|| गिरीश कुबेर

लोकसभा निवडणुकीच्या वेळी किमान एका राज्यात भटकंती करायची, लोकांशी आणि नेत्यांशीही बोलायचं, हा रुचिर शर्मा यांचा गेल्या २५ वर्षांचा नेम. इथल्या तसंच अनिवासी भारतीय मित्रांच्या साथीने केलेल्या या भटकंतीचं वर्णन करताना शर्मा त्या-त्या काळातल्या भारताबद्दल सांगतात. वाचकाला लिखाणाशी जोडणारे तपशील पुरवतात..

सर्वप्रथम एक कबुली. रुचिर शर्मा हे माझ्या आवडत्या लेखकांपकी एक आहेत. त्यामुळे प्रस्तुत लेख हा त्यांच्या पुस्तकाचा परिचय असेल. परीक्षण नाही. वैश्विक पातळीवर वावरत असतानाही प्रामाणिकपणे स्थानिक बंध जपणारे जे कोणी मोजके भारतीय आहेत, त्यात शर्मा यांचा क्रमांक अव्वल असेल. वास्तव्यास ते अमेरिकेत असतात. न्यू यॉर्कच्या मध्यवर्ती भागात त्यांचे घर आहे. ‘मॉर्गन स्टॅन्ले’ या बडय़ा वित्त कंपनीचे आशिया खंडासाठीचे मुख्य गुंतवणूक धोरणतज्ज्ञ म्हणून ते ओळखले जातात. एका बाजूला अर्थविषयक जाणकारी आणि दुसरीकडे भारतीय राजकारणाची चूष यामुळे आर्थिक आणि राजकीय अशा दोनही आघाडय़ांवर रुचिर शर्मा उत्तम मांडणी करत असतात. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’, ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ वा लंडनचा ‘फायनान्शियल टाइम्स’ आदी नियतकालिकांतून त्यांचे स्फुट लिखाण येत असते. ते वाचणे हा आनंद असतो. ‘ब्रेकआऊट नेशन्स’, ‘राइज अँड फॉल ऑफ नेशन्स’ ही त्यांची याआधीची दोन पुस्तके. ती दोन्ही वैयक्तिक ग्रंथसंग्रहाचा महत्त्वाचा हिस्सा आहेत. या पाश्र्वभूमीवर त्यांच्या ‘डेमॉक्रसी ऑन द रोड’ या पुस्तकाबाबत उत्सुकता होती.

ती हे पुस्तक पुरेपूर पुरवते. त्याचा विषय असा : लेखक आणि त्याचे काही उच्चभ्रू मित्र, यात काही भारतीय पत्रकारही आले, गेली जवळपास तीन दशके भारतातील जवळपास प्रत्येक निवडणुकीत दिशाहीन भटकंती करतात; त्यातील ही महत्त्वाची निरीक्षणे. १९७९ साली उत्तर प्रदेशातल्या बिजनोर येथील निवडणूक प्रचारसभेपासून यास सुरुवात होते. त्या वेळी या आजोळी गावात बडे प्रस्थ बनून राहिलेले आजोबा ‘बाबूजी’ शाळकरी रुचिरला निवडणूक प्रचारसभा पाहण्यास नेतात. तेथून त्यांचे सुरू झालेले निवडणूक पर्यटन आताच्या २०१९ सालच्या निवडणुकीपर्यंत येऊन थांबते. रुचिर शर्मा यांची लिहिण्याची शैली अनौपचारिक आहे. सर्वसाधारण अनुभव असा की, वित्त क्षेत्रात बडय़ा पदांवर असलेल्या प्रत्येकाच्या बोलण्यात उगाचच जागतिक अर्थव्यवस्थेचा भार जणू आपल्यालाच वाहायचा आहे, याची चिंता असते. भारतातील काही शहाणे तर ऐकवत नाहीत. ते पाहिल्यास आंतरराष्ट्रीय वित्तीय क्षेत्रात ज्येष्ठ पदावर असूनही शर्मा आपले भारतीयपण लपवण्याचा जराही प्रयत्न करीत नाहीत. आपल्याकडे काही स्थानिक ‘निवासी अभारतीयां’सारखे वागतात. अनिवासी असूनही शर्मा यांच्या वागण्या-बोलण्यातून निवासीपण जाणवते. ते प्रामाणिक आहे.

