समीर नेसरीकर

आयुष्यात गुंतवणुकीला जितक्या लवकर सुरुवात करू तितके खरे तर चांगले; पण वयाच्या विशी अथवा तिशीत गुंतवणुकीला सुरुवात झाली नसेल त्यांनी निराश होण्याचे कारण नाही. कारण वयाच्या कोणत्याही टप्प्यावर गुंतवणुकीचा पोर्टफोलियो तयार करता येईल, असे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे अनेक प्रकार सध्या उपलब्ध आहेत..

भारतीय भांडवल बाजारात यशस्वी होण्यासाठी जेवढे महत्त्व अभ्यासाला आहे तेवढेच ते ‘नियमितता आणि संयम’ या दोन गुणांना आहे. समभागसंलग्न म्युच्युअल फंडांच्या अनुषंगाने बोलायचे झाल्यास, हे दोन गुण ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडून मोठी संपत्ती निर्मिती केली जाण्याची शक्यता खूपच जास्त. मागील ‘कांचनसंध्येच्या निमित्ताने’ लेखात (अर्थवृत्तान्त, ११ जुलै २०२२) म्हटले होते की, ‘रिटायरमेंट प्लॅन’ची आखणी आणि अंमलबजावणी आयुष्यात जेवढी लवकर करू तेवढं चांगलं. त्यासाठी सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) माध्यमातून आपली दीर्घकालीन गुंतवणूक ‘इक्विटी अ‍ॅसेट क्लास’मध्ये करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने विवेचन हे पुढील तक्त्याद्वारे स्पष्ट होईल. तीन समवयीन मित्रांची ही कहाणी आहे. तिघांनी मिळून वयाच्या २५ वर्षी समभागसंलग्न म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायचा निर्णय घेतलेला. त्यांची वाटचाल कशी झाली हे ेसोबत दिलेल्या तक्त्यावरून पाहू या.

तक्ता पाहून दिसते ते हे की, विनीतने पहिली १० वर्षे काहीच गुंतवणूक केली नाही; परंतु वयाच्या ३५ व्या वर्षांपासून दरमहा १५,००० रुपये अशा प्रकारे २५ वर्षे पैसे गुंतविले. असे असूनसुद्धा सतीशच्या एकूण निवृत्ती निधीपेक्षा त्याचा निधी (वयाच्या साठीला बाजारभावानुसार होणारी रक्कम) ३.०८ कोटी रुपयांनी कमी आहे. याचे कारण सतीशने गुंतवणुकीस वयाच्या २५ व्या वर्षी लवकर सुरुवात केली होती. जरी त्याने दहाच वर्षे गुंतवणूक केली तरी जो निधी सतीशच्या वयाच्या ३५ व्या वर्षी बाजारभावाने जमा झालेला तो त्यापुढे वयाच्या साठीपर्यंत वाढत गेला. सांगायचा मुद्दा हा की, तुम्ही जेवढी लवकर सुरुवात कराल तेवढा जास्त निधी तुमच्याकडे जमा होईल.

अनेक कुटुंबांशी बोलताना हे जाणवतं राहतं की, गुंतवणूक करायची आहे; पण त्यांना वाटतं की, छोटय़ाशा गुंतवणुकीतून काय फरक पडणार आहे किंवा ‘अमुक अमुक डील’ झाल्यावर आपण सुरुवात करू या. त्या सर्वानी वरच्या उदाहरणातील अंतिम निधींमधील फरक अभ्यासावा. आपण अभय आणि सतीश यांच्या अंतिम निधींमधला फरक पाहिला तर तो जवळजवळ ३.८२ कोटी रुपये एवढा आहे. अभयने लवकर सुरुवात करून ‘नियमितता आणि संयम’ ठेवून त्यांनी त्यांचा ‘निवृत्ती कोष – रिटायरमेंट फंड’ सर्वाधिक जमा केला आहे. वरील उदाहरण प्रत्येकाने अभ्यासणे गरजेचे आहे. चांगले परिणाम दिसण्यासाठी आपल्याला दीर्घकालीन गुंतवणुकीची मानसिकता तयार करावी लागेल.

