‘प्रख्यात लेखक विल्यम डाल्रिम्पल यांचे (तीन अपत्यांपैकी) थोरले सुपुत्र सॅम डाल्रिम्पल हेही पुस्तक लिहीत असून, ‘द फाइव्ह पार्टिशन्स’ या नावाचे हे पुस्तक आहे’ अशा अर्थाची बातमी जर गेल्या दोनतीन दिवसांत तुम्ही इंग्रजीत वाचली असेल, तर त्यांनी न सांगितलेला तपशील आधीच इथं सांगितला पाहिजे : हे पुस्तक येतंय खरं; पण २०२३ साली येतंय ते. तरीही काही इंग्रजी पेपर लागलेत आत्तापासूनच नाचायला. सॅम डाल्रिम्पलनं स्वत:च सात डिसेंबरच्या सोमवारी एक ट्वीट करून पुस्तकाच्या कराराची माहिती दिली, त्यात २०२३ चाही स्पष्ट उल्लेख केला, तरी बातम्या तयार!
या इतक्या आधी बातम्या देणातून कुणाचं काय भलं होणार आहे, हाच खरा प्रश्न. प्रकाशकांना इतक्या लवकर प्रसिद्धीचा काहीच फायदा नसणार. भावी लेखक सॅम यांना चारसहा लिटफेस्टांमध्ये बोलावणी आलीही समजा, तरी पुढले सहा महिने सारं ‘आभासी’च असणार.. म्हणजे सॅमलाही फारसा लाभ नाहीच. मग कशाला पेरली गेली ही बातमी?
यातून भलं झालंच, तर ते स्पर्श आहूजा, अमीना मलक, सादिया गरदेझी आणि सॅम डाल्रिम्पल या चौघंनी मिळून २०१८ सालीच स्थापलेल्या ‘प्रोजेक्ट दास्तान’चं होणार आहे. हा ‘दास्तान’ प्रकल्प मौखिक इतिहासाला आणखी महत्त्वाकांक्षी – काहीशी कार्यकर्तेपणाची- जोड देऊ पाहातोय. ते कसं?
भारत-पाकिस्तान फाळणीला २०२२ मध्ये ७५ वर्ष होतील. तोवर ‘दास्तान’ तर्फे, फाळणीआधी ‘पलीकडच्या देशात’ वास्तव्य केलेल्या ७५ जणांना हुडकून, त्यांच्या आठवणी नोंदवल्या जातील. हे सारे साक्षीदार आज ऐंशीपार आहेत, त्यांना त्यांच्या-त्यांच्या मूळ शहरांचं ‘आभासी वास्तव (व्हीआर) दृकमुद्रण’ दाखवून त्यांच्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न केला जाईल. शिवाय त्यांच्याकडली छायाचित्रं, स्मृतीवस्तू, यांचाही अभ्यास होईल. पण त्याहीपेक्षा, या सर्व साक्षीदारांना सीमेपल्याडच्या त्यांच्या मूळ गावांमध्ये घेऊन जाणं, हाही या ‘दास्तान’ प्रकल्पाचा भाग आहे. ही कार्यकर्तेगिरी आहे हेही या चौघांना मान्य आहे- ‘यामुळे शांतिप्रियतेला चालना मिळेल’ असं हे चौघेही म्हणताहेत. त्यावर वाद असू शकतात. पण २०१८ पासून, या ध्येयानं ‘दास्तान’साठी अनेक स्वयंसेवकही काम करताहेत.
या प्रकल्पाची चर्चा सॅम डाल्रिम्पल यांच्या अतिआगामी पुस्तकाच्या घोषणेमुळे वाढली, हे एक भलं म्हणता येईल. सॅम डाल्रिम्पल याला इंग्रजी आणि हिंदीखेरीज संस्कृत, फारसी आणि उर्दू भाषा येतात, इस्फहानमध्ये फारसीचा तर ऑक्सफर्डमध्ये संस्कृतचा अभ्यास त्यानं केला आणि गेल्या काही वर्षांत ‘न्यू यॉर्क टाइम्स’सह अन्य ठिकाणी तो लिहू लागला. आणि हो, या प्रकल्पातली माहिती शोषून घ्यायची आणि लिहायचं पुस्तक, असला प्रकार तो करणार नाही- १९४७ च्या फाळणीखेरीज ब्रह्मदेश, बंगाल, अरबस्तान यांच्याही फाळण्यांबद्दलचं हे पुस्तक आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2020 12:00 am