त्यामुळे त्यांचे हे निवडणूक पर्यटन हे एका अर्थाने त्या-त्या काळातल्या निवडणुकांतल्या भारताचे वर्णन आहे. लालूप्रसाद यादव यांच्या घरी त्यांच्या गाईघोडय़ांसमवेत गोठय़ात गप्पा मारून निघालेल्या शर्मा आणि दोस्तांची उत्तर प्रदेशपर्यंतच्या रस्त्यावरील प्रवासात जी काही कंबरमोड होते, ती आपण अनेकदा अनेक ठिकाणी अनुभवलेली असते. अशा प्रकारचे लिखाण करताना अमेरिका वा पाश्चात्त्य देशवासीय ‘गरीब बिच्चारे भारतीय’ अशा थाटात लिहीत असतात. शर्मा यांच्या लिखाणात असा कोणताही अभिनिवेश नाही की भूमिका नाही. ते भारत आणि राजकारणी जसे दिसले तसे लिहितात. आजोळच्या बिजनोर या गावी निवडणूक प्रचारसभा पाहण्याच्या निमित्ताने रुचिर बऱ्याच वर्षांनी पुन्हा गेले. त्या वेळी त्यांना दिसलेलं आपलं गाव आपणही अनुभवलेलं असतं. तेच बकाल स्वरूप. उघडी गटारं. पकपकणाऱ्या कोंबडय़ा. पारापारांवर बसलेले रिकामटेकडय़ांचे जथे आणि या सगळ्यामुळे एकंदरच भरून राहिलेली निष्क्रिय उदासी. आपल्याही गावची ही किंवा अशीच काही स्थिती असते. ‘लहानपणी माझ्या गावातनं मुख्य शहरापर्यंत यायला चार तास लागायचे.. आज २१ व्या शतकातही तेवढाच वेळ लागतो’ असं शर्मा लिहितात तेव्हा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तयार झाल्यानंतरही या दोन शहरांतलं अंतर कापायला तितकाच वेळ लागतो, हे आपल्याला जाणवून जातं. साधारण आजच्या भारताची हीच स्थिती आहे. तो जितका बदलतो तितका तो पूर्वी होता तसा भासतो, हे शर्मा यांचं निरीक्षण. त्यांच्या लहानपणी आजोळी जातव्यवस्था होती. शर्मा यांचे आजोबा त्या वेळी अस्पृश्य आदींची करत होते तशाच शब्दांत आता त्याच गावातल्यांची आजची पिढी बहुजन समाज पक्षाची संभावना करते. याचं वर्णन वाचल्यावर देशात नक्की काय बदललं, हा प्रश्न आपल्यालाही पडतो आणि मग गोवंश हत्याबंदी वगरे मुद्दे टोचायला लागतात.

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल- एक महत्त्वाचं राज्य असं नाही की गेल्या तीन दशकांत रुचिर आणि मित्रांनी तेथील निवडणुकीची यात्रा केली नाही. हा त्यांचा भक्तिभाव कौतुकास्पद खरा. ही मंडळी ज्या राज्यात हिंडायचंय त्या राज्यातच एखादी तगडी मोटार भाडय़ानं घेतात आणि ते राज्य उभंआडवं कापतात. वाटेत शेतकरी, स्थानिक सरपंच किंवा अन्य कोणी वगरेंशी त्यांचा मुक्त संवाद होतो. त्यातनं होणारं राजकारणाचं आणि समाजकारणाचं दर्शन विलोभनीय आहे. दक्षिणेत अभिनेता राजकारण्यास ही मंडळी भेटायला गेली असता त्यांनी या सर्वाना आपल्या शयनगृहातच बोलावलं. हा नायक अभिनेता बिछान्यावर आडवा पडलाय आणि हे सर्व पायाशी, डोक्याशी बसून राजकारणाची चर्चा करतायत. तो संवाद मोठा रंजक आहे. मायावतींबाबतही यांचा अनुभव असाच. दलितांच्या नावे राजकारण करणाऱ्या मायावतींची राहणी ही एखाद्या सम्राज्ञीसारखी अतिश्रीमंतीची. त्यांनी जेव्हा भेटीची वेळ या सगळ्यांना दिली तेव्हा गप्पा मारल्या त्या आपल्या शयनगृहात बसूनच. भारतीय राजकारण्यांचा हा मोकळेपणा अभूतपर्व आहे, असं शर्मा यांचं निरीक्षण. त्यांचं म्हणणं असं की, या राजकारण्यांवर परिस्थितीचा, नागरिकांचा इतका दबाव असतो की त्यांना स्वत:चं असं काही आयुष्यच राहत नाही. पण निवडणुकीच्या वेळी जेवढा हा राजकारणी आरपार दिसतो तितका अन्य कधी दिसत नाही, हेही त्यातून जाणवतं.

अशा मुक्त भटकंतीत वातावरण आहे तसं दिसतं. शर्मा ते तसंच मांडतात. अटलबिहारी वाजपेयींचा इंडिया शायनिंग पराभव वा २०१४ सालच्या निवडणुकीत पराभव वातावरणात भरलेला असूनही काँग्रेसची चाललेली निर्थक पोपटपंची शर्मा दिसली तशी सांगतात. आर्थिक प्रगती आणि राजकीय पक्षांची भाग्यरेखा याबद्दलची त्यांची निरीक्षणं विचार करण्यासारखी आहेत. पण सध्याच्या वातावरणात अत्यंत वाचनीय वाटेल असा भाग म्हणजे या सगळ्या उच्चभ्रूंची नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली पहिली चर्चा.

