‘आपल्याला जे हवं ते कोणत्याही हिंसेशिवाय मिळवणं म्हणजे खरी सत्ता’- असं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं मत. ओबामांच्या या मताचा संदर्भ देत बुजुर्ग अमेरिकी पत्रकार बॉब वूडवर्ड यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलं होतं, ‘तुम्हालाही हेच वाटतं का?’ ट्रम्प यांचं उत्तर होतं- ‘खरी सत्ता आदरातून मिळते हे काहीसं खरं असलं, तरी माझ्या मते, खरी सत्ता म्हणजे (मला हा शब्द वापरावासा वाटत नाही, पण) ‘भय’..!’

वूडवर्ड आणि ट्रम्प यांचं हे बोलणं २०१६ च्या एप्रिलमधलं. वॉशिंग्टन पोस्टचे राजकीय बातमीदार रॉबर्ट कोस्टा यांच्यासह वूडवर्ड हे ट्रम्प यांची मुलाखत घेत होते, त्यावेळचं. अमेरिकी  राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचाराच्या ऐन धामधुमीत घेतलेली ही मुलाखत. त्यानंतर प्रचार रंगला, निवडणूक झाली आणि ट्रम्प ‘सत्ते’त आलेही!

हे सारं सांगण्याचं  कारण म्हणजे वूडवर्ड यांच्या नव्या पुस्तकाची आलेली बातमी. ‘फीअर : ट्रम्प इन द व्हाइट हाऊस’ हे ते पुस्तक! येत्या सप्टेंबरमध्ये ते प्रकाशित होणार असल्याचं ‘सायमन  अ‍ॅण्ड शूस्टर’ या प्रकाशनसंस्थेनं अलीकडेच जाहीर केलं आहे. कार्ल बर्नस्टीन यांच्यासह १९७२ साली शोधून काढलेलं ‘वॉटरगेट’ प्रकरण आणि त्यामुळे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना द्यावा लागलेल्या राजीनाम्यामुळे वूडवर्ड यांच्या शोधपत्रकारितेचा जगभरच्या माध्यमविश्वात दबदबा आहे. दोनदा पुलित्झर पुरस्कार मिळालेल्या वूडवर्ड यांनी बर्नस्टीन यांच्यासह लिहिलेली  ‘ऑल द प्रेसिडेन्ट्स मेन’ आणि ‘द फायनल डेज्’ ही व इतर पुस्तकं प्रसिद्ध आहेत. निक्सन ते ओबामा अशा आठ राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ अगदी जवळून पाहिलेल्या वूडवर्डना ट्रम्प यांच्याविषयी मुद्दाम पुस्तक लिहिण्याचं कारण काय?

पहिलं कारण म्हणजे, वर सांगितलेला २०१६ च्या मुलाखतीतला प्रसंग! ट्रम्प हा प्रकार काय आहे, हे जाणण्यासाठी अनेकानेक मुलाखतींचा आधार वूडवर्ड यांच्या या पुस्तकाला आहे.  त्यातून व्हाइट हाउसमधली ‘भयकथा’ उलगडेल, असा दावा  प्रकाशकांनी केला आहे, तर वूडवर्ड यांचं ‘ट्रम्पगेट’ कसं असेल, याची वाचकांनाही उत्कंठा आहे!