21 September 2020

News Flash

मानव्यशास्त्रातला महाराष्ट्र : ओव्यांचे आत्मभान, भूगोलाचे धर्म-भान

नद्यांभोवती निर्माण झालेल्या कहाण्या, नद्यांनी जोडलेल्या भूगोलाला एकसंधता प्रदान करतात

‘कनेक्टेड प्लेसेस ,से टू द सन

महाराष्ट्राबाहेर सुरू असलेल्या महाराष्ट्र-अभ्यासाचा आढावा घेणाऱ्या मालिकेतील या महिन्याच्या मानकरी आहेत- अ‍ॅन फेल्डहाऊस या लेखात आपण ज्यांच्या दोन पुस्तकांची ओळख करून घेणार आहोत, त्या प्रख्यात विदुषी अ‍ॅन फेल्डहाऊस यांची महाराष्ट्राविषयीची उत्कट आत्मीयता तर उल्लेखनीय आहेच, पण त्यांचा मराठी भाषेचा आणि महाराष्ट्रातल्या भाषिक आणि धार्मिक संस्कृतींचा अभ्यास प्रगाढ असून सामाजिक शास्त्रांमधल्या विविध पद्धतीशास्त्रांचा अवलंब करून केलेलं बहुविध आणि सखोल संशोधन अतिशय मार्मिक आहे. भारतात १९७० साली त्या पहिल्यांदा आल्या तेव्हा त्यांनी महाराष्ट्राचं नावसुद्धा ऐकलेलं नव्हतं आणि आज भारतीय ‘भक्ती’चे प्रख्यात इंग्रजी भाष्यकार जॉन हॉली यांच्या मते, फेल्डहाऊस या भारताबाहेर जन्मलेल्या सर्व अभ्यासकांपैकी सवरेत्कृष्ट महाराष्ट्रविद्यातज्ज्ञ आहेत (यात निश्चितच अतिशयोक्ती नाही). हा त्यांचा वैचारिक प्रवास थक्क करणारा आहे.

प्राचीन महानुभाव वाङ्मयाचं संशोधन, त्यातल्या सूत्रपाठाचा इंग्रजी अनुवाद; महानुभावांचं एक तीर्थस्थान असणाऱ्या रिद्धीपूरच्या स्थळमाहात्म्याविषयी एक ग्रंथ; प्राचीन मराठी वाङ्मयाचे मोठे अभ्यासक शंकर गोपाळ तुळपुळे यांच्या सोबतीने प्राचीन मराठी भाषेच्या शब्दकोशाचे संपादन; रा. चिं. ढेऱ्यांच्या ‘विठ्ठल : एक महासमन्वय’ या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद; मराठी साहित्यिक आणि धार्मिक रचनांत उमटलेल्या महाराष्ट्रीय स्त्रीच्या विविध रूपांची चर्चा करणारं संपादित पुस्तक; महाराष्ट्रीय सामाजिक जीवनातलं घर या संस्थेचं स्थान या विषयावरचं एक संपादित पुस्तक; ‘वॉटर अ‍ॅण्ड वूमनहूड’ नावाचं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूगोलाचं मराठी स्त्रियांशी असलेल्या नात्याची चिकित्सा करणारं पुस्तक (या पुस्तकाचा उत्तम मराठी अनुवाद ‘नद्या आणि स्त्रीत्व’ या नावानं पद्मगंधा प्रकाशनानं हल्लीच प्रसिद्ध केलाय. हे पुस्तक मराठीत उपलब्ध असल्यामुळेच त्याची चर्चा या लेखात नाही.) शिवाय गुंथर सोन्थायमर या मराठी लोकसाहित्याच्या जर्मन अभ्यासकासोबत मराठी मौखिक वाङ्मयाचा अभ्यास आणि त्यांचं संकलन आणि संपादन अशी चाळीस वर्षांची दीर्घ आणि प्रेरणादायी अशी फेल्डहाऊस यांची विद्यापीठीय कारकीर्द आहे.

