करेल मनोरंजन जो मुलांचे,
जडेल नाते प्रभुशी तयाचे
    – साने गुरुजी
मुंबई शेअर बाजाराची नेहमीच गंमत वाटते. इथे कुठल्याही व्यवसायात असणाऱ्या कंपनीची नोंदणी होऊ शकते. इथे शरीर तंदुरुस्त ठेवणारी (तळवळकर्स) तर शरीर दुरुस्त करणारी  (अपोलो हॉस्पिटल), बांधकाम कंपनी (हिंदुस्थान कंस्ट्रक्शन) आहे; तसेच ते बांधकाम तोडण्यासाठी स्फोटके बनविणाऱ्या (प्रीमियर एक्स्प्लोसिव्ह), दवा (डॉ. रेड्डी) व दारूमध्येसुद्धा  (युनायटेड स्पिरिट्स) उंची दारूपासून ते देशी दारूपर्यंत (जीएम ब्रुअरिज्) अशा विविध ढंगी कंपन्या ‘बीएसई’मध्ये नांदत असतात.
या महिन्याचे सूत्रच मुळी वेगळ्या वाटेवरच्या कंपन्या असल्यामुळे आजची कंपनी लहानग्यांच्या सुंदर दुनियेत व्यवसाय करणारी म्हणजे तीन वर्षांखालील मुलांसाठी शाळा चालविणारी. ‘द ट्री हाऊस एज्युकेशन अॅण्ड एक्सेसरिज लिमिटेड’ (ट्री हाउस) शिशूवर्गपूर्व (प्रीस्कूल) शाळांची साखळी चालविणारी कंपनी असून २००३ मध्ये मुंबईत पहिला बालवर्ग सुरू करून कंपनीने व्यवसायाचा श्रीगणेशा केला. ऑगस्ट २०११ मध्ये प्राथमिक खुली विक्री करून शेअर बाजारात नोंदणी केली. या खुल्या विक्रीला ‘क्रिसिल’नेही ३/५ मानांकन दिले होते.
‘ट्री हाऊस’ ही शिशुवर्गपूर्व शाळांची साखळी चालविणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीच्या भारतात ३२५ शाळा असून त्यापकी ८०% शाळा या मालकीच्या आहेत. उरलेल्या ‘फ्रँचाइजी’ तत्त्वावर चालविल्या जातात. गेल्या पाच वर्षांत शाळेचे शुल्क ४०% तर नफा ३८% आवर्ती दराने वाढत आहे. शिशुवर्गपूर्व शिक्षणाचा हा व्यवसाय सरकारच्या नियंत्रणाबाहेर असल्यामुळे शुल्क निर्धारणासारख्या समस्येला कंपनीला तोंड द्यावे लागत नाही. याची दुसरी बाजू म्हणजे कोणालाही या व्यवसायात प्रवेशाची बंधने नाहीत. एखाद्या निवासी इमारतीतही अशा प्रकारची शिशुवर्गपूर्व शाळा सहज उघडता येते. तरीही या कंपनीने आपली नाममुद्रा (ब्रॅडिंग) ग्राहकांवर ठसविण्यासाठी, दीर्घकाल नेतृत्व करण्यासाठी धोरण ठरविले आहे. आतापर्यंत मुंबई-पुण्यापुरते (२२१-३२५) असणारे शाळांचे जाळे आता विस्तृत करण्यासाठी इतर प्रमुख शहरांमध्ये व जिल्हा पातळीवर जाण्याचे कंपनीने ठरविले आहे. कोलकाता व गुवाहाटी ही शहरे शाखा विस्तारासाठी कंपनीने निवडली आहेत. भारतीयांची इंग्रजी बोलणे शिकण्याची मानसिकता, कुटुंबातील दुहेरी उत्पन्न, मर्यादित कुटुंब ठेऊन जीवनमान उंचावण्याची मानसिकता तसेच दोन तासांसाठी मुलांना शाळेत अडकवून स्वत:ची सुटका करून घेण्याची असलेली सोय या गोष्टी या व्यवसायवृद्धीला पोषक आहेत.
सप्टेंबर २०१२ ला संपलेल्या तिमाहीत रु. २८.२८ कोटी शाळाशुल्क कंपनीकडे गोळा झाले. तर शुल्काव्यतिरिक्त रु. ३.१६ कोटी इतर उत्पन्न म्हणून मिळाले. घसारापश्चात करपूर्व नफा रु. १३.८० कोटी होता. तर निव्वळ नफा रु. ९.९३ कोटी झाला. गेल्या वर्षी प्रति समभाग मिळकत रु. ६.४५ होती. या वर्षीचा अंदाज रु.१०.२१ आहे. ही कंपनी सूक्ष्म भांडवली कंपनी (Micro Cap) असल्यामुळे गुंतवणुकीत जोखीम अधिक आहे. परंतु व्यवसायवृद्धीची अधिक शक्यता असल्यामुळे मर्यादित जोखीम पत्करून वार्षकि ४० ते ५०% परतावा मिळणे शक्य असल्यामुळे शिफारस करणे योग्य वाटते. खाजगी गुंतवणूकदारांनी (Private Equity) भांडवल गुंतवल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी संचालक मंडळावर असणे हे उद्यम व्यवसायाच्या (Corporate Governance) दृष्टीने सर्वच कायद्यांचे कठोर पालन व त्याचबरोबर पुरेसे लाभांश वाटपाच्या दृष्टीने व्यवस्थापनावर वचक असणे, ही एक दिलासा देणारी बाब आहे.
