जाहल्या काही चुका..: ग्रोथ की व्हॅल्यू?             

गेल्या दशकात, रोखे गुंतवणुकीवरील उत्पन्न आणि ‘व्हॅल्यू इंव्हेिस्टग’मध्ये सकारात्मक सहसंबंध दिसून आला आहे.

वसंत कुळकर्णी shreeyachebaba@gmail.com

रोखे गुंतवणुकीवरील उत्पन्न/ परतावा आणि ‘व्हॅल्यू इंव्हेिस्टग’मध्ये सकारात्मक सहसंबंध दिसून आला आहे. गेल्या दशकात तो अनुभवास आला आणि सध्या जगभरात महागाई आणि व्याजदर दोन्ही वाढत असता, रोख्यांवरील वाढणाऱ्या परताव्यातूनही तो अनुभवास येत आहे. त्यामुळे ‘ग्रोथ’कडून ‘व्हॅल्यू’कडे संक्रमित होण्याचीदेखील हीच वेळ आहे.

समभाग गुंतवणुकीत ग्रोथ आणि व्हॅल्यू या दोन मूलभूत गुंतवणूक पद्धती आहेत. ‘ग्रोथ’ पद्धतीत गुंतवणूकदार अशा कंपन्यांचा शोध घेतात ज्यांच्या उत्सर्जनात (अर्निग) सातत्याने वाढ होत असते. तर ‘व्हॅल्यू’ गुंतवणूकदार अशा कंपन्यांच्या शोधात असतात ज्यांचे मूल्य (बाजारभाव नव्हे) गुंतवणूकयोग्य पातळीवर आहे.

या दोन्ही शैली एकमेकांना पूरक असल्यामुळे, सर्वसाधारणपणे त्यांचा एकत्र वापर होताना दिसतो. या दोन्ही शैली पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यात मदत करतात.  ढोबळमानाने मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंड हे ‘ग्रोथ’ पद्धतीचे प्रतिनिधित्व करतात तर लार्जकॅप आणि व्हॅल्यू फंड हे ‘व्हॅल्यू’ रणनीतीची उदाहरणे आहेत. विस्तृत बाजार मूल्यांकनापेक्षा कमी मूल्यांकन असलेल्या कंपन्यांचा शोध घेत निधी व्यवस्थापक गुंतवणूक करतात. अनेकदा कंपन्यांच्या उत्सर्जनात अपेक्षित वृद्धी न दिसणे, नकारात्मक प्रसिद्धी किंवा कायदेशीर समस्या, या व अशा अनेक कारणांनी कंपनीच्या नजीकच्या काळातील उत्सर्जनाबाबत शंका निर्माण होऊन बाजारभावात घसरण झाल्याने ‘ग्रोथ स्टॉक’चे परिवर्तन ‘व्हॅल्यू स्टॉक’मध्ये होते. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या करोनाच्या सुरुवातीच्या काळात ‘व्हॅल्यू स्टॉक’ होत्या. करोना ऐन भरात असताना त्यांच्या मूल्यांत झालेल्या वाढीमुळे त्या कंपन्या ‘ग्रोथ स्टॉक’ झाल्या. तर अलीकडच्या घसरणीने ते पुन्हा ‘व्हॅल्यू स्टॉक’ झालेले दिसत आहेत.

सतत उत्सर्जनात वाढ झाल्याने कंपन्यांच्या बाजारभावात पराकोटीची वाढ होते. एखाद्या तिमाहीत समाधानकारक वाढ न झाल्याने बाजारभावात घसरण संभवते. व्यापक बाजारपेठ अस्थिर असताना ‘ग्रोथ स्टॉक’ विकत घेण्यात धोका असतो. कंपनीबद्दलच्या एखादी नकारात्मक बातमी कंपनीच्या बाजारभावात मोठय़ा घसरणीला कारण ठरू शकते. 

