अजिंक्य कुलकर्णी

ही निव्वळ सलिमाची, तिच्या तीन मुलींची किंवा त्यांच्या पुढच्या पिढीची कहाणी नाही.. या साऱ्यांच्या ‘गोष्टी’ त्यात येतातच.. पण त्याबरोबरच सत्तर ते नव्वदच्या दशकांतील बदलांचे ओमान या देशातील कुटुंबव्यवस्थेवर झालेले परिणाम आणि त्यामुळे बदलत गेलेले स्त्रीजीवन या साऱ्याचा पटही त्यातून उलगडत जातो..

आपल्याकडे सर्वसाधारण वाचणाऱ्यांचे वाचनविश्व थोडे मराठी, थोडे हिंदी, थोडे इंग्रजी या त्रिकोणापुरतेच मर्यादित असते. या त्रिकोणाबाहेरील अरब साहित्य- म्हणजेच तिसऱ्या जगातले लेखन हे अगदी तुरळकांच्या वाचनात येते. मुळात आपली अरब साहित्याची झेप ही खलिल जिब्रान, नजिब माहफुज (माहफुज यांना १९८८ साली साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे!) आणि ‘अरेबियन नाइट्स’च्या पलीकडे जात नाही. त्यामुळे अरब साहित्यातील स्त्री-लेखकाच्या साहित्यवाचनाची शक्यता तर अधिकच धूसर. पण डॉ. जोखा अल्हार्थी या ओमान देशातील लेखिकेच्या साहित्याकडे आवर्जून वळायला हवे.

ओमानची राजधानी मस्कतमधील सुलतान काबुस विद्यापीठात डॉ. जोखा अल्हार्थी प्राध्यापक आहेत. डॉ. अल्हार्थी यांनी अभिजात अरब साहित्यात एडिन्गबर्ग विद्यापीठातून पीएच.डी. केली आहे. त्यांचे आजोबा, वडील व काका असे तिघेही विख्यात ओमानी कवी होते/आहेत. डॉ. अल्हार्थी यांच्या ‘सेलेस्टिअल बॉडीज्’ या इंग्रजीत अनुवादित कादंबरीस २०१९ सालच्या ‘नॉन-फिक्शन’ गटातील ‘मॅन बुकर इंटरनॅशनल’ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्या अरब राष्ट्रामधल्या पहिल्या अशा व्यक्ती व पहिल्या महिला साहित्यकार आहेत, ज्यांना हा जागतिक पातळीवरचा सन्मान मिळालेला आहे. ‘सईदत अल्-कमार’ या मूळ ओमानी भाषेतील कादंबरीचा मेरिलिन बूथ यांनी ‘सेलेस्टिअल बॉडीज्’ या नावाने इंग्रजी अनुवाद केला आहे. ‘सईदत अल्-कमार’ याचा अर्थ होतो- चंद्राच्या स्त्रिया!

असे म्हटले जाते की, चित्रपट व साहित्य हे समाजाचा आरसा असतात. समाजात होणाऱ्या स्थित्यंतराचा या दोन्हींवरील जबरदस्त प्रभाव वेळोवेळी पाहायला मिळतो. डॉ. अल्हार्थी यांचा जन्म सत्तरच्या दशकातला. हा तोच काळ आहे, जेव्हा जागतिकीकरणाचे वारे जोरात वाहू लागले होते आणि त्याच्या धक्क्यांपासून ओमानचीही सुटका नव्हती. याच काळात बहुतेक गावांमध्ये वीज पोहोचू लागली होती, पाठोपाठ टीव्हीसुद्धा आला होता- पण तो एका ठरावीक वर्गापर्यंतच. याच दरम्यान ओमानमध्ये एक अतिशय महत्त्वाचा कायदा पारित झाला; तो म्हणजे, कायद्याने गुलामगिरी नष्ट करण्याचा. साल होते साधारण १९७२-७३. हा कायदा ओमानी स्त्रियांच्या रोजच्या जगण्यावर मूलगामी परिणाम करणारा ठरणार होता. त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणारा होता. मग या घडामोडींचा साहित्यावर प्रभाव पडला नसता तरच नवल. तसा तो डॉ. अल्हार्थी यांच्या ‘सेलेस्टिअल बॉडीज्’वरही दिसतो.

