|| भक्ती रसाळ

आर्थिक नियोजनातील मोठे आव्हान म्हणजे निवृत्त जीवनाचे नियोजन. निवृत्त जीवनाचे नियोजन दोन वयोगटात करावे लागते. म्हणजे २०२२ मध्ये जे पुढे १० ते ३० वर्षांनतर निवृत्त होतील अशा गुंतवणूकदारांचा एक गट आणि जे गुंतवणूकदार निवृत्त वेतन आणि सेवानिवृत्ती पूंजीवर अवलंबून आहेत अशांचा दुसरा वयोगट. मात्र या दोन्ही वयोगटांपुढे एक यक्षप्रश्न एकसारखाच आहे. तो म्हणजे, दीर्घ मुदतीत कुटुंबाचे मासिक उत्पन्न महागाईशी सामना करू शकेल काय?

तरुण पगारदार मध्यमवर्ग आणि निवृत्त ज्येष्ठ नागरिक दोघांनाही हा प्रश्न खासच सतावणारा आहे आणि दोघेही आज आर्थिकदृष्टय़ा तणावमुक्त नाहीत.

अलीकडेच डिसेंबर २०२१ मध्ये मॅक्स लाईफ इन्शुरन्स आणि काव्‍‌र्ही इनसाइट यांच्या संयुक्त सर्वेक्षणातून भारतीयांच्या निवृत्तीविषयक निर्देशांकाविषयी अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. सदर निरीक्षणानुसार, प्रत्येक दहा भारतीयांपैकी नऊ भारतीय आज जीवनाविषयी चिंतेत आहेत, असा निष्कर्ष पुढे आला आहे. याचा अर्थ आज आपण ‘सर्वच’ निवृत्त जीवनातील आर्थिक सुबत्तेसाठी ‘नियोजनबद्ध’ नाही आहोत!

निवृत्त जीवन निर्देशांकानुसार ५० टक्के भारतीयांना जाणीव झाली आहे की, त्यांच्याजवळील पैसा निवृत्तीनंतर दहा वर्षे पुरेल इतकाच आहे. प्रत्येक चार भारतीयांपैकी एक भारतीय आज निवृत्तीविषयक विचारही करताना दिसत नाही. जीवनातील आर्थिक उद्दिष्टांचा प्राधान्यक्रम मांडला तर पाच गुंतवणूकदारांपैकी केवळ दोन गुंतवणूकदार हे आज स्वत:च्या निवृत्त जीवनासाठी गुंतवणूक करत आहेत, असे दिसून येते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ८० टक्के भारतीय आरोग्याविषयी जागरूक आहेत आणि त्यांचे निवृत्त जीवनात निरोगी, निरामय असेल असा आशावाद बाळगून आहेत.

आर्थिक नियोजन करताना वित्तीय सल्लागार अकल्पित मृत्यु आणि वाढलेले आर्युमान या दोन्हीही जोखमींचा विचार करतो.

भारतात नागरिकांसाठी सामाजिक सुरक्षा योजनांचा अभाव आहे. विभक्त कुटुंबव्यवस्था, सुशिक्षित तरुण वर्गाचे परदेशी स्थलांतरित होणे, तसेच स्वत:च्या अस्मितेस जपत स्वाभिमानाने वृद्धापकाळ जगण्याची मानसिकता इत्यादी काळानुरूप झालेल्या बदलांमुळे पुढील दशकांत आपली मुले म्हातारपणी आपला ‘आर्थिक आधार’ असतील ही गृहीतके भूतकाळात जमा होतील. मुळात मध्यमवयीन गुंतवणूकदारांनी, पालकांनी हा भावनिक मुद्दा आजच तटस्थपणे स्वीकारलेला आहे. याचा अर्थ कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाच्या प्राध्यान्यक्रमात निवृत्त जीवनासाठीची समर्पित गुंतवणूक अग्रस्थानीच असायला हवी. लक्षात ठेवा, जेवढी महागाई जास्त तेवढीच निवृत्त वेतनासाठीची वाढीव गुंतणवूक अपेक्षित आहे.

सामान्यपणे बँकेतील ठेवी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड – पीपीएफ), कर्मचारी भावष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि जीवनविमा योजना यांचा निवृत्तीसाठी आर्थिक तजवीज म्हणून विचार केला जातो. मात्र हे चारही पर्याय आज केवळ ६ टक्के ते कमाल ८.५० टक्के परतावा देत आहेत. २०२२ साली सर्वसाधारण चलनवाढीचा दर ६ ते ७ टक्के राहणार असून ‘जीवनशैली’, ‘आरोग्य सेवा’ यावरील चलनवाढीचा दर तर १२ टक्के ते १५ टक्क्यांच्या घरात जाणारा असेल. पारंपरिक गुंतवणुकीचे पर्याय नजीकच्या कालावधीत मोडीत निघणार आहेत. काळाची गरज ओळखून गुंतवणूकदाराने आर्थिक लवचीकता व शहाणपण दाखवले नाही तर निवृत्त जीवनातही अर्थार्जनाच्या संधी शोधत राहावे लागेल.