राजकोटला एका झकास हॉटेलात या मंडळींची मोदी यांच्याशी भेट झाली. त्याआधी केशुभाई पटेल वगरेंशी या लोकांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. दिवसभर वणवण केल्यानंतर मद्यबंदी असलेल्या गुजरातेत या मंडळींना संध्याकाळी हॉटेलांत अधिकृत मार्गानं मद्य कसं सहज मिळतं वगरे तपशीलही शर्मा जाता जाता पुरवतात. त्या सगळ्या वातावरणात मोदींविषयी एक कुतूहलमिश्रित उत्सुकता होती. २००२ च्या दंगलींचा रक्तलांच्छित इतिहास त्यांना मागे सोडायचा होता. नव्यानं प्रतिमानिर्मिती सुरू होती त्यांची. त्या वातावरणात त्यांची ही भेट झाली. सुरुवातीला मोदी मोकळेढाकळे होते. गप्पांना ढोकळा, फाफडा वगरेंची चविष्ट साथ होती. पण एका टप्प्यावर या गप्पांचं वातावरण गंभीर होत गेलं. शर्मा यांच्याबरोबरच्या मंडळींनी गुजरात दंगलींचा विषय काढला आणि मोदींचा चेहरा हळूहळू कठोर होत गेला. एका टप्प्यावर ते उठले आणि निघून जायला लागले. या कंपूमधल्या काही संपादकांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला. पण मोदी थांबले नाहीत. गप्पा मारण्याच्या मिषानं तुम्ही माझा अपमान करताय, असं म्हणाले व निघून गेले.

त्यानंतर आजतागायत मोदींनी यातल्या कोणालाही भेट दिलेली नाही. नंतर अनेकदा यातल्या अनेकांनी एकत्रितपणे वा स्वतंत्रपणे मोदी यांना प्रचारसभांत गाठलं. पण मोदी भेटले नाहीत. यात आश्चर्य नाही. वृत्तवाहिन्यांतल्या मुलाखतींसाठी ओळखले जाणारे विख्यात पत्रकार करण थापर यांनी आपल्या ‘डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट’ या पुस्तकात असाच प्रसंग उद्धृत केला आहे. यातून देशाच्या सर्वोच्च नेतेपदावरील व्यक्तीचा वेगळा परिचय होतो.

साधारणपणे एक निवडणूक एक प्रकरण अशा पद्धतीनं या पुस्तकाची मांडणी आहे. त्यामुळे त्याची वाचनीयता चांगलीच वाढलीये. शर्मा विश्लेषकाच्या पद्धतीनं ते सांगत नसल्यामुळे पुस्तकवाचनाला एक गती येते. त्यातले त्यांचे निष्कर्षही बऱ्याच अंशी पटतात. अपवाद फक्त एका मुद्दय़ाविषयी.

अर्थकारण आणि राजकारण वगरे सर्व समीकरणं शर्मा मांडतातच. पण मतदारांची मानसिकता आणि मतदान यातलं नातंही ते उलगडण्याचा प्रयत्न करतात. तसं करताना त्यांचा एक मुद्दा विचारार्ह, पण तरी प्रश्न पडावा असा ठरतो. तो म्हणजे- या देशातील मतदार एककल्ली, एकारलेला आणि एकाधिकारशाहीशी साधर्म्य दाखवणारा नेता मान्य करत नाहीत. इंदिरा गांधी हे एक याचं उदाहरण दिलं जातं. पण ते सर्वव्यापी नाही. याचं कारण इंदिरा गांधी या विचारबिंदूच्या डावीकडच्याच होत्या. उजवीकडचा तसा नेता या देशाला माहीत नव्हता. त्यामुळे शर्मा यांचा हा निष्कर्ष कितपत खरा ठरेल, याविषयी शंका घ्यायला जागा आहे.

तिचं निरसन होईपर्यंत हे पुस्तक वाचायला हरकत नाही. विशेषत: सध्याच्या निवडणुकांच्या तापलेल्या वातावरणात दूरचित्रवाणी वा समाजमाध्यमांतलं हलकंसलकं काही वाचण्या-पाहण्यापेक्षा या पुस्तकवाचनाचा आनंद किती तरी मोठा आहे!

  • ‘डेमॉक्रसी ऑन द रोड: ए २५-इयर जर्नी थ्रू इंडिया’
  • लेखक : रुचिर शर्मा
  • प्रकाशक : पेंग्विन
  • पृष्ठे: ३८८, किंमत : ६९९ रुपये

 

girish.kuber@expressindia.com

@girishkuber