कुणाही सामान्यांचे अर्थव्यवहाराचे पहिले पाऊल हे बँकेपासूनच सुरू होते. अर्थसमंजसतेचा पहिला संकेत असलेल्या बँकेतील व्यवहारांतही काही क्षुल्लक  वाटणाऱ्या गोष्टींबाबत सावधगिरी निश्चितच आवश्यक आहे.
आपण आपल्या बँकेबरोबर अंधविश्वासाने व्यवहार करत असतो. आपला ‘रिलेशनशिप मॅनेजर’ जे सांगेल ते खरे असेल असे आपण धरून चालतो. एका सहकारी बँकेतील अधिकाऱ्याने व्याजातून कर कापला जाऊ नये म्हणून एका निवृत्त झालेल्या नागरिकाला मिळालेल्या फंडातील १० लाख रुपये, प्रत्येकी एक लाखप्रमाणे १० शाखांमध्ये गुंतवण्यास सांगितले. आज ती बँक अडचणीत आल्यावर निवृत्तीनंतर त्याला व्याजही मिळत नाही व मुद्दल मिळेल की नाही याची शाश्वती नाही.
आपली तक्रार नोंदवण्यासाठी बँकेच्या प्रत्येक शाखेत स्वतंत्र नोंदवही असते. तुमची कोणतीही तक्रार त्यात तुम्ही नोंदवू शकता. त्यासाठी तुम्ही त्या शाखेचे ग्राहक असणेही आवश्यक नाही. मी अशी तक्रार नोंदवण्यासाठी एका प्रतिष्ठित बँकेत गेलो. ‘शाखा व्यवस्थापक आज रजेवर आहेत. तुम्ही उद्या या’ असे सांगितले गेले. त्यावर मी सांगितले की, ‘व्यवस्थापक नाहीत तर शटर खाली ओढून आज शाखा बंद ठेवा’. मग दुसरा अधिकारी येऊन एक रफ कागदांचे (पाठकोरे) रजिस्टर देऊन मला तक्रार लिहा म्हणून सांगू लागला. माझ्या बॅगेतील माझे शेअर ब्रोकर म्हणून असलेले ‘कंप्लेंट रजिस्टर’ दाखवले. त्यावर संपूर्ण वर्षांत एकही तक्रार नाही, असा लेखा निबंधकाचा सही, शिक्का दाखवला व असेच तुमचे १० वर्षांचे ‘कंप्लेंट रजिस्टर’ हे नाही, असे दाखवल्यावर तो घामाघूम झाला. हा किस्सा सविस्तर लिहिण्याचे कारण ‘लोकसत्ता’चे वाचक निवृत्त नियामक मंडळाच्या योजनेची माहिती मागण्यास माझ्या लेखाचे कात्रण घेऊन गेल्यावर त्यांना कोणत्याही शाखेत माहिती मिळाली नाही.
‘कंप्लेंट रजिस्टर’मध्ये नोंद केल्यावर त्याची दखल शाखा अधिकाऱ्यास घ्यावीच लागते; पण दखल घेतली न गेल्यास बँक लोकपालजवळ तक्रार करता येते. महाराष्ट्रासाठी यांचे कार्यालय वरळीला आहे.
एका प्रतिष्ठित खासगी बँकेचे एटीएम शाखेबाहेर उघडय़ावर आहे. रक्कम काढताना मागे उभे असलेल्या व्यक्तीला सर्व व्यवहार दिसतात. रेल्वे स्टेशनजवळ म्हणून तिथे मोठी रांग असते. एटीएमसाठी स्वतंत्र बंदिस्त जागा नसेल तर तेथे व्यवहार करू नयेत.
