News Flash

अव-काळाचे आर्त : चंगळवादाचे थैमान…

कादंबरीचा नायक म्हणजेच मिच कोर्टेने हा संपूर्ण जगाला जाहिरातीच्या भिंगातून बघत असतो.

|| आकाश नवघरे

पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने जवळपास संपुष्टात आल्याने उपभोगासाठी नवीन संसाधने मिळावीत या हेतूने सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या शोधात विविध देशांतील सरकारे आणि संलग्न कंपन्या यांमध्ये स्पर्धा सुरू होते, असे या कादंबरीचे कथानक… पण त्या स्पर्धेतून काय काय घडते, याचे कादंबरीतील वर्णन वर्तमानाचा आरसा दाखवणारेच!

संपूर्ण जग विकून हडप केलेल्या समाजाचे पाय कोणत्या दिशेने जाऊ शकतात, याचे विवेचन मांडण्याचा प्रयत्न म्हणजे- ‘द स्पेस मर्चंट्स’! पृथ्वी आणि पृथ्वीवरील संपूर्ण संसाधने ही फक्त मानवाच्या उपभोगासाठीच आहेत असा समज असलेल्या आणि नीतिमत्तेची चाड न बाळगणाऱ्या समाजाचे विवरण लेखकाने ‘द स्पेस मर्चंट्स’मध्ये केले आहे. या कादंबरीचा नायक एका मोठ्या जाहिरात कंपनीमध्ये उच्चपदस्थ आहे. सकाळी उठल्यापासून ज्या-ज्या वस्तूंचा किंवा संसाधनांचा उपभोग मनुष्य घेतो, ती-ती वस्तू वा संसाधन जास्तीत जास्त लोकांना विकण्याचे काम ही जाहिरात कंपनी करत असते. फ्रेडरिक पोल आणि सीरील कॉर्नब्लथ लिखित, १९५३ साली प्रथम प्रकाशित झालेल्या, ‘द स्पेस मर्चंट्स’ या कादंबरीमध्ये चंगळवादामुळे निर्माण झालेल्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने जवळपास संपुष्टात आल्याने उपभोगासाठी नवीन संसाधने मिळावीत या हेतूने सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या शोधात विविध देशांतील सरकारे आणि संलग्न कंपन्या यांमध्ये स्पर्धा सुरू असते. या स्पर्धेच्या अवतीभोवती ही कादंबरी गुंफलेली आहे.

कादंबरीचा नायक म्हणजेच मिच कोर्टेने हा संपूर्ण जगाला जाहिरातीच्या भिंगातून बघत असतो. नैसर्गिक संसाधने, मानवी भावना, मानवी नाती आणि इतर बाबींचा वापर जाहिरातीमध्ये कशा प्रकारे होऊ शकतो आणि नवनव्या वस्तूंचा खप कसा वाढवता येऊ शकतो, हे शोधणे हे एकच ध्येय मिचपुढे आहे. हे सर्व होताना मानवी मूल्यांचा ऱ्हास होत आहे आणि पृथ्वीवरील मानवी जीवन हे दिवसेंदिवस जगण्यासाठी प्रतिकूल होत चालले आहे, याचे जराही भान त्याला नसते.

कादंबरीतल्या जगातील सर्वच राष्ट्रे आणि तेथील सरकारे ही फक्त बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातातले खेळणे बनली आहेत. सरकारे निरनिराळी नसून जणू काही या वेगवेगळ्या कंपन्या मिळून सर्वत्र एकच सरकार समांतरपणे चालवत आहेत असे जाणवते. असेच एक उदाहरण भारताबद्दल देण्यात आले आहे. भारतात उपलब्ध सर्व संसाधने, त्यांच्यावर होणाऱ्या प्रक्रिया आणि संपूर्ण भारतात विकल्या जाणाऱ्या वस्तू या सर्वांवर ‘इंडियास्ट्रीज्’ या कंपनीची मक्तेदारी असते. ‘इंडियास्ट्रीज्’ कंपनीची उत्पादने विकून देण्याचे आणि बाजारात त्यांची अधिक मागणी निर्माण करण्याची जबाबदारी ही मिचच्या कंपनीवर असते. मिचच्या कंपनीचा मालक अभिमानाने सांगतो की, आज भारतात एकही वस्तू अशी नाही की जिची जाहिरात करून आपण ती विकून देत नाही, जणू संपूर्ण भारत देश आपणच चालवतो. हे आपण नक्की कोणत्या काळाबद्दल वाचतो आहोत, असा संभ्रम वाचताना होतो.

