करावे  कर-समाधान : मृत व्यक्तींचे विवरणपत्र ..   

प्राप्तिकर कायद्यानुसार मृत करदात्याच्या उत्पन्नाचे मूल्यांकन (अ‍ॅसेसमेंट) करण्यात आल्यास त्याची जबाबदारी वारसदाराची असते.

income tax return
प्राप्तिकर कायद्यानुसार मृत करदात्याच्या उत्पन्नाचे मूल्यांकन (अ‍ॅसेसमेंट) करण्यात आल्यास त्याची जबाबदारी वारसदाराची असते.

प्रवीण देशपांडे

मृत्यू ही एक दुख:द घटना आहे. मृत्यूनंतर सर्व संपते असे म्हणतात. मात्र ज्या करदात्यांचे निधन झाले आहे अशा करदात्यांच्या उत्पन्नावर त्यावर्षी कर भरावा लागतो आणि विवरणपत्र देखील दाखल करावे लागते. ज्या करदात्यांचे उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांनी ठरावीक व्यवहार केलेले असतील अशांना विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. हे आपण मागील लेखात जाणून घेतले. ज्या व्यक्तीचे निधन झाले आहे त्यांच्यावतीने कर आणि विवरणपत्र कोणी भरावे याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार करदात्याच्या निधनानंतर त्याचा कायदेशीर प्रतिनिधी (वारसदार) हा ‘‘करदाता’’ म्हणून समजला जातो. मृत करदात्याचा कर भरण्याची जबाबदारी ही वारसदाराची असते. करदाता मृत झाला नसता तर ज्या पद्धतीने त्याने कर भरला असता त्या पद्धतीने वारसदाराला कर भरावा लागतो. प्राप्तिकर कायद्यानुसार मृत करदात्याच्या उत्पन्नाचे मूल्यांकन (अ‍ॅसेसमेंट) करण्यात आल्यास त्याची जबाबदारी वारसदाराची असते. मृत करदात्याच्या मृत्युपूर्वी त्याच्याविरुद्ध केलेली कोणतीही कार्यवाही वारसदाराविरुद्ध करण्यात आली आहे असे मानले जाते आणि मृत व्यक्तीच्या मृत्यूच्या तारखेला ती ज्या टप्प्यावर होती, तिथून वारसदाराविरुद्ध सुरू ठेवता येते. मृत करदाता जिवंत असताना त्याच्याविरुद्ध जी कार्यवाही केली जाऊ शकते, ती वारसदाराविरुद्ध केली जाऊ शकते.

प्रत्येक वारसदार हा वारसदार म्हणून देय असलेल्या कोणत्याही करासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार असतो,  त्याच्या कराचे दायित्व देय राहिल्यास, ते मृत व्यक्तीकडून मिळालेल्या संपत्तीच्या मूल्यापुरते मर्यादित असते.

उत्पन्न कसे गणावे?

मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही. वारसदारावर मृत करदात्याच्या उत्पन्नावर कर भरण्याची, त्याचे विवरणपत्र दाखल करण्याची जबाबदारी असते. हे उत्पन्न कसे गणावे याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. आर्थिक वर्षांच्या पहिल्या दिवसापासून ते मृत्यूच्या तारखेपर्यंतचे उत्पन्न आणि त्यावरील करदायित्व गणावे. हे उत्पन्न आणि कर हे मृत करदात्याच्या विवरणपत्रात दाखवावे. उदा. करदाता १५ ऑक्टोबर, २०२१ रोजी मरण पावला असेल आणि त्याला व्याज आणि घर भाडय़ाचे मिळून दरमहा ६०,००० रुपये मिळत असतील तर २०२१-२२ या आर्थिक वर्षांचे उत्पन्न १ एप्रिल, २०२१ ते १५ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत म्हणजे ३,९०,००० रुपये इतके असेल (एप्रिल ते सप्टेंबर, २०२१ पर्यंत दरमहा ६०,००० रुपयानुसार ३,६०,००० रुपये आणि ऑक्टोबर, २०२१ चे १५ दिवसांचे ३०,००० रुपये असे एकूण ३,९०,००० रुपये).

कर कसा गणावा?

करदात्याने मृत्युपूर्वी करबचतीच्या गुंतवणुका किंवा खर्च केले असतील तर त्याच्या वजावटीदेखील विचारात घेऊन करदायित्व गणता येते. मृत करदात्याच्या उत्पन्नात पगाराचे उत्पन्न असेल तर ५०,००० पर्यंतची प्रमाणित वजावट घेता येते. अशा वजावटी घेतल्यानंतर उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे देय कर (उद्गम कर आणि अग्रिम कर वजा जाता) वारसदाराला भरावा लागतो. हे करदायित्व वारसदाराचे वैयक्तिक नसून मृत करदात्याच्या वतीने आहे. हे करदायित्व त्याला मृत व्यक्तीकडून मिळालेल्या मालमत्तेपुरते मर्यादित असते. उदा. वारसदाराला मृत करदात्याकडून २ लाख रुपये वारसाने मिळाले आणि मृत करदात्याचे करदायित्व ३ लाख रुपये असेल तर त्याचे करापोटी दायित्व २ लाख रुपये इतकेच असेल.