फेल्डहाऊस अमेरिकन विद्यापीठांत ज्याला धार्मिक अभ्यास विभाग म्हटलं जातं त्या विषयाच्या तज्ज्ञ आहेत आणि वर दिलेल्या अभ्यासविषयांच्या जंत्रीतून त्यांच्या अभ्यासाचं नेमकं केंद्र म्हणायचं तर ते म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक भूगोल आणि मराठी लोकसाहित्य. आपण आजच्या लेखात त्यांच्या ज्या दोन पुस्तकांची चर्चा करणार आहोत, त्यातलं एक पुस्तक धार्मिक आणि सांस्कृतिक भूगोलाविषयी आहे आणि दुसरं आहे, महाराष्ट्राचे थोर जर्मन भाषिक अभ्यासक आणि डी. डी. कोसंबींचे शिष्य गुंथर सोन्थायमर यांच्या संग्रहातल्या धनगरांच्या मराठी मौखिक साहित्याविषयीचं पुस्तक.

महाराष्ट्राचा धार्मिक, सांस्कृतिक भूगोल

महाराष्ट्र (किंवा उदाहरणार्थ तमिळनाडू किंवा कर्नाटक) या संज्ञेत अनुस्यूत असणारा भूगोल निव्वळ भौतिक नसून त्यातल्या दगडांना, पर्वतांना, नद्यांना, धार्मिक स्थळांना अनेकपदरी-तरीही दीर्घ इतिहासात तुलनेने स्थिर झालेले सांस्कृतिक अर्थ प्राप्त झालेले असतात. या सांस्कृतिक भूगोलाचा त्याच्या अनेक वैशिष्टय़ांच्या संदर्भातला हा अभ्यास आहे.

फेल्डहाऊस यांच्या विवेचनाच्या केंद्रस्थानी असणारा प्रश्न आहे : महाराष्ट्र म्हणजे काय? आणि त्याचं उत्तर त्यांना निरनिराळ्या प्रकारच्या जोडण्यांमध्ये सापडतं. देवता, नद्या, पर्वत, मंदिरं आणि लोक असे सगळे एकमेकांशी दीर्घकालीन ऐतिहासिक प्रक्रियेत घडलेल्या भाषिक, सांस्कृतिक आणि धार्मिक व्यवस्थांनी जोडलेले त्यांना आढळतात. या परस्परसंबंधांनी व्यापलेला भूगोलाचा दीर्घ परीघ या अर्थी त्या महाराष्ट्र देशाचा विचार करतात. धार्मिक जत्रा, तीर्थयात्रा, कर्मकांडं यांच्या द्वारे हे परस्परसंबंध पुन:पुन्हा नवनिर्मित होत राहतात. मात्र फेल्डहाऊस यांना अभिप्रेत असणारी ही धार्मिकता एकपदरी पद्धतीने बांधली गेलेली नसून ती निसर्ग, मानव आणि ईश्वर यांच्या अतिशय प्रवाही असणाऱ्या नातेसंबंधांत पुनरुज्जीवित होत राहते. महाराष्ट्रातील लोकसमूह आपल्या परिसराचा, भूगोलाचा काय अर्थ लावतात आणि हा अर्थ लोकमानसात कशाप्रकारे अभिव्यक्त होतो हा ‘कनेक्टेड प्लेसेस’चा मुख्य विषय. हे पुस्तक सहा प्रकरणांत विभागलेलं आहे. नद्यांची परिक्रमा, महानुभावीय पवित्र स्थळांची यात्रा, शनिशिंगणापूरची जत्रा, शैव मंदिरं, ठिकठिकाणची बौद्ध लेणी अशा धार्मिकतेच्या निरनिराळ्या आविष्कारांमधून महाराष्ट्राच्या धार्मिक भूगोलाच्या व्यापक जोडणीचा विचार या पुस्तकात केला गेलाय.