नायक मिच हा ‘स्टार’ श्रेणीचा नागरिक आहे. विविध देशांतील नागरिकांची विभागणी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये केली गेली आहे. अमेरिकेसारख्या प्रगत आणि श्रीमंत देशात मिचसारखे ‘स्टार’ श्रेणीचे लोक जास्त प्रमाणात आहेत. भारत, कोस्टारिका किंवा इतर गरीब आणि विकसनशील देशांमध्ये श्रमिक वर्गातील खालच्या श्रेणीच्या लोकांचे वास्तव्य आहे. या वर्गवारीनुसार त्यांना स्वातंत्र्य, सोयी आणि संसाधने यांचा उपभोग घेता येतो. तुमच्या श्रेणीच्या बाहेर जाऊन कुठलेही काम करणे हे जवळपास अशक्यच. प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट क्रमांक दिलेला आहे आणि त्यानुसार व्यक्तींची ओळख ठरते. तो क्रमांक प्रत्येक व्यक्तीच्या हातावर नोंदलेला असतो. वेगवेगळ्या श्रेणींनुसार लोकांना विविध ठिकाणी येण्या-जाण्याची मुभा असते. लोकांच्या श्रेणींनुसार आणि जागेच्या दर्जानुसार त्यांच्या हालचालींवर निर्बंध लादण्यात आलेले आहेत. कुणालाही कुठेही जाण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य उरलेले नाही. लोकसंख्या प्रमाणाच्या बाहेर वाढल्याने आर्थिक आणि सामाजिक दरी दिवसेंदिवस खूप मोठी झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे लोकांना विविध श्रेणींत विभागणे. वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक संसाधनांवर प्रचंड ताण आलेला आहे. शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा हे सर्वसाधारण लोकांच्या आवाक्यापल्याड गेले आहेत. दोन खोल्यांचे घर म्हणजे श्रीमंती ठरली आहे. पुरेशी जमीन शिल्लक न राहिल्याने नैसर्गिक अन्न फक्त अतिश्रीमंत लोकांपुरते मर्यादित झालेले आहे. इतर लोकांनी त्या देशातील सरकार आणि कंपन्या मिळून जे ठरवतील तेच गुपचूप खायचे. कृत्रिम आणि अनैसर्गिकरीत्या रसायनांपासून तयार केलेले अन्न हे साधारण लोकांसाठी, तर श्रीमंत आणि उच्चवर्गीय लोकांना शेतात पिकलेले अन्न. अर्थातच, हे सगळे सरकार आणि काही कंपन्या ठरवणार. लोकसंख्यावाढीमुळे प्रदूषणाच्या पातळीतही प्रचंड वाढ झालेली आहे; त्यामुळे प्राणवायू पुरवणाऱ्या विशिष्ट पोषाखाशिवाय बाहेर पडणे जवळपास अशक्य. साधे पिण्याचे पाणी मिळणेही कर्मकठीण. घरी नळाला येणारे पाणी कुठल्यातरी कंपनीने एकदा वापरून मग त्यावर प्रक्रिया करून आलेले. त्यात कधी क्षार, तर कधी इतर काही रसायने. हेही आपल्याला आता परिचितच आहे. बाटलीबंद पाण्यापाशी थांबलेला चंगळवाद ती पायरी कधी ओलांडेल हे सांगता येत नाही.

कादंबरीमध्ये सगळेच लोक हे मुकाट्याने सहन करत नाहीत. एक गट सातत्याने या सर्व गोष्टींना विरोध करत असतो. त्यांना या कादंबरीमध्ये ‘कॉन्झी’ ऊर्फ ‘कन्झर्वेशनिस्ट’ या नावाने डिवचले जाते. पन्नासच्या दशकात अमेरिकेत साम्यवादी लोकांना उद्देशून वापरलेल्या संबोधनांचा प्रभाव ‘कॉन्झी’ या उपहासात्मक शब्दावर दिसतो. मिचच्या अगदी उलट कॉन्झी लोकांचे विचार असतात. मिच मानवाला केंद्रस्थानी ठेवून निसर्गाचा विचार करतो, तर कॉन्झी मात्र संपूर्ण निसर्गाला सर्वसमावेशक दृष्टीने बघतात. या स्पर्धेत दोन्ही बाजूंनी विविध योजना आखल्या जातात. याचीच एक पायरी म्हणून मिचचा घात करून त्याचा ओळख क्रमांक आणि नाव बदलून त्याला कोस्टारिका देशात मजुरांच्या छावणीमध्ये पाठवले जाते. मिच ज्या कंपनीचे बनावट मांस अमेरिकेत विकून देतो, त्याच कंपनीमध्ये त्याला मजूर म्हणून पाठवले जाते. मानवनिर्मित भोजन, इतर उत्तेजक पदार्थ यांवर लोकांचे जीवन अवलंबून असते. मजुरांच्या श्रेणींनुसार त्यांच्या देयकांची आणि अन्नाची विभागणी केलेली असते. समजा, मला दिवसभर काम करून ‘क्ष’ रुपये देयक म्हणून मिळत असतील, तर माझा दररोजचा खाण्याचा आणि राहण्याचा खर्चसुद्धा ‘क्ष’ असतो. त्यामुळे रोजच्या अन्नाला किंवा दैनंदिन जीवनाला कंटाळून दुसरे काही खायचे वा अनुभवायचे असेल तर कर्ज काढावे लागते. आपल्या श्रेणींनुसार अवाजवी देयक मिळत नसल्याने मी मरेपर्यंत त्या कर्जाच्या बोज्याखाली राहीन व त्यातून सुटका होणार नाही, अशी खातरजमा व्यवस्थेकडून केली जाते. भारतात शेतकरी ज्याप्रकारे सावकाराकडून कर्जांवर कर्जे घेऊन संपूर्ण आयुष्य कर्जाच्या बोज्याखाली काढतात, अगदी त्याचप्रमाणे इथल्या मजुरांना कर्जात आयुष्य काढावे लागते. हे सर्व मिचने स्वत: कधीच अनुभवलेले नसते. मजूर म्हणून काम करताना प्रथमच त्याला हे सर्व ग्राहकाच्या बाजूने दिसू लागते. अन्नात अमली पदार्थ मिसळून लोकांना त्याची सवय लावणे म्हणजे ती व्यक्ती आयुष्यभरासाठी आपली ग्राहक होईल अशी खातरी करून घेणे, या योजनेतल्या हुशारीबद्दल मिचला आधी स्वत:चा अभिमान वाटत असतो. पण स्वत:चे स्थान बदलल्यावर त्याला यातल्या शोषणाचा राग येऊ लागतो. कॉन्झी गटातील काही लोकांची मदत घेऊन तो बऱ्याच प्रयत्नांनंतर कंपनीच्या उच्चपदस्थ लोकांच्या नजरेत भरण्यासाठी काही डावपेच आखतो. ते यशस्वी होऊन त्याला अमेरिकेत जाण्याची संधी मिळते, तिथून या कादंबरीच्या कथानकाला कलाटणी मिळते.

