‘‘जर नवरा बायकोला पाडव्याच्या दिवशी, प्रियकर प्रेयसीला व्हॅलेंटाइन डेला, भाऊ बहिणीला भाऊबिजेच्या दिवशी भेटवस्तू देऊ शकतो.. तर काहीही प्रसंग नसताना मोठा भाऊ लहान भावाला भेटवस्तू का देऊ शकत नाही? मोठय़ा भावाने लहान भावाला भेटवस्तू देण्याचा प्रसंग शोधून काढलाच पाहिजे.’’ पुण्याहून सुट्टी घेऊन आलेला आयटी इंजिनीयर पार्थ व्यवसायाने वित्तीय सल्लागार असलेल्या आपल्या मोठय़ा भावाबरोबर, आर्यनबरोबर मॉलमध्ये फिरत असताना सुरू असलेला हा संवाद. ‘‘बघतोस ना, सगळ्या महाग वस्तू.. खूप पसा कमावला पाहिजे आयुष्यात. एकदोन चांगल्या स्टॉक्सच्या टिप्स दे. आधीच कामाचा व्याप.. किती दिवस एखादी कादंबरी सोडा, साधे वृत्तपत्र वाचायलासुद्धा वेळ मिळत नाही. नोकरीला लागल्यापासून सगळे छंद विसरूनच गेलो आहे.’’
आर्यनने कॉफी शॉपमध्ये प्रवेश करून दोन कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. कॉफीचा पहिला घोट घेत आर्यन म्हणाला, ‘‘एक चांगला उपाय आहे तो म्हणजे रिटायरमेंट अर्थात निवृत्तीचे नियोजन..’’
‘‘ब्रो, नो ग्यान.. प्लीज..’’ चटकन् पार्थचा त्रागा!
आर्यनने मात्र सुरूच ठेवले, ‘‘तू दीर्घकालीन दृष्टिकोन ठेव. पुढील २०-२५ वर्षांनंतरसुद्धा तुला अशीच तणावग्रस्त जीवनशैली जगायची आहे का?’’
पार्थच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून आर्यनने त्याला समजावण्यास सुरुवात केली- ‘‘निवृत्तीपश्चात नियोजन ही आयुष्यातील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तू जितकी लवकर सुरुवात करशील तितकी चांगली. यात अल्पमुदतीतील नफातोटा विचारात न घेता दीर्घकालावधीत संपत्ती संचय कसा करता येईल यावर भर द्यावा. आपल्या जीवनशैलीनुसार उद्दिष्टे निश्चित करावीत. निश्चित केलेल्या उद्दिष्टांप्रमाणे आपले वित्तीय नियोजन बनव. या उद्दिष्टांमध्ये लग्न, मुले, त्यांचे शिक्षण वगैरे हवेच!’’
‘‘अरे ब्रो, तुझा ए.के. हंगल झालाय, जास्त सेंटी होऊ नकोस. लग्न.. सध्या माझी जीवनशैली जगायला मला पसे पुरत नाहीत.’’
‘‘आयुष्यात शिस्त आण.. बी डिसिप्लिन्ड! खर्च आवाक्यात आण. प्रत्येक प्रसंगाला ब्रॅण्डेड वस्तूंचा मोह आवरा. गरज असलेल्या वस्तू डिस्काऊंटमध्ये शोधाव्यात. ऑनलाइन साइट्सची त्यासाठी चढाओढ सुरूच असते. वर्षांत प्रत्येक ठिकाणी कमीत कमी दोनदा तरी डिस्काऊंट बम्पर असतो. अशा वेळी पूर्ण वर्षांची खरेदी गरजेनुसार ठरवून करावी. घर विकत घेताना ऑफिसमधल्या सहकाऱ्याचे ४ बीएचके घर आहे म्हणून तुलना न करता, आपल्या घरात चार माणसे असतील तेव्हा २ बीएचके बरे.. उरलेले पसे मालमत्ता निर्माणासाठी वापरावेत. हेच तर असते नियोजन!’’
जास्त टेक्निकल संभाषण न होता दैनंदिन जीवनात अडथळे आणणाऱ्या गोष्टींवरील उपाय ऐकून पार्थची उत्सुकताही चाळवली गेली.
‘‘आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपत्कालीन फंड असावा. त्याची गुंतवणूक ‘लिक्विड फंडा’सारख्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये करावी. आरोग्य विमा स्वत:साठी आणि गृहस्थाश्रमात गेल्यावर सगळ्या कुटुंबीयासाठी ‘फॅमिली फ्लोटर’ रूपात घ्यायलाच हवा. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ‘शेअर ट्रेडिंग’च्या फंदात न पडता ‘एसआयपी’ पद्धतशीर गुंतवणुकीचा शिरस्ता अनुसरावा. शेअर्स घ्यायचे असल्यास त्याचा व्यवस्थित अभ्यास करून दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आपण आखलेल्या वित्तीय नियोजनाप्रमाणे गुंतवणूक करावी. कुटुंबीयांची भविष्य सुरक्षितता म्हणून ऑनलाइन उपलब्ध असलेले टर्म इन्श्युरन्स घ्यावे.
प्रत्येक वर्षी नोकरीधंद्यात आपल्या वार्षकि उत्पन्नात जी वाढ होते त्यातील बहुतांश हिस्सा निवृत्तीच्या नियोजनामध्ये गुंतवावा. आपल्या गुंतवणुकीचा सुयोग्य ट्रॅक ठेवावा व तो आपल्या जोडीदाराबरोबर शेअर केला जावा. आपल्या उद्दिष्टानुसार आखलेले ध्येय टप्प्यात आल्यास ती गुंतवणूक जोखीम मालमत्तेमधून सुरक्षित मालमत्तेत परिवर्तित करावी. निवृत्ती नियोजनासाठी आपली गुंतवणूक नियमित उत्पन्न देणाऱ्या चांगल्या व सुरक्षित स्कीम्समध्येही गुंतवावी. ज्यामध्ये चांगला लाभांश देणारे शेअर्स, मन्थली इन्कम स्कीम्स (एमआयएस), घराचे भाडे यांचा पोर्टफोलिओमध्ये विचार होऊ शकतो. जसा आपला एक फॅमिली डॉक्टर असतो त्याप्रमाणे एक कुटुंबाचा वित्तीय नियोजनकारही असावा.’’
‘‘लवकर निवृत्ती घेतल्यामुळे आयुष्यात असा काय फरक पडेल?’’ इति पार्थ.
‘‘लवकर निवृत्ती घेतल्यामुळे तुम्ही तुमचे छंद उत्तमरीत्या जोपासू शकता. खूप वेळा तुमचे छंदच तुम्हाला निवृत्तीनंतर पैसेही मिळवून देऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तब्येत चांगली राहते. व्यक्तिश: आणि आर्थिकदृष्टय़ादेखील! अर्थात यासाठी आपली जीवनशैली यथायोग्य (रिझनेबल) असायला हवी.’’
या वेळी काही भेट मिळाली नसली तरी पुढील आयुष्यभराची भेट पार्थला ‘अनपेक्षित’रीत्या मिळाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unexpected
First published on: 10-06-2013 at 12:06 IST