वारसदाराची नोंदणी प्राप्तिकर कायद्याच्या संकेतस्थळावर कशी करावी :

विवरणपत्र भरण्यासाठी वारसदाराला ‘‘वारसदार’’ म्हणून त्याचा पॅन क्रमांक टाकून प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. मृत करदात्याचे पॅन प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर नोंदणी नसेल तर वारसदार तसे करू शकतो. त्याबरोबर काही कागदपत्रे ऑनलाइन दाखल करावी लागतात. यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र, मृत व्यक्तीच्या पॅनची प्रत, वारसदाराच्या पॅनची स्वयंप्रमाणित प्रत, वारसदार असल्याचे प्रमाणपत्र, वगैरेचा समावेश आहे. वारसदार असल्याचा दाखला हा खालीलपैकी असावा :

१. न्यायालयाने जारी केलेले कायदेशीर वारस प्रमाणपत्र,

२. स्थानिक महसूल अधिकारी यांनी जारी केलेले कायदेशीर वारस प्रमाणपत्र,

३. स्थानिक महसूल प्राधिकरणाने जारी केलेले कुटुंब सदस्य प्रमाणपत्र.

४. केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेले कौटुंबिक निवृत्तिवेतन प्रमाणपत्र,

५. नोंदणीकृत इच्छापत्र.

६. बँकिंग किंवा वित्तीय संस्थेने त्यांच्या लेटर हेडवर, अधिकृत शिक्का आणि स्वाक्षरी असलेले पत्र, ज्यामध्ये मृत्यूच्या वेळी मृत व्यक्तीच्या खात्यावर नामनिर्देशित किंवा संयुक्त खातेदाराचे तपशील नमूद केलेले असतील. 

हे निवेदन प्राप्तिकर प्रशासकाने तपासून मंजूर केल्यानंतर विवरणपत्र दाखल करता येते. दाखल केलेल्या माहितीमध्ये काही त्रुटी असतील तर त्या सुधारण्याची संधी देण्यात येते. विवरणपत्रात करपरताव्याचा (रिफंड) दावा केला असेल तर वारसदाराच्या बँक खात्याचा तपशील द्यावा लागेल.

एक्झिक्युटर्स

मृत व्यक्तीने मृत्युपत्र केले असेल तर त्याप्रमाणे मालमत्तेचे वाटप होते. वारसाहक्काच्या प्रकरणांमध्ये, मृत्यूच्या तारखेनंतर मिळालेल्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न हे एक्झिक्युटर्सच्या हातात करपात्र असेल. एक्झिक्युटर एक असेल तर त्याचा दर्जा ‘वैयक्तिक’ असेल आणि एकापेक्षा जास्त एक्झिक्युटर्स असतील त्याचा दर्जा ‘असोसिअशन ऑफ पर्सन्स’ हा असेल. तसेच मृत करदाता हा निवासी भारतीय असेल तर एक्झिक्युटर्सचा दर्जा हा निवासी भारतीय असेल आणि मृत करदाता अनिवासी भारतीय असेल तर एक्झिक्युटर्सचा दर्जा ‘अनिवासी भारतीय’ असेल.

एक्झिक्युटरचे मूल्यांकन त्याच्या वैयक्तिक उत्पन्नाहून स्वतंत्रपणे मालमत्तेच्या उत्पन्नाच्या संदर्भात केले जाते. एक्झिक्युटरचे विवरणपत्र भरण्यासाठी स्वतंत्र पॅन आवश्यक आहे. मृत व्यक्तीच्या इच्छेनुसार मालमत्तेचे वितरण पूर्ण झाल्याच्या तारखेपर्यंत एक्झिक्युटर कर आकारण्यायोग्य असेल. वितरण पूर्ण झाल्यानंतर त्यावर मिळणारे उत्पन्न हे वारसदाराला करपात्र आहे. त्यानंतर एक्झिक्युटर्स निष्क्रिय होईल.

वारसदारांना मिळणारी मालमत्ता

मृत व्यक्तीच्या इच्छेनुसार वारसदारांना मिळालेल्या मालमत्तेवर वारसदारांना कर भरावा लागत नाही. मात्र त्या मालमत्तेतून मिळालेले उत्पन्न मात्र वारसदारांना करपात्र आहे. उदा. एका वारसदाराला त्याच्या वडिलांकडून १० लाख रुपये मिळाले हे पैसे त्याने मुदत ठेवीत ठेवले आणि त्यावर ५०,००० रुपये व्याज मिळाले तर, १० लाख रुपयांवर वारसदाराला कर भरावा लागणार नाही. मात्र त्यावर मिळालेले व्याज हे करपात्र उत्पन्नात गणले जाईल. वारसदाराला हे संपत्तीच्या (घर, समभाग, सोने, वगैरे) रूपात मिळाले तर त्यावरसुद्धा कर भरावा लागत नाही परंतु त्यातून मिळालेले उत्पन्न म्हणजे भाडे, लाभांश, वगैरे हे वारसदाराला करपात्र असेल. ही संपत्ती वारसदाराने विकल्यास त्यावर होणाऱ्या भांडवली नफ्यावर त्याला कर भरावा लागेल. भांडवली संपत्ती अल्पमुदतीची आहे की दीर्घमुदतीची आहे हे ठरवताना मृत व्यक्तीने ही संपत्ती खरेदी केल्याच्या तारखेपासून, ते वारसदाराने केलेल्या विक्रीच्या तारखेपर्यंतचा कालावधी विचारात घ्यावा लागतो. तसेच, मृत व्यक्तीने केलेली खरेदी किंमत आणि त्यावर महागाई निर्देशांक विचारात घेऊन त्यावर होणारा भांडवली नफा गणावा लागतो.

* लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. pravin3966@rediffmail.com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to file income tax return of deceased person by legal heirs zws

Next Story
क..कमॉडिटीचा : गोदाम सुधारणा आणि महागाई नियंत्रण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी