03 August 2020

News Flash

कावळा, कारवी आणि कदंब

एरवी सतत नजरेसमोर असणाऱ्या कावळ्याची आपण खऱ्या अर्थाने दखल घेतो ती पितृपक्षाच्या काळात.

एरवी सतत नजरेसमोर असणाऱ्या कावळ्याची आपण खऱ्या अर्थाने दखल घेतो ती पितृपक्षाच्या काळात. पण तरीही आपल्याला कावळ्याच्या घरकावळा आणि डोमकावळा या दोनच जाती माहीत असतात.

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत आपण साश्रू नयनांनी बाप्पांना निरोप दिला आणि निरव पोकळी निर्माण झाल्याची भावना निर्माण झाली. ती पुढचे काही दिवस आपल्याला व्यापत राहते. या पोकळीत एक रिकामेपणा असतोच, पण गंभीरपणाही असतो. अशा वेळी, शांत झालेलं मन आसमंतातल्या विविध घटकांकडे सहज वळतं आणि चिंतनमग्न होतं. या चिंतनात दैनंदिन जीवनातल्या खिसगणतीत नसलेल्या पण अचानक स्वत:चं अनन्यसाधारण महत्त्व जाणवून देणाऱ्या घटकांचा विचार आपण करायला लागतो. आपल्या आयुष्ययात्रेतल्या ज्या सहप्रवाशांना काळाने प्रवास थांबवायला लावलेला असतो त्या स्नेहीजनांच्या स्मरणभेटीची आठवण करून देणाऱ्या कावळोजींना हे पुढचे पंधरा दिवस जणू उसंतच लाभणार नाही. ‘पैल तो गे काऊकोकताहे’ म्हणत कुणाच्या तरी आगमनाची वार्ता सांगणारा कावळा ऊर्फ काऊ . जन्मापासून मृत्यूनंतरही सोबती समजल्या जाणाऱ्या या पक्ष्याबद्दल शास्त्रीय विचार काय करायचा? वर्षभर त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही आणि महालय काळात या कावळ्यांना जणू सुगीचे दिवस येतात.

38-lp-nature

कावळ्यांच्या फक्त दोनच जाती आपल्याला माहीत असतात. नेहमी दिसणारा ‘घरकावळा’ ऊर्फ ‘हाऊस क्रो’ आणि दुसरा त्याच्याहून जरासा थोराड दिसणारा ‘डोमकावळा’ म्हणजेच ‘जंगल क्रो’ हे एवढंच कावळ्याबद्दलचं आपलं ज्ञान असतं. या दोन जातींशिवाय भारतात अजून पाच प्रकारचे कावळे सापडतात हे आपल्या गावीही नसतं. समस्त काकभाई कोर्विदाई या कुलात नि कोर्वस गोत्रात मोडतात. या गणगोत्रापुढे वेगवेगळी जातिवाचक नावे लागतात. उदाहरणार्थ घरकावळा म्हणजे ‘कोर्वस स्प्लेंडेन’, डोमकावळा म्हणजे ‘कोर्वस मॅक्रोऱ्हांकोस’. साधं कावळा आणि डोमकावळा असंच ओळखले जाणारे कावळे अशा विचित्र नावांनी जणू अपरिचित वाटतात. म्हणूनच ही शास्त्रीय नावं सांगून मी कावकाव करणार नाहीये. आपल्या या काकभाईंच्या उरलेल्या पाच भावांची नावे रूक, जॅकडॉ, कॅरियन क्रो, रेवन आणि ब्राऊन नेक्ड रेवन अशी आहेत. साधं उदाहरण देते, कावळा आपल्या दररोजच्या आयुष्यात इतका एकरूप झालाय की ते आपल्या लक्षातही येत नाही. हल्ली नैसर्गिक काळी छटा म्हणून जो काळा रंग केसाला लावतात, त्या गर्द काळ्या छटेला डोमकावळ्याच्या रंगाचं नाव दिलंय, रेवेन ब्लॅक!