धनादेश लिहिताना शक्यतो बॉलपेनने लिहावा. जेलपेन किंवा फाऊंटनपेनने चेक लिहू नये. इंक रिमूव्हरने बॉलपेनची शाई काढणे कठीण असते. सध्या ई.सी.एस.ने रक्कम आपल्या खात्यात जमा होण्यासाठी किंवा खात्यातून वजा होण्यासाठी (विजेचे, टेलिफोन देयक इत्यादीसाठी) एक रद्द केलेला धनादेशसही करून द्यावा लागतो. सर्वजण धनादेशावर मध्यात दोन रेषा ओढून ‘कॅन्सल’ असा शब्द लिहून स्वाक्षरी करून धनादेश हा अर्जाबरोबर जोडून देतात. माझ्या मित्राने दिलेला अर्जाबरोबरचा धनादेश गहाळ झाला व इंक रिमूव्हरने ‘कॅन्सल’ शब्द खोडून रोख रक्कम काढण्यासाठी बँकेमध्ये गेला. बँकेच्या रोखपालला संशय आला. त्याने धनादेश अतिनील किरणांच्या यंत्रामध्ये ठेवल्यावर चोरी उघडकीस आली. म्हणून रद्द करून धनादेश संस्थेला देण्यापूर्वी त्यावर ज्या संस्थेला धनादेश देणार त्यांचे किंवा स्वत:चेच नाव लिहावे. धनादेश‘अकाऊंट पेयी’ करावा. तारीख चार महिन्यांपूर्वीची टाकावी. रक्कम शून्य लिहावी. म्हणजे धनादेशावर स्वाक्षरी असेल तरी तो धनादेश वापरला जाणार नाही.
रिझव्‍‌र्ह बँकेने, सेबी, इर्डा सर्वानी असे रद्द केलेले धनादेशन देण्याचा किंवा मागण्याचा कायदा करणे गरजेचे आहे. याला पर्याय म्हणून प्रत्येक बँकेने खातेदाराला एक पत्र द्यावे. त्यावर खातेदाराचे नाव, पत्ता, खाते क्रमांक, एम.आय.सी.आर. क्रमांक आणि आयएफएससी (किंवा एनईएफटी) क्रमांक लिहावा. या पत्राची एक प्रत आपण संस्थेस देऊ शकतो. प्रत्येक संस्था याच माहितीसाठी एक रद्द केलेला धनादेशफुकट घालवण्यास आपल्याला भाग पाडते.
बँकांचा मुख्य व्यवसाय खातेदारांकडून ठेव स्वरूपात रक्कम गोळा करणे व ती कर्ज स्वरूपात इतरांना देणे हा असतो. हे करताना व्याजदरातील फरक हा बँकांचा फायदा असतो; परंतु काही सहकारी बँकांमध्ये अनेकदा खोटी कर्जे किंवा संचालकांच्या नातेवाइकांना कर्जे किंवा योग्य हमी न घेता कर्जे दिली जातात. ती कालांतराने बुडित खाती जमा होण्याची शक्यता असते व ठेवीदारांची रक्कम धोक्यात येते.
लेखक सेबीकडे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार
ग्राहक म्हणून ठेवीदारांनी घ्यावयाची काळजी:
१. आपली जोखीम क्षमता ओळखून एका बँकेत (सर्व शाखा मिळून) ठेव किती ठेवायची हे निश्चित करा.
२. सर्व रक्कम घराजवळची म्हणून एकाच बँकेत न ठेवता विविध बँकांत ठेवा.
३. दरवर्षी बँकेने ठेव रकमेसाठीच्या विम्याचा हप्ता वेळेवर भरला आहे याची चौकशी शाखा अधिकाऱ्याजवळ करा. त्याची पावती तपासणीसाठी मागा.
४. बँकेच्या एकूण शाखा किती आहेत. सोयी-सुविधा काय आहेत याचा अंदाज घेऊन ठेवा. उदा. बँकेच्या शाखा १०० च्या वर आहेत. विविध राज्यांत व्यवसायाचा परवाना आहे. शेडय़ुल्ड बँक आहे. विदेशी चलन व्यवहारांची परवानगी आहे इत्यादी.
५. दरवर्षी बँकेचे नफा/तोटापत्रक व ताळेबंद मागून घ्या. त्यामध्ये निबंधकाचे (ऑडिटर) काही शेरे आहेत का याचा अंदाज घ्या. ग्राहक म्हणून हा तुमचा हक्क आहे (अगदी खासगी बँकेतसुद्धा).
६. शक्य असल्यास सहकारी बँकेत ठेव असल्यास त्या बँकेचे शेअर घ्या व जमल्यास बँकेच्या वार्षकि सर्वसाधारण सभेला हजर राहा. अनेक धोके अशा वेळेस सहज नजरेस येतात.
७. शेवटी हा पसा तुमच्या कष्टाचा आहे. त्यामुळे तो भावनेच्या भरात गुंतवू नका. आपली बँक (आपल्या समाजाची बँक) असे काहीही नसते. (दक्षिणी ब्राह्मण सहकारी बँक, भंडारी बँक अशी खूप नावे बुडित बँकांची सांगता येतील.)
sebiregisteredadvisor@gmail.com