‘सेलेस्टिअल बॉडीज्’ ही कथा आहे एका ओमानी शेख व्यापारी घराण्याची, त्यांच्या तीन पिढय़ांतील स्त्रियाची. सलिमा ही एक सर्वसामान्य गृहिणी आहे. तिच्या तीन मुली- माया, अस्मा आणि खावला. मायाचे लग्न अल्-अवाफी या गावातील एक बडा व्यापारी अल्-सुलेमान याचा मुलगा अब्दुल्लाहशी होते. अब्दुल्लाह हे पात्र मनात मोठी घालमेल, घुसमट दबलेली असलेले आहे. लहानपणापासून वडील सुलेमान यांचा वाटणारा धाक व आजूबाजूला घडणाऱ्या वेदनादायी घटनांमुळे अब्दुल्लाह स्वत:ला फारच असुरक्षित समजत असतो. त्याच्या मनाची होणारी उलघाल ही आपल्याही मनात अक्षरश: घर करते. अब्दुल्लाहच्या बायकोचे- म्हणजे मायाचे त्याच्यावर मनापासून प्रेम नसते; कारण तिला दुसऱ्या कोणाशी लग्न करायचे होते. अब्दुल्लाह हा मनात नेहमी कुढत असतो, की मायाच्या चेहऱ्यावर आपल्या लग्नात साधे हास्यसुद्धा नव्हते. ही माया घरात नेहमीच गप्प गप्प असते. कुणाशी बोलावे लागू नये म्हणून ती दिवसातला बराच काळ झोपत असे. अब्दुल्लाह मायाला नेहमी विचारत असे की, ‘तुझे माझ्यावर प्रेम आहे ना, तुला मी आवडतो ना?’ यावर मायाचे काहीच उत्तर नसे. अब्दुल्लाहचे वडील सुलेमान यांच्या घरात एक आफ्रिकी वंशाची झरिफा नावाची गुलाम स्त्री आहे. आई नसलेल्या अब्दुल्लाहला याच झरिफाने वाढवलेले असते. झरिफाचे सुलतानसोबत संबंधही असतात. तिने एकदा अब्दुल्लाहला जिवे मारण्याचा प्रयत्नही केलेला असतो.

पुढे सुलेमान आजाराने खंगून खंगून मरतो. सुलेमानच्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू होतो. झरिफाचा मुलगा झायद हा पुरात वाहून जातो. या कुटुंबातील अन्यही काही याच काळात मृत्यूच्या जबडय़ात जातात. अशा या दु:खद वातावरणाच्या पार्श्वभूमीवर झरिफा अब्दुल्लाहला वाढवत असते. या घटनांचा त्याच्यावर जबरदस्त आघात होत असतो. अब्दुल्लाहची स्वगते वाचताना वाचक म्हणून आपलेही मन कारुण्याने भरून आल्याशिवाय राहत नाही. या पात्रांविषयीचा भाव आपल्या मनात असा काही उतरतो, की आपण अनुवाद वाचत आहोत हे जाणवतच नाही. हे अर्थात अनुवादिका म्हणून मेरिलिन बूथ यांचे यशच म्हणावे लागेल. अब्दुल्लाह हे पात्र प्रथम-पुरुषी निवेदन करते, तर इतर स्त्री पात्रे तृतीय-पुरुषी निवेदन करतात.