या सगळ्या सात जातींपैकी, पहिले दोन कावळे संपूर्ण देशात सापडतात हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच. पण गम्मत म्हणजे फक्त अंदमान-निकोबारमध्ये डोमकावळा सापडत नाही हे मला अभ्यासाला सुरुवात केल्यावर कळलं. यातले तिसरे रूक महाराज घरकावळ्यापेक्षा थोडेच मोठे असतात नि यांनी गळ्यावर व चोचीच्या सुरुवातीला पांढरा रंग धारण केलेला असतो. या रूक कावळ्यांना मी उत्तर पंजाब आणि हरियाणात पाहिलं आहे.

मागे मी लिहिलं होतं की, स्थलांतर करणारे अनेक पक्षी ठरावीक काळासाठी वास्तव्य करायला आपला देश निवडतात. तिकडे युरोपात हवा बदलली की आपल्या कावळ्यांचे भाऊबंद युरोप, अफगाणिस्थान व पाकिस्तानातून आपल्याकडे येतात. काश्मीर प्रांतात जरासे लहान चणीचे कावळे दिसतात. यांना जॅकडॉ म्हणून ओळखलं जातं. शहरात, शेतांमध्ये राहणारे हे कावळे हिवाळ्यात पंजाब-हरियाणात राहायला येतात. युरोपातून येणारा पाचवा कावळा कॅरियन क्रो लडाख प्रांतात दिसतो. हा घरकावळ्यापेक्षा थोडा मोठा नि काळाकुट्ट असतो. या सर्व कावळ्यांमध्ये सर्वात मोठा असतो तो म्हणजे ‘रेवन’! घारीएवढय़ा आकाराचा हा कावळा, राजस्थान हरियाणापासून अगदी तिबेटचे पठार, हिमालयाचे उंच भाग नि पूर्वेकडे अरुणाचल प्रदेशपर्यंत सापडतो. याचा आवाज सगळ्यांमध्ये भारदस्त असतो. आणि शेवटचा कावळा म्हणजे ‘ब्राऊन नेक्ड रेवन’ जो सहजासहजी दिसत नाही. या सर्वातले आपल्याला नेहमी दिसणारे दोघेच काय ते मनुष्यप्राण्याशी सलगी साधलेले. बाकी सगळे आपल्यापासून सहसा लांबच राहणारे असतात.

वरवर पाहता कावळा निरुपद्रवी या सदरात मोडतो, पण लहानसहान पक्ष्यांना त्याची फार दहशत वाटते. लहान पक्ष्यांची अंडी फोडून खाणं, नुकतीच जन्मलेली किंवा उडायला लागलेली पिल्लं खाणं हे कावळ्याचे आवडते चाळे असतात. कधी कधी यांच्या तावडीत कोणी मोठा पक्षी सापडला की अगदी शेकडय़ाच्या संख्येने त्याचा पाठलाग करतात. त्याला पार दमवून टाकतात नि मगच हे कावळे परत फिरतात. या
प्रकाराला ‘मॉबिंग’ म्हटले जाते. अगदी घारी, घुबडंसुद्धा कावळ्यांच्या नादी लागत नाहीत. फक्त ‘कोतवाल’ ऊर्फ ‘ड्रॉनगो’ पक्षीच काय तो या कावळ्यांना पुरून उरतो.

39-lp-nature

आता पुढचे पंधरा दिवस कावळे, गोडधोड, सुग्रास अन्न खातील पण इतर वेळेस त्यांना खायला काहीही चालतं. शहरातल्या वाढत्या बेसुमार घाण आणि कचऱ्यामुळे ओमनीव्होरस सदरात मोडणाऱ्या कावळ्यांची संख्या वाढली आहे असा शास्त्रीय निष्कर्ष मध्यंतरी काढला गेला होता. नको तिथे नाक खुपसणाची कावळ्यांची सवय, चौकसपणा, विनाकारण कलकलाट करायची सवय अगदी त्रासदायक वाटते. कचऱ्याचा सफाया करणारे हे पक्षी, त्यांना मिळालेला ‘पक्ष्यांची महानगरपालिका’ हा किताब सार्थ करतात. या कावळ्यांची घरं ओबडधोबड घाण वाटत असली तरी आतून स्वच्छ असतात. कावळी एका वेळेस साधारण तीन ते चार अंडी घालते. ही त्यांची घरटी झाडावर कुठे व किती उंचीवर बांधतात यावर पावसाचे अंदाज बांधता येतात.