मिचची पत्नी कॅथी हीदेखील कॉन्झींना सामील असते. मिचच्या अतिभांडवलशाही विचारांमुळे त्याचे आणि कॅथीचे पूर्वी पटत नसे. कॅथी मानवी भावना आणि निसर्ग या बाबींना जास्त प्राधान्य देते, तर मिचचे आधीचे विचार अगदी याउलट असतात. पण स्वत:ची ओळख परत मिळवण्याच्या प्रयत्नात त्याला पूर्वी न दिसलेल्या गोष्टी दिसू लागतात, व्यवस्थेचे बीभत्स रूप दिसू लागते, कॉन्झी गटासाठी काम करणारे लोक आणि त्यांच्यावरचा अन्याय दिसू लागतो. भांडवलशाहीच्या तथाकथित प्रगतीने निर्माण केलेल्या जीवघेण्या स्पर्धेत स्वअस्तित्व टिकवण्यासाठी कुठल्या स्तरावर जावे लागते याचा प्रथमदर्शी अनुभव घेतल्यावर मिच भानावर येतो.

सध्या भारताची परिस्थिती अगदी या कादंबरीतील लोकांसारखी झालेली आहे. तुम्ही जर श्रीमंत असाल किंवा राजकीयदृष्ट्या प्रबळ असाल, तरच तुम्हाला माणूस म्हणून जगता येते. नाहीतर कादंबरीतील लोकांप्रमाणे तुमचे अस्तित्वही क्रमांकामध्येच गणले जाते. ज्याप्रमाणे मिच किंवा इतर स्टार श्रेणीतील लोकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत, अगदी त्याचप्रमाणे आपल्याकडे काही प्रस्थापित लोकांना करोनाच्या त्सुनामीमध्ये आयपीएलसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करता येते. ज्याप्रमाणे मिचला स्टार श्रेणीव्यतिरिक्त इतर लोकांशी काहीच घेणेदेणे नसते, अगदी त्याचप्रमाणे या सर्व उच्चभ्रू आणि अतिश्रीमंत लोकांना सामान्य भारतीयांना न मिळणारी औषधे, न मिळणारा प्राणवायू, मरणाचा प्रचंड वाढलेला धोका यांबद्दल काहीच घेणेदेणे उरलेले दिसत नाही. वर्तमानकाळात भारतात ज्या प्रकारे ‘कम्युनिस्ट, लिबरल्स’ हे शब्द वापरून काही लोकांना डिवचले जाते, त्यांना खुनाच्या-बलात्काराच्या धमक्या दिल्या जातात, वेळ पडल्यास त्या खऱ्याही केल्या जातात. अगदी त्याच प्रकारे या कादंबरीतसुद्धा कॉन्झी लोकांना या सर्व त्रासाला सामोरे जावे लागते. वाचताना कधी कधी तर असे वाटते की, लेखकाने भविष्यकाळात प्रवास करून तर ही कादंबरी लिहिलेली नाही ना!

लेखक फ्रेडरिक पोल इथेच थांबत नाही. त्याने या कादंबरीचा दुसरा भाग- ‘द मर्चंट्स वॉर’-देखील लिहिला. त्याचे प्रकाशन १९८४ मध्ये झाले. या मधल्या ३० वर्षांत पालटून गेलेले जग लेखकाच्या कल्पनेच्या किती जवळ जाऊन पोहोचले, ते वाचकाने स्वत:च अनुभवावे असे आहे.

anaoghare@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2021 12:05 am

Web Title: earth natural resources are almost depleted akp 94
Next Stories
1 परिचय : पॅलेस्टाइन संघर्षावर ‘भांडवली’ उत्तर?
2 बुकबातमी : आहे ‘बंडखोर’ तरी…
3 आलेंदेंची (आता) आठवण..
Just Now!
X