नवीन आर्थिक वर्ष सुरू होताना निफ्टीने १८,००० चा टप्पा ओलांडला. ही तेजी जेमतेम आठवडाभर टिकली नसली तरी, कंपन्यांच्या भविष्यातील उत्सर्जनाबाबत गुंतवणूकदारांना खात्री वाटत नसल्याने विदेशी गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात विक्री केली. साहजिकच निर्देशांकांचा ‘पी/ई’ वरच्या पातळीवर असल्याने नव्याने गुंतवणूक करण्याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. सातत्याने मागील दोन वर्षांत, ‘एमएससीआय ग्रोथ निर्देशांका’ने आर्थिक वर्ष २०२१ आणि २०२२ मध्ये अनुक्रमे ९० टक्के आणि १६ टक्के नफा मिळवून दिला आहे. ‘एमएससीआय व्हॅल्यू निर्देशांका’ने आर्थिक वर्ष २०२१ आणि २०२२ मध्ये अनुक्रमे ५६ टक्के आणि १७ टक्के नफा मिळवून दिला आहे. ‘एमएससीआय ग्रोथ निर्देशांक’ रोज नवीन उच्चांक गाठत असताना गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्ष २०२३ साठी कोणत्या रणनीतीचा अवलंब करावा, ‘ग्रोथ’ की ‘व्हॅल्यू’?

समष्टी अर्थशास्त्राचा (मॅक्रो इकोनोमिक्स) विचार केल्यास, जगभरात महागाई आणि व्याजदर दोन्ही वाढत असल्याने रोख्यांवरील परतावा वाढणे अपरिहार्य आहे आणि परतावा वाढत असल्याचे दिसतही आहे. गेल्या दशकात, रोखे गुंतवणुकीवरील उत्पन्न आणि ‘व्हॅल्यू इंव्हेिस्टग’मध्ये सकारात्मक सहसंबंध दिसून आला आहे. ज्या ज्या वेळी केंद्र सरकारच्या १० वर्षांच्या उत्पन्नात (यील्ड) वाढ झाली आहे, त्या काळात ‘एमएससीआय व्हॅल्यू निर्देशांका’ने ‘एमएससीआय ग्रोथ निर्देशांका’पेक्षा सरस कामगिरी केली आहे. तसेच १० वर्षांच्या रोखे उत्पन्नात घसरण झाली तेव्हाच्या काळात, ‘एमएससीआय व्हॅल्यू निर्देशांक’ मोठय़ा प्रमाणात घसरलेला दिसून आला. पुढे, सध्याच्या समष्टी अर्थशास्त्राचे चलन हे भविष्यात महागाई आणि व्याज दोन्ही वाढल्याने पुरवठा साखळीत व्यत्यय, त्यामुळे संभाव्य मागणीतील घट अशा दिशेने सुरू आहे. यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर अशंत: परिणाम होऊन कंपन्यांच्या उत्सर्जनवाढीला खीळ बसेल. करोनापश्चात मजबूत फेरउभारीची अपेक्षा होती. त्यामुळे उत्सर्जनातील वाढीचा अंदाज घेत कंपन्यांची भाववाढ गृहीत धरण्यात आली होती. या भाववाढीची परिपूर्ती झाल्याने आणि वाढत्या महागाईमुळे उत्सर्जनाला खीळ बसल्याने कंपन्यांच्या भावात घसरण संभवते. ‘स्टॉक प्राइसेस आर स्लेव्हज् ऑफ अर्निग’ असे सुवचन आहे. त्यामुळे ‘ग्रोथ’कडून ‘व्हॅल्यू’कडे संक्रमित होण्याची हीच वेळ आहे.

शिफारसयोग्य व्हॅल्यूम्युच्युअल फंड

फंड                मालमत्ता (कोटी रुपये)   क्रिसिल  रॅकिंग

आयडीएफसी स्टर्लिग व्हॅल्यू फंड   ४५१४         टॉप क्वारटाइल

टेम्पल्टन इंडिया व्हॅल्यू फंड      ६३३          टॉप क्वारटाइल

एल अँण्ड टी इंडिया व्हॅल्यू फंड    ७८२८         अप्पर मिडल क्वारटाइल

निप्पॉन इंडिया व्हॅल्यू फंड       ४३९४         अप्पर मिडल क्वारटाइल

भारतीय गुंतवणूकदरांसाठी ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’चा अवलंब करणारे १६ फंड उपलब्ध आहेत. यापैकी चार फंडांची शिफारस करीत आहे.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Investment in mutual funds mutual fund investment zws

Next Story
‘अर्था’मागील अर्थभान : योजना व वेळापत्रक (प्लॅनिंग अँड शेडय़ूलिंग) – भाग १
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी