नामदेव शहानी यांनी लहान वयात भारत सोडला, ते रोजगारासाठी. त्यांना सहा भाषा अवगत होत्या, गणिती आकडेमोडीतही तरबेज होते. आधी लेबनॉनच्या बैरुतमध्ये त्यांनी काही काळ काम केले आणि मग ऐंशीच्या दशकात अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरी ते नशीब अजमावण्यासाठी गेले. तिथे नातेवाईक होते. त्यांच्या सहाऱ्याने काही काळ कोणत्याही नोंदणीविना- म्हणजे बेकायदेशीररीत्या- राहिले. मग ‘जुगाड’ करून नागरिकत्व मिळवले. दुकान थाटले. ते चांगले चालू होते. तर, अचानक एके दिवशी पोलिसांची धाड पडली आणि त्यांना अटक झाली. अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीला वस्तू-विक्री केल्याचा आरोप त्यांच्यावर लावला गेला. प्रकरण न्यायालयात गेले. हद्दपारीही सुनावण्यात आली. त्यांच्यासोबत कुटुंबालाही.

खरे तर या कहाणीला इथेच पूर्णविराम मिळायला हवा होता. परंतु तसे झाले नाही. ती पुढे गेली. तीत नामदेव शहानी यांची कन्या- आरतीचा प्रवेश झाला. तिने वडिलांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी कॉलेज सोडले. न्यायालयीन प्रक्रिया समजावून घेत वडिलांच्या सुटकेसाठीचा लढा दिला.. आणि अखेर शहानी यांची सुटका झाली!

‘बुकबातमी’त ही कहाणी सांगण्याचे कारण असे की, स्वप्न आणि दु:स्वप्न ही दोन टोके अनुभवलेल्या या भारतीय स्थलांतरित कुटुंबाची ही संघर्षकथा पुस्तकरूपात आली आहे! आता पेशाने पत्रकार असलेल्या आरती शहानी हिनेच ती पुस्तकबद्ध केली असून ‘हीअर वी आर : अमेरिकन ड्रीम्स, अमेरिकन नाइटमेअर्स’ या शीर्षकाने ते मंगळवारी प्रसिद्ध झाले. अमेरिकेतील स्थलांतरितांबद्दल, त्यांच्याविषयीच्या कायद्यांबद्दल कठोर भाष्य करणारी ही स्थलांतरित कुटुंबाची संघर्षकथा अमेरिकी आणि इतरही वाचकांना भावते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरावे!