मागील लेखामध्ये आपण फ्युचर्स आणि  कॅश मार्केटचा तुलनात्मक अभ्यास केला. आज आपण रोख बाजार / भविष्यकालीन बाजार (Futures Market) यामध्ये होणारा नफा/तोटा तक्त्याच्या स्वरूपात समजून घेऊ.
फ्युचर्स किंवा ऑप्शन्सची खरेदी विक्री केली असता संभाव्य नफा-तोटा दृश्य स्वरूपात दाखविता यावा याकरिता नकाशांचा उपयोग केला जातो. ऑपन्शन्सच्या अनेक प्रकारच्या रणनीती अतिशय उत्तमरीतीने दर्शवण्यासाठी नकाशे उपयुक्त ठरतात. खरेदीदाराचा आणि विक्रेत्याचा नफा/तोटा तक्ता कसा असेल हे पाहू.
समजा निफ्टी फ्युचर्स खरेदीदाराची खरेदी किंमत जर ८७०० असेल व त्याने त्याच किमतीला ते विकले तर नफा किवा तोटा शून्य होईल. मात्र त्याने ८,८०० ला विकले असता त्याला नफा १०० रुपये होईल; ८९०० ला विकले असता त्याला २०० रुपयांचा नफा होईल. उलट जर किंमत कमी झाली व त्याला ते ८६०० ला विकावे लागले असता १०० रुपये तोटा होईल आणि ८५००ला विकले असता तोटा २०० रुपये होईल. हे सोबतचा  रेषात्मक तक्ता  (Linear Chart) तक्ता दर्शवितो. आपणास हे लक्षात येईल की, फ्युचर्स खरेदीमध्ये अमर्याद नफा व अमर्याद तोटा होऊ शकतो.
फ्युचर्स खरेदीदाराचा नफा:
उदाहरणार्थ, हिंदुस्तान युनिलीव्हर लि. (एचयूएल) फ्युचर्स शेअर्स संख्या (Lot Size) ५०० आहे व २१ जानेवारी २०१५ रोजी बाजार सुरु होताना एचयूएल फ्युचर्सची किंमत ९०३ रुपये होती. त्यामुळे एकंदर एका लॉटची किंमत ४,५१,५०० रुपये होते. परंतु आपण हा केवळ भविष्यकालीन करार करत असल्याने आपणास केवळ १५% मार्जीन म्हणजे ६७.७२५ रुपये भरून व्यवहार करता येतो.
एखाद्याने बाजार सुरू होताना सकाळी ९ वाजून १५ मिनिटाला ९०३ रुपयाला शेअर्स खरेदी केले आणि एचयूएल फ्युचर्सचा भाव बाजार बंद होताना ९४५ रुपये झाला असता  विक्री करून व्यवहार पूर्ण केला, तर त्या व्यक्तीला एकंदर नफा वर दिलेल्या तक्त्याप्रमाणे होईल. फ्युचर्स विक्रेत्याचा नफा:
उदाहरणार्थ, आयटीसी फ्युचर्स शेअर्स संख्या (लॉट) १००० आहे आणि २१ जानेवारी २०१५ रोजी आयटीसी फ्युचर्सची किंमत बाजार सुरू होताना ३७३.२० रुपये होती. त्यामुळे एका लॉटची एकंदर किंमत ३,७३,२०० रुपये होते. परंतु आपण हा केवळ भविष्यकालीन करार करीत असल्याने आपणास केवळ १५% मार्जीन भरून म्हणजे रुपये ५५,९८० रुपये भरून व्यवहार करता येतो.एखाद्याने सदर करार बाजार सुरु होताना सकाळी ९ वाजून १५ मिनिटाला रुपये ३७३.२० रुपयाला विकला असता व आयटीसी फ्युचर्सचा भाव त्या दिवशी बाजार बंद होताना ३५३.७५ रुपयांवर घसरला असेल, तर त्यावेळी व्यवहार पूर्ण केला असता, त्या व्यक्तीला एकंदर नफा खालीलप्रमाणे होईल. वरील नफ्या-तोटय़ाची उदाहरणे केवळ भविष्यकालीन बाजाराच्या संकल्पना समजावून देण्यासाठी मांडण्यात आल्या आहेत तसेच वरील उदाहरण क्र १ मध्ये प्रथम खरेदीच्या ऐवजी विक्री केली असता व उदा. क्र २ मध्ये प्रथम विक्रीच्या ऐवजी खरेदी केली असता तेवढाच मोठा तोटा झाला असता. अमर्याद नफा किया अमर्याद तोटा हे भविष्यकालीन बाजाराचे वैशिष्ट्य आहे.    (क्रमश:)
primeaocm@yahoo.com
(पुढील लेखात विकल्प/ ऑप्शन्सबद्दल सविस्तर)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Limitations profit and loss
First published on: 26-01-2015 at 12:50 IST