अतुल कोतकर
जगभरात फैलावलेल्या करोनाच्या साथीमुळे विस्कळीत झालेल्या पुरवठा साखळीला पूर्ववत करण्यासाठी देश-विदेशातील मध्यवर्ती बँकांनी त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये पुरेशी रोकडसुलभता राहील याची दक्षता घेतली. या उपलब्ध रोकडसुलभतेचा लाभ भांडवली बाजारातील तेजीला कारण ठरला. या तेजीचे सर्वाधिक लाभार्थी फोकस्ड इक्विटी फंड ठरल्याचे दिसते. बाजारात अवतरलेल्या या तेजीवर आरूढ झालेला आणि फोकस्ड इक्विटी फंड या फंड गटात परतावा तालिकेच्या अग्रस्थानी असलेल्या फ्रँकलिन इंडिया फोकस्ड इक्विटी फंडाची ही शिफारस.

‘सेबी’प्रणीत फंड वर्गीकरणानुसार फोकस फंडाच्या गुंतवणुकीत कमाल ३० कंपन्यांचा समावेश करता येतो. फोकस्ड फंडांचे उद्देश हा वेगाने वाढतील असा दृढ विश्वास असणाऱ्या कंपन्या निधी व्यवस्थापकाने निवडून अधिक प्रमाणात त्यांचा समावेश गुंतवणुकीत केला जातो. लार्जकॅप किंवा मिडकॅप फंडाच्या तुलनेत फोकस्ड इक्विटी फंडातील कंपन्यांची संख्या कमी असल्याने, प्रत्येक कंपनीची (समभागांची) मात्रा अधिक अशा पद्धतीने पोर्टफोलिओची रचना असते.

गुंतवणुकीत एका विशिष्ट कंपनीची मात्रा अधिक असल्याने गुंतवणुकीतील जोखीम आणि अस्थिरता अधिक असते. अस्थिरता आणि जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी विविध उद्योगांतील आणि विविध बाजार भांडवल गटातील कंपन्यांचा समावेश केला जातो. निधी व्यवस्थापिका रोशी जैन यांनी बाजारातील चढ-उतारांचा गुंतवणूक मूल्यावर कमीत कमी परिणाम व्हावा अशा पद्धतीने पोर्टफोलिओची बांधणी केली आहे. फंडाच्या गुंतवणुकीत सर्वाधिक गुंतवणूक खासगी बँका (२६.०१%), सार्वजनिक मालकीच्या बँका (१०.२३%), सीमेंट आणि बांधकाम (८.३८%), तेल शुद्धीकरण (८.२९%), आरोग्य निगा उत्पादने (६.४९%), अभियांत्रिकी (६.३४%), दूरसंचार (४.९९%), ऊर्जा निर्मिती (४.८९%), नागरी हवाई वाहतूक (३.२३%), भांडवली वस्तू (३.१०%), स्थावर मालमत्ता (३.०२%), आरोग्य निगा सेवा (१.७२%), गृह सजावट (१.५५%), मद्य (१.२६%), वाहन निर्मिती आणि पूरक उत्पादने (०.५६%) आणि रोख रक्कम (७.४५%) या उद्योग क्षेत्रांचा समावेश आहे. टाळेबंदीचा सर्वाधिक परिणाम झालेल्या परंतु टाळेबंदीपश्चात परिचालन त्वरित मार्च २०२० पूर्वीच्या पातळीवर येण्याची शक्यता असलेल्या हवाई वाहतुकीला वाहन निर्मितीपेक्षा अधिक प्राधान्य देण्यात निधी व्यवस्थापिकेचे जोखीम परतावा समायोजन कौशल्य दिसून येते.

रोशी जैन यांची या उद्योगातील अत्यंत बुद्धिमान निधी व्यवस्थापकांत त्यांची गणना होते. मॉर्निगस्टारच्या ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार त्या ३० जून २०२१ रोजी त्या १५,०८४.४८ कोटीच्या निधीचे व्यवस्थापन करीत आहेत. त्या निधी व्यवस्थापक असलेले फ्रँकलिन फोकस्ड इक्विटी, फ्रँकलिन इंडिया ब्लूचीप आणि फ्रँकलिन बिल्ड इंडिया हे फंड परताव्याच्या तालिकेत अग्रस्थानी आहेत. थोडक्यात सांगायचे तर त्या एखाद्या फलंदाजाप्रमाणे सध्या फॉर्मात असलेल्या निधी व्यवस्थापिका आहेत.

फ्रँकलिन फोकस्ड इक्विटी फंडाने या फंड गटात सर्वाधिक मालमत्ता असलेल्या अ‍ॅक्सिस आणि एसबीआय फोकस्ड इक्विटी फंडांना लीलया मागे सारत किमान २० टक्के अधिक परतावा दिला आहे. केवळ परतावा नव्हे तर जोखीम-परताव्याच्या गुणोत्तरात (शार्प रेशो) तो अव्वल ठरला आहे. फोकस्ड फंडांच्या पोर्टफोलिओचे स्वरूप पाहता गुंतवणूकदारांनी किमान तीन ते पाच वर्षे गुंतवणूक करणे हिताचे ठरते. सुमार बुद्धीचे गुंतवणूकदार ऐकीव माहितीवर फ्रँकलिन टेम्पल्टनच्या फंडातून गुंतवणूक काढून घेताना दिसतात. एनएफओची गर्दी झालेल्या बाजारपेठेत विजेत्या निधी व्यवस्थापकांचा शोध घेतला तर मागील तीन वर्षांत रोशी जैन यांची चमकदार कामगिरी झाल्याचे आकडेवारी दाखवत आहे. अर्धशिक्षित गुंतवणूकदारांनी ‘कुरूप वेडे..’ ठरविलेल्या फंड घराण्याच्या इक्विटी फंडांची कामगिरी.. ‘तो राजहंस एक’ अशीच आहे. पाच वर्षांसाठी पैसे गुंतवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी या फंडाची शिफारस करीत आहे.

फ्रँकलिन इंडिया फोकस्ड इक्विटी फंड

* फंड गट          फोकस्ड इक्विटी

* फंडाची सुरुवात २६ जुलै २००७

* फंड मालमत्ता ७,३७९ कोटी (३० जून २०२१ रोजी)

* मानदंड   निफ्टी ५०० टीआरआय

या फंडात आम्ही ग्रोथवर्गात मोडणाऱ्या कंपन्यांचा समावेश करतो. कंपन्यांची संख्या कमी असल्याने अन्य फंडांच्या तुलनेत अस्थिरता आणि जोखीमदेखील असते. जोखीम स्वीकारून अधिक परतावा मिळवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड सुयोग्य साधन आहे.

रोशी जैन,

निधी व्यवस्थापिका, फ्रँकलिन इंडिया फोकस्ड इक्विटी फंड

*लेखक विमा नियामक इर्डाचे माजी सदस्य आणि एलआयसीमध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते.

ई-मेल : nbsathe@gmail.com