आपल्या स्वत:च्या सुरक्षेबाबत आपण खूपदा निष्काळजी असतो. आपल्याला कोणकोणत्या जोखीमेचे नियोजन करणे आवश्यक आहे. याची आपल्याला जाणीव नसते. परिपूर्ण आíथक नियोजनात गुंतवणुकीच्या व्यवस्थापनाबरोबरच, स्व-सुरक्षेला म्हणजे कमावलेल्या पैशाच्या सुखाने व चिंतेविना उपभोग शक्य करणारी तरतूदही महत्त्वाची आहे.
मागील लेखात (अर्थ वृत्तान्त,  २३ मार्च २०१५) आरोग्य विमा (मेडिक्लेम) बद्दल माहिती पाहिली. काही गंभीर आजार उदा. कॅन्सर, हृदय शस्त्रक्रिया, किडनी प्रत्यारोपण या सारख्या आजारांमध्ये खर्च जास्त येतो. यासाठी गंभीर आजार आरोग्य विमा घेता येतो. ही सुनिश्चित लाभ योजना (डिफाइन्ड बेनिफिट) आहे. आरोग्य विमा ही नुकसान भरपाई (इन्डेम्निटी) योजना असते. म्हणून गंभीर आजाराचे निदान झाले असता त्याचे सर्व रिपोर्टस् सादर केल्यावर सुनिश्चित रक्कम विमा कंपनीमार्फत दिली जाते. यासाठी झालेला वैद्यकीय खर्च कमी असेल, तरी विम्याची पूर्ण रक्कम मिळते.
बहुतेक सर्व विमा कंपन्यांची एक अट असते. रुग्णाने रोग निदान झाल्यापासून एक महिना जिवंत असले पाहिजे (म्हणजे निदान झाल्यापासून कमीत कमी एक महिना त्या रुग्णावर उपचार झाले पाहिजेत.) आरोग्य विम्यापासून मिळणाऱ्या खर्चाच्या रकमेव्यतिरिक्त ही रक्कम स्वतंत्र असते.
यासाठी भारतीय आयुर्वमिा महामंडळ- ‘एलआयसी’ची जीवन आरोग्य (प्लॅन – ९०४) खूप चांगली योजना आहे. यामध्ये कमीत कमी एक लाख रुपये ते जास्तीत जास्त चार लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा घेता येतो. ही पॉलिसी मुख्यत्वे शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च व रुग्णालयातील वास्तव्यासाठी येणारा खर्च यासाठी आहे. म्हणून रुग्णालयात कमीत कमी ४८ तास वास्तव्य आवश्यक आहे. ही सुनिश्चित लाभ योजना असल्याने सर्व बिलांच्या छायाप्रती जोडून क्लेम सादर करून चालतो. एखाद्या धर्मादाय रुग्णालयातून शस्त्रक्रिया करण्याचा खर्च शून्य असेल तरी संपूर्ण रक्कम मिळते.
यामध्ये १४० गंभीर आजार, १४० कमी गंभीर आजार आणि इतर शस्त्रक्रिया अशा स्वरूपात वर्गीकरण केलेल्या कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी विमा रक्कम मिळू शकते. या व्यतिरिक्त रुग्णालयातील रोजच्या वास्तव्यासाठी रु. १००० ते रु. ४००० रक्कम मिळते. यासाठी भरावा लागणारा वार्षकि हप्ता खालीलप्रमाणे (चौकट पाहा) आहे.
ही पॉलिसी वय १८ ते ६५ दरम्यान कधीही घेता येते. आपले कुटुंबीय, आपले पालक, वैवाहिक जोडीदाराचे पालक यांची एकत्रित पॉलिसी मिळू शकते. वयाच्या ८० व्या वर्षांपर्यंत किंवा पॉलिसीचे हप्ते चालू असेपर्यंत याचा लाभ चालू रहातो. आई-वडिल दोघेही हयात असतील तर दोघांचा विमा घ्यावा लागतो. फक्त एकाचा मिळत नाही.
याबरोबर टर्म रायडर व अपघात विमा रायडर घेण्याची सोय आहे. मागील लेखात आरोग्य विम्याच्या दोन पॉलिसी दोन स्वतंत्र संस्थामार्फत घ्याव्यात असे सुचविले होते. त्यापकी एक या पॉलिसीचा  विचार करण्यास हरकत नाही.
