रपेट बाजाराची : जोखीम टाळण्याकडे कल

दुचाकी वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या बजाज ऑटोच्या वाहन विक्रीचे आकडे दहा टक्क्यांनी खाली आले.

|| सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

जागतिक बाजारातील प्रतिकूल घडामोडींची गडद सावली असलेल्या गेल्या सप्ताहात भारतीय भांडवली बाजारात काही अपवाद वगळता कुठल्याच कंपन्यांच्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीचे स्वागत झाले नाही. अमेरिकी रोखे बाजारातील व्याज परताव्याच्या दरात अचानक आलेल्या उसळीने आणि खनिज इंधनाच्या दरवाढीने जगातील सर्वच बाजार ढवळून निघाले. गुंतवणूकदारांची जोखीम क्षमता कमी झाली. भारतीय बाजारात देखील विदेशी गुंतवणूकदारांच्या समभाग विक्रीचा सपाटा आणि नफावसुलीवर जोर दिल्याने भांडवली बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीला साडेतीन टक्क्यांचा तडाखा बसला. व्यापक बाजाराचे  प्रतिनिधित्व करणारे स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकात विक्रीच्या जोराने दोन टक्क्यांची घट झाली. उच्च मूल्यावर व्यवहार होणाऱ्या सर्वच समभागात नफावसुली मोठय़ा प्रमाणावर झाली.

सरल्या सप्ताहात अनेक कंपन्यांनी नऊ महिन्यांतील आर्थिक कामगिरीचे निकाल जाहीर केले. दुचाकी वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या बजाज ऑटोच्या वाहन विक्रीचे आकडे दहा टक्क्यांनी खाली आले. मात्र किमतींमुळे नफ्याचे प्रमाण कायम राखता आले. सिएट टायरच्या निकालातही वाहन उद्योगावरील ताण प्रतिबिंबित झाला. सध्या गुंतवणुकीसाठी वाहन क्षेत्रापासून दोन हात लांब राहिलेले योग्य ठरेल. हिंदूस्तान युनिलिव्हरच्या विक्रीत केवळ दोन टक्के वाढ साधता आली. पण वाढवलेल्या किमतींमुळे नफ्याचे प्रमाण टिकवून ठेवता आले. रंग विक्री करणाऱ्या एशियन पेन्ट्सने महसुलात २५ टक्के तर नफ्यात १८ टक्के वाढ नोंदवली. कंपनी उत्पादनांच्या किमती वाढवून कच्च्या मालातील दरवाढ ग्राहकांकडून वसूल करू शकते. शिवाय रंगांच्या नक्त विक्रीतील होणारी वाढ ही कंपनीच्या प्रगतीच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. एल अँड टी इन्फोटेक आणि एल अँड टी टॅक्नॉलॉजी या दोन्ही कंपन्यांनी सरलेल्या तिमाहीत सरस कामगिरी करत उत्तम निकाल जाहीर केले. मात्र बाजारातील पडझडीची झळ यांसारख्या समभागांना अधिक बसली. या कंपन्यांच्या समभागात पडझड होण्यामागे कामगिरीचा संबंध नाही. यामुळे या कंपन्यांच्या समभागांची किंमत नव्या खरेदीसाठी आकर्षक आहे. बजाज फायनान्स, माईंड ट्रीसारख्या कंपन्यांनी उत्तम निकाल जाहीर केले. पण निकालांनंतर त्यांच्याही समभागात मोठी घसरण झाली.

टाटा एलॅक्सी : बाजारातील पडझडीत अपवाद ठरला तो म्हणजे टाटा समूहातील आणखी एक हिरा टाटा एलॅक्सी. बाजारात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्व समभाग पडत असताना या समभागात १६ टक्के वाढ झाली. टाटा एलॅक्सी ही ऑटोमोटिव्ह, ब्रॉडकास्ट, कम्युनिकेशन्स, हेल्थकेअर आणि ट्रान्सपोर्टेशन अशा उद्योगांसाठी जगातील आघाडीच्या डिझाइन आणि तंत्रज्ञान सेवा प्रदात्यांपैकी एक आहे. क्लॉउड, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, कृत्रिम बुध्दिमत्ता अशा अद्ययावत तंत्रझान क्षेत्रातील या कंपनीच्या समभागात कधी घसरण होईल तेव्हा जमवावेत.

