आगामी काळात जैवविविधतेकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज आहे. तिचा शाश्वत वापर आणि पारंपरिक ज्ञानाची जपणूक करणाऱ्या समुदायाला आíथक फायदा मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांचा ऊहापोह..

निसर्गाने भरभरून दान दिलेला आणि पश्चिम घाटाचा भाग असणाऱ्या केरळमधील एका जंगलात काही संशोधक अभ्यास करण्यासाठी गेले असताना खूप वेळ चालल्यानंतर त्यांना थकवा जाणवतो. मात्र त्यांच्यासोबत असणाऱ्या ‘काणी’ या आदिवासी जमातीचे लोक मात्र थकलेले दिसून येत नव्हते. ते अतिशय उत्साही, न थकलेले वाटत होते. ही बाब संशोधकांमधील पुष्पगंधन यांनी नेमकी हेरली. काणी लोक एवढे चालूनही टवटवीत का दिसत आहेत, याचे कारण त्यांनी या लोकांना विचारले असता त्यांनी ‘जिवणी’ नावाच्या वनस्पतीकडे बोट दाखवले. संशोधकांनी या वनस्पतीला लागलेली काळ्या रंगाची फळे काणी लोकांकडून मिळवून खाल्ली आणि काय आश्चर्य. त्यांनाही क्षणात उत्साही आणि चालून आलेला थकवा क्षणात नाहीसा झाल्यासारखे वाटले. त्यानंतर या संशोधकांनी ८ वष्रे यावर अभ्यास करून याला अधिक शक्तिवर्धक केले. औषधाच्या निर्मितीमध्ये आदिवासींचे योगदान असल्याने त्यांच्या विकासासाठी ५० टक्के रॉयल्टी देण्याचे हे औषध आंतरराष्ट्रीय बाजारात आणणाऱ्या आर्य विद्या फार्मसी लि.ने मान्य केले. आíथक मदत मिळाल्यामुळे काणी लोकांच्या आयुष्यात सध्या आमूलाग्र बदल झाल्याचे दिसून येते.

या आणि अशा अनेक प्रकरणांचा अभ्यास भारतीय वनसेवेतून निवृत्त झालेल्या शिवेंदू श्रीवास्तव यांनी करून ‘कमíशयल युज ऑफ बायोडायव्हर्सटिी’ या पुस्तकात केला आहे. जैवविविधतेचा वापर आणि त्याचे संवर्धन करण्यावर बिगर-सरकारी संस्था (एनजीओ) मोठय़ा प्रमाणावर काम करीत असल्याचे त्यांना १९९० मध्ये आढळून आल्यानंतर त्यांचे जैवविविधतेकडे खऱ्या अर्थाने लक्ष वेधले गेले. त्यांनी या पुस्तकाच्या निर्मितीसाठी सलग आठ वष्रे लिखाण केले. जैवविविधतेचा वाढता आíथक वापर कसा होईल, यासाठी त्यांनी या पुस्तकात माहिती दिली आहे. जैवविविधतेचे भविष्यात संवर्धन होणे आणि वाढता आíथक वापर होणे ही काळाची गरज आहे. यासाठी कोणकोणते उपाय करता येतील, याचा ऊहापोह यात केला आहे.

नऊ प्रकरणांमध्ये विभागलेल्या या पुस्तकात मुख्यत्वे जैवविविधता आणि त्याचा व्यावसायिक वापर, जैवविविधतेतून मिळणाऱ्या वस्तूंची सद्य:स्थिती आणि येणारी आव्हाने, बौद्धिक मालमत्ता अधिकारांमध्ये पारंपरिक ज्ञानाचे संवर्धन, जागतिक स्तरावर याबाबत नवीन माहिती मिळविणे आणि त्याचा लाभ मिळवून देणे याची चर्चा करण्यात आली आहे. जैवविविधतेकडे येणाऱ्या काळात एक व्यवसाय म्हणून पाहणे आवश्यक आहे. तो करण्यासाठी जैवतंत्रज्ञान, मार्केटिंग (पणन), स्थानिक परंपरा, स्थानिक कायदा, व्यवस्थापन कला यांचा वापर, असे अनेक पर्याय त्यांनी सुचवले आहेत.

