जगभरातील जवळपास सर्व पळणारे ‘ससे’ आज थकले-भागले अन् सुस्तावले आहेत.. पण याचा अर्थ कासवाचा मार्ग मोकळा झाला असा नव्हे. उलट नव्या संदर्भात, भारतीय अर्थव्यवस्थेच्या ‘कासवा’ला गती वाढवावी लागेल.. तसे का होत नाही, हे वेळोवेळी सांगणारे टी. एन. नायनन यांच्या लेखसंग्रहाबद्दल..
‘‘काहीही बदललेले नाही. धोरणंही तीच आणि धोरणं बनविण्याची पद्धतही जुनीच काँग्रेससारखीच. जर काही वेगळे घडले असेल तर गायीच्या मुद्दय़ाची भर पडली आहे..’’ फार नाही तर साधारण तीन महिन्यांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी मोदी सरकारच्या कारभारावर ही तोफ डागली. तो जाहीर कार्यक्रम ज्येष्ठ पत्रकार टी एन नायनन यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा होता. भारतापुढे आíथक संधींचा मोठा पट मांडला आहे, पण त्यातील किती संधी साधल्या गेल्या आणि किती दवडल्या व दवडत आहोत, हे विशद करणाऱ्या नायनन यांच्या ‘द टर्न ऑफ टॉरटॉइज’ या अर्थविषयक पुस्तकाला जो काही राजकीय संदर्भ आहे, तो शौरी यांच्या मुखातूनच जणू त्यावेळी व्यक्त झाला. एक विशाल अर्थव्यवस्था म्हणून उभे राहण्यात आणि सध्याच्या जडत्व आलेल्या जागतिक परिमाणांत एक विपुल शक्यतांनी भारलेला देश म्हणून भारताच्या गुणावगुणांचे विहंगम दर्शन या पुस्तकातून नायनन यांनी घडविले आहे. नेमक्या आव्हानांना ओळखणाऱ्या जाणिवेचा तोटा आजही आहेच. धोरणकर्त्यांकडून या जाणिवेच्या जोपासनेची अपेक्षा करताना, नायनन यांनी या आव्हानांच्या सामन्यासाठी समर्पक उपायही प्रस्तुत केले आहेत.
कासवाने सशाला धावण्याच्या शर्यतीत हरविले. संथ सुरुवात करूनही केवळ चिकाटीच्या बळावर कासवाचे जिंकणे, हे या कथेचे तात्पर्य भारतीयांच्या मनामनांत लहानपणापासून घर करून आहे. म्हणजे कासवाने शर्यत जिंकणे अघटित नाही. कधी ना कधी कासवाने जिंकणे अभिप्रेतच आहे. पण ही वेळ नेमकी केव्हा येईल? या प्रश्नाभोवती फेर धरून केली गेलेली अनेकांगी चिकित्सा नायनन यांच्या या साडेतीनशे पानी पुस्तकातील सहा प्रकरणांतून पुढे येते. त्या अर्थी नायनन हे आशावादी असले तरी ‘भारत उद्याची अनभिषिक्त आíथक महासत्ता’ अशा तुताऱ्या फुंकणाऱ्यांच्या पंक्तीत ते अजिबात जाऊ इच्छित नाहीत. अतिरंजिततेच्या आहारी न जाता वास्तव स्थितीत आपल्यासमोरची आव्हाने आणि समस्यांचा वेध घेताना, उपलब्ध संधींचा साद्यंत पट ते खुला करतात. असाधारण असे काहीही न करता भविष्यात भारताला गाठता येणे शक्य असलेल्या माफक आíथक लक्ष्यांची ही मांडणी म्हणूनच वस्तुनिष्ठ आणि समजून घ्यायलाही सोपी बनली आहे. उल्लेखनीय म्हणजे आजवरच्या आíथक कामगिरीचा मागोवा आणि भविष्यातील वाढीचा वेध हा केवळ आíथक अंगाने नव्हे तर सामाजिक व राजकीय परिप्रेक्ष्यातून हाताळला गेल्याने हे पुस्तक सर्व प्रकारच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त बनले आहे.
