनिका ४८ लाखाला खरेदी केली आहे. या सदनिकेसाठी त्यांनी ३३ लाखांचे कर्ज काढले आहे. भविष्यात त्यांना दोन बीएचके सदनिका घ्यायची असून आणखी २० लाखांचे कर्ज घ्यावे लागेल. असेच एक दोन वर्षांत एक चारचाकी घेण्याचा अमोल यांचा विचार आहे. अमोल यांच्या कंपनीच्या सेवाशर्तीनुसार अमोल व ज्युलिया यांना तीन लाखांचे आरोग्य विमाछत्र लाभले आहे. ज्युलिया यांनी दोन पारंपरिक प्रकारच्या विमा योजना खरेदी केल्या आहेत. या योजनांचे एकत्रित विमाछत्र ८ लाखांचे आहे. अमोल यांनी एकही विमा योजना अद्याप खरेदी केलेली नाही. घरखर्च व गृहकर्जाचा हप्ता वजा जाता, दरमहा अंदाजे पाऊण लाखांची बचत होईल. परंतु संसाराला नवीन सुरुवात त्यामुळे त्यांना काही वस्तू नव्याने घ्यायच्या आहेत. परिणाम नवीन नियोजनानुसार करावयाच्या गुंतवणुकीला एप्रिल किंवा जूनपासून ते सुरुवात करू इच्छितात. एखाद्या वर्षांतच त्यांना पहिले अपत्य होऊ देण्याचा त्यांचा विचार आहे.
नियोजनाची सुरुवात मुदतीचा विम्याने करणे इष्ट ठरते. अमोल व ज्युलिया यांचे वय त्यांना भविष्यातील पार पडायच्या जबाबदाऱ्या व मोठ्या घरासाठी नवीन काढणार असलेले कर्ज लक्षात घेता. ज्युलिया यांनी २५ लाख व अमोल यांनी एक कोटीचा ३० वष्रे मुदतीचा विमा खरेदी करावा. येत्या पाच वर्षांत अमोल यांनी टप्याटप्याने त्यांनी आपले एकूण विम्याचे कवच दोन कोटी तर ज्युलिया यांनी एक कोटीपर्यंत वाढवत न्यायचे आहे. शिवाय दोघांनी अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई मिळणारा विमा खरेदी करावा.
अमोल व ज्युलिया यांच्या कुटुंबाला आरोग्य विम्याचे तीन लाखांचे कवच पुरेसे नाही. म्हणून त्यांनी पाच लाखापर्यंतच्या वैद्यकीय खर्चाच्या विमा छत्राचे संरक्षण देणारी पॉलिसी घ्यावी. अपत्याचे नांव लाभार्थ्यांच्या यादीत जोडावे. ज्या पॉलिसीत प्रसुतीसाठी झालेल्या खर्चाची भरपाई मिळते अशी योजना घेऊ नये. अशा योजनेत विम्याचा हप्ता अधिक असतो. गर्भवती राहण्याचे वय निघून गेल्यानंतरही हा वाढीव हप्ता सुरूच राहतो. हल्ली एकच बाळंतपण होते. परंतु बाळंतपणाच्या खर्चापेक्षा कितीतरी अधिक रक्कम हप्त्यापोटी भरली जाते. बचतीआधी कर्जफेड करावी, अशी धारणा असली तरी अनेकजणांना हे पटत नाही आणि शेअर बाजार दररोज उसळी मारत असताना तर नवगुंतवणूकदाराला हे पचनी पडणे कठीणच असते.  तरीसुद्धा बचतीपकी दरमहा दहा हजार रुपये जास्तीच्या कर्जफेडीसाठी वापरण्याचा अमोल यांना सल्ला दिला. त्यांना नवी मुंबई अथवा ठाणे येथे दोन बीएचके सदनिका घेण्याची इच्छा आहे. साहजिकच घरासाठी लागणारी लागणारी रक्कम उभी करणे (बचत) हे एकमेव उद्दिष्ट पुढील पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आले आहे. जर एखाद्या वर्षांत किंवा जेव्हा बाळ होईल तेव्हा या बचतीच्या नियोजनात बदल करण्याचा सल्ला दिला. घर घेण्यासाठी गंगाजळी तयार करण्यासाठी दहा हजाराची ‘एसआयपी’ करण्यासाठी चार फंड सुचविण्यात आले आहेत. यापकी एक लार्ज कॅप तर तीन मिडकॅप व स्मॉल कॅप यामध्ये गुंतवणूक करणारे फंड आहेत. या फंडातील एसआयपी निदान चार वष्रे सुरु राहावी अशी अपेक्षा आहे. दरमहा तीन हजार ज्युलिया यांच्या व सात हजार अमोल यांच्या पीपीएफ खात्यात जमा करायचे आहेत. पाचव्या वर्षांच्या अखेरीस निदान साठ लाखाची रक्कम हाती यावी, अशा अपेक्षेने ही गुंतवणूक सुचविली आहे.
अमोल व ज्युलिया यांच्यासारख्या तरुण जोडप्याने वित्तीय नियोजाकाचा शोध घ्यावा व त्याच्या मदतीने आपल्या गुंतवणुकीचा वर्षांतून एकदा आढावा घेणे गरजेचे आहे. केलेले आíथक नियोजन म्हणजे न बदलणारे घटनेचे कलम नव्हे. नियोजनात लवचिकता असणे गरजेचे आहे. अशीलाच्या बदललेल्या गरजांनुसार आíथक नियोजन देखील तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने बदलणे आवश्यक असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमोल व ज्युलिया यांनी आर्थिक नियोजन म्हणून करावयाच्या गोष्टी..
० अमोल व ज्युलिया यांनी मुदतीच्या विम्याची खरेदी करावी
० ज्युलिया यांनी आरोग्य विमा योजनेची खरेदी करावी
० दोघांनी पीपीएफ खाते उघडून दरमहा ठरावीक रक्कम जमा करणे
० ज्युलिया सध्या हप्ता भरत असलेल्या विमा योजनांची नोंदणी एलआयसी नोमुरा सेिव्हग्ज प्लस योजनेत करणे.
० गृहकर्ज फेडीचा हप्ता वाढविणे
० चार म्युच्युअल फंडात एसआयपी सुरु करणे

: आजचा अर्थबोध:  
उत्साहाच्या भरात नको असलेल्या वस्तूंची खरेदी केली तर गरज असलेल्या वस्तुंपासून वंचित राहावे लागेल. म्हणून खर्चाचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Financial planning after marriage
First published on: 26-01-2015 at 01:00 IST