|| अजय वाळिंबे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही वेळा उत्तम अनुभवी प्रवर्तक असूनही त्यांचा आयपीओ यशस्वी होतोच असे नाही. तसेच तो यशस्वी झाला तरीही त्याचा गुंतवणूकदारांना फायदा होतोच असेही नाही. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या बाबतीतही हेच झाले. गेल्या वर्षी एप्रिल २०१८ मध्ये ५१५ अधिमूल्य घेऊन हा आयपीओ तसा भरणा होण्यासाठी यशस्वी झाला खरा. परंतु गुंतवणूकदारांना मात्र याचा चांगलाच फटका बसला असणार. कारण केवळ ४३४ रुपयांना नोंदणी झालेला हा शेअर सध्या आयपीओ किमतीच्या (५२० रुपये) केवळ ४० टक्के किमतीत उपलब्ध आहे.

वर्ष १९९५ मध्ये स्थापन झालेली आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड ही भारतातील एक अग्रगण्य तंत्रज्ञान-आधारित दलाली पेढी आहे जी ब्रोकरेज, आर्थिक उत्पादनांचे वितरण आणि गुंतवणूक बँकिंगसह विविध प्रकारच्या वित्तीय सेवा प्रदान करते आणि दोन्ही म्हणजे रिटेल आणि संस्थात्मक ग्राहकांवर कंपनी लक्ष केंद्रित करते.

कंपनीच्या प्रमुख सेवांमध्ये इक्विटी तसेच डिबेंचर्स आयपीओ, कन्व्हर्टबिल ऑफिरग, क्वालिफाइड इन्स्टिटय़ुशनल प्लेसमेंट (क्यूआयपी), बायबॅक, डिलििस्टग आणि ओपन ऑफर्स आणि असूचिबद्ध व सूचिबद्ध संस्थांसाठी आंतरराष्ट्रीय ऑफर्स यासह इक्विटी- कॅपिटल मार्केट यांचा समावेश होतो. कंपनीच्या ग्राहकांत कॉर्पोरेट्स, वित्तीय संस्था, उच्च धनसंपदा व्यक्ती आणि किरकोळ गुंतवणूकदार अशा सर्वाचा समावेश होतो.

गुंतवणूकदारांना इक्विटी, डेरिव्हेटिव्हज, करन्सी फ्युचर्स, म्युच्युअल फंड आणि इतर वित्तीय उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तसेच संशोधन माहिती, समभागांची निवड आणि म्युच्युअल फंड शिफारशींमध्ये प्रवेश करण्यासाठी कंपनी आयसीआयसीआय डिरेक्ट नावाचे एक ऑनलाइन ब्रोकिंग मंच चालवते. सध्या आयसीआयसीआय डिरेक्टकडे  सुमारे ४४ लाख ऑपरेशनल खाती असून गेल्या पाच वर्षांत त्यात उत्तम वाढ झाली आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या किरकोळ ब्रोकरेज आणि वितरण व्यवसायात देशभरात शाखा असून ७,१०० पेक्षा जास्त उप-दलाल, अधिकृत व्यक्ती, स्वतंत्र वित्तीय सहयोगी आणि स्वतंत्र सहयोगी आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या २,६०० हून अधिक शाखांमधून इलेक्ट्रॉनिक ब्रोकरेज मंचाचे विपणन केले जाते.

मार्च २०१९ अखेर समाप्त आर्थिक वर्षांकरिता कंपनीने १,७२५.८० कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४८७.२१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत ही कामगिरी फारशी समाधानकारक नसली तरीही उत्तम आणि अनुभवी प्रवर्तक असलेली आयसीआयसीआय सिक्युरिटीज एक आकर्षक मध्यमकालीन गुंतवणूक ठरू शकते.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

 

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icici securities limited mpg
First published on: 22-07-2019 at 00:46 IST