सुधीर जोशी
उच्चतम पातळी गाठलेले सेन्सेक्स व निफ्टी हे प्रमुख निर्देशांक गेल्या सप्ताहाच्या सुरुवातीस काहीसे सुस्तावले होते. मासिक सौदापूर्तीच्या दिवशी गुरुवारीही बाजार फारसा आक्रमक नव्हता. परंतु वायदा बाजारातील निफ्टीचे ८४ टक्के सौदे सटोडियांनी पुढील महिन्यांसाठी कायम केले. हे प्रमाण गेल्या तीन महिन्यांच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ सटोडियांना बाजारात तेजीची अपेक्षा होती. त्याप्रमाणे शुक्रवारी बाजार तेजीने बंद होऊन सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे ५६ हजारांच्या आणि १६,७०० वरील नव्या उच्चांकावर बंद झाले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक सतत सातव्या सप्ताहात वर बंद झाला आणि त्यात आघाडीवर होता माईंड ट्री. वाहन क्षेत्र वगळता सर्वच निर्देशांकानी या सप्ताहात आघाडी घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या सप्ताहात जाहीर झालेल्या राष्ट्रीय चलनीकरण उपक्रमाची (एनएमपी) घोषणा खासगी क्षेत्राला गुंतवणुकीच्या नव्या संधी प्राप्त करून देतील. विमानतळ, खेळाची मैदाने, रेल्वे स्थानके खासगी क्षेत्राला कराराने दिली जातील. या धोरणाची यशस्वी अंमलबजावणी झाली तर ती दीर्घ मुदतीत भांडवली गुंतवणुकीसाठी पोषक ठरून सिमेंट, स्टील, रस्ते, वीज अशा क्षेत्रांतील लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, एसीसी, अल्ट्राटेक सिमेंट, कमिन्स, टाटा स्टील, आयआरसीटीसी, अदानी यांसारख्या कंपन्यांना त्याचा लाभ मिळेल.

टाळेबंदी, प्रवासावरील निर्बंध अशा कठीण काळातही जूनअखेर तिमाहीत इझ माय ट्रिप या प्रवासी सेवा देणाऱ्या कंपनीने चांगली कामगिरी केली. उत्पन्नात घट असूनही नफ्याचे प्रमाण टिकविले गेले. कंपनी इतर लहान कंपन्यांचे अधिग्रहण तसेच विमानाच्या तिकिटांशिवाय इतर प्रवास तिकिटांचे आरक्षण करून देण्याच्या संधी शोधत आहे. कंपनीला निष्ठावंत ग्राहकांचा आधार आहे. कंपनी संपूर्णपणे कर्जमुक्त असून ताळेबंदामध्ये २४६ कोटींची रोकड आहे. करोनाची दुसरी लाट ओसरत आहे व तिसऱ्या लाटेचा प्रभाव जास्त पडला नाही तर सहलीला जाण्याचे अनेकांचे मनसुबे आहेत. कंपनीला याचा फायदा होईल. पुढील एक वर्षांचे उद्दिष्ट ठेवून येथे गुंतवणुकीला संधी आहे.

झोमॅटोमुळे चर्चेत आलेल्या इन्फोएज या कंपनीचा देखील सध्या गुंतवणुकीसाठी विचार करता येईल. झोमॅटोमध्ये कंपनीचा १५.२३ टक्के हिस्सा आहे ज्याची सध्याची किंमत १५ हजार कोटी आहे. जूनअखेर तिमाहीत कंपनीने नफ्यात गेल्या वर्षांतील तिमाहीच्या तुलनेत १० टक्के वाढ केली आहे. नौकरी डॉट कॉम या आघाडीच्या पोर्टलद्वारे कंपनी रोजगाराशी संबंधित सेवा पुरविते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या वेगवान प्रगतीत नव्या नोकरभरतीच्या संधीचा कंपनीला फायदा मिळेल. ९९ एकर्स, जीवनसाथी अशा काही इतर व्यावसायिक पोर्टल कंपनीच्या मालकीच्या आहेत. तसेच पॉलिसी बाजारसारख्या इतर काही स्टार्टअप्समध्ये कंपनीची गुंतवणूक आहे. टाळेबंदीमुळे वाढलेल्या डिजिटल सेवांच्या मागणीची ही कंपनी लाभार्थी आहे.

टाटा मेटॅलिक्सने जूनअखेर तिमाहीत ९४ कोटींचा नफा जाहीर केला व कंपनीचे समभाग ६ टक्क्यांनी वर गेले. गेल्या वर्षांतील याच तिमाहीत तिला तोटा सहन करावा लागला होता. टाळेबंदीचे निर्बंध असले तरी कंपनीने निर्यातीच्या जोरावर पहिल्या तिमाहीत विक्रीचे मोठे लक्ष्य गाठले. कंपनी पिग आयर्न, लोह खनिज व पाणी पुरवठय़ाचे लोखंडी पाइप तयार करते. टाटा स्टीलकडे कंपनीचा ६० टक्के हिस्सा आहे. सध्या इतर धातू कंपन्यांबरोबर खाली गेलेले समभाग दीर्घ मुदतीची गुंतवणूक करण्यास योग्य आहेत.

भारतीय बाजारात आलेल्या न भूतो तेजीचा वेग काहीसा कमी होत आहे. बाजाराच्या समतोल प्रगतीला हे उपयुक्तच आहे. करोनाचे संकट संपून नव्याने वाटचाल करण्याचा उत्साह आता ओसरू लागला आहे. त्यामुळे आता पुढील काळात समभागांतील वाढ वा घट होण्यावर कंपन्यांच्या कामगिरीचा प्रभाव जास्त असेल. बाजाराची आघाडी लार्ज कॅप कंपन्यांनी सांभाळली आहे. मिड कॅप व स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये थोडा मंदीचा काळ आला होता, पण आता त्यात थोडी सुधारणा झाली आहे. त्याचा फायदा घेऊन केवळ बाजारातील लाटेमुळे वर गेलेल्या कंपन्यांत नफावसुली करून फक्त नामांकित लहान कंपन्या व लार्ज कॅप कंपन्यांमधील गुंतवणूक कायम राखणे इष्ट ठरेल. पुढील सप्ताहात पहिल्या तिमाहीचे विकास दराचे आकडे, वाहन विक्री, जीएसटी संकलन, अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या अध्यक्षांच्या अर्थप्रोत्साहन कमी करण्याच्या धोरणाबाबतचे विचार यावर बाजाराची वाटचाल अवलंबून असेल.

sudhirjoshi23@gmail.com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Share market index sunsex nifty ssh
First published on: 30-08-2021 at 00:36 IST