अनेकदा उत्तम व्यवसाय आणि भविष्य असलेली कंपनी केवळ वाईट व्यवस्थापन किंवा सरकारी धोरणांमुळे गोत्यात येते. गेला काही काळ वादग्रस्त राहिलेल्या या एसकेएस मायक्रोफायनान्स लिमिटेड या सूक्ष्म वित्त क्षेत्रातील कंपनीचे चांगले दिवस पुन्हा सुरू झालेत असे म्हणायला काही हरकत नाही. कंपनीने आपल्या भांडवलात नुकतीच ४०० कोटी रुपयांची भर घातली असून तिचे मूल्यांकनही सुधारले आहे. चार वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या घोटाळयानंतर रिझर्व्ह बँकेने मायक्रो फायनान्स कंपन्यांकरीता नवीन नियमावली केली आहे. आता केवळ रिझर्व्ह बँकेकडे या कंपन्यांच्या नियमनाचे अधिकार असल्याने कंपनीचे कामकाज सुधारेल तसेच नवीन नियम जाचक असल्याने नवीन सूक्ष्म वित्त कंपन्या आता बाजारात येण्याची शक्यता खूप कमी आहे. साहजिकच एसकेएस सारख्या जुन्या मोठ्या कंपन्यांना आता स्पर्धा नसेल. मार्च २०१४ अखेर समाप्त आíथक वर्षांसाठी कंपनीने उत्तम कामगिरी करून ती आता तोट्यातून नफ्यात आली आहे. मार्च २०१४ रोजी समाप्त तिमाहीकरिताही कंपनीने १२६ कोटींच्या उलाढालीवर २७.१ कोटी रूपयांचा नफा कमावला आहे. छोटी गावे आणि निम शहरात कंपनीचे कर्जवाटपात प्राबल्य आहे. येत्या दोन वर्षांत कर्जवाटप आणि वसुलीचे प्रमाण वाढेल अशी अपेक्षा आहे. सध्याचे शेअरचे किंमत उत्पन्न (पी/ई) गुणोत्तर बघता हा शेअर थोडा महाग वाटत असला तरीही चार वर्षांपूर्वी कंपनीने आपले शेअर्स ९७५ रुपये अधिमूल्याने आयपीओद्वारे विकले होते हेही लक्षात घ्यायल हवे.  येत्या दोन वर्षांत तुम्हाला गुंतवणुकीवर ५०% परतावा मिळायला काहीच हरकत नाही.