जगभरातील जवळपास सर्व पळणारे ‘ससे’ आज थकले-भागले अन् सुस्तावले आहेत. उत्पादकता आणि संपन्नता एका विशिष्ट पातळीवर पोहोचली की, आपोआपच फाजील आत्मसमाधान आणि बेफिकिरीतून जडत्व येते. पण याचा अर्थ कासवाचा मार्ग मोकळा झाला असा घेतला जाऊ नये. सुस्तपणा हा भारतीय व्यवस्थेचा स्थायीभाव बनला आहे, सांप्रत स्थितीत अशीच कूर्मगती कायम राहिली तर सुस्तावलेल्या सशापर्यंतचे अंतर कापायला आणखी बराच पल्ला गाठावा लागेल. नव्या संदर्भात कासवाने सशाची गती धारण करणे मग भागच ठरेल, असे लेखक सांगतात. पण तसे व्हायचे तर लक्षणीय असे काही घडताना दिसतच नाही. एकीकडे कृषिक्षेत्राची अस्मानी व सुल्तानी दोन्ही अंगाने शक्य तेवढी परवड सुरू आहे. निम्न उत्पादकतेच्या शेतीतील श्रमशक्तीचे, उच्च उत्पादकता व उच्च मोबदल्याच्या निर्मिती व सेवा क्षेत्रात सहजपणे स्थान बदलासारखी मूलभूत गोष्ट होणे मग अपेक्षित आहे. पण तेही इतके सावकाशपणे सुरू राहून कसे चालेल?
भारताच्या आíथक सशक्ततेबद्दल आणि संभाव्य सामर्थ्यांबद्दल देशांतर्गतच नव्हे तर सबंध जगभरातूनच आज जितक्या भरवशाने बोलले जात आहे, तसे यापूर्वी कधी दिसून आलेले नाही. भारताने गेल्या पाव शतकात खरेदी क्षमता असलेल्या लोकसंख्येच्या निकषावर १८व्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर झेप घेण्याइतकी प्रगती केली आहे. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अव्वल तीन अर्थव्यवस्थांपकी आज ती एक आहे. हे जरी खरे असले तरी त्याचवेळी लोकसंख्येत गरिबांचा सर्वाधिक वाटा असलेलीही ती एक अर्थव्यवस्था आहे. जागतिक उत्पादनांत (जीडीपी) ९० टक्के वाटा असणाऱ्या अव्वल ४० देशांत सर्वात कमी दरडोई उत्पन्न असलेला भारत आज शेवटच्या स्थानी आहे. जरी पुढील १० वष्रे सरासरी ६ टक्के दराने जरी भारताने प्रगती केली तरी दरडोई उत्पन्नांत आपल्यापुढे असलेल्या फिलिपाइन्स, श्रीलंका केवळ मागे पडतील, इतकीच मजल आपल्याला शक्य होईल. महाकाय आकारमान हीच भारताची सर्वात मोठी कुमक आहे, की देशाच्या वाटेतील ती मोठा अडसर ठरत आहे? नवस्वतंत्र भारतात त्याकाळी स्वीकारली गेलेली धोरणे आणि त्यामागील उद्दिष्टे आजही कमी-अधिक तशीच टिकून राहावीत, हे कितपत व्यवहार्य आहे? नाण्याला असलेला दुसरा पलूही मांडत, नायनन यांनी अनेक रोकडे प्रश्न आजच्या धोरणकर्त्यांपुढे उभे केले आहेत. तुलनेसाठी सर्वाधिक पसंत केल्या गेलेल्या चीनपुरतेच नव्हे तर वेगाने मुसंडी मारणाऱ्या अन्य आशियाई (‘रॅपिड ग्रोथ एशिया- आरएजी’ – लेखकांचाच शब्दप्रयोग) देशांच्या तुलनेत आपण कुठे आहोत, हे सांगणारी पुस्तकातील तौलनिक आकडेवारी बरीच बोलकी आहे.
