|| देवेंद्र गावंडे

बस्तर वा अबुजमाड म्हटलं, की नक्षलवाद आठवणं हे आता सवयीचं झालं आहे. मात्र, त्यापल्याडही तिथल्या ‘अबुजमाडियां’चं स्वतंत्र आणि स्वच्छंदी असं नैसर्गिक जगणं आहे. त्या जगण्याचा तीन दशकांपूर्वी अबुजमाडमध्येच राहून घेतलेला शोध या पुस्तकात मांडला आहे..

Using Plastic Chopping Board Can Harm Stomach Throw These Four Items From Kitchen
Earth Day: तुमच्या किचनमधून आजच बाहेर काढा ‘या’ ४ वस्तू; पर्यावरणच नव्हे तर पोटाच्याही ठरतात शत्रू
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…

आज ‘बस्तर’ म्हटले वा त्यातील ‘अबुजमाड’चे नाव घेतले, की लगेच ऐकणाऱ्याच्या तोंडून ‘नक्षलवाद’ हा शब्द बाहेर पडतो. अलीकडच्या काही दशकांत रूढ झालेल्या या समीकरणापल्याडही एक बस्तर आहे. त्यातला अबुजमाडचा भाग तर आजही अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो. अजूनही महसुली सर्वेक्षणापासून वंचित राहिलेला हा देशातील एकमेव परिसर आहे. सर्वात आधी अकबराच्या राजवटीत या भागाच्या सर्वेक्षणाचा प्रयत्न झाला. तो फसला. नंतर ब्रिटिशांनी वारंवार प्रयत्न केले, परंतु त्यांनाही यश आले नाही. स्वातंत्र्याची सात दशके लोटल्यावरही सरकारी यंत्रणा या माड परिसरातील फक्त एका गावाचे सर्वेक्षण आजवर करू शकली. एका अंदाजानुसार, चार हजार चौरस किलोमीटरच्या या पहाडी क्षेत्रात १३ हजार आदिवासी राहतात. ‘अबुजमाडिया’ अशी ओळख असलेल्या या आदिवासींचा अभ्यास नेहरूंच्या काळात व्हेरियर एल्विन या मानववंशशास्त्रज्ञाने केला. त्यानंतर या भागाच्या वाटय़ाला फारसे कुणी गेले नाही. बी.डी. शर्मा, नंदिनी सुंदर यांसारख्या काही अभ्यासकांनी या भागात फिरून काही पुस्तके लिहिली खरी, पण त्यांचा भर विकास, प्रशासकीय असुविधा व या भागातील हिंसाचार याभोवतीच केंद्रित राहिला. या दुर्गम भागातील आदिवासी नेमका जगतो कसा, त्याची जीवनशैली काय, याचा तटस्थपणे वेध घेण्याचा प्रयत्न कुणी केला नाही. त्यामुळे अबुजमाडविषयीची उत्सुकता कायम राहिली. ती पूर्णपणे शमवण्याचे काम नरेंद्र यांनी लिहिलेले ‘बस्तर डिस्पॅचेस : अ पॅसेज थ्रू द वाइल्ड’ हे पुस्तक करते. हे अप्रतिम पुस्तक लिहिणारे नरेंद्र स्वत:ची पूर्ण ओळख देत नाहीत. दिल्लीच्या ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज्’तर्फे मिळणारी शिष्यवृत्ती घेऊन ते १९८० ते ८५ या काळात अबुजमाडला राहिले. तेव्हा आलेले अनुभव त्यांनी शब्दबद्ध करून ठेवले. त्यास ‘हार्पर कॉलिन्स’ने तब्बल ३३ वर्षांनंतर पुस्तकरूपात आणले आहे.

