12 December 2017

News Flash

अमेरिकी लोकशाही ‘ट्रम्पली’ कशी?

समाजातल्या सुखवस्तू वर्गाचे विचार बुरसटलेले असले तरीही त्याच विचारांना प्रोत्साहन द्यायचं

लोकसत्ता टीम | Updated: June 24, 2017 2:51 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (संग्रहित छायाचित्र)

समाजातल्या सुखवस्तू वर्गाचे विचार बुरसटलेले असले तरीही त्याच विचारांना प्रोत्साहन द्यायचं, त्या विचारांना अगदी शरण जायचं.. हे करतानाच कुणी तरी ‘त्यांच्या’बद्दल भीती आणि राग या भावनांचं मिश्रण समाजात अधिकाधिक पसरेल असं पाहायचं.. विद्यमान राज्यकर्ते हे ‘त्यांच्या’ बाजूचे आहेत, इतकंच नव्हे तर हे आजचे राज्यकर्ते आपल्या देशाची वाट लावण्यासाठीच गादीवर बसलेले आहेत आणि त्यांना हुसकावणं हेच आता देशाचं रक्षण करण्यासाठी गरजेचं आहे, असा प्रचार जोरात करायचा, त्या प्रचारासाठी आपल्या सुखवस्तू समर्थकांची मदत घ्यायची.. कोणत्याही प्रकारचे विरोधक (म्हणजे- (१) आपल्याविरुद्ध असलेल्या समाजगटापैकी- अर्थात ‘त्यांच्या’पैकी अध्यात ना मध्यात असणारे, (२) गैरसोयीचे ठरतील असे प्रश्न विचारणारे, (३) अन्य राजकीय गटांचे सदस्य (४) संभाव्य धोका ठरू शकणारे) अशांना एक तर जाहीरपणे मारहाण करून वर ‘त्यांना अशीच शिक्षा हवी होती’ असा प्रचार करायचा..

हे असं राजकारण अमेरिकेत १६ जून २०१५ रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारीची इच्छा जाहीर केल्यापासून पुढल्या काही महिन्यांत स्पष्टच दिसू लागलं, असं मुक्त पत्रकार आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक चिप बर्लेट यांनी २०१५ च्या डिसेंबरात लिहिलं होतं. ‘ट्रम्पिंग डेमोक्रसी’ या शीर्षकाच्या त्या दीर्घ लेखाचा बराच भाग आजही, बर्लेट ज्याचे सदस्य आहेत अशा, ‘पोलिटिकल रीसर्च असोसिएट्स’ या संस्थेच्या संकेतस्थळावर (पोलिटिकलरीसर्च.ऑर्ग) आजही वाचता येतो.  ‘ट्रम्प हे समाजालाच (सिव्हिल सोसायटी) खिळखिळं करतील’ असं या बर्लेट यांनी नंतरही वेळोवेळी म्हटलेलं आहे. आता याच चिप बर्लेट यांचं, ‘ट्रम्पिंग डेमोक्रसी’ याच नावाचं पुस्तक येतं आहे.. तेही वैचारिक, सैद्धान्तिक आणि अभ्यासकी विश्वात मोठं नाव असणाऱ्या ‘रूटलेज’ या प्रकाशन संस्थेतर्फे!

‘रूटलेज स्टडीज इन फॅसिझम अ‍ॅण्ड फार राइट’ या ग्रंथमालिकेचा भाग म्हणून हे पुस्तक २०१८ मध्ये प्रकाशित करायचं, असं रूटलेजनं ठरवलंय. पुस्तकाचं आवरण अद्याप ठरलेलं नाही, पण एकंदर १८ प्रकरणांपैकी १७ तयार आहेत. रोनाल्ड रेगन यांच्या कारकीर्दीत कट्टर उजव्या अमेरिकी (गौरवर्णीय) संघटना आणि अध्यक्षीय राजकारण यांचं मेतकूट जमू लागलं, ती प्रक्रिया ट्रम्प यांच्या विजयाकडे घेऊन जाणारी ठरली. रेगन व ट्रम्प दोघेही लोकानुनयी नेते, पण ट्रम्प भीती आणि द्वेष यांवर आधारित राज्य करणारे, असा बारकावा उलगडून दाखवणाऱ्या या पुस्तकात भारताच्या अभ्यासासाठीही अप्रत्यक्षपणे काही दुवे नक्कीच सापडतील, हे सांगायलाच हवं का?

 

First Published on June 24, 2017 2:51 am

Web Title: american democracy and donald trump