|| विद्युत भागवत

श्रद्धा आणि देव या दोन्हीही गुंतागुंतीच्या प्रश्नांशी झुंज घेणारा कबीर हा किरण नगरकरांच्या या अखेरच्या कादंबरीत भेटतो. कबिराचे दोहे हाताशी घेऊन विणलेल्या या कथनात नगरकर स्वत:लाही प्रश्न विचारतात आणि आपल्यालाही, ते कोणते?

जन्मजात गोष्ट सांगण्याची सवय असणारे किरण नगरकर कबिराचे दोहे हाताशी घेऊन एक वेगळाच पट त्यांच्या शेवटच्या ‘द आर्सनिस्ट’ या कादंबरीत विणतात. संत कबीर फक्त कवी नव्हता, तर लोकांमध्ये मिसळणारा कवी, विणकर, द्रष्टा आणि काही प्रमाणात- खरे तर जगाच्या दृष्टीने पूर्णपणे अभद्र होता. म्हणजे सर्वसामान्यांना ज्या गोष्टी करण्याची मनाई असते आणि ते करण्याचे धर्यही नसते, अशा सर्व गोष्टी कबीर जाणीवपूर्वक करत होता. हे जे कबिराचे नवनिर्माण आहे, त्यात आपल्याला अचानकच कबिराच्या दोह्यांचा नवा अर्थ उलगडतो.

कादंबरीच्या प्रस्तावनेत किरण नगरकरांनी नमूद केल्याप्रमाणे, आताच्या परिस्थितीतील गुंतागुंत अंगावर आल्याने, आपल्या निराशेच्या गत्रेतून बाहेर येण्यासाठी कबिराच्या साहाय्याने ही संहिता सिद्ध केली. नगरकर आपल्याला सांगतात की, ‘मी कबिराचा अभ्यास केला नाही किंवा त्यावर तज्ज्ञताही मिळवली नाही. अति उत्कटपणे कोणत्या तरी काव्यात बुडून जावे असा माझा बाज नाही.’ अरुण कोलटकर या नगरकरांच्या लेखक मित्राने कबिराचे दोहे म्हणून दाखविले आणि ते दोहे अनेक वर्षे त्यांच्या मनात रुतून बसले. अर्धा मुसलमान आणि अर्धा हिंदू असा जो कबीर आहे, तो मिश्कीलपणे मुल्लाला विचारतो की, अजान म्हणताना इतके किंचाळायला कशाला हवे? आणि उंचावर चढायला तरी कशाला हवे? अल्ला काय बहिरा आहे का? नगरकरांना कबिराची ही शैली डसली आणि त्यातले कर्मठपणाला प्रश्न विचारणे खोलवर जाणवले. नगरकरांच्या आधीच्या कादंबऱ्यांतून अनेकदा ‘आगलाव्या’ कबिराची झलक दिसत होती. पण थकलेल्या नगरकरांना अशी धाप लागत असे की, त्यांना वाटत राहिले- आता आपण कबिरावर लिहिण्याचे काम बहुधा पुढच्या जन्मीच करू शकू!

या विषयावर १६ पानांचे एक लहानसे टिपण नगरकरांनी आधी केले होते. त्या टिपणाचे रूपांतर सहाशे पानांत कसे झाले, याचे त्यांनाही आश्चर्य वाटत होते. भोवतालचे जग ज्या गतीने बदलते आहे, देशामागून देश हुकूमशाहीकडे आणि फॅसिझमकडे वळत आहेत आणि तेही देवा-धर्माच्या नावाखाली, हे पाहून आणि हजारो माणसांच्या कत्तली पाहून नगरकरांचा जीव तळमळला असावा.