गम्मत म्हणजे कितीही चौकस नि हुशार असले तरीही, त्या कोकिळा घोळका करतात आणि कावळ्यांना ‘लल्लू’ बनवतात. मग घरटी एक प्रमाणे कोकिळेच्या एका तरी पिल्लाची जिवापाड काळजी घेऊन कावळे त्याला लहानाचं मोठं करतात. म्हणूनच आपल्याकडे ‘बावळा कावळा’ हा शब्द रूढ झाला असावा. कावळ्यांची एक चांगली गोष्ट सांगते, जेव्हा एखादा कावळा मरतो, तेव्हा अक्षरश: शेकडोंच्या संख्येने कावळे तिथे जमतात. अगदी दिसेल तिथपर्यंत हे काकभाईबंद जमून काही क्षण कावकाव करतात नि मग उडून जातात. सांत्वन करण्यासाठी जणू काहीच क्षणच पुरेसे असतात. आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरी. आता कावळा बघाल तेव्हा आसमंती गप्पांमधली ही कावकाव नक्कीच सगळ्यांना आठवेल.

गणपतीच्या दरम्यान आलेल्या सुट्टय़ा जोडून अनेक भटके सह्य़ाद्रीत भटकून आले. रानोमाळ रानवाऱ्यावर पसरलेल्या एका बातमीने भल्याभल्यांचे पाय सह्य़पठाराकडे वळले. काय होती ती बातमी? बातमी होती कारवी फुलल्याची! दर सात वर्षांनी कारवी फुलल्याची बातमी रानोमाळ पसरते नि सुरू होतात आनंदवाऱ्या या कारवीला पाहण्याच्या. अकांथस कुटुंबातलं हे रानफूल, ‘स्ट्रॉबिलान्थेस कॅलोसा’ या अवघड वनस्पतिशास्त्रीय नावाने ओळखलं जातं. दर सात वर्षांनी फुलणारी ही कारवी जणू सह्य़ाद्रीचा मानबिंदूच म्हटल्यास चूक ठरणार नाही. निळसर जांभळ्या गुलाबी छटेची कारवी साधारण पाच ते सहा मीटर्सची उंची सहज गाठते. कातरलेल्या हिरव्यागर्द पानांची कारवी आडवीतिडवी न वाढता, शक्यतो सरळसोटच वाढते. दर वर्षी कारवीची पावसाळ्यात वाढ होते. पावसाळा संपला की, थंडीच्या नंतर, पान गळून जाऊन, कारवीचा फक्त दांडाच उरतो. असं चक्र सात र्वष सुरूच असतं. मात्र सातव्या वर्षांच्या पावसाळ्यानंतर, लहान लहान गुलाबी, पांढरट कळ्यांनी कारवी भरायला सुरुवात होते. या कळ्या अचानक झपकन् उमलतात आणि कडसर गोड वासाच्या अगणित जांभळ्या घंटा आसमंतात डुलू लागतात. साधारण दहा ते पंधरा दिवसांच आयुष्य लाभलेलं कारवीचं फूल आपल्या मधामुळे मोठय़ा प्रमाणात स्वत:कडे कीटक, फुलपाखरं आणि पक्ष्यांना आकर्षित करत असतं. कारवीच्या फुलांतून निघणारा मध हा नेहमीच्या मधापेक्षा घट्ट तर असतोच, पण रंगाला थोडा गडद असतो. आदिवासी समाजात या मधाला महत्त्व तर असतंच पण हल्ली सरकारी मधविक्री केंद्रात याची मागणी वाढली आहे कारण यात अनेक औषधी गुणधर्म असल्याचे लक्षात आले आहे.

