साहित्यकारम्हणून नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या बॉब डिलननं लिहिलेल्या/गायलेल्या गाण्यांचे अर्थ सांगून त्याचं मोठेपण कळणार नाही; तर त्याचा तरुणांवर पडलेला प्रभाव, त्यांचे अनुभव, त्यायोगे झालेले सामाजिक/राजकीय बदल पाहिले पाहिजेत, अशा विचारातून केलेल्या तीन नोंदी..

प्रसंग एक

mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: “अरे २ ओव्हरमध्ये २४ धावा सहज होतील…” शशांक आणि आशुतोषने सांगितला किस्सा, शेवटच्या ओव्हरमध्ये काय झालं बोलणं, पाहा व्हीडिओ
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल

अमेरिकेतल्या मिशिगन राज्यातल्या फ्लिंट शहराच्या कामगार वस्तीत राहणारा एक पत्रकार मित्र. २००८ साली सुरू झालेले आर्थिक संकट नुकते थोडे कमी व्हायला सुरुवात झाली असतानाचा काळ..  मित्र शिकागोसारख्या मोठय़ा शहरातून मिशिगनसारख्या लहान राज्यात उपसंपादक म्हणून रुजू झाला आहे. शहर लहान असले तरी त्या शहराच्या समस्यांचा डोंगर वाढतच चाललाय. एक एक करून आजारी कारखाने बंद झाले आहेत, गेली चाळीस-पन्नास वर्षे कष्टांतून उभी राहिलेली कामगार वसाहत आपली ओळख हरवून बसली आहे, बेरोजगारी कमी तर होतेय; पण नव्याने तयार होणाऱ्या संधी या दुय्यम स्वरूपाच्या आहेत, कामगारांना मिळणाऱ्या रोजगारातून पोटापुरते अन्न विकत घेता येते पण त्यापलीकडे जाऊन सुख म्हणता येईल असे आयुष्यात काही उरलेले नाही. लोक शून्य चेहऱ्याने कामावर जातात, शून्य चेहऱ्याने परत येतात. शहराच्या शवागारात काही प्रेते सहा महिन्यांहून जास्त काळ अंत्यसंस्काराविना पडून आहेत. लोकांजवळ आप्तांचे अंत्यविधी करण्याइतपतही पैसे नाहीत.  ही तीच अमेरिका आहे जी ‘अमेरिकन ड्रीम’ या संकल्पनेचा उदो उदो करीत जगाची महासत्ता झाली होती. स्वकष्टाने आणि हिमतीने अमेरिकेतला कुठलाही माणूस उच्चपदापर्यंत जाऊ शकतो अशी काहीशी अमेरिकन ड्रीमची शिकवण. शिकागोहून फ्लिंटमध्ये येऊन, त्या उद्ध्वस्त झालेल्या स्वप्नांचा हिशेब करताना मित्र दु:खी होऊन निराशेत जाणार हे स्वाभाविक आहे. तो कुठून तरी मॅरिउआना मिळवतो. फ्लिंटमध्ये मॅरिउआना बेकायदाच आहे. प्रतिबंधक कायदा असला तरी नैराश्यावर उपाय म्हणून फ्लिंटमध्ये मॅरिउनाचा वापर काही लोकांनी सुरू केला आहे. त्यात माझा मित्रही एक. डोके भंजाळून टाकणाऱ्या वृत्तसंपादनाच्या दिवसभराच्या कामानंतर तो त्याच्या लहानशा रूमवर जातो. तिथे असलेला लहानसा फ्रिज, आतले अन्नपदार्थ तिथे किती महिन्यांपासून आहेत ते सांगता येणार नाही. रूममधले इतर सामान इतस्तत: पसरलेले आणि तिथे येणारा कुबट वास, त्या खोलीत जगणारा जीव किती अस्वस्थ आहे याची ग्वाही देणारा. मित्र मला भेटायला बोलावतो, मी कामात व्यग्र असल्याने त्याला लगेच भेटू शकत नाही, मी येत नाही म्हणून मित्र त्याच्या रूमवरचा पसारा आणखी वाढवतो, वास आणखी कुबट होतो. मग यथावकाश एका शुक्रवारी रात्री मी त्याला भेटायला त्याच्या रूमवर जातो. समोर दिसणारा तो कमालीचा अस्ताव्यस्त कचरा आणि त्या कचऱ्याच्या मधोमध गुंगी आल्यासारखा बसून राहिलेला माझा मित्र. मी इथे यायला आणखी आठवडाभर उशीर केला असता तर त्याने कचरा आणखी वाढवला असता. त्याला काम करताना कुठल्या दिव्यातून जावे लागते आहे याची मला कल्पना आहेच त्यामुळे वेगळे असे काही बोलावे लागत नाही, आमची अस्वस्थता समायोजित होते आणि वातावरण निवळावे म्हणून मित्र त्याच्या म्युझिक सिस्टमवर बॉब मार्ले लावतो. तो सध्या नशेत आहे म्हणून तो बॉब मार्ले लावणार हे साहजिक आहे. मी दोनेक गाणी त्याच्यासोबत ऐकतो, मग त्याला पाचेक मिनिटे म्युझिक बंद करायला सांगतो. आम्ही नुसतेच शांत बसून राहतो. या शांततेनंतर मी माझ्या मोबाइलमध्ये बॉब डिलनचे ‘गॉना चेंज माय वे ऑफ थिंकिंग’ लावतो.