जैवविविधतेचा सर्वाधिक वापर सध्या औषधनिर्माण क्षेत्र करीत असून पेनिसिलिन, क्विनिन, अ‍ॅट्रोपाइन, मेन्थॉल, टॅक्सोल, मॉरफिन, सॅलिसिन, बॉरनियोल, डिजिटॅलिन आणि इतर महत्त्वाच्या १२० पेक्षा अधिक औषधांची निर्मिती नसíगक साधनांचा आधार घेत तयार करण्यात येत आहे. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दोन दशकांत मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असणाऱ्या जैवविविधतेकडे जगाचे लक्ष वेधले गेले. त्यामुळेच पारंपरिक ज्ञानाचे जतन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बौद्धिक मालमत्ता अधिकाराची (इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स-आयपीआर) निर्मिती करावी लागली. सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये ट्रिप्स करार (व्यापारसंबंधित बौद्धिक मालमत्ता अधिकार) आणि जैवविविधता परिषद (सीबीडी) यामुळे जैवविविधता ही कशी राष्ट्रीय संपत्ती आहे आणि तिचे संवर्धन कसे केले गेले हे सांगण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. या कायद्यांच्या निर्मितीमुळे ट्रेडमार्क, कॉपीराइट, पेटंट, औद्योगिक डिझाइन आणि काही व्यापारातील माहिती गोपनीय राहण्यास मदत होते आहे.

भारत आणि भारतासारख्या प्राचीन संस्कृती असणाऱ्या जगभरातील देशांमध्ये पारंपरिक ज्ञान जतन करण्यासाठी प्रत्येक देशाचे काही वेगळे नियम आहेत. मात्र तरीही अनेक ठिकाणी बौद्धिक मालमत्तेची चोरी होताना दिसते. भारतात २००२ साली नवा पेटंट कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे जैवविविधतेचे असणारे पारंपरिक ज्ञान भारतातच राहण्यास सुरुवात झाली. १९९७-९८ ते २००५-०६ पर्यंत औषध क्षेत्रात प्रत्येक वर्षांला पेटंट विभागाकडून वर्षांला ५०० पेटंट्स दिली जात असत. मात्र नंतर झालेल्या जागृतीमुळे २००६-०७ ते २००९-१० पासून पेटंट घेण्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून पेटंट विभागाकडून प्रत्येक वर्षांला ५३० ते १२०७ पेटंट्स देण्यात येत आहेत. येणाऱ्या काळात यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होऊ शकेल, असा अंदाज लेखकाने व्यक्त केला आहे.

भारतासारख्या अनेक उष्णकटिबंधीय देशांतील ८० टक्के लोकसंख्या त्यांच्या आरोग्य उपचार, पोषक आहार आणि उत्पन्नासाठी जैवविविधतेवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक देशाकडून जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पारंपरिक ज्ञानाबाबत स्थानिक, आदिवासी लोकांनी केलेल्या नोंदी जतन करण्याचे काम सुरू आहे. तसेच पारंपरिक ज्ञानाची डिजिटल लायब्ररी तयार करण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत ३० दशलक्ष पाने भरतील इतक्या पारंपरिक ज्ञानाची माहिती जतन करण्यात आली आहे.

भविष्यात जैवविविधतेच्या आíथक वापरासाठी प्रयत्न, जैवविविधतेवर जनुकीय पातळीवर संशोधन आणि त्याचे संवर्धन करावे लागणार आहे. तसेच पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करत जैवविविधता जतन करणाऱ्या आदिवासींनाही त्याचा फायदा मिळायला हवा.

  • कमíशयल युज ऑफ बायोडायव्हर्सटिी
  • लेखक – शिवेंदू श्रीवास्तव
  • प्रकाशक – सेज पब्लिकेशन
  • पृष्ठे – ३२०, किंमत – ९९५ रुपये

 

चंद्रकांत दडस

chandrakant.dadas@expressindia.com