रेश्मा भुजबळ

दुष्काळग्रस्त भागांतल्या स्त्रियांच्या व्यथा आणि त्यांच्या स्वप्नांचा वार्ताकथनात्मक वेध घेणाऱ्या पुस्तकाबद्दल..

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
ajit pawar and supriya sule
स्नुषाविरोधात प्रचार करण्यास नकार देण्याची एकनाथ खडसेंची भूमिका सुसंस्कृतपणाची;  खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना चिमटा

उस्मानाबाद जिल्ह्य़ातल्या हिंगलजवाडी येथील सावकार सध्या मोठय़ा चिंतेत आहेत. त्यांना चिंता आहे ती त्यांच्या व्यवसायाची. कारण त्यांच्याकडून कर्ज घेणारे कोणी हिंगलजवाडीमध्ये उरलेच नाही. ही किमया कशी काय झाली? अचानक तर नक्कीच नाही. हिंगलजवाडी हे दुष्काळग्रस्त गाव आणि आत्महत्याग्रस्तही. इथे २०१२ ते २०१६ हा असा काळ होता, की दररोजच कुणी ना कुणी आत्महत्या केल्याच्या घटना घडायच्या. शेतकऱ्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नींनीही आत्महत्या केल्या होत्या. कोमल कटकटे, रेखा शिंदे आणि गावातल्या इतर स्त्रिया या गावातील स्थिती बदलण्यासाठी काय करता येईल याचा विचार करायच्या. मात्र काहीच मार्ग दिसत नसल्याने त्यांना खूप असाहाय्य वाटायचे. कोमलने विचार केला की, स्थिती बदलणे शक्य नसले तरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला ज्या कुपोषणाला सामोरे जावे लागते ते दूर करण्यासाठी काही करता येईल. खूप विचारांती त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. पण शेती करणार कुणाची? कारण कुठल्याच स्त्रीच्या नावावर शेती नव्हती. पावासाअभावी गावातल्या अनेकांच्या शेतीत काहीच पीक घेतले जात नव्हते. जमिनी पडून होत्या. त्यातला थोडा तुकडा त्यांनी त्यांच्या पतीकडे मागितला. अर्थातच पहिल्यांदा नकारघंटाच वाजली. ‘तुम्ही काय करणार? आम्हालाच जे जमत नाही तिथे तुम्हाला काय जमणार? तुम्हाला शेती करण्याचा अनुभव कुठे आहे?’ वगैरे वगैरे.. गावातल्या इतर स्त्रियांच्या घरीही थोडीबहुत हीच वाक्ये ऐकायला मिळाली. मात्र स्त्रियांनी हार न मानता मागणी कायम ठेवल्यावर फार उदार मनाने त्यांना शेतीचा एक तुकडा देण्यात आला.

गावातल्या स्त्रियांना स्वत: शेती करण्याचा अनुभव नव्हता की त्यांच्याकडे काही साहित्य, हत्यारे होती. अत्याधुनिक साधने नसताना कशी शेती केली जायची, तशाच प्रकारे आपण शेती करून पाहू, असा विचार त्यांनी केला आणि पारंपरिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. कुपोषण रोखण्यासाठी त्यांनी प्रथम भाज्यांची लागवड केली. दुष्काळ तिथे पाचवीलाच पुजलेला. त्यामुळे कमी पाण्यात कसे भागवायचे, याची इथल्या स्त्रियांना उपजतच जाण. त्यामुळे त्यांचा प्रयोग सफल होऊन भाज्यांचे चांगले उत्पादन मिळाले. अर्थातच ते त्यांनी त्यांच्यासाठीच वापरले. या प्रयोगामुळे मात्र त्यांचा आत्मविश्वास वाढला.

सरकारी योजनांची काही मदत होईल का, हा विचार करून गावातल्या काही स्त्रिया उस्मानाबादला गेल्या. मात्र सरकारी बाबूंनी त्यांना जवळपास हाकलूनच दिले म्हणा ना. कारण त्यांचा अशिक्षितपणा. मग कोमल आणि इतर स्त्रियांनी गावातल्या सगळ्या स्त्रियांसह उस्मानाबाद गाठले. एवढय़ा स्त्रियांना पाहिल्यावर सरकारी अधिकाऱ्याला माहिती देणे भागच पडले.