आर्थिक  नियोजनाद्वारे  निवृत्ती नियोजनासाठी पंचसूत्री

१) आपल्या चालू गुंतवणुकांचे पुनरावलोकन :

चालू गुंतवणुका म्हणजे, पीपीएफ, ईपीएफ आणि पेन्शन योजना यांच्या परताव्यांचा अभ्यास करून सध्याची एकूण जमा ठेव यांची नोंद ठेवणे. ज्या योजना दरसाल ८ टक्क्यांपेक्षा कमी वेगाने वाढत आहेत. त्यातील पैसा मुदतपूर्व बाहेर काढावा. व्यक्तिगत जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार गुणोत्तर आखून किमान १२ ते १५ टक्के दराने परतावा देऊ शकतील अशा नवीन योजनांत हा पैसा पुन्हा गुंतवावा.

२) पैशाचे मुदतीनुसार वर्गीकरण :

जसे आर्थिक उद्दिष्टाचे गरजेनुसार वर्गीकरण करता येते तसेच ते मुदतीनुसार आणि जोखीम क्षमतेनुसारही करता येते. पाच, सात, पंधरा वर्षे अशा मुदतकाळानुसार पैशाचे वर्गीकरण करून जास्त जोखीम घेण्याची मानसिकता अवलंबिता येते. लक्षात ठेवा, दीर्घ मुदतीत जोखमींचे अवमूल्यन होते आणि १५ ते १८ टक्के परतावा सहज साध्य होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिकांनी जोखीम घेण्याची मानसिकता अवलंबून जो पैसा येत्या तीन ते पाच वर्षांत गरजेचा नाही तो समभागसंलग्न (इक्विटी) म्युच्युअल फंड, बॅलन्स्ड म्युच्युअल फंडांत गुंतविणे गरजेचे आहे. अशा गुंतवणुका करताना सुयोग्य सल्लागाराची निवड करून त्या योजना समजावून घेणे गरजेचे आहे.

३) स्थावर मालमत्तेतून निवृत्त नियोजन :

भारतीय संस्कृतीत जमीनजुमला, शेतजमीन, वास्तू या मागील पिढीस वारसा रूपात ठेवण्याची प्रथा आहे. ज्येष्ठ नागरिकांची किंवा तरुण वर्गाची बव्हंशी मिळकत ही मालमत्तेत गुंतविली जाते. त्यामुळे हा पैसा न उपभोगता गुंतवणूकदार आर्थिक ताण सोसण्यावर भर देतो. म्हणूनच शक्य झाल्यास स्थावर जंगम मालमत्तेतून नवीन उत्पन्न तसेच गुंतवणूक स्रोत निर्माण करणे अत्यावश्यक ठरते.

४) आधुनिक निवृत्त योजनांचा विचार :

म्युच्युअल फंडाद्वारे निवृत्त योजनांचा विचार अपरिहार्यपणे करावाच लागेल. केवळ निवृत्त जीवनासाठी समर्पित म्युच्युअल फंड योजना बाजारात उपलब्ध आहेत. अशा योजना निवृत्तीच्या वयापर्यंत चालू ठेवण्याकरिता योग्य पर्यायाने युक्त आहेत. सर्वसाधारण गुंतवणूकदारांनी या पर्यायी योजनाचा अभ्यासपूर्वक विचार करावा. म्युच्युअल फंड म्हणजे मुद्दलाचीही शाश्वती नाही असा शेअर बाजारातील जुगार, सट्टा आहे अशा अंध:विश्वासातून ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर पडणे गरजेचे आहे. म्युच्युअल फंडात जोखीम सोसण्याच्या प्रत्येकाच्या क्षमतेनुसार वर्गीकरण केले गेलेले विविध पर्याय आहेत त्याचा विचार करणे काळानुरूप गरजेचे बनले आहे.

५) आरोग्य आणीबाणीसाठी व्यवस्था :

आरोग्य विमा केवळ रुग्णालयात भरती आणि त्यानंतरच्या काही काळातील वैदयकीय खर्चाची भरपाई देतो. जीवघेण्या व्याधीवरील उपचार दीर्घ मुदतीचे असतात. आरोग्य विमा हा आहारावरील खर्च, हवापालट खर्च प्रवास खर्च अशा प्रासंगिक परंतु आरोग्य आणीबाणीशी निगडित खर्चाचा विचार करत नाही. त्यामुळे निवृत्त जीवनात आरोग्य आणीबाणीसाठी आपत्कालीन तजवीज असणे अत्यावश्यक आहे. निवृत्त झाल्यावर कार्यालयीन आरोग्य विमा बऱ्याच पेन्शनधारकांना उपलब्ध असतो. त्या योजनांमधील त्रुटींचाही अभ्यास करून वेगळी व्यवस्था तयार करणे गरजेचे ठरते.

लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आणि व्यावसायिक विमा सल्लागार

bhakteerasal@gmail.com