‘नेहरूंच्या पहिल्या प्रस्तावित मंत्रिमंडळ यादीत पटेल यांचे नाव नव्हते’ हे वाक्य, पटेल यांचे सचिव आणि त्याहीपूर्वी तिघा व्हाइसरॉयचे सल्लागार म्हणून काम केलेल्या व्ही. पी. मेनन यांनी हॅरी ऊर्फ एच. व्ही. हॉडसन यांना दिलेल्या मुलाखतीत उच्चारलं होतं. सध्या राष्ट्रपती भवनात ‘संशोधन सहायक’ असलेल्या नारायणी बसू यांनी या व्ही. पी. मेनन यांच्यावर लिहिलेलं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं, त्यात हे वाक्य आहे. हे वाक्य असलेलं पुस्तक, चीन आणि पूर्व आशियाचा विशेष अभ्यास असलेल्या बसू यांनी लिहिलं आणि त्यांना गुरुस्थानी असलेले विद्यमान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याच हस्ते त्याचं प्रकाशन झालं. प्रकाशनपर भाषणातही जयशंकर यांनी त्याच वाक्याचा उल्लेख केला. मग हा उल्लेख जयशंकर यांच्या भाषणातून जयशंकर यांच्या ट्विटवरही गेला. दिल्लीत शेदीडशे श्रोत्यांनी ऐकलेलं जयशंकर यांचं विधान आता बेंगळूरुच्या रामचंद्र गुहांनीही वाचलं. गुहा गांधी- नेहरू- पटेल काळाचे अभ्यासक. त्यांनी जयशंकरांच्या विधानावर खत्रूड आक्षेप घेतला : ‘जे काम भाजपच्या ‘मीडिया सेल’ला करता आलं असतं, ते देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी का करावं?’ यावर जयशंकरांचं उत्तर ‘काही परराष्ट्रमंत्री पुस्तकंही वाचतात’! तेवढय़ात दुसऱ्या मेननांवर – म्हणजे नेहरूंचे सहकारी व्ही. के. कृष्ण मेनन यांच्यावर- पुस्तक लिहिणारे माजी पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी ‘नेहरूंची पहिली प्रस्तावित मंत्रिमंडळ यादी’ – दिनांक १९ जुलै १९४७- फोटो काढून ट्विटरवर प्रसृत केली. त्यात सरदार पटेल यांचं नाव पहिलंच आहे.

इथे वाद थांबायला हवा होता, पण कदाचित तो थांबणार नाही. दुसरीकडे, kwww.forgotten-raj.org/’ या आर. पी. फर्नादो यांच्या महाब्लॉगवर जो ९६००हून अधिक शब्दांचा अभ्यासलेख व्ही. पी. मेनन यांच्याविषयी आहे, त्यात ‘मेनन नेहरूंच्या जवळचे नव्हते’ हा स्पष्ट,  ‘१९५० नंतरच्या काळात मेनन यांची मते एकांगी होत गेली’ असा सूचक उल्लेख आहे. त्याचा धांडोळा पुस्तकात आहे की नाही कोण जाणे.. कारण, बाकी पुस्तकाची फारशी चर्चाच नाही. असं बसू यांचं पुस्तक सध्या तरी एका उल्लेखानं मारलं गेलंय आणि त्याऐवजी पटेलप्रेम- नेहरूद्वेषाचा जुनाच खेळ सुरू झालाय.