माईंड ट्री : कंपनीची मिळकत सलग चौथ्या तिमाहीत पाच टक्क्यांहून अधिक प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत ही वाढ ३६ टक्के आहे. कंपनीला नफ्याचे प्रमाणही ३४ टक्के राखता आले आहे. कंपनीला क्लॉऊड टेक्नॉलॉजीवर आधारित सेवांसाठी दहा नवीन कंत्राटे गेल्या तीन महिन्यांत मिळाली. कंपनीला लार्सन अँड टुब्रोचे पाठबळ आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडील समभागांचे प्रमाण फक्त साडेतेरा टक्के आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमध्ये सहभागी होण्यासाठी सध्याच्या निकालानंतर झालेल्या घसरणीत खरेदी केल्यास सहा महिन्यांत फायदा मिळवून देऊ शकते.

अल्ट्राटेक सिमेंट : कंपनीने सरलेल्या तिमाहीत चांगली कामगिरी करत बाजाराला सुखद धक्का दिला आहे. मालवाहतुकीतील वाढता खर्च आणि इंधनावरील खर्चामुळे नफ्याचे प्रमाण घटले असले, तरी निव्वळ नफ्यात झालेली आठ टक्के वाढ बाजाराच्या अपेक्षेपेक्षा अधिक ठरली. निकालानंतर बाजारात सकारात्मक प्रतिक्रिया दिसून आली. सरलेल्या तिमाहीत अवकाळी पाऊस आणि सणासुदीच्या दिवसांमुळे सिमेंटची मागणी घटलेली होती जी पुढच्या तिमाहीत पुन्हा पूर्वीसारखी होईल. इंधनाचे दरही आता स्थिर झाले आहेत. थोडय़ा घसरणीची वाट पाहून या समभागात खरेदी करावी.

कंपन्यांच्या नऊ महिन्यांचे निकाल उत्साहवर्धक येत आहेत. चीनखेरीज आणखी एका पुरवठादारावर अवलंबून राहण्याचा जागतिक धोरणांचा फायदा भारताच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे. बँकांचे ताळेबंद सुधारलेले आहेत. तंत्रज्ञान कंपन्यांना डिजिटायझेशनच्या मागणीचा फायदा मिळत आहे. किरकोळ गुंतवणूकदार मोठय़ा प्रमाणात बाजारात सहभागी झाले आहेत. त्यामुळे दीर्घ मुदतीसाठी बाजाराचा कल उन्नतीचा असला तरी अल्प मुदतीमधील व्याजदर वाढ व इंधन दरवाढ बाजाराला काबूत ठेवतील. या महिन्याचा हा शेवटचा आठवडा असल्यामुळे वायदे बाजाराची मासिक सौदा पूर्ती होईल. अर्थसंकल्पाच्या आधीचा सप्ताह असल्यामुळे असणारी अनिश्चितता आणि अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हच्या बैठकीकडे सर्वच बाजारांचे लक्ष लागले आहे. यामुळे या आठवडय़ात बाजारात पराकोटीची अस्थिरता राहण्याची शक्यता आहे.

सप्ताहातील या घडामोडींकडे लक्ष ठेवा

*  कोफोर्ज, अकिल्या काळे, आयआयएफएल, मोतीलाल ओसवाल, एनआयआयटी लि. ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या कंपन्या डिसेंबरअखेरच्या तिमाहीतील  आर्थिक कामगिरीचे निकाल व अंतरिम लाभांश जाहीर करतील.

*  मॅंगलोर रिफायनरी, लॉरस लॅब, सिप्ला, एसबीआय कार्ड, कोलगेट, अ‍ॅक्सिस बँक,  कोटक बँक, मारुती सुझुकी, पिडिलाईट, लार्सन अँड टुब्रो या कंपन्या डिसेंबरअखेरच्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

*  अदानी विल्मर या खाद्यतेल व वस्तू निर्मात्या कंपनीची प्रारंभिक समभाग विक्री २७ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हची व्याजदर आढावा बैठक

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Investment in share market share market analysis akp

Next Story
‘अर्था’मागील अर्थभान : कमाल पातळी (मॅक्सिमम लेव्हल)
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी