बाजारात गवगवा असलेल्या विविध वित्तीय योजनांचा उणा-पुरा वेध घेणारे सदर
उत्तर आयुष्याची तजवीज म्हणून योग्य पर्यायांमध्ये आतापासूनच गुंतवणूक अतिशय महत्त्वाचीच आहे. पण निवृत्तीनंतर आधार देणारी काठी म्हणून गौरविल्या जाणाऱ्या ‘पेन्शन प्लॅन्स’ हे त्यावरील उत्तर निश्चितच नाही.
आजच्या तरुण पिढीला ‘अर्ली रिटायरमेंट’चा फार मोठा धोका आहे. बऱ्याच तरुणांना याची कल्पनाही नसावी. ऑफिसला जायची ठराविक वेळ असते. परंतु परतायच्या वेळेचा भरवसा नसतो. पैसेही भरपूर मिळतात. परंतु दिवसेंदिवस स्पर्धा इतकी वाढत चालली आहे की कामाचे आठ तास पुरे पडत नाहीत. थकून भागून घरी आल्यानंतरही लॅपटॉपपुढे बसून काम सुरूच असते. रविवारचा एकमेव सुटीचा दिवस मिळतो तेव्हा आठवडय़ाची झोप पुरी करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे व्यायाम या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जाते. कामाचे वाढीव तास, भरीला जंक फूड, सततचे टेन्शन आणि नो एक्सरसाइज.. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे साठीच्या ऐवजी पन्नास-पंच्चावन्नाव्या वर्षीच निवृत्ती.
सद्यकाळाचे आणखी वैशिष्टय़ म्हणजे पेन्शन ही संकल्पना इतिहासजमा झालेली आहे; एकत्र कुटुंबपद्धतीही नामशेष होत आहे; हम दो, हमारे दो आणि निवृत्तीनंतर पुन्हा फक्त ‘हम दो’ हे प्रमाण वाढत चालले आहे. यात भर म्हणजे वाढलेले सरासरी आयुर्मान, ज्यायोगे सध्याच्या पिढीचा कोणतीही कमाई नसण्याचा काळ वाढला आहे. नोकरीच्या काळात २५ ते ३० वर्षे नियमितपणे गुंतवणूक (पीएफ, पोस्ट ऑफिस, बँक किंवा एफडी) केलेल्या रकमेवर महागाईदरात वाढीपेक्षा कमी दराने परतावा मिळाल्याने, निवृत्तीनंतर एकहाती मिळणारी रक्कम दिसायला जरी भरभक्कम वाटत असली तरी त्याची बाजारातील किंमत कमीच झालेली असते.
उदाहरण : प्रकाशने २५ व्या वर्षांपासून वयाच्या ६० व्या वर्षांपर्यंत ३६ वर्षे नियमितपणे वार्षिक १०,००० रु. हे ८% परतावा देणाऱ्या ठोस पर्यायामध्ये गुंतविले आहेत. जर महागाई दर (इन्फ्लेशन) वार्षिक १०% दराने या काळात वाढत आली असेल तर ६० व्या वर्षी प्रकाशकडील गंगाजळीची बाजार मूल्य (purchase value) काय होते ते पाहू या.
*  एकूण गुंतविलेली रक्कम     रु. ३,६०,०००
*  ६० व्या वर्षांअखेर रक्कम    रु. २०,२०,७००
*  गंगाजळीचे बाजार मूल्य     रु. २,६१,८६०
प्रकाशची गुंतवणूक मुद्दल रु. ३,६०,००० आणि त्याच्या हाती येणारी रक्कम प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी म्हणजे रु. २,६१,७००
गंभीर बाब म्हणजे अशा प्रकारे तयार केलेली गंगाजळी आणि निवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅच्युइटी आणि इतर लाभ वगैरे एकूण रक्कम प्रकाशला निवृत्तीपश्चात ५ ते ७ वर्षेच पुरी पडेल इतपतच असते.
