13 December 2018

News Flash

‘रीचर’चे मनोहारी अधोविश्व 

ब्रिटिश लेखक ली चाइल्ड याच्या ‘जॅक रीचर’ मालिकेतील नव्या लघुकथासंग्रहाची ही ओळख..

ली चाइल्ड

थरार कादंबऱ्यांसाठी लोकप्रिय असलेल्या ब्रिटिश लेखक ली चाइल्ड याच्या ‘जॅक रीचर’ मालिकेतील नव्या लघुकथासंग्रहाची ही ओळख..

जगात दर विसाव्या सेकंदाला ली चाइल्ड या ब्रिटिश कादंबरीकाराचे पुस्तक खपत असते. त्याचा ‘जॅक रीचर’ हा नायक प्रत्येक कादंबरीत एक दीर्घ साहस करतो. हा रीचर साडेसहा फूट उंच आहे. वजन २०० पौंड, मजबूत शरीरयष्टी. अमेरिकन सैन्यात तो मिलिटरी पोलीस अधिकारी म्हणून काम करून निवृत्त झाला आहे. तो एकटाच आहे. दोन-तीन दिवसांवर तो कुठेही राहत नाही. त्याच्याकडे चालक परवाना नाही. तो मोबाइल वापरत नाही. स्वत:जवळ टूथब्रशव्यतिरिक्त सामान बाळगत नाही. अर्थात, हाणामारीत तो प्रवीण आहेच, एका वेळी अनेक गुंडांशी तो सामना करतो. शिवाय विलक्षण तार्किक शक्ती त्याला लाभली आहे, इतकी की, वयाच्या तेराव्या वर्षी त्याने अमेरिकन लष्करी तज्ज्ञांना सापडू न शकलेले गुप्त सांकेतिक शब्दावलीचे पुस्तक शोधण्याचे काम केलेय. थोडक्यात, तो ‘जेम्स बॉण्ड’ आणि ‘शेरलॉक होम्स’ यांचे मिश्रण आहे. त्याला शोधणे कठीण आहे, पण संकटप्रसंगी मित्र त्याला शोधून काढतात किंवा त्याच्या निरंकुश भ्रमंतीमध्ये एखादा गुन्हाच आडवा येतो.

तर अशा या जॅक रीचरभोवती गुंफलेल्या ली चाइल्डच्या आतापर्यंत एकवीस कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याच्या कथा मात्र प्रामुख्याने ई-बुकरूपात वाचाव्या लागत. ‘नो मिडल नेम’ या छापील संग्रहात त्याच्या साऱ्या कथा वाचता येतात.

जगभर रहस्यकथांना मोठा वाचकवर्ग आहे. अगदी ‘रोज एक रहस्यकथा वाचल्याशिवाय माझे मन स्थिर होत नाही,’ असे बटर्रण्ड रसेलसारखा तत्त्वज्ञ वेद मेहतांना ‘फ्लाय अ‍ॅण्ड द फ्लाय-बॉटल’ या पुस्तकात सांगतो. मराठी नाटककार महेश एलकुंचवारांनीही रहस्यकथांच्या वाचनसुखाचा उल्लेख ‘निवडक बाबुराव अर्नाळकर’ (संपादन : सतीश भावसार, राजहंस प्रकाशन) या संपादित पुस्तकाच्या प्रस्तावनेत केला आहे. एखाद्या खुनाच्या किंवा रहस्याच्या पाठलागाच्या वर्णनात वाचकांना गुंगवून टाकणे, हे एडगर अ‍ॅलन पो, अगाथा ख्रिस्तीपासून ली चाइल्डपर्यंत अनेक जण करीत आलेत. उत्तराधुनिक काळात पॉप कल्चरला थोडी प्रतिष्ठा लाभली तेव्हा मात्र, समीक्षकांनी नाके मुरडलेल्या या वाङ्मय प्रकारातील साहित्य अभिजनही चाळू लागले.

उत्तम भाषा, सैनिकीच नव्हे तर रोजच्या जीवनातीलही विलक्षण तपशील देणे, तिरकस विनोदी संभाषणाची हातोटी आणि हाणामारीची ‘अ‍ॅड्रेनालिन’ वाढवणारी वर्णने यांमुळे चाइल्डची पुस्तके खाली ठेववत नाहीत. आजवर त्याच्या कादंबऱ्यांत दिसलेली ही सारी वैशिष्टय़े ‘नो मिडल नेम’ या नव्या कथासंग्रहातही दिसतात. पण काही कथा अगदी अभिजात लघुकथेला लाजवतील अशा आहेत.