त्यांच्या विवेचनात या जोडणीचा मुख्य घटक आहे नदी. नद्यांभोवती निर्माण झालेल्या कहाण्या, नद्यांनी जोडलेल्या भूगोलाला एकसंधता प्रदान करतात. महाराष्ट्रातील गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी अशा अनेक नद्यांच्या महात्म्याविषयीच्या पोथ्यांचा अभ्यास करून, नदीपरिक्रमा करणाऱ्या लोकांच्या मुलाखती घेऊन, नदीसंदर्भात केल्या जाणाऱ्या विविध कर्मकांडाचं परिशीलन करून आणि तीर्थयात्रा, पालख्या यांच्या उत्सवात निरीक्षक म्हणून भाग घेऊन फेल्डहाऊस यांनी हा अभ्यास सिद्ध केला आहे. त्यांचा अभ्यास अनेकानेक पद्धतींना सामावून घेऊन आपल्या विषयाला अतिशय सर्जक पद्धतीने मांडतो. ‘विशिष्टता आणि अर्थगर्भितता यांनी स्थान (प्लेस) निश्चित होतं तर व्यापकता आणि अमूर्तता ही अवकाशाची (स्पेस) वैशिष्टय़ं असतात’ हे सांगून फेल्डहाऊस देश या स्थानाची अवकाशापासून तसंच इतर स्थानांपासून अनन्यता दाखवून देतात. कोकण आणि देश यांची परस्परावलंबी भौगोलिकता महाराष्ट्राला एकसंधता देते आणि नर्मदा आणि विंध्यरांगांमुळे महाराष्ट्र उत्तरेपासून निराळा होतो, मात्र दक्षिणेकडे अशा कुठल्याही नैसर्गिक सीमा नसल्यामुळे, महाराष्ट्राचा दक्षिणेशी एक खोलवरचा अनुबंध आहे असं निरीक्षणही त्या नोंदवतात. महाराष्ट्र हे भौगोलिक स्थान अशा रीतीनं अनन्यसाधारण बनतं पण त्याचा सांस्कृतिक आशय त्यातल्या निरनिराळ्या लोकसमूहांना एक सुस्थापित आणि ऐतिहासिक प्रक्रियेत साकार झालेली महाराष्ट्रीयत्वाची ओळख देतो. अगस्ती मुनी (ज्यांना तमिळ भूगोलात महाराष्ट्रापेक्षाही महत्त्वाचं स्थान आहे), परशुराम (कोकण किनारपट्टीपासून केरळपर्यंतच्या स्थानिक भौगोलिक श्रद्धा यांच्याशी निगडित आहेत) आणि राम (महाराष्ट्राची दंडकारण्य अशी स्थानिक मानसात ओळख निर्माण होण्याचं कारण) अशा मिथकांची चर्चा करून फेल्डहाऊस दाखवून देतात की, महाराष्ट्रीयत्वाचा सांस्कृतिक आशय जसा भाषिक आहे तसाच मिथकं, धार्मिक कहाण्या, भौगोलिक स्थानांविषयीच्या श्रद्धा अशा अनेक घटकांनी व्यापलेला आहे. या भारतव्यापी ओळख असणाऱ्या मिथकीय दैवतांसोबतच, त्या यमाई, तुकाई, येडाई अशा ‘शक्ती’च्या स्थानिक आविष्कारांचीही चर्चा करतात. या स्त्री दैवतांच्या देवळांच्या भिन्न मार्गाचा अभ्यास करून त्या देवतांमधल्या भगिनीभावाच्या शक्यतांचा फेल्डहाऊस शोध घेतात. खेरीज, महानुभाव परंपरेतल्या सिद्धचरित्रांचा महाराष्ट्रीय भूगोलाशी असलेल्या अस्सल आणि जैविक संबंधांची चर्चा करून, नंतरच्या महानुभावी पिढय़ांनी तीर्थयात्रांद्वारे महाराष्ट्रीय भूगोलाची मर्यादा कशी ओलांडली हेही फेल्डहाऊस सांगतात. या धार्मिक भूगोलाद्वारे जशा महाराष्ट्रात सांस्कृतिक जोडण्या सिद्ध होतात, त्याच वेळी महाराष्ट्राचा इतर भूगोलांशी असणारा विरोध किंवा फरकही अधोरेखित होत असतो. विशेषत: महाराष्ट्राची उत्तर भारतापासूनची भिन्नता फेल्डहाऊस अतिशय तपशिलांत दाखवून देतात. शेवटी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये या सांस्कृतिक भूगोलाच्या संकल्पना कशा केंद्रस्थानी होत्या ते दाखवून, फेल्डहाऊस महाराष्ट्रीय असण्याच्या बहुविध आणि सर्वसमावेशक आशयाकडे आपलं लक्ष वेधतात.