अबुजमाडच्या आदिवासींचे जीवन समजून घेताना लेखकाला या भागाने काय शिकवले, यावरचे मुक्त अन् तितकेच रसाळ शैलीतील चिंतन म्हणजे हे पुस्तक! लेखक तिथल्या आदिवासींसोबत राहिला, परंतु त्याने त्यांना कोणतेही सल्ले दिले नाहीत. शहरी भागात रुजलेल्या विकासाच्या कल्पना त्यांना सांगितल्या नाहीत. स्वत:ची मते त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न तर अजिबात केला नाही. लेखक अबुजमाडचा, तेथील जीवनाचा अभ्यास करताना ‘सहभागी निरीक्षका’च्या भूमिकेतून वावरला. त्यामुळे अबुजमाडियांच्या जीवनशैलीतील प्रत्येक पैलूचे तटस्थ दर्शन हे पुस्तक वाचताना सतत होत राहते. अबुजमाडियांचे जगणे पूर्णपणे निसर्गाशी तादात्म्य पावलेले आहे. नागरी जीवनाच्या दैनंदिन व्यवहारातील बहुतांश गोष्टींपासून ते अनभिज्ञ आहेत. यासंदर्भात लेखकाने अबुजमाडियांमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेचे उदाहरण दिले आहे. अबुजमाडियांच्या बोलीभाषेत पाचशेपेक्षा जास्त शब्द नाहीत. कमीत कमी शब्दांचा वापर हे या जमातीच्या जीवनशैलीचे एक वैशिष्टय़ आहे. जसजसे जंगलात खोलवर जाऊ तसतसा भाषेचा वापर कमी कमी होत जातो, हा लेखकाला आलेला अनुभव महत्त्वाचा आहे. इथले आदिवासी आणि वन्यप्राणी यांच्यातील सहजीवन दृष्ट लागावे असेच आहे. ‘प्राणी’ हे सामान्य नाम येथील लोकांना ठाऊकच नाही. वाघ, कोल्हा, अजगर अशीच नावे सर्वश्रुत आहेत. न्याय, अन्याय, अतिक्रमण, समता, विषमता, अराजक, शांतता, युद्ध, शेतकरी, उत्पादन, साठा, चोरी.. यांसारखे शब्दच त्यांच्या कोशात नाहीत. त्यामुळे ही जमात शब्द आणि त्यातून निर्माण होणाऱ्या रस, विकारांपासून दूर आहे. कुणी कुणावर देखरेख ठेवणे; एखादा माणूस जंगलात गेला असेल, तर ‘तो का गेला?’ असा प्रश्न विचारणे, त्याची चौकशी करणे हे अबुजमाडियांच्या स्वभावातच नाही.

यासंदर्भात लेखकाने उत्तर अमेरिकेतील ‘रेड इंडियन्स’च्या जागेवर युरोपियनांनी केलेल्या पहिल्या अतिक्रमणाचा संदर्भ दिला आहे. युरोपीय लोकांनी जेव्हा तिथल्या आदिवासींच्या जमिनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि त्याचे तुकडे पाडले, तेव्हा ‘ताबा’ व ‘तुकडा’ हे जमिनीशी संबंधित शब्द रेड इंडियन्सनी प्रथमच ऐकले आणि नंतर त्यांनी त्यांचा वापर सुरू केला. अबुजमाडियांना अजूनही जमिनीचा ‘तुकडा’ हा शब्दच ठाऊक नाही. लेखकाने इथल्या ‘कोहकामेटा’ या गावात राहण्याचा निर्णय घेतला आणि तेथील आदिवासींना तीन एकर जमीन कसण्यासाठी मागितली. आश्चर्य म्हणजे, त्यांनी कसलीही विचारपूस न करता जमीन देऊन टाकली! आदिवासींची निर्मळ व निर्हेतूक जीवन जगण्याची आणखीही काही उदाहरणे लेखकाने दिली आहेत. प्रारंभीच्या काळात लेखक ‘मावली’ गावातील जत्रेत फिरत असतो. तिथल्या एका दुकानात एक आदिवासी बसलेला असतो. ‘हे तुझे दुकान नाही, मग कशाला इथे बसला?’ असा प्रश्न लेखक त्याला विचारतो. त्यावर तो आदिवासी ‘असेच..’ असे उत्तर देतो. ‘जत्रेत कशाला आला, काही काम होते का’ म्हणून विचारले, तर – ‘काहीच काम नव्हते. जंगलात मासेमारी करत होतो; गावातील दोघे जत्रेत जात होते, त्यांच्या मागे मागे आलो,’ असे उत्तर मिळते. येण्याचा हेतू काय, हे लेखक आडून आडून खूपदा त्याला विचारतो; परंतु नंतर लेखकाच्या लक्षात येते, की याला ‘हेतू’ हा शब्द व त्याचा अर्थच ठाऊक नाही. एखाद्या माणसाचा रोजगार काय, बेरोजगारी म्हणजे काय, किंवा जगण्यासाठी काम करावे लागते या संकल्पनाच अबुजमाडियांना ठाऊक नाहीत हे लेखकाच्या ध्यानात येते.