संग्रहात सुरुवातीला ‘टू मच टाइम’ ही नवी लघुकादंबरी आहे, ज्यात दहा मिनिटांत एक साधी घटना नायक रीचरसमोर घडते. एक मुलगा एका बाईची पर्स पळवतो. रीचर ते पाहतो आणि मध्ये पडतो. मुलाला पकडण्यात येते. नेमके त्याच वेळी दोन पोलीस समोरून येतात. इरोन आणि रॅम्से ही त्यांची नावे. रीचरला साक्षीदार म्हणून जबाब नोंदवायला सांगितले जाते. आढेवेढे घेत तो तयार होतो. ताब्यात घेतलेली ती पर्स रिकामीच असते. दोघा पोलिसांनी रीचरची साक्ष टेप करून घेतल्यावर पुन्हा डेलनी नावाचा पोलीसही त्याची साक्ष घेतो. त्यात तो रीचर खाली वाकून पर्स हातात घेऊ  पाहत होता, असा आरोप करतो. पुन:पुन्हा पर्स रिकामी आहे हे सांगूनही तो ऐकत नाही. शेवटी रीचरला अटक केली जाते. कौंटीच्या (तालुक्यापेक्षा लहान भाग) कोठडीत ठेवून त्याला वकील देण्यात येतो.

पुढे रीचरला मोठय़ा तुरुंगात नेले जाते. इथे त्याच्यावर एक प्रचंड शरीराचा कैदी हल्ला करतो. तसे भांडणही नसते अन् परिचयही. शिवाय हा कैदी पॅरोलवर सुटणार असतो. रीचर त्याला पुरून उरतो. दुसऱ्या दिवशी रीचरला परत कौंटी कोठडीत नेण्यात येते. एक गोष्ट त्याच्या लक्षात येते, की त्याला मोठय़ा तुरुंगात नेताना सहा पोलीस सोबत होते, पण परत आणताना दोनच. म्हणजे तो मोठय़ा तुरुंगातून परत येणारच नाही, असा त्यांना विश्वास असतो तर! परत आल्यावर त्याला फारसा बंदोबस्त नसतोच. रीचर मग इरोनला फोन करतो आणि आतापर्यंतच्या साऱ्या घटनांचा क्रम लावून ती पर्स रिकामी असणे, त्याला मारण्याचा प्रयत्न होणे, त्याच्या साक्षीचे रेकॉर्डिग नाहीसे होणे या साऱ्याचा संबंध एका मोठय़ा साखळीशी कसा आहे, हे सांगतो. तरीही कथा इथे संपत नाही. गुन्हेगार त्याला मारायला हजर होतोच.. आणि शेवटच्या चतुर संभाषणात त्याचे तिथे येणे हे त्याला ताब्यात घेण्याचा भाग कसा आहे, हेही सांगतो!

छोटे छोटे भाषिक तपशील हाही पुस्तकाच्या रंजकतेचा भाग आहे. उदा. पोलीस म्हणतो ‘थँक्स फॉर हेल्पिंग अस विथ दॅट..’. तेव्हा रीचर म्हणतो, ‘तुम्ही ‘दॅट’ हा शब्द वापरलात, याचाच अर्थ याला काही पूर्वेतिहास आहे. हा कशाचा तरी भाग आहे.’

आणखी एका कथेत, न्यूयॉर्कमध्ये भटकायला आलेल्या १७ वर्षांच्या रीचरला एक गृहस्थ एका स्त्रीच्या गळ्यावर दाब देताना दिसतो. रीचर मध्ये पडल्यावर तो गृहस्थ रीचरला मारायचा प्रयत्न करतो. छोटय़ाशा मारामारीनंतर तो गृहस्थ रीचरला म्हणतो, ‘तू इथून निघून जा आणि साडेतीन तासांनंतर दिसलास, तर मुडदा पाडीन.’ अर्थात, रीचर नाद सोडत नाही. तो गृहस्थ गेल्यावर रीचर त्या बाईला म्हणतो, ‘तू एफबीआय एजंट आहेस.’ ती बाई चकित होते! तेव्हा तो सांगतो, ‘तो गृहस्थ तू लपवलेले रेकॉर्डिग मशीन शोधत होता.’ तो गृहस्थ माफिया-गँगस्टर असतो. वय लहान, पण दणकट शरीरयष्टीचा रीचर त्याचे आव्हान स्वीकारतो आणि त्याच रात्री पूर्ण शहराची वीज जाते. याच दरम्यान गाडीत बसलेल्या प्रणयी जोडीदारांचा खून करणारा सॅम हा मोकाट खुनीही न्यूयॉर्क शहरात येऊन ठेपतो. दिवसभरातील घडामोडी सांगणारी ही कथा रात्री वीज गेल्यामुळे भांबावलेल्या शहराचे, तिथल्या माणसांचे वर्णन करताना आयझ्ॉक असिमोव्हच्या ‘नाइटफॉल’ या कथेची आठवण करून देते. अशा काळोखात रीचर माफिया गुंड आणि खुनी दोघांना सामोरा जातो. पुढच्या रीचरची बीजे या तरुण रीचरमध्ये दिसतात.