कोणीही आपल्या श्रद्धेपेक्षा किंवा धारणेपेक्षा वेगळे काही म्हटले तर त्याला संपविणे, अशी जगाची रीत झाल्यावर नगरकरांपाशी ही कादंबरी लिहिण्याशिवाय पर्याय नव्हता. निव्वळ घृणा, तिरस्कार आणि अतिरिक्त अहंकारी राष्ट्रवाद ही नाणी वापरून जगभर जेव्हा हिंसाचार माजत होता, तेव्हाच आपला स्वतचा देशही त्याच मार्गाने चालला आहे, हे पाहून तर ही कादंबरी ‘झाली’ नाही ना? नगरकर सांगतात की, ‘भक्तीच्या चौकटीतील संतांवर अलीकडे महानगरीत आणि छोटय़ा शहरांमध्ये राहून नवनवे लेखक नवी मांडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.’ परंतु या प्रयत्नांमध्ये त्यांना संतांचा सच्चा गाभा दिसत नाही. संतांचे जनसामान्यांशी असणारे नाळेचे नाते आताच्या प्रायोगिक लेखनामध्ये तुटते की काय, असे बहुधा नगरकरांना वाटले असावे.

त्यामुळे या कादंबरीत- आपण कबिरासारखे जगणे कधी सुरू करणार? त्याच्या लेखनाचे सूत्र काय होते? संपूर्ण जगभरच अत्यंत घातक अशा विषमतेला आणि घृणेला खतपाणी घातले जात आहे, त्याविरुद्ध आपण आवाज कधी उठवणार? असे प्रश्नांचे मोहोळ नगरकर उभे करतात. हे प्रश्न त्यांनी स्वतलाही विचारले आहेत आणि भोवतीच्या जगालाही.

मुल्ला, योगी, साध्वी आणि वंशवादी सगळेच जण आता तिरस्काराचे विष लोकांमध्ये भिनवत चालले आहेत आणि हिंसाचाराने आग पेटवत निघाले आहेत. अशा वेळी १६ वर्षांच्या ग्रेटा थनबर्गने आपल्या संपूर्ण पृथ्वीच्या वतीने उभे राहून आवाज उठवला आणि आपल्या राजकारण्यांना, धर्मगुरूंना आणि उद्योगपतींना प्रश्न विचारला : पुढच्या पिढीतल्या मुलांच्या जगण्यासाठी पृथ्वी नावाच्या ग्रहावर आपण काय शिल्लक ठेवणार आहोत? या प्रश्नाला भारतीयांनीसुद्धा उत्तर दिले नाही. नगरकरांच्या सर्जनशील शैलीमध्ये जेव्हा कबिरावरची ही संहिता तयार होत होती, तेव्हा त्यांना भोवतीचे जग लोभी आणि हे हवे-ते हवे असे करणारे दिसत होते. कबिराविषयी लिहितानाच मधेच कॅथलिक आणि प्रोटेस्टंट पंथांचे कडवट वाद घुसत होते. नगरकरांचा कबीर त्यांना सांगत होता की, फक्त भूतकाळातला नाही तर कल्पनेच्या जगामध्ये कबिराला तुमच्या-आमच्या समकालीन परिस्थितीत मांडावेच लागेल.

कबिराच्या लेखनातील तिरकस व्यंजना, विनोद आणि खोलवर दिसणाऱ्या मानवी जीवनाच्या दिशा आणि समकालीनत्व पाहता, त्या लेखनातील अतिवास्तव आशय पाहून श्रद्धा आणि देव या दोन्हीही गुंतागुंतीच्या प्रश्नांशी झुंज घेणारा कबीर नगरकरांना दिसला. संपूर्ण मानवजातीलाच आता नैतिकतेची चाड राहिलेली नाही, हे नगरकरांना दिसले. सर्व सजीव सृष्टीचे घर- म्हणजेच आपली पृथ्वी जणू आम्हाला आंदण मिळालेली आहे, अशा उपभोगवादी व्यवहाराने नगरकरांना अत्यंत अस्वस्थ केले. आणि त्यातूनच त्यांनी- निसर्गालाच छेडाल तर तोही प्रलयकारी प्रतिक्रिया देईल, हा कबिराने दिलेला इशारा तळमळीने अधोरेखित केला आहे. माणसाची एकमेव भूमी असणाऱ्या पृथ्वीवरून काही माणसे पलायन करतील. ती भले चंद्रावर किंवा मंगळावरही जातील; परंतु सर्वसामान्य माणसे आणि बाकीची सजीव सृष्टी मात्र बेघर होणार, नष्ट होणार. हे भयंकर वास्तव लक्षात आल्यावर नगरकरांना जाणवले की, कबीर आपल्या त्वचेच्या आत शिरला आहे. मग नगरकरांनी निराशेत डुबक्या मारत मारतच ही कादंबरी लिहिली. धाडसी, कल्पक आणि जबरदस्त कविता लिहिणारा कबीर पूर्ण केल्याशिवाय नगरकर हे जग सोडून जाऊ शकत नव्हते.