मधातले औषधी गुणधर्म वगळता, कारवीची पानं विषारी समजली जातात. जनावरं किंवा मानवी खाण्यासाठी ही पानं अयोग्य समजली जातात. मात्र आदिवासी समाजात या पानांच्या रसाचा वापर अनेक दुखण्यांसाठी केला जातो. अशी ही कारवी तिच्या आयुष्यात एकदाच फुलते व नंतर मरून जाते. या कारवीच्या काठय़ा, आदिवासी पाडय़ांमध्ये घरबांधणीसाठी प्रमुख आधार समजला जातात. बाकी सरपणाव्यतिरिक्त कारवीचा उपयोग म्हणजे, मैलोन्मैल पसरलेली ही रानझुडपं, आपल्या केशमुळांद्वारे जमिनीवरच्या मातीला घट्ट धरून ठेवतात. डोंगराची होणारी धूप याने कमी होते. अशी ही कारवी, सह्य़ाद्रीच्या पठारांवर, डोंगरमाथ्यावर आणि संपूर्ण पश्चिम घाटात फुलायला लागलीय. सात वर्षांनी फुलणारं जांभळं गारूड बघायला जायलाच हवं.

फुललेल्या कारवीबरोबर आसमंतात शरदाचं होऊ घातलेलं आगमन म्हणजे सरत्या पावसाळ्याची नांदी असते. ताज्या पाण्याचा बुस्टर डोस पिऊन सुखावलेली झाडं आपल्या नवीन इनिंगला सज्ज होत असतात. श्रावण, भाद्रपदात होऊन गेलेल्या सणांच्या आनंदखुणा मिरवणारा आसमंत विविध नवीन झाडझाडोऱ्यासकट फुलायला लागलेला असतो. गरज असते कावळ्याच्या शोधक नजरेची आणि कुतूहल शाबूत ठेवण्याची. श्रावणात दहीहंडी फोडणारा बाळकृष्ण यमुनेच्या काठी कदंबातळी रासलीला करायचा हे वाक्य अनंत वेळा आपण ऐकलेलं असतं. मात्र हे कदंबाचं झाड पाहिलेलं असतंच याची खात्री नसते. आपल्या देशात उत्तरेकडच्या हिमालयाच्या पायथ्यापासून अगदी पार दक्षिणेकडेही हा वृक्ष आढळतो. शंभर टक्के भारतीय असलेला रुबिएसी कुटुंबातला कदंब दणदणीत मोठा होतो. सहज पंचवीस मीटर्सची उंची गाठणारा कदंब पानझडी प्रकारात गणला जातो. इतर झाडांसारखं हे झाड आडवं तिडवं न वाढता उंचच उंच आणि गर्द वाढतं. अगदी हिरवागार पर्णसंभार मिरवणारं कदंबाचं झाड केवळ सुंदर याच सदरात जमा होतं. साधारण पंधरा सेंमी असलेली कदंबाची लांबट पानं अगदी साधी, सरळसुंदर म्हणता येऊ शकतात.  मार्च महिन्यात होणाऱ्या पानगळीत ही पानं गळून पडतात. खालच्या बाजूला लव असलेली, अतिशय ठळक शिरा दाखवणारी पानं या झाडाला विविध हिरवे रंग प्राप्त करून देतात. वाढत्या वयाबरोबर जून होऊन गडद करडट होणारी भेगा असलेली कदंबाची साल अतिशय साधी म्हणता येऊ शकते.

या झाडाला प्रसिद्ध बनवणारा आकर्षक भाग म्हणजे त्याची ती चेंडूसारखी दिसणारी फुलं. या फुलांचं अस्तित्व थेट कालिदासापर्यंत जोडलं गेलंय. आपल्या साहित्यातसुद्धा कदंबाला मानाचं स्थान दिलं गेलंय ते कदाचित या आकर्षक फुलांमुळेच. सरत्या आषाढापासून कदंब फुलायला सुरुवात होते. कदंबाचं फूल म्हणजे एक फूल नसून एकत्र लहान फुलांचा एक फुलोराच असतो. केशरी झाक असलेल्या पाच पाकळ्यांचा जणू गोलाकार कप बनवणाऱ्या या पाकळ्या आणि त्यातून बाहेर डोकावणारे शुभ्र स्त्रीकेसर मिरवणारं हे फूल फारच सुंदर दिसतं. आषाढात सुरू झालेली ही कदंबाची ‘फुलबाजी’ थेट भाद्रपदापर्यंत सुरू राहते. त्यानंतर या झाडाला फळं लागायला सुरुवात होते. हे फळपण फुलासारखंच अनेक फळांनी बनलेलं असतं. कोकणात या फळाची भाजी करून खातात. जोडीला लोणचंही केलं जातंच. कदंबफळं अगदी करमळ्यासारखीच आंबट-गोड लागतात. त्यामुळे नुसती कापून, त्यावर तिखट-मीठ टाकून ही फळं खाण्यात वापरली जातात. माणसांच्या जोडीला या फळांवर माकडं, खारुटल्या, वेगवेगळे पक्षीसुद्धा ताव मारतात.

