आशीष ठाकूर ashishthakur1966@gmail.com

निफ्टी निर्देशांक १७,००० चा स्तर राखत, हा निर्देशांक १८,१०० च्या उच्चांकाला गवसणी घालेल, यावर सर्वाचीच श्रद्धा होती. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे गुंतवणूकदार, निफ्टी निर्देशांकावरील ३०० अंशांच्या परिघाचे सूत्र हाताशी ठेवत. निफ्टी निर्देशांकावरचा १७,००० चा स्तर टिकल्यास, १७,२०० अधिक ३०० अंश १७,५००.., १७,८००.., १८,१०० ही नमूद केलेली वरील लक्ष्ये आता गुंतवणूकदार स्वत:च आत्मविश्वासाने अचूकपणे रेखाटायला लागला आहे. हे या स्तंभाचे आणि तांत्रिक विश्लेषण शास्त्राचे फार मोठ यश आहे. या तृप्त, कृतार्थक्षणी तांत्रिक विश्लेषण शास्त्राची ‘आभाळागत माया आम्हावरी..राहू दे!’ अशी भावना प्रत्येक गुंतवणूकदारांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

सरलेल्या ८ मार्चला निफ्टी निर्देशांकाने १५,६७१ चा नीचांक मारून या निर्देशांकावर सुधारणा सुरू झाली. या सुधारणेत, निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य काय असेल हे या स्तंभातील १४ मार्चच्या ‘अखेर साथ लाभली!’ या लेखात सूचित केले होते. या उच्चांकाची साध्या, सोप्या, शालेय गणिती पद्धतीने, निफ्टी निर्देशांकावर १८,१०० च्या उच्चांकाची मांडणी केलेली त्या लेखातील वाक्य होती – ‘‘येणाऱ्या दिवसातील निफ्टी निर्देशांकावरील संभाव्य उच्चांकासाठी आपण अगोदरच्या दोन उच्चांकाची सांगड घालता, प्रथम निफ्टी निर्देशांकावर १८,६०४ च्या समोर १८,३५० असा २५४ अंशांचा उतरत्या भाजणीतला उच्चांक येत आहे. आता हाच फरक निफ्टी निर्देशांकावरील १८,३५० च्या उच्चांकातून वजा करता, निफ्टी निर्देशांकाचा उच्चांक १८,०९६ येतो.’’ मागील सप्ताहातील मंगळवारी, ५ एप्रिलला निफ्टीने १८,०९५ चा उच्चांक नोंदविला. मात्र पुढे शुक्रवापर्यंत (८ एप्रिल) निफ्टी निर्देशांकावर १७,६०० एवढी घसरण  झाली. येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकांने १७,५०० चा स्तर सातत्याने राखल्यास निफ्टी निर्देशांकाची वरची लक्ष्ये ही अनुक्रमे १७,८०० ते १८,१०० असतील.निफ्टी निर्देशांक १८,१०० च्या स्तरावर सातत्याने दहा दिवस टिकल्यास, निफ्टी निर्देशांकावर १८,४००, १८,७०० ही तेजीची नवीन दालने खुली होतील. ही नाण्याची एक बाजू झाली.

या तेजीच्या मार्गात निफ्टी निर्देशांकाची १८,००० चा स्तर ओलांडतानाच दमछाक व्हायला लागली आहे.  १७,००० चा स्तर राखण्यास त्याला अतोनात कष्ट पडत असल्यास, निफ्टी निर्देशांकावर १६,५०० ते १६,००० पर्यंत घसरणीची आर्थिक, मानसिक तयारी ठेवावी.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५९,४४७.१८

निफ्टी : १७,७८४.३५

गेल्या लेखात एचडीएफसी बँकेचे निकालपूर्व विश्लेषण केलेले, लेखाची शाई वाळते न वाळते तोच,  सोमवारी ४ एप्रिलला अकल्पितपणे आर्थिक क्षेत्रातील दोन बलाढय अशा एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाची घोषणा झाली. या घटनेनंतर आलेल्या नितांत सुंदर तेजीत एचडीएफसी बँक किती रुपये वर जाऊ शकतो? या मनातल्या प्रश्नावर,निकालपूर्व विश्लेषणाचा आधार घेतल्यास, एचडीएफसी बँकेचे १,६७० रुपयांचे वरचे लक्ष्य नमूद केलेले. हे वरचे लक्ष्य त्या दिवशी १,७२२ रुपयांचा उच्चांक मारत साध्य केले गेले. त्या दिवशीचा एचडीएफसी बँकेच्या समभागाचा बंद भाव १,६५६ रुपये होता.तर शुक्रवारचा ८ एप्रिलचा साप्ताहिक बंद भाव १,५१४ रुपये आहे. घडतंय ते नवलच! या शास्त्राची आभाळागत माया आम्हा सर्वावर राहू दे!.

निकालपूर्व विश्लेषण

डेल्टा कॉर्प लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : सोमवार,११ एप्रिल     

८ एप्रिलचा बंद भाव – ३२८.६० रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ३१० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ३१० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३४० रुपये, द्वितीय लक्ष्य ४०० रुपये.

ब) निराशादायक निकाल: ३१० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २५० रुपयांपर्यंत घसरण.

केसोराम इंडस्ट्रीज लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : सोमवार, ११ एप्रिल        

८ एप्रिलचा बंद भाव – ६१.१० रु  

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ५७ रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ५७ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६६ रुपये, द्वितीय लक्ष्य ७५ रुपये.

ब) निराशादायक निकाल: ५७ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ५० रुपयांपर्यंत घसरण.

आनंद राठी वेल्थ लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : मंगळवार, १२ एप्रिल     

८ एप्रिलचा बंद भाव – ६१०.५५ रु.. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ५८० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ५८० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६५० रुपये, द्वितीय लक्ष्य ७०० रुपये.

ब) निराशादायक निकाल: ५८० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ५४० रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.