कादंबरीची सुरुवातच मुल्ला आणि कवी यांच्या संवादाने होते. सुंदर स्त्री आणि देव यांच्यात तू कोणाला निवडशील? या प्रश्नाला कबिराचे उत्तर आहे : ज्या पापावर बंदी घातली गेली आहे, ते सगळं मी करणार आहे. पाप करण्यात मजा आहे. कबीर म्हणतो, ‘हे जे आपलं घर आहे, ते काही आपल्या काका-मामांचं घर नाही. परंतु तुम्ही माथा टेकवून विनम्र झालात, शरण गेलात, तरच या घरामध्ये प्रवेश करता येतो.’

या कादंबरीतील प्रकरणामागून प्रकरणे आपल्याला खरे प्रेम म्हणजे काय, हे सांगतात. म्हणजे रिकाम्या मडक्याचे भांडे प्रेमाने भरले नाही, तर कुंभाराला त्या भांडय़ात चतन्य ओतताच येत नाही. तसेच लोहार जेव्हा भाता फुंकतो तेव्हा त्यात त्याने चतन्य घातल्याशिवाय जिवंतपणा येणारच नाही. थोडक्यात, नगरकर आताच्या साधनात्मक प्रवृत्तीवर कोरडे ओढतात आणि प्रत्येक प्रकरणातून कबिराच्या साहाय्याने ते एक मोठे तत्त्वज्ञान सांगतात. त्यात मग एका थेंबाचीसुद्धा ताकद समुद्र होण्याची असते, असा आशावाद जागवतात. आणि असा थेंब अंशात्मक असला, तरी तो समुद्राचे भव्य स्वरूप जाणून घेतो आणि मगच समुद्रात विलीन होतो, असे कबिराच्या दोह्य़ातून आपल्यापर्यंत पोहोचते. अंश हे जाणून घेतो की, समुद्र म्हणजे काय आणि मगच समुद्रात विलीन होतो. यानंतरच्या प्रकरणांमध्ये हळूहळू मुल्ला-मौलवी आणि धर्मगुरू यांची कर्मठपणाची सक्ती किती ढोंगी आहे, हे कबिराने दाखविले आहे.

एखादा दगड घेऊन त्याचा देव बनवण्यापेक्षा, कबीर म्हणतो : ‘मी डोंगराचीच पूजा करीन. परंतु खरं तर चक्की ज्या प्रकारे पीठ दळते, ते पाहता सबंध जगालाच खाण्यापिण्यासाठी मदत करणारी चक्की मला महत्त्वाची वाटते.’ येथे माणसाच्या वैज्ञानिक प्रगतीला मान देऊन नगरकरांनी सर्व धर्ममरतडांची खिल्ली उडवली आहे. हे सांगताना जवळजवळ महात्मा गांधींच्या विचारांपाशी ते जातात. म्हणजे हिंसेला हिंसेने उत्तर देणे हे आंधळेपणाचे लक्षण आहे, असे सांगणाऱ्या गांधीजींप्रमाणेच नगरकर आपल्याला सर्वच कर्मठ प्रवृत्तींकडे हसून पाहायला सांगतात. एखाद्या विसंगतीकडे ‘हसून पाहणे’ म्हणजे नुसती खिल्ली उडवणे नव्हे, तर माणसातल्या शहाणपणाला हाक देणे आहे. माणसाचा अहंकार, स्वसंरक्षणाची धडपड आणि आत्मसमर्थन या सगळ्यांवर उपाय म्हणजे स्वतकडे आणि जगाकडे पाहून हसणे! या टप्प्यावर नगरकरांचा संवाद बुरखाधारी स्त्रीशी होतो आणि तिला दगडाने ठेचू पाहणाऱ्या मुल्ला-मौलवींना ते प्रश्न विचारतात की, ‘दगड आणि खडक घेऊन तुम्ही मशीद बनवता, पण आंधळेपणाने ज्याला पापी ठरवता त्याच्यातला देव तुम्हाला का दिसत नाही? आपण पाप केले तर त्याची भीती कशाला? आणि पश्चात्तापही कशाला? काटेरी बाभूळ पेरली तर काटेच उगवणार!’