संपत्तिनिर्मितीचा वेग तुम्ही ‘एसआयपी टॉप अ‍ॅप’द्वारेही वाढवू शकता. करायचे एवढेच की, गुंतवणूक करतानाच ‘दरवर्षी माझी एसआयपी गुंतवणूक किती रुपयांनी/ टक्क्यांनी वाढवावी’ याबद्दल आधीच नमूद करावे. म्हणजे जसजसे दरवर्षी तुमचे उत्पन्न वाढेल त्या प्रमाणात तुमची ‘एसआयपी’ रक्कम आपोआप वाढवली जाईल आणि तुम्ही तुमचे निवृत्तीपश्चात्त कोषाचे ठरवलेले लक्ष्य आधीच गाठू शकाल.

येथे हेही नमूद केले पाहिजे की, ज्यांची समभागसलंग्न फंडातील गुंतवणुकीची सुरुवात, वयाच्या विशी अथवा तिशीत झाली नसेल त्यांनी निराश होण्याचे कारण नाही. कारण वयाच्या कोणत्याही टप्प्यावर म्युच्युअल फंडातील डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडांसोबत इतर श्रेणी जसे की, इक्विटी हायब्रिड, डेट हायब्रिड, इक्विटी सेिव्हग्स, डेट फंड यांच्या मदतीने तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ बांधू शकता.

हा आकडय़ांचा खेळ समजल्यानंतर, मग सुरुवात कोठे करायची, आधीच्या गुंतवणुकीचा आढावा कसा घ्यायचा, म्युच्युअल फंडाच्या कोणत्या श्रेणीतील फंडात गुंतवणूक करावी, आपली जोखीम क्षमता नेमकी किती आहे या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे गुंतवणुकीआधीच शोधणे खूप महत्त्वाचे आहे. यात ओपन एंडेड फंडांच्या बरोबरीने ‘पेन्शन फंड’ आहेत, त्यांना पाच वर्षांचा ‘लॉक इन’ कालावधी असून प्राप्तिकराच्या ‘कलम ८० सी’नुसार करवजावटीस ते पात्र आहे. प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, जोखीम क्षमता वेगळी आहे. त्यामुळे आपणास कोणता पर्याय योग्य यासाठी आपण या क्षेत्रातील अनुभवी गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे आवश्यक ठरेल.

भांडवली बाजाराची वाटचाल एक दिशेने कधीच नसते आणि नसणार याचे सुरुवातीपासूनच भान ठेवायचे. गुंतवणूकदारांना अधूनमधून अग्निपरीक्षा द्यावीच लागते. कधी तरी ती जागतिक महामारीची असेल, कधी दोन देशांमधील युद्धाची, तर कधी खनिज तेलाच्या किमतीच्या भडक्याची तर कधी मंदीसदृश परिस्थितीची. हा असा काळ धीराने सामोरे जाणाऱ्या गुंतवणूकदाराच्या संपत्तीत चांगली वाढ होते हे इतिहासाने दाखवून दिले आहे. संपूर्ण गुंतवणूक पारंपरिक गुंतवणूक साधनांत (तुलनेने कमी जोखीम) ठेवून मोठी संपत्तिनिर्मिती करणे शक्य नाही. माझ्या दृष्टीने, ‘बाजारात गुंतवणूक न करणे’ हीच एक मोठी जोखीम आहे.

आपले प्रत्येकाचे सरासरी आयुष्य किती? तर साधारण ७०-७५ वर्षांचे, नाही का? किती तरी छोटय़ा-मोठय़ा टप्प्यांतून आपण जात असतो आयुष्यभर. मग तो लहानपण ते शालान्त परीक्षेपर्यंतचा पहिला टप्पा, नंतरचा महाविद्यालयापासून लौकिकार्थाने शिक्षण संपेपर्यंतचा टप्पा, त्यानंतर नोकरी/व्यवसाय आणि मग शेवटचा निवृत्ती काळ. हा जो ‘नोकरी/व्यवसायाचा’ टप्पा आहे तो आयुष्यातला सर्वात मोठा टप्पा, पैसे कमावण्याचा, जोडण्याचा आणि वाढवण्याचा. या टप्प्यावर आपली पावले योग्य वाटेवर पडतील, अशी आशा बाळगतो.

* (लेखक मुंबईस्थित गुंतवणूकविषयक अभ्यासक)

sameernesarikar@gmail. com

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.)