भाववाढीच्या पैलूची कल्पना असलेले तरुण आपसूकच नफ्यासकटच्या विमा पॉलिसी (एंडाऊमेंट) किंवा ‘युलिप’सारख्या पर्यायांकडे आकर्षित होतात. निवृत्तीनंतर पैशाचा स्रोत चालू राहावा हा त्यामागील त्यांचा हेतू. परंतु या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला न घेता इंटरनेटवरील माहितीच्या आधारे स्वत:च निर्णय घेता आणि गुंतवणूक करतात. या प्रवृत्तीची तुलनाच करायची झाली तर रुग्णाने स्वत:च निदान करायचे आणि डॉक्टरकडे जाऊन मला हे प्रिस्क्रिप्शन द्या म्हणून सांगायचे, असा हा प्रकार आहे.
पाच-सहा महिन्यांपूर्वी बातमी होती- पुण्यातील एका आय.टी. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घाऊक प्रमाणात एका पेन्शन योजनेत पैसे गुंतविण्याचा निर्णय घेतला. तरुण पिढी इतक्या गंभीरतेने उत्तर आयुष्याचा विचार करण्यास प्रवृत्त झाली म्हणून त्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही बातमीत केले होते. या बातमीने मला मात्र अस्वस्थ केले आणि मी त्या कंपनीच्या बंगळुरूमधील मुख्य कार्यालयाशी संपर्क केला. महत्प्रयासाअंती पुण्याच्या कार्यालयात हे सर्व घडवून आणणाऱ्या मुख्य व्यक्तीशी मला संपर्क साधता आला. त्या व्यक्तीने एकाच वाक्यात माझी बोळवण केली. ‘आम्ही त्या बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे आणि त्यावर आणखी विचार करण्याची आम्हाला गरज वाटत नाही,’ असे म्हणत त्यांनी संभाषण संपविले.
पेन्शन प्लॅन्सही कशी छान भूरळ घालतात याचा हा एक नमुनाच. नावाप्रमाणे या योजनांची संकल्पना अशी असते की निवृत्तीनंतर नियमितपणे ठराविक रकमेचा स्रोत सुरू राहील. काही योजनांच्या बाबतीत १०० वर्षांर्पयची वयोमर्यादा असते. विद्यमान उपलब्ध सर्वच योजनांची कार्यपद्धती सर्वसाधारणपणे सारखीच आहे.
गुंतवणूकदाराने नियमितपणे प्रीमियमचा भरणा करायचा. त्यामधून काही ठराविक रक्कम कापून उर्वरित रक्कम कंपनी खात्रीच्या ठोस पर्यायांमध्ये गुंतविते. गुंतवणूकदार निवृत्त होईपर्यंत त्याने जमा केलेल्या रकमेची गंगाजळी तयार होते. ती मग अ‍ॅन्युइटी योजनेत जमा केली जाते आणि गुंतवणूकदाराच्या आवश्यकतेनुरूप (मासिक/ त्रमासिक/ सहामाही किंवा वार्षिक) पैशाची आवक चालू होते. वेगवेगळ्या विमा कंपन्या आपल्या आणि गुंतवणूकदारांच्या सोयीनुसार त्यात थोडेफार बदल करतात.
सकृतदर्शनी एकदम सोपा आणि सरळ व्यवहार. कोणत्याही प्रकारची खोट काढण्याचा प्रश्नच नाही.
तुम्ही पेन्शन योजनेत जे पैसे गुंतविता ते निवृत्तीपर्यंत विसरून जायचे. या मधल्या काळात गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या नामनिर्देशित वारसाला एक हाती रक्कम किंवा अ‍ॅन्युइटी यापैकी पॉलिसी घेताना ज्या पर्यायाची निवड केलेली असेल त्यानुसार पैसै प्राप्त होणार.