धनगरी मौखिक वाङ्मय

फेल्डहाऊस यांनी संपादित केलेलं दुसरं पुस्तक हे गुंथर सोन्थायमर या महाराष्ट्रावर विलक्षण प्रेम करणाऱ्या मानववंशशास्त्रीय अभ्यासकानं रामदास अटकर आणि राजाराम झगडे या दोन सहकाऱ्यांच्या साथीनं ध्वनिमुद्रित केलेल्या हाटकरी धनगरांच्या बिरोबा आणि धुळोबा या मुख्य दैवतांविषयीच्या ओव्यांचा संग्रह आहे. सोन्थायमर यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर फेल्डहाऊस यांनी फार कष्टानं या ठेव्याचं जतन केलं. या ओव्यांचा मराठी संग्रह श्रीविद्या प्रकाशनने २००६ साली प्रसिद्ध केला; पण इंग्रजी पुस्तकाला असणारी फेल्डहाऊस यांची विस्तृत आणि चिकित्सक प्रस्तावना मात्र मराठी आवृत्तीत नाही त्यामुळे या प्रस्तावनेचा विचार इथे करू.

यातली बिरोबा या देवाविषयीची पहिली दीर्घ ओवी सांगली जिल्ह्य़ातल्या आटपाडी तालुक्यातल्या निम्बवडे गावाच्या चार जणांनी मिळून गायलीये. त्यांनी ही संपूर्ण ओवी सलग चार रात्रींमध्ये गायली. तर दुसरी धुळोबा या दैवताविषयीची दीर्घ ओवी ही दाजी रामा पोकळे या साताऱ्यातल्या ताडगाव इथल्या बिरोबाच्या अंध पुजाऱ्यांनी एकटय़ानेच गायली आहे. (या ओव्यांचे रचयिता कोण असं विचारलं असता, पोकळे म्हणायचे, धुळोबानंच या ओव्या रचल्या आणि तोच माझ्या शरीरातून व्यक्त होतो. या ओव्या ध्वनिमुद्रित करत असतानादेखील काहीवेळा धुळोबा अंगात आला असं पोकळे म्हणायचे. पोकळे यांचं २००० साली निधन झालं.)

साधारणपणे या ओव्या धनगरवाडय़ात रात्रीची कामं आटपून गायल्या जातात. मंडळी म्हणतात, सूर्याला सांगा उगवू नकोस आणि चंद्रा तू मावळू नकोस कारण आम्हाला ही गोष्ट ऐकतच राहावीशी वाटते. मराठीतले विख्यात कवी आणि समीक्षक दि पु चित्रे ‘भाषा हा माणसाच्या अंगातला प्रकाश आहे’ असं म्हणाले होते; धनगरी ओव्यांच्या समूहाविष्काराचा हा प्रकाश निश्चितच त्यांच्या रात्री उजळून काढत असावा.

वसाहतिक काळात मुद्रणाचा व्यापक प्रसार होऊन, छापील लिखाणाचं वाचन खासगी स्वरूपाचं बनलं. खुर्चीत बसून मनातल्या मनात वाचन करणारा वाचक ही स्थिती मुद्रणसंस्कृतीच्या पूर्वी नव्हती. त्यामुळे समूहात प्रचलित असणाऱ्या कहाण्या मुख्यत: मौखिक आविष्कारांतून व्यक्त होत. जात्यावरच्या ओव्या असोत, भक्ती परंपरेतला अभंग असो किंवा गोंधळ अथवा भारुड असो, ही सामूहिक अभिव्यक्तीची माध्यमं असत. विशेषत: इथल्या विवेचनाच्या केंद्रस्थानी असणारं ओवी हे वैयक्तिक आणि सामूहिक निवेदनाचं माध्यम निरनिराळ्या संदर्भात कार्यरत असलेलं दिसतं. उदाहरणार्थ, हेमा राईरकर आणि गी पोत्व्हँ यांनी संपादित केलेलं डॉ. आंबेडकरांच्या आठवणींचे आत्मभान हे सुगावा प्रकाशनाचं पुस्तक या संदर्भात पाहण्यासारखं आहे. यात त्यांनी आंबेडकरी चळवळीशी बांधिलकी असणाऱ्या स्त्रियांच्या जात्यावरच्या ओव्यांचं संकलन करून सामूहिक स्मृती आणि अस्मिता या अशिक्षित स्त्रियांच्या जीवनातदेखील या ओव्यांतून आत्मभानाची ज्योत कशी उजळतात याचं उत्तम विवेचन केलेलं आहे. धनगर पुरुषांनी रात्र-रात्र जागवून गायलेल्या ओव्या आणि आंबेडकरी स्त्रियांनी जात्यावर दळताना बाबासाहेबांच्या आठवणीतून गुणगुणलेल्या ओव्यांचा आशय निराळा असला तरीही ओवी या माध्यमाचा सामूहिक एकत्व व्यक्त करायला उपयोग केला जातो हे इथे अधोरेखित होतं.