कठोर मेहनत आणि सरकारी योजनांचा उपयोग करून त्यांनी हळूहळू प्रगती केली. आज तीन हजार वस्ती असणाऱ्या त्यांच्या गावात जवळपास २००हून अधिक स्वयंसाहाय्यता गट आहेत. या गटांची उलाढाल कोटीच्या आसपास आहे. बांगडीपासून धान्यापर्यंत आणि अंडय़ापासून कपडय़ापर्यंत गावातील सर्व व्यवहार याच स्वयंसाहाय्यता गटाच्या माध्यमातून होतात. २० रुपयांपासून बचत केली जाते. त्यांचा पैसा त्यांच्याच गावात वापरला जातो. स्त्रियांनी केलेला प्रयोग आणि त्याचे यश पाहून गावातले पुरुषही त्यांच्याबरोबरीने प्रयोग करू लागले आणि आज त्यांचे गाव कर्जमुक्त आहे. गावातली प्रत्येक स्त्री आत्मनिर्भर असून तिचा सन्मान केला जातो. घरच्या निर्णयांमध्ये तिचा सहभाग आहे. आज तिथल्या कुठल्याच स्त्रीला सरकारी योजनांची माहिती घ्यायला उस्मानाबादला जावे लागत नाही, तर तिथले अधिकारीच हिंगलजवाडीला येतात, सरकारी योजनांचा उत्तम उपयोग करणारे ‘रोल मॉडेल’ गाव म्हणून!

हिंगलजवाडी असो की उस्मानाबाद, बीड, यवतमाळ, वाशिम, लातूर, अमरावती, औरंगाबाद, परभणी, बुलढाणा, वर्धा, जालना या मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त जिल्ह्य़ांतली अनेक गावं; त्या त्या गावांत कोमल कटकटेंप्रमाणेच अनेक जणी आहेत. ज्या कुठलीही मदत नसताना, पाठिंबा नसताना केवळ सकारात्मक विचारांच्या शिदोरीवर अनेकांसाठी आशेचा किरण बनल्या आहेत.

पत्रकार राधेश्याम जाधव यांच्या ‘हार्वेस्टिंग होप इन द सुसाइड झोन’ या पुस्तकात अशा अनेक जणी आपल्याला भेटतात. या पुस्तकातील ‘कल्टिव्हेटिंग लाइफ’, ‘फाइटर्स इन द फिल्ड’, ‘चॅलेंजर्स’ आणि ‘सोइंग चेंज’ या चार विभागांतील ४० प्रकरणांत आपल्याला अनेक रणरागिणी भेटतात. या विभागांच्या शीर्षकांप्रमाणेच प्रत्येकीची सत्यकथा आपल्यासमोर उलगडत जाते. प्रत्येकीचा संबंध दुष्काळ, शेतकरी आत्महत्या यांच्याशी असला, तरी प्रत्येकीचे प्रश्न, त्यांच्या समस्या वेगळ्या होत्या. प्रत्येकीचा लढा वेगळा होता. परिस्थिती मात्र सारखीच होती.. हलाखीची. त्या सर्वच जणी विधवा आहेत, असेही नाही; पण ‘दुष्काळ’ नावाच्या राक्षसाच्या तावडीत सापडलेल्या नक्कीच होत्या. दुष्काळ, मृत्यू आणि नशीब यांच्याशी दोन हात करता करता आपल्याबरोबरच इतरांना आशेचा किरण दाखवत, स्वप्न पाहायला मदत करत होत्या.

रात्री अचानक ज्वालांनी घेरलेल्या झोपडीत जाग आलेल्या विद्या मोरेने मुलांचा विचार करून त्यांच्यासह स्वत:ला झोपडीबाहेर झोकून दिले. त्या वेळी तिच्या डोक्यात विचार होते फक्त मुलांचे, त्यांना वाचवण्याचे. ती त्या अपघातातून भानावर येईपर्यंत झोपडी पेटवून दिलेल्या नवऱ्याचीही झोपडीबरोबरच राख झाली होती. नवऱ्याने हे पाऊल उचलले होते फक्त ३० हजारांच्या कर्जाचा डोंगर त्याच्यावर होता म्हणून. मुलांसाठी लढणाऱ्या विद्याला आपण मुलांना वाचवून चूक तर केली नाही ना, असे वाटण्याची स्थितीही कित्येकदा आली. मात्र मुलांकडे पाहून रात्रीचा दिवस करून विद्याने आपली स्थिती बदलवली. सर्व कर्ज तर फेडलेच, मात्र शेती करण्याचा निर्णय घेऊन ती ताठ मानेने जगत आहे.

मंदा अलोने तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही जाब विचारण्यास कचरली नाही. तिच्या पतीने कर्जाला कंटाळून नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. मात्र नुकसानभरपाई देताना सरकारी अधिकाऱ्यांनी ‘त्याला दारूचे व्यसन होते म्हणून त्याने आत्महत्या केल्याने भरपाई मिळणार नाही’ असे सांगितले. मुंबईला झालेल्या बैठकीत मंदाने मुख्यमंत्र्यांना सांगितले की, ‘आम्हा विधवांना सरकारकडून काही मदत तर मिळत नाहीच; मात्र आमचे ज्या बँकेत बचत खाते आहे, त्या बँका परस्पर कर्जाच्या खात्यात पैसे वळते करतात. अशाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाने उदरनिर्वाह कसा करायचा? त्यांनीही आत्महत्या करायच्या का?’ मंदा अलोनेच्या या प्रश्नामुळे मुख्यमंत्र्यांना बँकांच्या कारभाराची माहिती मिळाली आणि हा प्रकार थांबला.