या कादंबरीचा कमी शब्दांत परिचय करून देणे तसे अशक्य आहे. परंतु हिंसेने लोकांची तोंडे बंद केली गेली तरी कुठून तरी नव्या पिढीकडून प्रतिकार येणार आणि त्या प्रतिकराला तोंड देणे हे कर्मठपणाला शक्य होणार नाही, असा नगरकरांचा आशावाद आहे. कर्मठपणा आणि हुकूमशाही याच्या आधाराने प्रस्थापित जगावर राज्य करू पाहणाऱ्यांना फार काळ टिकाव धरता येणार नाही. कारण माणसांमध्ये अशी एक सर्जनशील शक्ती असते की, कर्मठपणाच्या फुग्याला ते टाचणी लावू शकतात. हे फार महत्त्वाचे सूत्र या कादंबरीतून हाती येते. खरोखरच यातील एका-एका प्रकरणावर ग्रंथ व्हावा अशी ही संहिता आहे. तिच्यात ‘प्रेम’ या संकल्पनेचा अत्यंत गंभीर असा आविष्कार आहे. जिथे प्रेम आहे तिथे बिनशर्त एकमेकांचे होऊन जाणे असते. अशा ठिकाणी सर्वव्यापी असा ईश्वर असूच शकत नाही. कारण प्रेमाने जगायचे ठरवले, तर प्रेमाचा मार्ग इतका चिंचोळा असतो की, त्यात प्रेम करणारा आणि ज्याच्यावर प्रेम आहे त्या वस्तू आणि व्यक्तीपेक्षा महत्त्वाचे असे इतर काहीही असूच शकत नाही. थोडक्यात, माणसाची ही जी समर्पित होण्याची ताकद आहे, त्यात दगडी देव बसूच शकत नाही. यातून देवाचे चिरंतनत्व किती आंधळे आहे, हेच नगरकर सुचवतात.

निष्कर्ष म्हणून इतकेच म्हणता येईल की, मानवी जीवनातला विवेक संपत जातो आणि धर्माची जागा धर्मसंस्था घेते, तेव्हा इतर संस्थांप्रमाणेच त्यालाही कीड लागते. यातूनच मग प्रलय निर्माण होतो आणि पुढच्या पिढीसाठी एकुलती एक पृथ्वीसुद्धा वाचवणे शक्य होत नाही. अशा वेळी जनसामान्यांची प्रेते गंगेसारख्या पाण्यावर तरंगतानाच दिसणार- इतके भीषण सत्य गोष्टीरूपाने सांगणारे नगरकर स्वत: मात्र या जगात नाहीत. ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या मराठीतून लिहिलेल्या आपल्या पहिल्याच कादंबरीतून नगरकर अस्तित्ववादाचा आविष्कार मराठी साहित्यात मांडतात. परंतु महाराष्ट्रातील कर्मठ शक्तींना तो पचला नाही आणि नगरकर इंग्रजीत लिहू लागले. यानंतरच्या त्यांच्या प्रत्येक कादंबरीत त्यांनी गृहीत धरलेले सत्य स्वतच उलटेपालटे करण्याचा प्रयत्न केला. मग कधी संत मीराबाईच्या नवऱ्याची कोंडी सांगितली, तर कधी रावणाचे पुनर्निर्माण केले. आपल्या संहिता त्यांनी इंग्रजीतून लिहून मराठी करण्याचा मार्ग पत्करला आणि इंग्रजी वाचकांच्या व्यापक जगात नाव मिळवले. अलीकडच्या काळात नगरकर संधी मिळेल तेव्हा- प्रकृती चांगली नसतानाही- महाराष्ट्रातील मराठी समुदायाकडे आपली मांडणी करू लागले होते. जणू काही कर्मठ शक्तींच्या पुढे उभे राहण्याची ताकद त्यांना आली होती. त्यांनी अशा प्रकारचा अभद्रपणा घेऊन जगण्याचा जो प्रयत्न केला होता, त्याचा आता आपणच शहाणा अन्वयार्थ लावला पाहिजे!