हे पुस्तक आजच्या पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांनी, तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांपुढे दिलेल्या व्याख्यानांचे असले तरी मेंदूबद्दल आणि जाणिवेबद्दल शास्त्रीय संशोधनही भरपूर होत असताना, तसेच दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संबंधांचा समतोल, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि स्वायत्तता.. या आपणा भारतीयांच्याही प्रश्नांचा विचार त्यात आहे. त्या अर्थाने ते ‘आपले’ आहे..
समजा, नजीकच्या भविष्यकाळात आंतरग्रहीय प्रवास सुरू झालाच आणि तुम्हाला मंगळावर जायचंय अन् तुम्ही आता, लिफ्ट किंवा एसटीडी बूथसारख्या एका भन्नाट टेलीट्रान्स्पोर्टर (दूरवाहक) नामक मोठय़ा यंत्रपेटाऱ्यात घुसलात; त्यातील यंत्रज्ञानाने तुमची सारी जैविक माहिती शोषून तुम्हाला नष्ट केले आणि त्याच्या पुढच्या क्षणाला तुम्ही मंगळावर तसल्याच यंत्रातून नव्याने सदेह बाहेर आलात; या नव्या ‘तुम्ही’त तुमची सारी जैविक माहिती भरलेली आहे; अगदी तुम्ही इथल्या यंत्रपेटाऱ्यातील बटन दाबेपर्यंतची स्मृती शाबूत आहे आणि त्यानंतरची घटना म्हणजे तुम्ही नव्या देहाने मंगळावरील यंत्रपेटाऱ्यातून बाहेर पडला आहात; आता पृथ्वीवरचे (नष्ट झालेले) तुम्ही आणि मंगळावरील ‘तुम्ही’ एकच आहात की वेगवेगळे दोन जण आहेत (किंवा होते)? यातील अस्सल तुम्ही कोण?
काही जण म्हणतील की तुम्ही येथून नष्ट होऊन ‘तेच तुम्ही’ तेथे केवळ जागे झालेले आहात, तर काही जण म्हणतील की ती तुमची केवळ ‘प्रतिकृती’ आहे. ही जबरी कथा केवळ विज्ञानकथा नाही. कथेपेक्षाही जास्त तो एक मूलभूत तत्त्वज्ञानात्मक प्रश्न आहे. ‘मी कोण?’ हा व्यक्तीच्या तत्त्वज्ञानात्मक आयडेन्टिटीचा (प्रतिशब्द : ‘तदेवता’ (अस्मिता नव्हे)) गंभीर प्रश्न आहे. माणसाची तदेवता त्याच्या अनेक सामाजिक भूमिकांशी अखंड जोडलेली असते. मुख्यत: ती व्यक्तीच्या नैतिक भूमिकेशी, तिच्या कर्तव्य, बांधिलकी, सचोटी, नेकी आणि जबाबदारीशी निगडित असते. ‘वरतून आर्डर हाय’, ‘साहेबांनी सांगितले म्हणून मी केले, माझे कामच हे असे करणे आहे, म्हणून मी निदरेष आहे’ असा बचाव अनेक जण करतात. अनेक नाझी गुन्हेगारांनी तसा युक्तिवाद केला. दहशतवादी, धार्मिक-जातीय दंगलखोर, पोलीस, सैनिक, गुंड, नोकरदार, चाकरमानी इत्यादी मंडळी हीच भाषा बोलतात.
पण माझ्या आज्ञापालनात मला आदेश देणारा मेंदू असतो की मन की जाणीव की आत्मा की परमात्मा, ईश्वर? की अंतिम सत्य की अन्य काही? मी जर माणूस असेन तर ‘मी माणूस असतो म्हणजे नेमका कोण असतो?’ या प्रश्नासारख्या अनेक प्रश्नांवर तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात काटेकोर सखोल मांडणी केली जात असते. अशी मांडणी असलेले ‘फिलॉसॉफर्स ऑफ अवर टाइम’ (आमच्या काळातील तत्त्ववेत्ते) हे टेड होण्डेरीच या तत्त्ववेत्त्याने संपादित केलेले नवे पुस्तक नुकतेच भारतात मिळू लागले आहे.
लंडनच्या ‘रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ फिलॉसॉफी’च्या वार्षिक व्याख्यानमालेत जगातील विचारवंतांनी दिलेल्या १८ व्याख्यानांचा हा संग्रह आहे. व्याख्याते-लेखक वर्ग म्हणजे जगातील दर्जेदार नामवंत विचारवंत मंडळी आहेत.