या ओव्या जरी बिरोबा आणि धुळोबा या धनगरांच्या पुरुष दैवतांविषयी असल्या तरी त्यात कुठल्याही पुरुषाच्या संपर्काशिवाय निव्वळ शंकराच्या आशीर्वादानं बिरोबाला जन्म देणारी त्याची आई सुरावंती किंवा त्याची बायको कमाबाई अशी अनेक स्त्री पात्रं आहेत; किंबहुना सगळी कथाच धनगरी वाडे, त्यातली कौटुंबिकता, परस्पर स्नेह आणि पराक्रम अशा धाग्यांनी विणलेली आहे. अद्भुत आणि भौतिक यांचं अत्यंत मानवी आणि रम्य असं मिश्रण या कथांतून घडतं. या ओवी संग्रहाला फेल्डहाऊस यांनी लिहिलेली विस्तृत प्रस्तावना एकूण मौखिक संस्कृतींविषयी महत्त्वपूर्ण भाष्य करणारी आहे. एकूण पाच प्रकरणांत विभागलेली ही दीर्घ प्रस्तावना एक स्वतंत्र प्रबंधच आहे. त्यांच्या मते, धनगरांचं विचारविश्व प्रकट करतानाच, या ओव्या लोकमानस, समूहाची संरचना, मूल्यव्यवस्था, भौतिक संस्कृती आणि धनगरांच्या संदर्भातली मानवी अनुभवाची खोली व्यक्त करतात. खेरीज, या ओव्या गायकाला अभिप्रेत असणाऱ्या आशयापेक्षा नेहमीच काहीतरी अधिक व्यक्त करतात हे फेल्डहाऊस यांचं निरीक्षणदेखील अतिशय मार्मिक आहे. ओव्यांतून या भटक्या पशुपालक समूहातील स्त्री-पुरुष संबंध आणि माणूस आणि ईश्वर यांच्या संबंधांवरही प्रकाश पडतो. फेल्डहाऊस महाराष्ट्राच्या आणि एकूण दख्खनच्या पर्यावरणाचा आणि कोरडवाहू जमिनीचा विचार करताना, धनगरी पशुपालक समूहांना मराठी लोकसंस्कृतीच्या केंद्रस्थानी कल्पून, या मौखिक संस्कृतींनी यादव राजवटीपासून महाराष्ट्राला एकसंधता दिली अशी मांडणी करतात.

या मौखिक माध्यमांच्या विश्लेषणातून फेल्डहाऊस महाराष्ट्राच्या नेणीवेवर भाष्य करतात. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दीर्घ कालखंडातल्या अंतर्गत जोडण्यांचा बहुजनांची धार्मिकता, मौखिक वाङ्मय, सांस्कृतिक भूगोल, लिंगभाव (जेण्डर) आणि समूहाचं आत्मभान अशा अनेकानेक संकल्पनांद्वारे सूक्ष्म वेध घेणारं हे लिखाण महाराष्ट्रानं आवर्जून वाचायला हवं. ही दोन्ही पुस्तकं लवकरच भारतीय आवृत्त्यांत उपलब्ध होतील अशी आशा करू या.

‘कनेक्टेड प्लेसेस : रिलिजन, पिलग्रिमेज अ‍ॅण्ड जिओग्राफिकल इमॅजिनेशन इन इंडिया.

लेखिका : अ‍ॅन फेल्डहाऊस

प्रकाशक : पाल्ग्रेव्ह, मॅकमिलन, न्यूयॉर्क

पृष्ठे : ३२२

‘से टू द सन, ‘डोंट राइज’ अ‍ॅण्ड टू द मून, ‘डोंट सेट’: टू ओरल नॅरेटिव्हज फ्रॉम द कंट्रीसाइड ऑफ महाराष्ट्र’

लेखिका : अ‍ॅन फेल्डहाऊस

प्रकाशक : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस.

पृष्ठे : ६३२

राहुल सरवटे rahul.sarwate@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 3:59 am

Web Title: connected places and say to the sun book review
Next Stories
1 भोपाळ रियासतीचा इतिहास
2 आम्ही हे वाचतो : रुपेरी पडद्यामागचे स्त्री-संघर्ष..
3 रशियाच्या जाळ्यात ट्रम्प कसे अडकले?
Just Now!
X