मग यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान तरी काय आहे, असा प्रश्न लेखकाला पडतो आणि याचे उत्तर त्याला ‘गरपा’ गावातील ‘बांडा’ हा आदिवासी अगदी सहजपणे देतो. हा बांडा पन्नाशीचाही नाही; तरी गावातील सर्वात वृद्ध म्हणून तो ओळखला जातो. ‘जगता जगता जे काही आपण छोटे-मोठे करतो ते काम’ अशी बांडाची साधी व्याख्या असते. ‘जे शरीर आपल्याला मिळाले ते घेऊन जगणे आपले काम, आपल्या गरजा पुरवणे हे निसर्गाचे काम. आपण आपली मर्यादा पार केली, की निसर्ग आपल्याला वठणीवर आणतो. या निसर्गाने प्रत्येकाला, म्हणजे शरीर, देव, नदी, आकाश, झाडे, जमिनीला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व दिले आहे. त्यांना मानवाप्रमाणेच भावभावना आहेत. त्यावर अतिक्रमण म्हणजे घुसखोरी. ती न करता जगणे हेच खरे जगणे. एकापासून दुसऱ्याला न तोडता जगणे म्हणजे खरे जगणे,’ असे बांडा अगदी सहजपणे सांगून जातो. छोटीशी लंगोटी घातलेला हा बांडा ताठ उभा राहून हे सांगत असतो तेव्हा लेखकाला तो एखाद्या सम्राटासमान भासतो. अगदी शुद्ध भावनेने जगणाऱ्या या आदिवासींच्या मनात ‘हे तुझे – हे माझे’ असे भाव कधीही येत नाहीत. कोणतीही कृती अथवा काम करताना दुसऱ्यावर अतिक्रमण नको अशी भावना सतत त्यांच्या मनात असते.

एकदा लेखक एका आदिवासीला सोबत घेऊन जंगलात दूरवर जातो. तिथे त्याला पाणथळीची जागा दिसते. त्यावर वाघाच्या पावलांचे ठसे दिसतात. ते पाहून ‘माघारी फिरू’ असे लेखक सोबतच्या आदिवासीला सुचवतो. परंतु तो ठाम नकार देतो. ‘आता दिवस आहे. ही प्राण्यांची वेळ नाही. त्यांची फिरण्याची वेळ सायंकाळची आहे. त्यामुळे आपल्याला काहीही होणार नाही,’ असे तो आदिवासी सांगतो आणि त्यांचा प्रवास अगदी निर्धोकपणे पार पडतो. जीवन जगण्याची अशीही एक पद्धती असू शकते, हे लेखकाला या भागात राहिल्यानंतर हळूहळू ध्यानात येते. एकीकडे नागरी जीवनात रोज वेगवेगळे बदल घडत असताना, भौतिक सुखाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असताना देशातील एका भागात अजूनही जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन किती नि:स्वार्थ आहे, याचे दर्शन या पुस्तकात होते.

लेखक कोहकामेटा गावात राहण्याचा निर्णय का घेतो? तर, तिथे शाळा आहे म्हणून. या गावात एकूण झोपडय़ा पाच, सहावी झोपडी शाळेची! शाळेत शिक्षण होतच नाही. गावातील सारे निसर्गाच्या प्रेमात आकंठ बुडालेले. हे प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना कोणतेही निमित्त पुरेसे असते. गावातील एका जुन्या झाडाच्या बुंध्यातून एक दिवस कोब्रा साप निघतो आणि परत बिळात जातो. हे कळताच सारे गाव बुंध्याजवळ गोळा होते. माणसांसोबत गावातील कुत्री, डुक्करं, आजूबाजूला फिरणारी जनावरं या ठिकाणी एकत्र येतात. हा कोब्रा आता काय करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असते. माणूस व प्राण्यांचे असे एकाच पातळीवर येणे लेखकाला अद्भुत वाटते. लेखकाने येथे १८५५ साली युरोपियनांच्या अतिक्रमणानंतर सिअ‍ॅटलच्या प्रमुखाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला लिहिलेल्या पत्राचा दाखला दिला आहे. ‘तुम्ही ज्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करताय, ते आमचे जगच नाही. मग तुम्हाला आम्ही का म्हणून जमीन द्यायची?’ – हा त्या पत्रातील प्रश्न लेखकाला आठवतो आणि शतकानंतरही हा प्रश्न तितकाच प्रस्तुत आहे, हे लेखकाला जाणवते.

‘डोकरापेन’ हा अबुजमाडियांचा सगळ्यात जुना देव. नंतर ‘लिंगो’, ‘रावपेन’, ‘खेतराव’, ‘भिमानदेव’, ‘दिंडापेन’, ‘भंगाराम’, ‘पातपेन’ अशी देवांची नावे लेखकाला आढळतात. त्यात ‘बंजारामाता’ ही देवी बघून लेखक चमकतो. ही इथे कशी आली, या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळत नाही. मात्र, या मातेसोबतच ‘भुरीमाता’, ‘केवराबुढीणमाता’, ‘मारीममाता’, ‘हिंग्लाजभवानी’, ‘ढोकरीमाता’ अशा ३२ माता लेखकाला या भागात आढळतात. देवावर श्रद्धा असलेले हे आदिवासी त्यांचे सण एकत्रितपणे साजरे करतात. या जमातीकडे कोणतीही दिनदर्शिका नाही, तारीख नावाचा प्रकार ठाऊक नाही; तरी वर्षांच्या कोणत्या दिवशी कोणता सण येतो, हे प्रत्येकाला ठाऊक असते. बरोबर त्या दिवशी कुठे जमायचे, हेही सगळ्यांना माहीत असते. परंपरा पाळणे हा सणांमधील महत्त्वाचा भाग; पण ‘आम्ही इथले रहिवासी आहोत’ हे या सण साजरे करण्यातून दाखवून देण्याचा प्रयत्न आदिवासींकडून होतो, असे निरीक्षण लेखक नोंदवतो.