अनेक चढ-उतार झेलत सुरू असलेली भारतीय उद्योगक्षेत्राची प्रगती, अर्थविकासातील राज्यांची भूमिका आणि कारभारात भ्रष्टाचार व अनागोंदी हा विशेष सर्वत्र सारखाच असला तरी काही राज्यांनी तशा स्थितीत मिळविलेली आघाडी, गरिबीशी सुरू राहिलेला निरंतर झगडा, आíथक विकास की पर्यावरण रक्षण हे सनातन द्वंद्व, जातीआधारित राजकारण आणि अलीकडचा िहदू राष्ट्रवाद यासारख्या राजकीय क्षितिजावरील ताज्या बदलांचा प्रभाव व आíथक परिणामकारकता अशी या पुस्तकातील वेगवेगळी प्रकरणे म्हणजे समकालीन भारताचा आíथक इतिहासच ठरतो. पुढच्या दशकभरात काय घडेल, अशा मूल्यांकनातून गाठले गेलेले टोकही खासच उद्बोधक आहे.
नायनन सद्य:काळाबद्दल लिहिताना, ‘एका तज्ज्ञ पंतप्रधानाचे निष्क्रिय मंत्रिमंडळ ते महत्त्वाकांक्षी पंतप्रधानांचे बथ्थड मंत्रिमंडळ असे परिवर्तन जरूर घडले’ असल्याचे सांगतात. ‘पण हा धडपडय़ा नेता जर आपल्या व्यवस्थेच्या अंगभूत कमजोऱ्यांबाबत जागरूक नसेल, किंबहुना ते झाकण्याचा प्रयत्न करीत असेल तर काय घडते, हे आपण सध्या पाहतोच आहोत. भले आपण गरिबी, अनारोग्य, भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढाईच्या पहिल्या टप्प्यांपर्यंतच पोहोचू शकलो असू, आपण जर अकार्यक्षमतेवर, धोरण निष्फलतेवर निर्णायक विजय मिळवू शकलो, तरी बरेच साध्य झाले म्हणावे,’ असा सजग आशावाद ते व्यक्त करतात. अर्थव्यवस्थेचा ‘सिंह’ गर्जून उठेल ही महत्त्वाकांक्षा ठीक पण त्या आधी सद्य ‘कासवा’वस्थेला स्वीकारले तरी जावे, अशीच लेखकाची अपेक्षा आहे. सावकाशतेची कबुली दिली तरच वेग वाढण्याची गरज आणि ठिकाणे लक्षात येतील.

‘द टर्न ऑफ दर टॉर्टॉइज’
लेखक : टी एन नायनन
प्रकाशक : पेंग्विन बुक्स,
पृष्ठे : ३५४, किंमत : ६९९ रु.

टी. एन. नायनन हे ‘बिझनेस स्टँडर्ड’ या अर्थविषयक इंग्रजी दैनिकाचे माजी संपादक आणि आता याच वृत्तपत्र समूहाचे चेअरमन व संपादकीय संचालक आहेत. ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ सह अन्य अर्थविषयक दैनिकांतून तसेच बिझनेसवर्ल्ड सारख्या नियतकालिकातूनही त्यांनी पत्रकारिता केली होती, परंतु १९९६ पासून ‘बिझनेस स्टँडर्ड’शी जोडले गेले, ते आजतागायत. याच दैनिकाचे प्रकाशक म्हणूनही त्यांनी काही काळ जबाबदारी सांभाळली होती. नायनन २०१० मध्ये दैनंदिन कामातून निवृत्त होऊन उच्चपदस्थ म्हणूनच कारभार पाहातात आणि स्तंभलेखन करतात. त्यांच्या नावावर ग्रंथ नाहीत हे खरे, परंतु त्यांच्या स्तंभलेखांची एकही ओळ न चुकवणाऱ्यांत अनेक दैनिकांचे संपादकही आहेत. प्रस्तुत पुस्तक त्यांच्या स्तंभलेखनाचेच फलित आहे.

सचिन रोहेकर
sachin.rohekar@expressindia.com