फंडाविषयक विवरण
फंडाचा गुंतवणूक प्रकार    : समभाग गुंतवणूक  
जोखीम प्रकार     : समभाग गुंतणूक असल्याने धोका अधिक (मुद्दलाची शाश्वती नाही).       
गुंतवणूक    : हा फंड ‘बॉटम्स अप इन्व्हेस्टमेंट अ‍ॅप्रोच’ या तंत्राने प्रामुख्याने लार्जकॅप व निफ्टी निर्देशांकातील प्रभावानुसार उद्योगक्षेत्रात गुंतवणूक करणारा फंड आहे.गुंतवणूक केल्यापासून एका वर्षांच्या आत गुंतवणूक काढून घेतल्यास एक टक्का निर्गमन (एग्झिट लोड) अधिभार आकारण्यात येईल. राष्ट्रीय शेयर बाजाराचा सीएनएक्स निफ्टी निर्देशांक या योजनेचा संदर्भ निर्देशांक आहे.
निधी व्यवस्थापक     : मनीष गुनवाणी हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. गुनवाणी यांनी    अभियांत्रिकीचे शिक्षण आयआयटी मद्रास येथून घेतले असून त्यांनी वित्तीय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आयआयएम बंगळूरू येथून घेतली आहे. ते आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडात जून २०१० मध्ये दाखल झाले.  
पर्याय    : वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (पे-आउट व रिइन्व्हेस्ट)
फंड खरेदीची पद्धती    : 1800 200 6666 (एमटीएनएल व बीएसएनएल वगळून) या क्रमांकावर     (सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यत) संपर्क केल्यास कंपनीचा गुंतवणूकदार सेवा प्रतिनिधी संपर्क करेल. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या विक्रेत्यामार्फत वा http://www.icicipruamc.com  संकेतस्थळावरून खरेदी करता येईल.

प्रत्येक फंड घराण्यातील एखादा फंड आपल्या कामगिरीमुळे त्या घराण्याला ओळख मिळवून देतो. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल या फंड घराण्याला कोणी ओळख मिळवून दिली या प्रश्नाचे उत्तर आयसीआयसीआय प्रू फोकस्ड ब्लूचीप हे आहे. या फंड घराण्यात हा फंड दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मालमत्ता असलेला हा फंड आहे. येत्या २३ मे रोजी हा फंड आपल्या कारकीर्दीची सात वष्रे पुरी करीत आहे. या फंडाने या मागील सात वर्षांत दोन अल्पकालीन तेजीच्या व दोन मध्यमकालीन मंदीच्या आवर्तनांचा सामना केला आहे. पहिल्या एनएव्हीला सुरुवात झाल्यापासून मागील सात वर्षांत १७.०८ टक्के चक्रवाढ दराने (सीएजीआर) परतावा दिला आहे. याच काळात संदर्भ निर्देशांकाची वाढ ८.२० टक्के दराने झाली.
३० एप्रिल २०१५ च्या गुंतवणूक तपशिलानुसार (फंड फॅक्टशीट) फंडाची मालमत्ता ८,६४२ कोटी रुपये आहे. आज देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मालमत्ता व्यवस्थापन करणाऱ्या फंड घराण्याचा मान आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाला मिळवून देण्यात या फंडाचा मोठा वाटा आहे. ताज्या गुंतवणूक तपशिलानुसार या फंडाने दहा उद्योग क्षेत्रात मिळून ५१ कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक केली आहे. या फंडाच्या निधी व्यवस्थापकास निफ्टीतील विविध उद्योग क्षेत्रापकी एखाद्या क्षेत्रात कमी अधिक पाच टक्के गुंतवणूक करण्याची मुभा असते. या धोरणामुळे निधी व्यवस्थापकास प्रवाहपतित होऊन अतिरिक्त जोखीम घेण्यापासून परावृत्त करण्यात आले आहे. हा फंड ‘बॉटम्स अप अप्रोच’ हे गुंतवणुकीचे धोरण अवलंबिणारा फंड आहे. अर्थव्यवस्थेच्या आवर्तनाच्या वेगवेगळ्या टप्प्यात विविध उद्योग क्षेत्रे चांगली अधिक कामगिरी करीत असतात. यापकी अव्वल कामगिरी करणारी उद्योगक्षेत्रे निवडून ( व नकारात्मक गुंतवणूक परतावा देणारी टाळून) त्या उद्योग क्षेत्रातील अव्वल मूल्यांकनाच्या कंपन्या निवडून त्यात गुंतवणूक करणे या प्रकारचे हे धोरण आहे. फंडाच्या पहिल्या दहा गुंतवणूकांत एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, अ‍ॅक्सिस बँक, टेक मिहद्र, स्टेट बँक, विप्रो, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसव्‍‌र्ह आदींचा समावेश होतो.
मागील दीड वर्षांपासून लार्जकॅप गुंतवणुका करणाऱ्या फंडाची कामगिरी मिडकॅप फंडांच्या कामगिरीपेक्षा डावी राहिली आहे. म्हणून जे गुंतवणूकदार मिडकॅप किंवा मिडकॅप धाटणीच्या म्युच्युअल फंडांची कास धरण्याच्या बेतात आहेत अशा गुंतवणूकदारांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, आज मिडकॅप समभागांचे मूल्यांकन एका धोकादायक पातळीवर आहे. या मूल्यांकनाबद्दल अनेक विश्लेषकांकडून चिंता व्यक्त होत आहे. तेजीच्या कालावधीत निर्देशांकापेक्षा सरस वाढ व मंदीत निर्देशांकापेक्षा कमी घसरण असलेला अशी या फंडाची ओळख आहे.
एक निश्चित दिशा नसलेल्या बाजारात आवर्जून एसआयपी पद्धतीने गुंतवणुकीचा विचार करावा असा हा फंड नक्कीच आहे.
mutualfund.arthvruttant@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Icici prudential focused bluechip equity fund
First published on: 18-05-2015 at 01:04 IST