घरातील वस्तू/सामानाचा विमा (हाऊसहोल्ड कन्टेट्स)
आपल्या घरात एकूण सामान, वस्तू, फíनचर किती रकमेचे आहे याचा आपणास खूपदा अंदाज नसतो. आपल्या सोयीनुसार आपण वस्तू खरेदी करीत जातो. त्याची आजची किंमत काय आहे हे पाहात नाही. घरातील सर्व वस्तूंची किंमत विचारात घेतल्यास दहा ते पंधरा लाख होऊ शकते. परंतु आपण या वस्तूंचा विमा घेत नाही. संपूर्ण इमारतीचा (स्ट्रक्चरल) विमा सोसायटी घेत असते. (कायदेशीररीत्या आवश्यक आहे.) पण घरातील वस्तूंचा विमा चोरी, आग, पूर, भूकंप आदींपासून संरक्षणासाठी घेण्याचे आपण टाळतो. या विम्याच्या संरक्षणाचा हप्ता दहा लाखासाठी वर्षांला फक्त रु. १०००/- पर्यंत येतो. ही जोखीम आपण सर्वसाधारण विमा कंपनीवर न सोपवता आपण बाळगत असतो.
एक ग्राहकाने मला सांगितले की आमच्या सोसायटीत सुरक्षा व्यवस्था चोख आहे. चोरी होण्याची शक्यता बिलकुल नाही आणि आग प्रतिबंध योजना व्यवस्थित आहे. त्यामुळे ती शक्यता फारच कमी. १५ दिवसांनी त्याचा फोन आला. त्याच्या बाजूच्या िवगमध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्या एका माणसाचे सर्व सामान दुपारी दोन वाजता इमारतीच्या खाली ट्रक उभा करून नेले गेले. भाडेकरू जागा सोडून जात असावा असे समजून शेजाऱ्यांनी लक्ष दिले नाही. मग मी त्याला म्हणालो, ‘अरे मंत्रालयासारख्या ठिकाणी तिसऱ्या मजल्यावर लागलेली आग वरचे सर्व मजले भक्ष्य करते तर तुझ्या खालच्या मजल्यावरील आगीची झळ तुला बसणार नाही हे शक्य आहे का? आणि २००५ साली आलेल्या पुरांत मुंबईतील काही इमारतीत तर दुसऱ्या मजल्यांपर्यंत पाणी आले होते.’’ आपल्यावर वेळ येत नाही तोपर्यंत आपण निर्धास्त असतो.
वाहन विमा
बहुतेक वेळा कायदेशीरदृष्टय़ा बंधनकारक असल्याने हा विमा विक्रेता किंवा कर्ज देणाऱ्या बँकेमार्फत घेतला जातो. यात दरवर्षी येणारा घसारा विचारांत घेऊन त्याचा हप्ता कमी करून घेणे महत्त्वाचे असते. बहुतेक सर्वजण गेल्यावर्षी दिलेल्या रकमेचा धनादेश यावर्षी पुन्हा देतात.
या व्यतिरिक्त गरजेनुसार सर्वसाधारण विमा कंपन्या तुमची जोखीम आपल्यावर घेत असतात. या योजना प्रत्येकास लागू होतीलच असे नाही. उदा. प्रवासात सामानाचा व अपघात विमा, लग्न समारंभात दागिने-सामान (पाहुण्यांचासुद्धा) यांचा विमा, व्यावसायिकांसाठी (प्रोफेशनल इंडेम्निटी) इ.
या सर्व जोखीमांपासून संरक्षणाची गरज प्रत्येक नागरिकास असेलच असे नाही. म्हणून त्याची माहिती येथे दिलेली नाही. सर्वसाधारण विमा प्रतिनिधीजवळ किंवा वेबसाइटवर ही माहिती उपलब्ध असते.
आपल्या स्वत:च्या सुरक्षेबाबत आपण खूपदा निष्काळजी असतो. आपल्याला कोणकोणत्या जोखीमेचे नियोजन करणे आवश्यक आहे. याची आपल्याला जाणीव नसते. म्हणून या लेखांचे नाव ‘संपूर्ण सुरक्षा’ ठेवले. आधीच्या दोन्ही लेखांवर खूप प्रतिक्रिया, प्रश्न व फसवल्याच्या तक्रारी आल्या. त्यातील सर्वाना इमेलने उत्तरे दिली आहेत. त्यापकी काही पुढील लेखात पाहू.
sebiregisteredadvisor@gmail.co
(लेखक सेबीकडे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illnesses health insurance
First published on: 06-04-2015 at 07:33 IST