विद्या आणि तिच्यासारख्या परिस्थितीला शरण आणणाऱ्या अंकिता गायकवाड, सुनीता कांबळे, कमल कुंभार, मंगल वाघमारे, बेबीताई वाघ, द्रुपदा राठोड, पूजा घनसरवाड आणि इतर सर्वच जणींना सहजी यश मिळालेले नाही. त्यांना त्यासाठी गरिबीशी, घरच्यांशी, गावकऱ्यांशी, नशिबाशी सातत्याने संघर्ष करावा लागला, नव्हे त्यांचा संघर्ष सुरूच आहे. यातील कित्येकींनी धाडस करून शेतीत प्रयोग केले. सेंद्रिय शेती केली. कित्येक जणींनी आधी ही शेती केवळ नाइलाजास्तव केली. मात्र, हाती पैसा आल्यानंतर रासायनिक कीटकनाशकांचे दुष्परिणाम समजून घेतल्यावर त्यांनी सेंद्रिय शेती ही चळवळच बनवली.

शेतीवर अवलंबून राहणे परवडणारे नाही हे जाणून कुक्कुटपालन, शेळीपालन, ब्युटी पार्लर, शिवणकाम, किराणा मालाचे दुकान, गिरणी अशा वेगवेगळ्या जोडव्यवसायांचे प्रशिक्षण घेऊन उपजीविकेचे नवीन मार्ग अवलंबले. स्वत:चा मार्ग स्वत: तयार केला. एवढेच नव्हे, तर त्यातून आपल्या मुलांना शिक्षण, नवऱ्याच्या पालकांचा सांभाळही केला. कुठेही आपली जबाबदारी झटकून टाकण्याचा विचारही केला नाही.

कधी त्यांना जातीयवादाचे चटके बसले, कधी त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे ओढण्यात आले, कधी त्यांचे खासगी जीवन चव्हाटय़ावर मांडले गेले. कधी त्यांना मत्सरातून होणारा त्रास सहन करावा लागला, कधी त्यांच्या अल्पशिक्षणाचा, गरिबीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. कधी दारूबंदीसारख्या चांगल्या कामासाठी प्रयत्न करणाऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागला, तर कधी हुंडय़ाच्या विरोधात हुंडा प्रतिबंधक चळवळ उभारावी लागली. पतीच्या आत्महत्येचे भांडवल करणाऱ्या बाबू लोकांचा सामना करावा लागला, शेतकरी आत्महत्येमागे प्रेमप्रकरण आणि दारूचे व्यसन हे कारण सांगणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना जाब विचारावा लागला. ग्रामीण भागात रूढी-परंपरा पाळण्यात जिथे समाज अधिक कट्टर आहे तिथे स्वरक्षणासाठी मंगळसूत्र आणि कुंकू लावून वावरावे लागले.. मात्र त्या डगमगल्या नाहीत.

त्या सर्व जणी सांगतात.. स्त्री म्हणून जन्माला आलो तिथेच संघर्ष सुरू झाला. इथे मरणं सोप्पं आहे, मात्र जगणं खूप कठीण. जगण्यासाठीची लढाई तुमची तुम्हालाच लढायची असते. त्यासाठी कोणी मदतीला येत नाही, मात्र आपण एखाद्याचे जगणे सुसह्य़ करण्यासाठी नक्कीच मदत करू शकतो.

इथे प्रत्येकीच्या प्रश्नात सरकारी योजना, सरकारी अधिकारी, सरकारी धोरणांमधल्या त्रुटींवरही बोट ठेवले आहे. सरकारने आत्महत्या रोखण्यासाठीच नव्हे, तर त्यानंतर परिस्थितीला तोंड देणाऱ्या त्यांच्या कुटुंबासाठी काय करणे आवश्यक आहे, हे कुठलाही आव न आणता नेमकेपणाने या स्त्रियांच्या समस्यातून मांडलेले आहे.

पुस्तक हे एका पत्रकाराने लिहिलेले आहे, हे त्यातील मुद्दे, दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न यातून वेळोवेळी जाणवत राहते. सक्षमीकरणाची गरज, रचनात्मक लढाई, दडपशाहीविरोधात लढतानाची हत्यारे आणि त्यातून झालेले बदल अशा अनेक मुद्दय़ांवर जाधव यांनी हे प्रश्न मांडले आहेत. त्यांनी दुष्काळग्रस्त भागांतल्या स्त्रियांच्या व्यथा आणि त्यांची स्वप्नं याविषयी लिहिताना पुस्तकात मांडलेले प्रत्येकीचे विचार हे फक्त त्यांच्यासारख्या दुष्काळग्रस्त भागांत संघर्ष करणाऱ्यांनाच नव्हे, तर प्रत्येक निराश माणसासाठी प्रेरणा देणारे, उत्साह देणारे ठरतात.

‘हार्वेस्टिंग होप इन द सुसाइड झोन’

लेखक :  राधेश्याम जाधव

प्रकाशक : ब्लूम्सबरी

पृष्ठे: १७६, किंमत : ३९९ रुपये

reshmavt@gmail.com