भिंतीला पाठ लावून बसलेला मित्र काही काळ गाण्याकडे लक्ष न देता नुसताच निर्विकार बसून राहतो, मग एकदमच त्या गाण्यात तो ओढला जातो. पुढच्या काही ओळींनंतर त्याच्या डोळ्यांत अश्रू, तो नुस्ताच पुटपुटतो ‘शब्द कधी निराश नसतात. निराश असतात ती माणसे.’ रात्रभर त्याच्या गलिच्छ रूमवर थांबून मी दुसऱ्या दिवशी माझ्या शहरात परततो. दोन दिवसांनी मित्र चॅटवर त्याची रूम स्वच्छ केल्याबद्दल सांगतो. पुरावे म्हणून त्याचे लेटेस्ट फोटो पाठवतो. त्याचे नैराश्य तसूभरही कमी झालेले नाही, त्या नैराश्याला कारणीभूत असलेली फ्लिंट शहराची परिस्थितीही फारशी बदललेली नाही. ती आता बदलेल याच्या शक्यताही मावळत चालल्याहेत. पण कुठे तरी या पराभूत परिस्थितीशी दोन हात करण्यापेक्षा त्यात विरघळून जाऊन आतून उत्तर शोधण्याची प्रेरणा बॉब डिलन मला आणि माझ्या मित्राला देतो.

आर्थिक संकटाच्या दुसऱ्या शक्यतांच्या उंबरठय़ापाशी उभे राहताना आम्ही दोघेही बॉब डिलनचे बोट पकडून आतमध्ये जाणार आहोत, हे नक्की.

प्रसंग दोन

मी भारतातल्या कुठल्याही मध्यम आकाराच्या शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी उभा. गेली दहा वर्षे इतस्तत: पसरलेल्या भांडवलवादी जगाच्या सर्व खाणाखुणा त्या मध्यवर्ती भागात चमचम करीत उभ्या आहेत. फुटपाथच्या कडेला लागलेल्या आधुनिक स्वस्त अन्नाच्या अनेक प्रकारांपैकी एका फ्रँकी विकणाऱ्या गाडीचे नाव ‘रॉक अ‍ॅण्ड रोल’ असे आहे. फ्रँकी विकणाऱ्या एखाद्या दुकानाचे नाव ‘रॉक अ‍ॅण्ड रोल’ असे असेल तर मराठी लोकांना उगीचच पोळीच्या गुंडाळीत चुकून एखादा खडा आलाय की काय असे काही तरी वाटेल. मी एका मैत्रिणीला फोन लावून या शब्दाच्या भाषांतरांची गंमत सांगतो. ती तिकडून फोनवर म्हणते- कदाचित गाडीवाल्याला वाटत असेल की त्याने फार भारी नाव ठेवलेय पण तसे नाही. मी दाताखाली खडा लागून होणाऱ्या चिडचिडीच्या चित्राशी पूर्णत: सहमत आहे. तिचे सहमत होणे एका अर्थाने तिला ‘रॉक अ‍ॅण्ड रोल’ या संगीतप्रकाराबद्दल काहीएक माहिती नसण्याचे द्योतक आहे. फोनवर बोलून झाल्यावर आणखी काही तासांनी ती मला काही लिंक्स पाठवते. ‘रॉक अ‍ॅण्ड रोल’चा इतिहास आणि त्यासंबंधी तिने कुतूहलाने काय काय शोधले, याच्या लिंक्स. मी थोडय़ा वेळाने तिला अ‍ॅरेथा फ्रँकलीन आणि बॉब डिलनची काही गाणी पाठवतो. आणखी दोन दिवसांनी तीच गाणी परत पाठवल्यावर ती लगेच सांगते की ही गाणी तिच्याकडे आहेत आणि ती ऐकल्यानंतर तिला नाचावेसे वाटते. वास्तविक नाचावेसे वाटावे असे संगीत वा शब्द त्या गाण्यात नाही पण तरीही तिला नाचावेसे वाटते. माझी ही मैत्रीण गेली पाच वर्षे नैराश्याच्या आजाराने ग्रस्त आहे. तिला बॉब डिलन ऐकल्यानंतर नाचावेसे वाटते यात बरेच काही आले.