सलिमाची दुसरी मुलगी अस्मा ही खालीद या स्वत:मध्येच मग्न असणाऱ्या चित्रकारासोबत लग्न करते. खालीदने स्वत:ची अशी एक कक्षा ठरवून घेतलेली आहे व त्यातच तो अडकलेला आहे. माया व अस्मा यांची धाकटी बहीण असलेली खावला ही शिकलेली असते. या तिघींचे वडील अझान हे जेव्हा खावलाचे लग्न तिला पसंत नसलेल्या मुलाशी तिच्या इच्छेविरुद्ध लावण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मात्र खावला बंड करते. माया व अस्मा यांना मात्र असे बंड करणे जमत नाही. माया आणि अब्दुल्लाह यांना पहिली मुलगी होते तेव्हा माया तिचे नाव ‘लंडन’ ठेवण्याचा निर्धार करते. माया केवळ आपल्या मुलीचे नाव ‘लंडन’ ठेवून थांबत नाही, तर त्या लहान मुलीला ती पाश्चिमात्य प्रकारचे फ्रॉक शिवते, आधुनिक बूट घालते. हे करणे म्हणजेच बंड, अशी तिची समज होती. मायाला लहानपणापासून शिलाईकाम उत्तम जमत असते. तिच्याकडे एक शिलाई यंत्र असते. कपडय़ांवरील भरतकामही तिला छान जमत असते. या अशा वागण्याचा दोन्हीकडच्या घरांमध्ये व्हायचा तो परिणाम होतोच. मुलीचे नाव कुणी कधी ‘लंडन’ असे ठेवता का; मुलीला काय ख्रिश्चन बनवायचे आहे का; लंडन हे तर एका शहराचे नाव आहे ना; लोक-नातेवाईक काय म्हणतील.. अशा प्रश्नांची सरबत्ती तिच्यावर होते. यावरून सत्तरच्या दशकातील स्त्रियांची स्थिती लक्षात येते. आज मात्र ओमानी स्त्रियांची परिस्थिती अशी राहिलेली नाहीये, असेही डॉ. अल्हार्थी एके ठिकाणी नमूद करतात. खावलाचे लग्न काही पुढे टिकत नाही. नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन ती मस्कतमध्ये एक ब्युटी पार्लर उघडते.

सलिमा व तिच्या तीन मुली या दोन पिढय़ा व लंडन, सलीम, मुहम्मद ही तिसरी पिढी. मुहम्मद हा नव्वदनंतरच्या काळातला. लंडन ही एक फिजिशिअन आहे आणि नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन तिने मस्कतमध्ये आपला दवाखाना सुरू केलेला आहे. १९९० नंतरच्या जागतिकीकरणाचा या नव्या पिढीवर झालेला परिणाम, तसेच गावाकडून शहरात स्थायिक झालेल्यांच्या मनाची उलघाल ही येथे फार मार्मिकपणे टिपलेली आहे. अब्दुल्लाह-मायाचा सर्वात लहान मुलगा मुहम्मद हा लहानपणापासून मस्कतमध्ये वाढलेला असतो. त्यांची मुलगी लंडनचे बालपण हे मात्र अल-अवाफी या गावात गेलेले असते. त्या काळात गावातून शहरात राहायला गेलेले लोक निवर्तल्यानंतर त्यांचे शव दफन करण्यासाठी त्यांच्या मूळ गावी आणले जात असे. या दफनविधीवरच घरात चर्चा चालू असतानाच मुहम्मद म्हणतो की, ‘‘आमचा जन्म जर इथे मस्कतमध्ये म्हणजे शहरात झाला आहे, तर मग आम्ही सुट्टय़ा घालवायला आणि सणसूद साजरा करण्यासाठी अल-अवाफीला का जावे? सुट्टय़ांचा, सणांचा आनंद आम्ही इथे का घेऊ शकत नाही? इथे आम्हाला भरधाव गाडीही चालवता येते, मग?’’ यावर उत्तर देताना लंडन म्हणते की, ‘‘एक तर पहिली गोष्ट ही की, शहरातील रस्ते हे माणसांसाठी नव्हे तर मोटारगाडय़ांची सोय व्हावी म्हणून बांधलेले आहेत. तसेच समुद्राजवळचे पेव्हर ब्लॉकचे रस्ते बांधण्यामागेही तोच हेतू आहे. दुसरे असे की, इथे मस्कतमध्ये कब्रस्तान नाहीये. जास्तीत जास्त लोक इथे मस्कतमध्ये राहतात, पण त्यांना इथे दफन न करता आपापल्या मूळ गावीच दफन केले जाते.’’