‘फिलॉसॉफर्स ऑफ अवर टाइम’ हे पुस्तक २०१४ पर्यंतच्या १८ व्याख्यानांचे आहे. व्याख्यान-लेखांची नावे अशी (कंसात लेखकाचे नाव)..
कनव्हिंसिंग द इम्पॉसिबल अॅण्ड माइंड-बॉडी प्रॉब्लेम (अर्न्स्ट नागेल), पर्सेप्शन अॅण्ड इट्स ऑब्जेक्टस् (पी. एफ. स्ट्रॉसन), पर्सेप्शन : व्हेर माइंड बिगिन्स (टायलर बर्ज), द रिव्हेंज ऑफ द गिव्हन : मेंटल रिप्रेझेंटेशन विदाऊट कन्सेप्चुलायझेशन (जेरी फोडोर), अटेन्शन अॅण्ड मेंटल पेंट (नेड ब्लॉक), सम रिमार्क्स ऑन इन्टेन्शन इन अॅक्शन (जॉन मॅकडोवेल), ऑन हॅविंग अ गुड (क्रिस्टिन कोर्सगार्ड), रीझन्स फंडामेंटालिझम (टी. एम. स्कनलोन), मॅजेस्टी ऑफ रीझन (सायमन ब्लॅकबर्न), व्हाट इज नॅचरल (मेरी वॉरनॉक), फ्री विल अॅज प्रॉब्लेम इन न्युरोबायोलॉजी (जॉन सर्ल), वी आर नॉट ह्य़ूमन बीइंग (डेरेक पार्फिट), नॉलेज, बिलिफ अॅण्ड फेथ (अन्थानी केनी), सिम्पल ट्रथ, हार्ड प्रॉब्लेम्स : सम थॉट्स ऑन टेरर, जस्टिस अॅण्ड सेल्फ डिफेन्स (नोम चोम्स्की), सोशल स्टिअर अॅण्ड द थ्रेटस टू मॉरल एजन्सी (अॅलेस्डेर मॅकएन्टायर), रिलिजस टॉलरन्स- द पीसमेकर ऑफ कल्चरल रायट्स (यार्गन हबरमास), फिलॉसॉफी अॅज अ ह्य़ूमॅनिस्टिक डिसिप्लिन (सर बर्नार्ड विल्यम्स) आणि व्हाय इजण्ट द मोर प्रोग्रेस इन फिलॉसॉफी (डेव्हिड शामर्स).
या १८ पैकी पहिले सहा लेख मन, प्रत्यक्ष ज्ञान आणि मानवी कृती यांच्याविषयीचे, चार लेख बुद्धी आणि नैतिकता यांच्याविषयीचे, नंतरचे सहा स्वातंत्र्य, तदेवता, धर्म आणि राजकारण याविषयीचे आहेत आणि शेवटचे दोन लेख हे खुद्द तत्त्वज्ञान या अॅकेडेमिक स्वरूपाच्या विद्यापीठीय व महाविद्यालयीन विषयाविषयीची चिंता व्यक्त करणारे, तत्त्वज्ञानाचे एक व्यापक सिंहावलोकन करणारे आहेत.
