प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात खूप यशस्वी आणि श्रीमंत व्हायचे असते, पण यशस्वी होण्यासाठी व्यक्तीने योग्य मार्ग निवडणे आवश्यक आहे. तसेच चुकीच्या लोकांपासून दूर राहिले पाहिजे. तुमच्याबरोबरच्या व्यक्तीचा प्रभाव नेहमी तुमच्यावर पडत असतो. चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिल्यास माणूस कधीच यशस्वी होऊ शकत नाही. यामुळे महान अर्थतज्ज्ञ, राजकारणी आणि मार्गदर्शक आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणत्या व्यक्तीपासून आपण नेहमी अंतर ठेवून राहिले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले आहे.

अशा लोकांपासून ठेवा अंतर

अशी अनेक नाती आहेत, ज्यात एकाची चूक नसतानाही दोघांना शिक्षा भोगावी लागते. अशावेळी जेव्हा ही नाती बिघडतात, तेव्हा व्यक्तीने त्यांच्या सहवासापासून दूर राहावे. चाणक्य नीतीच्या श्लोकांमध्ये लिहिलेले आहे की, ‘राजा राष्ट्रकृतम् पापम राज्यः पापम पुरोहितः, भरता च स्त्रीकृतं पापम शिष्यापम गुरुस्तथा’ म्हणजे या संबंधांमध्ये “राजा-प्रजा, गुरु-शिष्य आणि पती-पत्नी” या लोकांना एकमेकांच्या कृतीचे फळ भोगावे लागते.

१) राजा आणि प्रजा

राजाने चूक केली तर त्याचे परिणाम प्रजेला भोगावे लागतात. अशा परिस्थितीत जेव्हा राजा चुकीचा आणि अत्याचारी असतो तेव्हा प्रजेने ते ठिकाण सोडावे. सध्याच्या परिस्थितीत मोठ्या पदावर असलेल्या आणि चुकीची कामे करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीशी संबंध ठेवू नका. त्याच्या सहवासात राहिल्यास तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो.

२) गुरु आणि शिष्य

गुरुचे सर्व गुण शिष्यात असतात. गुरुंनी दाखवलेल्या मार्गावर चालणे हेच शिष्याचे काम असते. पण, गुरुच जर चांगल्या मार्गाने जाणारा नसेल तर शिष्याचे नुकसान होते. गुरु हाच शिष्याच्या वाईट वागण्याचे कारण बनू शकतो. गुरुचे वागणे योग्य नसेल तर त्या गुरुपासून अंतर ठेवून रहावे.

३) पती आणि पत्नी

पती-पत्नीचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. पण, या नात्यात कोणतीही छोटीशी फसवणूक नाते संपुष्टात आणू शकते. पती-पत्नीच्या नात्यात दोघांचे आचरण योग्य असले पाहिजे. जीवनसाथी बरोबर नसेल तर जीवनात अनेक समस्या येऊ शकतात. अशा परिस्थितीत जीवनसाथी बरोबर नसेल तर नातं संपवायला हवं.

हेही वाचा – Chanakya Niti : कठीण काळात फक्त ‘या’ ५ गोष्टी करा; संकटातून होईल लवकर सुटका, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती …

चुकीच्या लोकांची साथ सोडा

असे अनेक लोक आहेत जे तुम्हाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात किंवा स्वतः चुकीची कामे करतात. अशा परिस्थितीत तुमच्या आयुष्यातही अशा कोणी व्यक्ती असतील, तर त्यांच्यापासून अंतर राखले पाहिजे. अनेक वेळा या लोकांच्या सहवासात आपल्यालाही पापाचा भागीदार व्हावे लागते. या लोकांची संगत आपल्याला कधीच यशस्वी होऊ देत नाही.