‘सेकंड सन’ या कथेत, रीचरचे वडीलही सैन्यात असतात. जपानमध्ये त्यांचा तळ असतो. रीचरचे नव्वदीला पोहोचलेले आजोबा (आईचे वडील ) पॅरिसमध्ये शेवटच्या घटका मोजत असतात. म्हणून ती त्यांना भेटायला जाते. मात्र भोवतीची गुंड मुले आणि नवीन शाळा यांत तेरा वर्षांच्या रीचरचा निभाव कसा लागणार याची तिला काळजी असते. त्यातच वडिलांची कोडवर्ड पुस्तिका हरवलेली असते. ती तो शोधून काढतो. दरम्यान,  रीचरला एक गोड मैत्रीण मिळते आणि गुंडांचाही तो सामना करतो. या कथेवर शेरलॉक होम्स शैलीचा खूप प्रभाव आहे. तसाच ‘मेबी दे हॅव अ ट्रॅडिशन’ या हिरा गायब होण्याच्या कथेतही हा प्रभाव थोडासा जाणवतो. अनेक कथांप्रमाणे याही कथेची सुरुवात वेधक आहे. ती अशी : ‘‘ती साधारण एकोणीस वर्षांची असावी. जास्त नाही, कमीच वयाची. विमा कंपनीने कदाचित तिला आणखी साठ वर्षे देऊ  केली असती. मला विचारलं तर कदाचित ३६ तास किंवा मिनिटेही, म्हणजे गोष्टी चुकल्या तर! केस सोनेरी, डोळे निळे; पण ती अमेरिकन नसावी. अमेरिकन तरुणांच्या चेहऱ्यावर एक तजेला, नितळपणा असतो.. अनेक वर्षांच्या समृद्धीने आलेला. मात्र ही मुलगी वेगळी होती. तिच्या वाडवडिलांनी कष्ट आणि भीतीचे थैमान पाहिले होते. हा वारसा तिच्या चेहऱ्यावर, शरीरात आणि हालचालींवर दिसत होता..’’

अगदी छोटेखानी अशा दोन-तीन कथा यात आहेत. एक तर गुन्हेगारी जगताशी अजिबात संबंध नसणारी, तर दुसरी ‘गाय वॉक्स इन्टु बार’ ही अपहरणाची- ज्यात रीचरचा अंदाज किंचित चुकतो. एके ठिकाणी तुरुंगाचे वर्णन जवळपास चारशे शब्दांत लेखक करतो. अनेक प्रकारच्या बंदुका, माणसे, त्यांच्या हालचाली, रस्ते, नकाशे, भ्रमंतीच्या जागा आणि अफलातून निरीक्षणं यांमुळे रीचर मालिकेतील कथा-कादंबऱ्या केवळ ‘प्लॉट’ राहात नाहीत. त्याच्या दोन कादंबऱ्यांवर सिनेमे तयार झाले आणि त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली. असे असले तरी रीचरची खरी मजा वाचण्यात आहे. स्टीव्हन किंग, केन फॉलेट, जेम्स पॅटरसन, फ्रेडरिक फोरसिथ यांसारख्या लेखकांनीही त्याचे कौतुक केले आहेच. पण माल्कम ग्लॅडवेलसारख्या लेखकाने चाइल्डचे लेखन ‘अ‍ॅडिक्टिव्ह’ असल्याचे म्हटले आहे. त्याची झलक या संग्रहात मिळतेच, पण कादंबऱ्यांच्या ‘आदल्या आणि मधल्या’ काळात तो काय करीत होता, याचे कुतूहलही थोडेसे शमते.

‘नो मिडल नेम’

लेखक : ली चाइल्ड

 प्रकाशक : रॅण्डम हाउस यू.के.

 पृष्ठे : ३९०, किंमत : ५९९ रुपये.

शशिकांत सावंत shashibooks@gmail.com

First Published on January 13, 2018 1:42 am

Web Title: book review lee child no middle name