सर्व लेख एका अर्थाने एकमेकांशी संबंधित आहेत. प्रत्येक लेखाचा गोषवारा देणे शक्य नाही. पण त्यांच्या साऱ्यांच्या मांडणीतून एक सेंद्रीय एकात्म विचार सांगणे शक्य आहे. लेखकांनी राज्यकर्ते मानवी मन नियंत्रणात कसे आणता येईल, याचा विचार करीत हा मुद्दा मांडला आहे. माणसाला आत्मा असेल किंवा नसेलही, पण मन, मेंदू, जाणिवा असतात, त्यामुळे मेंदू विज्ञान, नस विज्ञान, जाणिवेचे विज्ञान यांच्या अभ्यासावर प्रचंड पैसा ओतला जातो. मन किंवा जाणीव वास्तवाचे ग्रहण कसे करते, ते कसे समजावून घेते, मन नावाच्या घटकाची निर्मिती कशी, कुठे, का होते, तिचा ज्ञातअज्ञात विस्तार कसा होतो, त्यानुसार व्यक्तीची कृती कशी साकारते, मन, मेंदू व जाणिवा बधिर कशा होतात किंवा कराव्यात याचे सारे संशोधन हे केवळ लोकांवर राज्य करण्यासाठी, युद्धातील-धार्मिक-जातीय-वंशीय हत्याकांडातील नैतिकता नष्ट करण्यासाठी केले जाते. ही बाब या साऱ्या लेखनातून अधोरेखित होते. निखळ ज्ञान आणि ज्ञानाचे विषय यात फरक केला पाहिजे, धर्म व धर्मसंस्था, त्यांची धार्मिक भाषा हे ‘ज्ञानाचे विषय’ होऊ शकत नाहीत; त्यांची काटेकोर तार्किक चिकित्सा आवश्यक असते. धर्म व ‘धार्मिक सत्ये’ हा काव्याविष्कार मानला पाहिजे, मानवी मेंदू व नीती यांचा संबध शोधला तर प्रत्येक व्यक्तीला नैतिक स्वायत्ततेचे सामाजिक भान येईल, उत्क्रांतीचा योग्य अर्थ लावणे आणि पृथ्वीबाहेरील कोणत्या तरी अज्ञाताला शरण जाण्याची गरज नाही. विज्ञान आणि धर्म हा संबंध जोडण्यापेक्षा विज्ञान आणि सामाजिक-व्यक्तिगत नीती यांचे नाते समृद्ध केले पाहिजे, धार्मिक-आध्यात्मिक ज्ञानशास्त्राची जागा सामाजिक-राजकीय ज्ञानशास्त्रास मिळणे महत्त्वाचे आहे, याचा आग्रह यातून जाणवतो. प्लेटो, देकार्त, ह्य़ूम, कांट, मिल ते रिचर्ड डॉकिन्स आणि पुढेही अनेकांचे परीक्षण यात आले आहे. मानवी तदेवता व तिची रचना लक्षात घेतली तर आत्मा, ईश्वर, पुनर्जन्म या संकल्पनांमधून; पर्यायाने विविध पातळ्यांवरील शोषणातून मानवाला कायमची मुक्ती मिळेल, असे लक्षात आणून दिले गेले आहे.
प्रत्येक लेख मुख्य मुद्दे, कोडी, सुरचित युक्तिवाद आणि प्रश्नोत्तरे यांनी सजलेले आहे. ज्यांना समकालीन तत्त्वज्ञानात रुची आहे आणि तत्त्वज्ञान व तत्त्ववेत्ते दैनंदिन समस्यांचा कसा विचार करतात, त्यावर कोणता उपाय सुचवितात, ती अमलात आणण्यासाठी कोणती धोरणे, कायदे, नियम काटेकोरपणे अमलात आणले पाहिजे, हे समजावून घ्यावयाचे आहे, त्या अभ्यासक, धोरणकर्ते, प्रशासक, नोकरशहा आणि राजकारणी व राज्यकर्ते या साऱ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकते.
या व्याख्यात्यांनी यांचे विषय विद्यापीठीय शिस्तीत मांडले आहेत, पण विषय लोकांशी संबंधित असल्याने केवळ तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांपुरती ते मर्यादित राहात नाहीत. म्हणून यापैकी काही लेखांची भाषांतरे किंवा त्यांची विस्तृत ओळख करून देणारे लेखन ही काळाची गरज आहे. प्रत्येक व्याख्यात्याने निवडलेला विषय आंतरराष्ट्रीय राजकारण, दहशतवाद, युद्ध, जागतिक शांतता व सुव्यवस्था, व्यक्तीची प्रतिष्ठा, तिची ‘नैतिक कर्ता’ (मॉरल अॅक्टर) म्हणून असलेली स्वायत्तता आणि ती व्यक्त करणारे स्वातंत्र्य देणारी लोकशाही आणि तिचे संवर्धन करणारी कालोचित राज्यव्यवस्था व समाजरचना, मानवी जीवनाची समृद्धी यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे हे पुस्तक सामान्य वाचकांसाठीही आहे.

ऐतिहासिक पाश्र्वभूमी
रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ फिलॉसॉफी ही लंडनमधील तत्त्वज्ञान या विषयाला वाहिलेली एक जुनी संस्था आहे. पण ती कोणत्याही एका विशिष्ट संप्रदाय, जीवनपद्धती अथवा विचारसरणीला बांधील नाही. निखळ तत्त्वचिंतन आणि तत्त्वज्ञानात्मक विचारांचा विकास या हेतूने ती नामवंत विचारवंताची व्याख्याने आणि परिसंवाद आयोजित करते.