अबुजमाडमध्ये जंगल आहे, प्राणी आहेत. त्यामुळे तेथील माणूस असुरक्षित असल्याची भावना देशाच्या इतर भागांत आहे. मात्र, त्यात तथ्य नाही हे लेखक ठासून सांगतो. येथील भूभाग, माणसांचे प्राण्यांप्रति असलेले वर्तन, प्रथा, परंपरा बघितल्यावर येथील माणूस व प्राण्यांनी एकमेकांना सांभाळून घेतले आहे, असा अनुभव लेखक मांडतो. एका माणसाला दुसऱ्याविषयी जेवढी उत्सुकता असते, तेवढीच उत्सुकता येथील माणसांना प्राण्यांविषयी आहे. निसर्गाशी समरस झालेल्या अबुजमाडियांना भौतिक गोष्टींविषयी काहीही ठाऊक नाही. लेखक येथे वास्तव्याला जाताना टेपरेकॉर्डर घेऊन जातो. त्याला बघून अनेक जण दूर पळतात. त्यांची थोडी भीती सरल्यावर लेखक त्यांचे आवाज ध्वनिमुद्रित करून त्यांनाच ऐकवतो तेव्हाही अनेक जण दूर पळतात. अखेर त्याच्या सेलमधील विद्युतसाठा संपल्यावर आदिवासी ते सेल ताब्यात घेतात. फोडतात. त्यातील काळा कार्बन जखमेवर लावतात. अनेक दिवस हाच त्यांच्यासाठी विरंगुळा असतो.

ज्याचे जंगलावर प्रेम तो आदिवासी, ज्याचे नाही तो गैरआदिवासी, अशी समजूत बाळगणारा हा समूह इतरांकडेही भेदरहित दृष्टिकोनातून बघतो. त्यांची संस्कृती वर्णनावर आधारित आहे. त्याची निश्चित व्याख्या करता येत नाही. दोन गोष्टींत फरक करण्याची वृत्तीच या आदिवासींमध्ये नाही. त्यामुळे त्यातून येणाऱ्या विकृतीपासून ते दूर आहेत. कमीत कमी श्रमात जगणे, कष्टाची बचत करत जगणे हेच त्यांच्या जीवनाचे सार आहे, असे मत नोंदवत लेखक नक्षलवादावर मार्मिक भाष्य करतो. अबुजमाडमधील आदिवासी कधीच कुणाच्या राजवटीखाली जगले नाहीत. आता काही ‘कमिटेड’ लोक स्वातंत्र्य व मुक्तीच्या नावाखाली या आदिवासींवर नवीन नियम लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे करून या आदिवासींना एका नव्या उपद्व्यापाच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुक्तपणे वावरणाऱ्या या जमातीला हे जमणे शक्य नाही. स्वातंत्र्य व मुक्तीच्या नावावर त्यांना पारतंत्र्यात ढकलण्याचा हा प्रयत्न आहे. नक्षलींमुळे या आदिवासींना पहिल्यांदा माणसाची भीती वाटायला लागली आहे. लेखकाचे हे निरीक्षण १९८० च्या दशकातील असले, तरी आजही चपखलपणे लागू होणारे आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात स्वच्छंदपणे व कसलीही तक्रार न करता जगणाऱ्या अबुजमाडियांचे जीवन या पुस्तकात लेखकाने अगदी समर्थपणे मांडले आहे. हे जीवन आधीच आपण समजून घेतले असते, तर आज आपणासमोर उभे ठाकलेले प्रश्न कदाचित निर्माणच झाले नसते. आजही प्रत्येकाला आपण आदिम असताना कसे असू, असा प्रश्न छळत असतो. मनात घर करून असणाऱ्या या प्रश्नाचा शोध घ्यायचा असेल, तर हे पुस्तक जरूर वाचावे. आपल्या मनात सध्या ठाण मांडून असलेल्या ‘आधुनिकते’वर प्रश्नचिन्ह उभे करणारा हा मोलाचा ऐवज आहे.

  • ‘बस्तर डिस्पॅचेस: अ पॅसेज थ्रू द वाइल्ड’
  • लेखक : नरेंद्र
  • प्रकाशक : हार्पर कॉलिन्स
  • पृष्ठे : २८०, किंमत : ४९९ रुपये

 

devendra.gawande@expressindia.com