रवींद्र कुलकर्णी kravindrar@gmail.com

एका ग्रंथप्रेमी वाचकाला सापडत नसलेल्या एका पुस्तकाच्या शोधात त्या पुस्तकाचे दूरचे शेजारीपाजारी सापडतात.. किंवा आजचे वातावरण असे की, या शोधात प्रकर्षांने दिसलेली ती पुस्तकेच शेजारची वाटू लागतात, पण हवे असलेले पुस्तक काही मिळत नाही.. मिळाले तर त्या पुस्तकाला शेजारच नसणार अशी चिंता वाटते! पुस्तक-कपाटाच्या आतबाहेर घडणारी, आठवणीतल्या ग्रंथखुणांची ही गोष्ट सुखान्त म्हणावी की शोकात्म?

once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
How Sugar Can Harm Liver
तुम्ही खाल्लेली साखर, फळे, हवाबंद पदार्थ यकृतावर कसा परिणाम करतात? डॉक्टरांनी सांगितलं, ‘साखरेच्या कराचं’ महत्त्व
How to draw a cat using 5 four times
Video : चार वेळा इंग्रजीत पाच लिहून काढले सुंदर मांजरीचे चित्र, व्हिडीओ एकदा पाहाच
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट

गेले काही दिवस माख्रेजचे ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’ सापडत नाही. संग्रहातले एखादे पुस्तक मिळेनासे झाले की ते आणखी हवेसे वाटू लागते. स्मृतीच्या तळातून मुखपृष्ठ अलगद वर येते. त्याच्या कण्याचे पोपडे उडून त्याचे एक डिझाइन तयार झालेले असते, तेही आपल्या लक्षात असते. त्यातले प्रसंग सारखे आठवू लागतात. त्यातला एखादा परिच्छेद पुस्तकाच्या डाव्या पानावर असतो का उजव्या, तेही आपल्याला आठवू लागलेले असते. या साऱ्या गोष्टी आपल्या ध्यानात असाव्यात; पण प्रत्यक्ष पुस्तक काही दिसू नये, याने अस्वस्थता येते.

माझ्या संग्रहातली पुस्तके फारशी कोणी मागून नेतही नाही आणि त्यातल्या पुस्तकांच्या जागा वर्षांनुवर्षे बदललेल्याही नव्हत्या. एखाद्या लक्षात असलेल्या पुस्तकावरून बाकीच्या पुस्तकांचा शोध घेणे सोपे असे. पूर्वी देशपांडय़ांना विचारले की सावंत कुठे राहतात, तर ते सहज दोन खोल्या सोडून पलीकडे, वा शेजारच्या चाळीत, असे सांगत.. तसेच एखादे पुस्तक आपल्या शेजाऱ्याचा पत्ता सांगे.

आता नुकतेच घर बदलल्याने पुस्तकांच्या साऱ्या जागा बदललेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे शेजार बदलून गेले आहेत. बरीच वर्षे राहिलो असलेल्या जुन्या शहरात अनेक वर्षांच्या खंडानंतर परत यावे, साऱ्या ओळखीच्या खुणा सापडाव्यात, पण एखादी लहानशी खूण सापडली नाही की जसा पोटात खड्डा पडतो; शोधत असलेले पुस्तक दिसले नाही की अगदी तसे वाटू लागते. खरे तर नवीन प्रत घेणे शक्य आहे. किंमतही फार नाही हे ऑनलाइन विक्रीस्थळांवर कळते आहे. तिथेच जुनेदेखील उपलब्ध आहे. त्याचे मुखपृष्ठही माझ्या न मिळणाऱ्या पुस्तकाशी मिळतेजुळते आहे. खरे तर मला घ्यायला हरकत नाही. पण बाहेरच्या वातावरणात एक नकोसा ताण आहे. येणारे पुस्तक कोणत्या विमानतळावरून येणार कोण जाणे. नंतर कुठल्या वाहनात त्याला टाकणार व ते घरी कोण आणणार? त्यावरून नकोसे काही आले तर? पुस्तकामुळे घर अशा प्रकारे संकटात येणे मला नको असते. चार दिवस आधीच ज्याँ अनुईच्या ‘बेकेट’ने येत नाही असे कळवले तेव्हा मला ‘सुटलो’ असे वाटले. खरे तर ऑर्डर रद्द करणे शक्य होते, पण ते करावेसे वाटले नाही. नाइलाजाने का होईना, पण या जबरदस्तीने लादलेल्या आणि त्रस्त करणाऱ्या वातावरणाला पुस्तकाचे शीर्षक समांतर जात राहते. ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’चे काय झाले असावे?