पहिल्या महायुद्धाच्या काळात १९१६ साली महायुद्धास विरोध करणाऱ्या एका पत्रकास पाठिंबा जाहीर केल्यामुळे जगतविख्यात तत्त्ववेत्ता बटरड्र रसल् (रसेल नव्हे) यास तुरुंगवास झाला. त्या वेळी तुरुंगात जाण्याची वाट पाहतानाच्या काळात रसल्ने ‘लॉजिकल अॅटोमिझम’ या विषयावर ब्लूम्सबरी भागात एका दालनात काही व्याख्याने दिली. तेथेच ही संस्था स्थापन झाली. ही घटना १९२५ सालची. संस्थेचे मूळ नाव होते ब्रिटिश इन्स्टिटय़ूट ऑफ फिलॉसॉफिकल स्टडीज. नंतर तिचे नाव बदलण्यात आले. रसल्ने व्याख्याने दिलेल्या त्याच दालनात १९९८ साली संस्थेने रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ फिलॉसॉफी अॅन्युएल लेक्चर ही व्याख्यानमाला सुरू केली. १९९८ पासून २०१५ पर्यंत १९ व्याख्याने झाली. २०१५ साली १९वे व्याख्यान अमर्त्य सेन यांचे जस्टिस अॅण्ड आयडिया ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी या विषयावर होते. पुढील वर्षी ०२ मार्च २०१६ रोजी टिमोथी विलियमसन या तत्त्ववेत्त्याचे ‘स्पेक्युलेटिव्ह फिलॉसॉफी’ हे व्याख्यान नियोजित आहे.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
How did Swargate get its name in Pune
Pune : पुण्यातील ‘या’ ठिकाणाला स्वारगेट हे नाव कसे पडले? जाणून घ्या ‘स्वारगेट’ नावामागचा इतिहास

स्टीफन हॉकिंगला उत्तर
या व्याख्यानसंग्रहाला दिलेल्या नावामागे दोन हेतू दिसतात. पहिले म्हणजे ते एका वादाला दिलेले सडेतोड उत्तर असावे, असे दिसते. जगप्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंगने (नीत्शेच्या ‘देव मेला आहे’ धर्तीवर) ‘तत्त्वज्ञान मेले आहे’ (फिलॉसॉफी इज डेड) असे २०१० साली त्याच्या ‘ग्रँड डिझाइन’ या पुस्तकात आणि नंतर अनेक ठिकाणी जाहीर केले होते. ‘तत्त्ववेत्त्यांनी विज्ञानातील आधुनिक प्रगतीशी आपली नाळ जोडलेली नाही, विशेषत: भौतिक विज्ञानातील प्रगतीविषयी ते अज्ञानी असतात,’ असे सांगून तत्त्वज्ञान मेल्याचे हॉकिंगने जाहीर केले होते. त्यावर बरीच मोठी खडाजंगी, वादविवाद, परिसंवाद झडले. हॉकिंगचे नाव न घेता प्रस्तावनेच्या शेवटी संपादक म्हणतात, की तत्त्वज्ञान मेले आहे, असे उद्गार काढणाऱ्यांनी हे सत्य लक्षात घेतलेले नाही की तत्त्वज्ञान या विषयाने ‘तत्त्वज्ञान मेले आहे’ असे म्हणणाऱ्यानांच पुरले आहे!
दुसरा हेतू तत्त्वज्ञान (किंवा कोणताही तात्त्विक विचार) कधी मरत नसतो, त्याची उचितता संपत नसते. प्रत्येक काळात ते नव्याने फुलत असते. हितनिरपेक्ष, लिप्ताळे नसलेला हेतू ठेवून ते दिलेल्या व्यवस्थेला प्रश्न विचारते, हे नैतिक सामथ्र्य केवळ तत्त्वज्ञानातच असते, सत्य उत्तरासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असते. त्यामुळे ते कधीच कालबाह्य होऊ शकत नाही, याची जाणीव करून देणे संपादकांना आवश्यक वाटले असावे. त्यामुळे ‘आमच्या काळातील तत्त्ववेत्ते’ हे समर्पक नाव दिले असावे.

फिलॉसॉफर्स ऑफ अवर टाइम
संपादक : टेड हॉण्डरिच
प्रकाशक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
पृष्ठे : ३८४, किंमत : ७५२ रुपये

shriniwas.sh@gmail.com