अभिनयसम्राट अशी ओळख असलेले दिलीपकुमार सरत्या आठवड्यात निरोप घेते झाले.  वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  १९२२ सालचा त्यांचा जन्म. १९४४ साली प्रदर्शित झालेल्या ‘ज्वार भाटा’ या सिनेमातून त्यांच्या सिने कारकिर्दीची सुरुवात झाली, तर १९९८ सालचा ‘किला’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. याचा अर्थ गेल्या शतकातील संपूर्ण स्वातंत्र्योत्तर कालखंड ते सिनेसृष्टीत सक्रीय राहिले. त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात झाली तो काळ स्वातंत्र्याच्या प्रेरणेने, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विज्ञानवादी दृष्टीच्या आशावादाने भारलेला. तर त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटाकडे देशावर धार्मिक ध्रुवीकरणाचा झाकोळ होता. परंतु दिलीपकुमार यांची अख्खी सिने कारकीर्द आणि ‘रील लाइफ’पल्याडचे जीवन मात्र कायमच स्वातंत्र्याच्या, आधुनिकतेच्या प्रभावाखाली राहिले.

तो प्रभाव ख्यातनाम ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ लॉर्ड मेघनाद देसाई यांनी अचूक जाणला, आणि ‘नेहरूज् हीरो : दिलीपकुमार इन द लाइफ ऑफ इंडिया’ या पुस्तकातून मांडला. हे पुस्तक २००४ साली प्रसिद्ध झाले. देसाई यांच्या मते, १९४४ ते १९६४ या काळातील दिलीपकुमार यांचे सिनेमे म्हणजे तरुण भारताचे प्रतिबिंबच. स्वतंत्र भारताच्या उभारणीची आस, नव्या विचारांच्या स्वीकाराची वृत्ती, ‘गंगा-जमनी’ संस्कृतीविषयीचा जिव्हाळा यांनी भारलेला हा काळ. १९६४ साली नेहरूंचे निधन झाले आणि नव्या राजकीय-सामाजिक घुसळणीस सुरुवात झाली. परंतु नेहरूंच्या निधनानंतरही दिलीपकुमार यांची निष्ठा नेहरूकालीन आधुनिकतेशी कायम राहिली, याचे अनेक दाखले देसाई यांच्या पुस्तकात मिळतात.

खुद्द दिलीपकुमार यांनी नेहरूंशी, त्यांच्या पक्षाशी- म्हणजे काँग्रेसशी असलेली जवळीक कधी लपवली नव्हती. नेहरूंच्या विनंतीवरून पन्नासच्या दशकात त्यांनी व्ही. के. कृष्णमेनन यांच्या किंवा पुढे १९९९ साली मनमोहन सिंग यांच्या निवडणूक प्रचारात सक्रीय भागही घेतला होता. पण दिलीपकुमार यांची मूल्यभूमिका पक्षीय नव्हती. ती वैचारिक होती. त्याचे भान कायम होते, म्हणून अन्य पक्षीय नेत्यांशीही त्यांचे संबंध जिव्हाळ्याचे राहिले. त्यामुळेच भारतीय समाजमन धर्माधिष्ठीत राजकारणाकडे, दुभंगलेपणाकडे मार्गक्रमण करत असतानाही दिलीपकुमार यांनी मात्र त्याविरोधी प्रवाहातच राहणे पसंत केले. मुंबईचे शेरीफपद सांभाळताना दाखवलेली संवेदनशीलता वा दिपा मेहता यांच्या ‘फायर’ या चित्रपटावरून झालेल्या वादात कलावंतांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याविषयी न्यायालयाकडे त्यांनी घेतलेली धाव, हे सारे त्यामुळेच साहजिक ठरते.

आज ‘नेहरूवाद’ असे ज्यास  म्हटले जाते, तसा काही अकादमिक, समाजशास्त्रीय ‘वाद’/ ‘इझम’ नाही. परंतु अलीकडच्या काही वर्षांत ‘नेहरूविचारा’स ‘इझम’चे रूप आपोआपच मिळत गेल्याचे दिसते. त्यास कारणीभूत ठरलेल्या घटना-घडामोडी एकविसाव्या शतकात घडल्या असल्या, तरी त्यांची बिजे गेल्या शतकातच रुजली होती, आणि ती दिलीपकुमार यांनी ओळखली होती, हेच देसाई यांच्या पुस्तकातून अधोरेखित होते.