माख्रेजचे ते पुस्तक शोधता शोधता अनेक पुस्तकांवरून नजर फिरत जाते. पॉल डी क्रुईफच्या ‘मायक्रोब हंटर्स’ या पुस्तकावर ती जराशी रेंगाळते तसे ते मी फळीवरून काढतो. धूळ झटकावी लागते. ते उघडून काही वर्षे झालेली आहेत. काळबादेवीतल्या ‘एनएस बुक शॉप’मधून घेतले होते, त्यालाही २५ वर्षे होऊन गेली. पुस्तकांच्या अनेक चळतींतून मार्ग काढत त्याच्यापर्यंत अजाणता पोहोचलो तेव्हाही त्याच्यावरली धूळ अशीच झटकावी लागली होती. ते एकदा शशिकांत सावंतशी बोलताना हातात होते. त्याने ते घेतले व त्याच्या टेक्स्ट-ब्लॉकवर नजर टाकत म्हणाला, ‘हॅण्डकट आहे रे!’.. तोपर्यंत माझे त्याकडे लक्षच गेले नव्हते.. १९२६ सालची पहिली आवृत्ती! वाचनाचे वेड वेग घेत होते तेव्हा ते ओढीने वाचले होते. नंतर कधी पानन् पान परत वाचले नाही. पॉल एहर्लिच व त्याच्या प्रयोगशाळेने शोधलेल्या ‘मॅजिक बुलेट’ तथा ‘कम्पाऊंड ६०६’ या औषधाची कहाणी त्यात आहे. एकदा एहर्लिचच्या चाहत्याने त्याला म्हटले, ‘‘हे प्रतिभावंत मनाचे काम आहे!’’ त्यावर तो उत्तरला, ‘‘मित्रा, कसली प्रतिभा घेऊन बसलास! तब्बल सात वर्षांच्या अपयशी प्रयत्नांनंतर एक क्षण नशीब घेऊन आला!’’ ..सध्या ज्या बातम्या हवेत आहेत, त्यात सात वर्षांचा काळ खूप मोठा वाटतो. याच पुस्तकातले लुई पाश्चरवरचे प्रकरण वाचून मी पात्रीस देब्रेने लिहिलेले त्याचे विस्तृत चरित्र (इंग्रजी अनुवाद) विकत घेतले होते. संशोधक पाश्चरमध्ये ‘योद्धा’ पाश्चर नसता तर? हा विचार मला अस्वस्थ करतो. मी पुस्तक परत ठेवून देतो.

काढलेले पुस्तक, काम झाल्यावर त्याच्याच जागेवर परत ठेवणे ही मला आजपर्यंत न जमलेली गोष्ट आहे. त्यामुळे शोधताना कुठे काय दिसेल हे सांगता येत नाही. ऑलिव्हर सॅक्सचे ‘अवेकनिंग्ज’ही मला रांगेत दिसते. ही पुस्तके अनेक वर्षे माझ्याकडे आहेत. चाळली अनेकदा, पण एक-दोन वेळाच पूर्ण वाचली असावीत. आजकाल वातावरणच असे आहे की, हीच पुस्तके नेमकी आज लक्ष वेधून घेताहेत. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धावरच्या पुस्तकांची रांगही माझ्याकडे आहे, त्यातही मी डोकावतो. त्यात शोधाशोध सुरू असताना सीनिअर डॉक्टर मैत्रिणीशी फोनवर बोलणे होते. ती म्हणते, ‘‘हॉस्पिटलमधले सर्व मामुली पेशंट घरी पाठवून दिले आहेत.. अ‍ॅण्ड वुई आर जस्ट वेटिंग..’’! तिच्या हातात बंदूक व दुर्बीण दोन्ही आहे, असे मला वाटू लागते. वेळ हाताशी आहे, पण त्यात हे वाट पाहणे जीवघेणे आहे.

मी शोधत असलेल्या कादंबरीचा- ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’चा – नायक आपल्या प्रेयसीची तब्बल ५० वर्षे वाट पाहतो.