यातून गावात बालपण गेलेली, पण नंतर शहरात आलेली लंडन व पूर्णपणे शहरात वाढलेला मुहम्मद या दोघांचे जीवनाकडे पाहण्याचे दोन भिन्न दृष्टिकोन दिसून येतात. या दोघांची आजी म्हणजे सलिमाच्या काळात स्त्रियांना शिक्षण मिळणे हे एक मृगजळच वाटावे इतके ते दुरापास्त होते. या दोघांची आई मायाच्या काळात स्त्रियांना प्राथमिक शिक्षणाची किमान सोय झाली आणि लंडनच्या पिढीपर्यंत तर मोठमोठी विद्यापीठे स्थापना झाली होती. नव्वदोत्तर पिढीमध्ये आधुनिक शिक्षणामुळे बंडखोरी करण्याची धमक निर्माण होऊ लागली होती. मग ती बंडखोरी स्त्रियांच्या गुलामगिरीबाबत असेल, शिक्षण मिळवण्यासाठी असेल किंवा स्वत:बाबत स्वत: निर्णय घेण्याची मुभा मिळवण्यासाठी असेल.

‘सेलेस्टिअल बॉडीज्’ ही कादंबरी खूप साऱ्या स्त्रियांचे फसलेले लग्न, पुढे झालेले त्यांचे घटस्फोट यांची गोष्ट आहे. ही कादंबरी स्त्रियांच्या व्यभिचारावर मार्मिकपणे बोट तर ठेवतेच, तसेच पुरुषांच्या विश्वासघातकी वृत्तीवरही कोरडे ओढते. सत्तर-ऐंशीच्या दशकांत ओमानच्या ग्रामीण भागातील इस्लामी समाजव्यवस्था कशी होती, याचे एक स्पष्ट चित्र ही कादंबरी उभे करते. या कादंबरीतील काळ हा नेहमी मागे-पुढे होणारा आहे. कादंबरीत कथनाचा जो ‘फॉर्म’ निवडलेला आहे, त्यातच ती बऱ्याच अंशी यशस्वी झालेली आहे.

एखादी कादंबरी जर काही पिढय़ांचा पट उलगडत असेल, तर प्रत्येक पिढीतील बदलांची दखल घेतली गेली आहे की नाही; कादंबरीच्या मुख्य पात्रांच्या आजूबाजूच्या जगातले आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक बदलांचे संदर्भ लिखाणात उतरले आहेत की नाहीत; त्याचा वाचकांच्या मनावर काही परिणाम होतो आहे की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. ‘सेलेस्टिअल बॉडीज्’ ही या निकषांवर खरी उतरते. ‘सेलेस्टिअल बॉडीज्’मध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टींपासून तर स्त्री-पुरुष परिधान करत असलेल्या कपडालत्त्यांपर्यंतचे उल्लेख जागोजागी वाचायला मिळतात. या विविध गोष्टींची नोंद घेणे हा तत्कालीन समाजातील बदलांचा येणाऱ्या पिढय़ांसमोर ठेवलेला आरसाच असतो. उदाहरण द्यायचेच झाले, तर ‘सेलेस्टिअल बॉडीज्’मध्ये ओमानी लोकांच्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी जेवणात असणारा खजुराचा समावेश. खजूर हा ओमानी खाद्यसंस्कृतीचा इतका अविभाज्य भाग आहे, की एखादे बाळ जन्माला आल्यास त्याला पहिला खजूर चाटवला जात असे (जसे आपल्याकडे मधाचे बोट चाटवले जाते!). तर.. खजूर व इतर पिकांच्या शेतीसाठी जी ‘फलाज’ नावाची सिंचन व्यवस्था त्या देशात उभारली गेली आहे, त्याचीही नोंद कादंबरीत येते. सत्तर ते नव्वदच्या दशकांत स्त्रियांच्या जीवनमानात झालेले बदल लेखिका डॉ. जोखा अल्हार्थी यांनी उत्तम हेरले आहेत.

ajjukul007@gmail.com