आपल्याकडे कदंब बहुगुणी बहुपयोगी म्हणून ओळखला जातो. हल्ली बहुतेक सर्वत्र याचा उपयोग सुशोभीकरणासाठी केला जातो. रस्त्यांच्या कडांना उत्तम वाढणारा वृक्ष म्हणून कदंब खूप लोकप्रिय होतोय. बाकी याच्या लाकडाची उपयोग क्षमता कमीच आहे, कारण ते अगदी कमी प्रतीचं समजलं जातं. कमी वजनाचं आणि हलकं असलेलं हे लाकूड अजिबात टिकाऊ नसल्याने काडय़ापेटय़ा, सरपण, चहाची खोकी असल्या कामासाठी वापरलं जातं. आयुर्वेदाला कदंबाचे अनेक उपयोग ज्ञात आहेत. याची साल आणि पानं औषधी समजली जातात. ताप, उलटी, अतिसारसारख्या आजारांवर याचा काढा करून देतात. कदंब पानं जनावरांना उत्तम चारा समजली जातात. भगवान श्रीकृष्णांमुळे याला धार्मिक महत्त्वही दिलं गेलंय. ‘एन्थोसेफ्यालस चायनेन्सिस’ नावाने आपल्याकडे ओळखला जाणारा हा वृक्ष, चीनच्या दक्षिण भागात वन्य वृक्ष म्हणून ओळखला जातो. कोकणात निव म्हणून ओळखला जाणाऱ्या कदंबाला बहुतेक भाषांमध्ये नावं आहेच. कदंबाची रोपं हल्ली सहज उपलब्ध असतात. बियांपासून हे झाड सहज लावता येतं.

मी जेव्हा जेव्हा या भारतीय झाडांनी नटलेल्या समृद्ध जंगलांकडे पाहते तेव्हा कुठे तरी अपराधी भावना ठाण मांडते की, झपाटय़ाने ऱ्हास पावत चालेल्या निसर्गात राहणारे आपण, आपल्या पुढच्या पिढय़ांना आंदण म्हणून काय देणार आहोत?

यावत् भूमंण्डलात् धत्ते

सशैलवनकाननम्

तावत् तिष्ठन्ति मेदिन्या

संतति पुत्र पौतृकी।

वराह पुराणातल्या या श्लोकाचा मथितार्थ घ्यायचा म्हटला तर, ‘या भूतलावर जोपर्यंत पर्वत, वने आणि सरोवरे आहेत, तोपर्यंत तुम्ही, आणि तुमची मुले व भावी पिढय़ा सुखाने जगतील’ असा होतो. आपले पूर्वज चांगले होते म्हणून अनेक वनांची, देवरायांची आणि उद्यानांची निर्मिती त्यांनी केली होती. आपण या सगळ्याचा नाश करून आपल्या भावी पिढीचे वाईट पूर्वज बनत चाललोय. जंगलं हजारो वर्षांच्या उत्क्रांतीची निर्मिती असते. ती एकदम बनवता येत नसतील, तर आपापल्या परीने त्या निर्मितीत आपला खारीचा वाटा उचलणं गरजेचं आहे. या महालय काळात, पावसाला आणि आपल्या पितरांना धन्यवाद म्हणण्यासाठी कदंबाचं एखादं झाड लावायला आणि जगवायला हरकत नाही. आसमंत अशा कृतीने नक्कीच सुखावेल.

(छायाचित्रे : सम्राट केरकर, अनिरुद्ध देशिंगकर)
रुपाली पारखे देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2016 1:03 am

Web Title: crow karvi kadamb
Next Stories
1 तेरडा, जळवा आणि पाल
2 धेड उंबर, साग आणि गांडूळ!
3 वैज्ञानिक नागपंचमी
Just Now!
X