हे लेखन करत असतानाच गेल्या तीन दिवसात या कंपनीचा भाव १६% ने वधारला. ३ डिसेंबर रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बठक होऊन दोन महत्वाचे निर्णय झाले. पहिला – कंपनीचे भागभांडवल ३५ कोटी रुपयांवरून ४० कोटी रुपये करण्यात आले. ओन मोरिशस व आदित्य बिर्ला ट्रस्टी कंपनी – आदित्य बिर्ला सन लाइफ प्रायव्हेट इक्विटी फंड या दोन गुंतवणूकदारांना मिळून १८.५० लाख शेअर्सचे वाटप प्रत्येकी रु. २२२.६० या दराने करण्यात आले. कंपनीचे प्रवर्तकांना १८ लाख वॉरंटचे वाटप करण्यात आले. या वॉरंटचे रु. २२२.६० ला एका शेअरमध्ये प्रवर्तक १८ महिन्यांच्या आत परिवर्तन करू शकतील. सध्या प्रवर्तकांचा हिस्सा २९% इतका कमी असणे, ही गोष्ट नकारात्मक होती; परंतु प्रवर्तकांना वॉरंटचे वाटप केल्यामुळे त्यांचा हिस्सा वाढेल. सर्व बाजूंनी विचार करून या कंपनीत १ ते ३% पेक्षा जास्त गुंतवणूक करू नये.      
केअर अव्वल श्रेणी
केअर ही प्रामुख्याने कर्जरोख्यांचे पतमानांकन व प्राथमिक खुल्या विक्रीची श्रेणी ठरविण्याच्या व्यवसायात १९ वषारंपासून असलेली व भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनीची आहे. या कंपनीच्या शेअर्सची (७२ लाख) प्राथमिक भागविक्री सुरु झाली असून उद्यापर्यंत (११डिसेंबर) गुंतवणूकदार अर्ज करू शकतात. एकूण विक्रीच्या ३५% समभाग (२५,१९,८९५) किरकोळ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहेत. हे समभाग खरेदीसाठी रु. ७००-७५० हा किंमतपट्टा कंपनीने ठरविला आहे. आयडीबीआय, कॅनरा बँक, स्टेट बँक व इतर अर्थसंस्था या विक्रीतून आपल्या मालकीचा हिस्सा विकणार आहेत. विक्रीपश्चात आयडीबीआयचा हिस्सा २५% राहणार आहे. सुरुवातीला बँका, उत्पादने, पायाभूत सुविधा, वीजनिर्मिती कंपन्यांच्या कर्जरोख्यांची पत ठरविण्याचे मुख्य काम करत प्राथमिक खुल्या विक्रीची श्रेणी ठरविणे, बँकांनी पुनर्रचना केलेल्या कर्जाची पत ठरविणे आदी शुल्काधारित कामे करण्यास सुरुवात केली. कंपनीने आतापर्यंत ४,६४४ ग्राहकांसाठी १९,०५८ पतमापनाची कामे केली आहेत. जोपर्यंत ते कर्ज अथवा कर्जरोख्यांची संपूर्ण परतफेड होत नाही तोपर्यंत कंपनीला पतमापन शुल्क मिळत असते. क्रिसिल व इक्रा या अन्य पतमानांकन कंपन्यांपेक्षा या कंपनीची नफा क्षमता उजवी आहे.
‘केअर’ ही कंपनी पतमापनाच्या व्यवसायात असल्यामुळे यंदाच्या प्राथमिक खुल्या विक्रीची श्रेणी ठरविण्यापासून सेबीने सूट दिली आहे. या विक्रीतून ५०० ते ५४० कोटी रुपये उभारण्याचे  उद्दिष्ट आहे. रु. ७०० व रु. ७५० किंमतीचे प्रती समभाग उत्पन्नाशी प्रमाण (पीई) अनुक्रमे १७ व १८.३१ असे येते. तर किंमतीशी पुस्तकी मूल्याचे प्रमाण अनुक्रमे ३.८७ व ४.०५ येते. याचा अर्थ विक्री वाजवी भावात होत आहे, असेच म्हणावे लागेल. हा शेअर बाजारात उलाढाल सुरु होताच मोठी भांडवल वृद्र्धी, १५ ते २५% नक्की मिळेवेल. परंतु थोडा दीर्घकालीन विचार केल्यास हा शेअर नक्की घ्यावा, असा आहे. परंतु मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा या कंपनीच्या विक्रीवर विपरित परिणाम होऊ शकतो. सध्या शक्य असेल तितक्या शेअरसाठी अर्ज नक्की करा. बाजारात उलाढाल सुरु झाली की परत आढावा घेऊच.       
ट्री हाऊस लि.
दर्शनी मूल्य     : रु. १०/-
मागील बंद भाव     : रु. २७५.२५              (७ डिसेंबर)
वर्षांतील उच्चांक :  रु. २८९.९०
 वर्षांतील नीचांक    :  रु. १४०.५
वर्षांनंतर अपेक्षित भाव : रु. ३७०
पत तुलना
     केअर       क्रिसिल        इक्रा
दर्शनीमूल्य (रु.)    १०    १    १०
वार्षकि उत्पन्न (कोटी रु.)       २१८.७९    ६८२.१७    १५९.०६
निव्वळ नफा (कोटी रु.)    ११५.७६    १८६.५१    ५०.९०
पुस्तकी मूल्य (रु.)    १४९.४८    ५१.४६    २८२.९२
प्रती समभाग उत्पन्न
(ईपीएस – रु.)           ४०.५४    २८.२८    ५०.९०
किंमत/उत्पन्न (पीई)       —-    ३५.०८    २७.८६
बंद भाव (४ डिसें. २०१२)       —-    १,००६.७५    १,४३२.१५