उभे-आडवे सर्व शोधून झाले. ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’ आता मिळायला हवे. हे खरे की, माख्रेज काही या कादंबरीने ओळखला जात नाही. ही प्रेमकथा आहे. शेवटी प्रेमिक एकत्र येतात की नाही हे कुतूहल सर्व प्रेमकथांत असते, तसेच इथेही आहे. कथा कोलम्बियाच्या कुठल्या तरी छोटय़ा शहरात घडते. त्यातली पात्रे, गल्ल्या, मैदाने, रस्ते, घरे आणि त्यांच्या गॅलऱ्या यांच्यात आपण इतके रंगतो की, त्या गावाचे नाव लेखकाने दिलेलेच नाही हे आपल्या लक्षात येत नाही. कोलम्बियाच्या समुद्रालगतच्या किंवा तिथल्या मॅग्डालेना नदीकाठच्या कुठल्याही गावात घडणारी ती गोष्ट आहे. या कादंबरीवर सिनेमा निघाला; त्याचे चित्रीकरण कार्टेजीना या शहरात झाले, त्याचे फोटो मी नेटवर पाहतो. तिथल्या १०० वर्षांपूर्वीच्या घरांकडे पाहताना गोव्याचा भास होतो.

पुस्तक मिळाले, तरी बाहेरून येणाऱ्या गंभीर बातम्यांत ते चाळणे सोपे नाही. मला त्यात रमायला काही वेळ द्यावा लागणार आहे. ते काही परत सारे वाचणारही नाही. माख्रेजची शैली पाल्हाळीक आहे. मला हवी असलेली काही प्रकरणे व प्रसंग चाळल्यानंतर ते पुस्तक परत कपाटात जाणारच आहे. ‘माझा देवावर विश्वास नाही, पण मी त्याला घाबरून असतो’ हे त्यातले वाक्य भारीच आहे. कादंबरीचा नायक फ्लोरेन्टिनो अरिझा हा आपल्या फावल्या वेळात प्रेमिकांना प्रेमपत्रे लिहून देत असतो. प्रथम कोणी मुलगा त्याच्याकडून प्रेमपत्र लिहून घेऊन जातो. नंतर ते पत्र घेऊन त्याची प्रेयसी त्या पत्राला उत्तर लिहून घ्यायला नायकाकडे येते. काही दिवसांपूर्वी आपणच लिहिलेले प्रेमपत्र तो ओळखतो व त्यास उत्तर लिहून देतो. एक प्रकारे, स्वत:च स्वत:ला प्रेमपत्रे लिहिण्यात गुंतत जातो. असे प्रसंग फक्त आठवून माझे भागत नाही, तर ते परत वाचावेसे वाटत आहेत. माझ्या निरीक्षणाला, ‘जगात खूप सुखी विधवा आहेत’ हे लेखकाचे मत पूर्णपणे मान्य असते. नायकाचे त्यातील प्रेम हे अजाण वयातले निरागस प्रेम नाही. नंतर वाढलेल्या वयातले हिशेबी प्रेमही नाही. ते सतत वाहणारे आणि कॉलराच्या साथीच्या अस्थिर वर्तमानाला तोलून धरणारे आणि ५० वर्षांनंतरही ताजे राहणारे आहे. खरे तर कार्टेजीनातल्या कुठल्या तरी जुन्या घराच्या गॅलरीत बसून हे पुस्तक मला वाचायला आवडेल.

सध्याच्या आणीबाणीसदृश परिस्थितीत ते पुस्तक सुरक्षितपणे मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ते किंडलवर डाऊनलोड करणे. हा मार्ग मला फार आवडत नाही, कारण तिथे पुस्तकाला एकटे पाहावे लागते. किंडलमध्ये एकत्र आलेली पुस्तके कधीही एकमेकांस ओळखत नसतील, भेटत नसतील असे वाटते. त्यांना शेजारधर्म नसतो. एक गेल्याशिवाय दुसरे हजर होत नाही. कोणतेही पुस्तक इतर समानशील पुस्तकांच्या संगतीने आणखी खुलते. अर्थात किंडल ही उत्तम सोय आहे हे मान्यच करावे लागेल. पुस्तक किंडलवर अवतीर्ण होताना पाहणे हे फार अद्भुत वाटते. रामानंद सागरांच्या रामायणात देव वा राक्षस अवतीर्ण होतात त्याची आठवण येते. आज मात्र निरुपायाने मी परिस्थितीला शरण जातो आणि संगणकाच्या साह्य़ाने पुस्तकाला हजर होण्याची आज्ञा देतो. किंडलवरचे चक्र गोल फिरू लागते आणि बाहेरच्या अडचणींवर मात करत काही क्षणांतच ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’ तेथे निर्माण होते. माख्रेजच्या जादूई वास्तवाचा जो बोलबाला होतो, ते हेच असावेसे मला वाटते!

गॅब्रिएल गार्सिया माख्रेजच्या ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’ची ओळखीची भासणारी प्रत आता इथे चित्रातच दिसते..