प्रसंग तीन

भारतात डाव्या चळवळीत काम करणारा माझा दुसरा एक मित्र कठीण परिस्थितीतून जातो आहे. एक तर भांडवलशाहीला विरोध असल्याने त्याची स्वत:ची आर्थिक स्थिती यथातथाच. त्यात देशात वेगाने बदलत चाललेले राजकीय वातावरण, गृहकलह आणि माध्यमांतून केली जाणारी दिशाभूल पाहून मित्र उदास झाला आहे. तो जेव्हा केव्हा मला फोन करतो तेव्हा आम्ही कितीही प्रयत्न केला तरी भांडणे होण्याची थांबत नाहीत. वारंवार भांडल्याने मग आम्ही एकमेकांशी तात्पुरते बोलणे थांबवितो, आणखी काही दिवस जातात आणि मी अवचित एक दिवस त्याच्या शहरात जातो. हो नाही करता करता त्याच्या फ्लॅटवर थांबायचे ठरवतो. सुरुवातीची संभाषणे अर्थात फोनवर वारंवार झालेल्या गैरसमज आणि भांडणांची तड लावण्यासंबंधी असतात. आणखी थोडय़ा वेळाने आपण दोघेही मूर्खासारखे का भांडत होतो यावर आम्हाला पश्चात्ताप होतो. हेही थोडा वेळ. मग देशभरात चाललेल्या उफराटय़ा घटनांची एक उजळणी होते, समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत यावर सांगोपांग चर्चा होते आणि त्यानंतर विषय येतो तो भारत पाक संभाव्य युद्धाचा. युद्धाविषयी माझ्या मित्राची मते ठाम आहेत. ‘ज्या देशातली मोठी लोकसंख्या उपाशीपोटी झोपते, जिथे लहान मुलांचे कुपोषणामुळे मृत्यू होतात त्या देशाला युद्ध कसे काय परवडते?’ हा त्याचा मूलभूत प्रश्न. त्याची ओळख डाव्या विचारसरणीचा माणूस अशी असल्याने साहजिकच युद्धासंबंधीचे त्याचे विचार अतिडावे म्हणून नाकारले जातात. ‘युद्धाला विरोध आणि शांतीची अपेक्षा हा डावा किंवा अतिडावा विचार आहे? का म्हणून?’ त्याला स्वत:वरच शंका येते. मी माझ्याकडची मारी जेरन त्याच्या टॅबवर डाऊनलोड करतो. मित्र उद्विग्न होऊन जगभर चाललेल्या गरिबांच्या शोषणाची आणि युद्धात मेलेल्यांची कथा सांगत राहतो, हे सांगताना अधूनमधून बॉब डिलनचे एकेक गाणे उलगडत राहतो. मग सगळी मानसिक परिस्थिती डिलनच्या ‘ब्लोइंग इन द विंड’ या गाण्यावर येऊन थांबते.

हे गाणे म्हणण्यासाठी चांगल्या आवाजाची गरज नसते, संगीताची जाण वा वाद्याचीही गरज नसते. ‘ब्लोइंग इन द विंड’ गाण्यासाठी गरज असते ती जगभरातल्या दु:खाशी एकरूप होण्याची. हे गाणे ऐकल्यानंतर माझ्या अंतरीचे दु:ख आणि बाह्यदु:ख यात काही फरक राहत नाही. एकूण दु:खाची एक सुसंगत धारणा घेऊन मी माझ्या शहरात परत येतो. मीही आता भारत-पाक युद्धाला विरोध करायचे ठरविले आहे.. कदाचित, अगदी सगळेच मला देशद्रोही म्हणणार नाहीत आणि उद्या तसे म्हटले तरी युद्धाला, जगभरात चाललेल्या कुठल्याही युद्धाला माझा विरोधच असेल. विचार करताना तुम्ही एकटे जरी पडलात तरी, तो विचार तुम्ही जगवायचा ठरवला तर तो तुम्ही जगवू शकता, ही बॉब डिलनची शिकवण युद्धाला विरोध करणाऱ्या जगभरातल्या कुठल्याही माणसाला उपयोगी ठरते आहे.

rahulbaba@gmail.com