या प्रकारातील पॉलिसींचे (खरे तर प्रत्येक पॉलिसीचा) प्रस्ताव मांडताना काही गोष्टी ‘फाइन प्रिंट’मध्ये नोंदलेल्या असतात. सर्वसाधारण गुंतवणूकदार त्याची दखल घ्यायच्या फंदात पडत नाहीत. उदाहरणार्थ, नोंद अशी असते की, ‘तुम्ही जमा केलेले प्रीमियम दरवर्षी अशा पर्यायामध्ये गुंतविले जाईल, जेणेकरून तुम्हाला ६% ते १०% परतावा प्राप्त होईल.’ ही प्रक्रिया तुमच्या पॉलिसीची टर्म संपेपर्यंत चालू राहते. यात मेख अशी आहे की, प्रत्यक्षात तुम्ही जमा केलेल्या प्रीमियमची रक्कम संपूर्णपणे नव्हे तर त्यातून ठराविक खर्च वजा जाता जी निव्वळ रक्कम उरते ती गुंतविली जाते. त्यामुळे तुमच्या वाटय़ाला जो परतावा येतो तो अर्थातच कमी असतो. दुसरे कारण म्हणजे जे पारंपरिक प्लॅन्स आहेत त्यामधील गुंतवणूक १००% खात्रीच्या सरकारी रोख्यांमध्ये किंवा तत्सम पर्यायांमध्ये केली जाते. त्यामुळे जास्तीच्या परताव्याची शक्यताच नसते.
थोडक्यात या पॉलिसींमध्ये प्राप्त होणारा परतावा महागाईदरात वाढीपेक्षा कमी असल्याने या एकमेव पर्यायावर अवलंबून राहाल तर निवृत्तीनंतर फार निभाव लागणे जरा अशक्यच दिसते.
तर मग याला पर्याय काय? निवृत्तीपर्यंतचा काळ २० वर्षांपेक्षा जास्त उरला असेल तर शेअर्स, कर्जरोखे, सोने अशा विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक केल्यास बऱ्याच मोठय़ा प्रमाणात गंगाजळी तयार होऊ शकते. गुंतवणुकीचे सर्वसाधारण वाटपाचे प्रमाण शेअर्स ७०% ते ७५%, कर्जरोखे १०% आणि सोन्यामधील गुंतवणूक १५% ते २०% असे असावे. पन्नाशीच्यापुढे पंच्चावन्न वर्षे वयापर्यंत हे प्रमाण बदलणे मात्र आवश्यक आहे.
आता प्रश्न पडतो- ‘सध्या सुरू आहे त्या पेन्शन योजनेचे काय करायचे?’ एकदा त्रुटी लक्षात आल्यानंतर हातून घडलेली चूक तशी पुढे चालू ठेवणे हा शुद्ध आत्मघातच ठरेल. अशा प्रसंगी तज्ज्ञाची मदत घेणे अपरिहार्य आहे. तोच वास्तव स्थितीचा आढावा घेऊन त्यातून निघू शकणारा मार्ग सुचवू शकेल.
निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी नियोजन करणे ही प्रत्येकाच्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. उत्तर आयुष्याची तजवीज म्हणून योग्य पर्यायांमध्ये आतापासूनच गुंतवणूक करणे हाच एक उपाय आहे. पण पेन्शन योजना हे त्यावरील उत्तर निश्चितच नाही.
स्वत:च्या गरजा, खर्च (आवश्यक आणि अनाठायी) आणि सध्याच्या मासिक खर्चानुसार निवृत्तीपश्चात (१०% भाववाढ जमेस धरून) येणाऱ्या खर्चाचा आढावा घेतला तर नियमित प्राप्ति बंद झालेली असेल त्यावेळच्या जीवनमानासाठी किती पूंजी हवी याचा अंदाज घेता येईल. हे सर्व लक्षात घेऊन आपण स्वत:च आपला ‘पेन्शन प्लॅन’ बनवू शकतो. असा स्वत:चा पेन्शन प्लॅन बनविण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, हे पुढील लेखात पाहू.