पंकज भोसले pankaj.bhosale@expressindia.com

आफ्रिकेमधून ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेल्या पिढीची स्थिरावण्याची धडपड बर्नार्डिन एव्हरिस्टो यांच्या ‘गर्ल, वुमन, अदर’ या बारा लघुकादंबऱ्यांनी संपन्न असलेल्या ग्रंथाचा मुख्य गाभा आहे. त्यात ब्रिटनमधील कृष्णवंशीय- त्यातही डझनभर स्त्रियांमध्ये चार आई, त्यांच्या चार मुली आणि या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात आत्यंतिक महत्त्वाच्या असलेल्या इतर चार महिला, अशा मिळून बारा जणींच्या सांगितलेल्या गोष्टी स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती आणि स्त्रीमौजवाद या संकल्पनांकडे तटस्थ दृष्टीने पाहतात..
‘बुकर’च्या अंतिम यादीत निवड झालेल्या पुस्तकांची ओळख करून देणाऱ्या नैमित्तिक लेख-लघुमालिकेतील हा दुसरा लेख..

समाजातील निम्न स्तरात जगणाऱ्या आणि दबल्या गेलेल्या व्यक्तींच्या साहित्याला जगभरात वाचा फुटली, त्याला महायुद्धांनंतरच्या कठीण अर्थपर्वात भरडले गेलेले जीवन कारणीभूत होते. दीन-दुबळे, जातींच्या-वंशाच्या तसेच आर्थिक स्तरांत सर्वात तळभागी असलेल्यांवरचे आणि विशेषत: स्त्रियांवरील अन्यायाचे चित्रण साहित्यामधून याच काळात जोमाने उमटू लागले. त्याला मान्यताही मिळाली. या प्रारूपाच्या आधारेच भारतीय इतर भाषांसह मराठी साहित्यामध्ये ग्रामीण, स्त्री आणि दलित आत्मकथनांचा प्रवेश झाला.

आफ्रिकेतून आणलेल्या गुलामांनी दोन शतकांच्या वास्तव्यामध्ये अमेरिकेमध्ये भिन्न आणि स्वतंत्र संस्कृती विकसित केली. त्यांचे संगीत, साहित्य, चित्रपट हे लादलेल्या देशात हक्काचे नागरिकत्व मिळवून स्थिरावण्याचा इतिहास पकडण्याच्या प्रयत्नात दिसतात. ही प्रक्रिया ब्रिटनमध्ये मात्र जेमतेम पाऊण शतकभरापासून सुरू झाली आहे. महागडय़ा राष्ट्रांत गणना होत असलेल्या ब्रिटनमध्ये लादलेल्या किंवा आत्मविकासाच्या ओढीने आफ्रिकेमधून स्थलांतर झालेल्या पिढीची स्थिरावण्याची धडपड बर्नार्डिन एव्हरिस्टो यांच्या ‘गर्ल, वुमन, अदर’ या बारा लघुकादंबऱ्यांनी संपन्न असलेल्या ग्रंथाचा मुख्य गाभा आहे.

कृष्णवंशीयांच्या ब्रिटिश साहित्याचा आरंभबिंदू मानला जातो, तो सॅम्युअल सेल्वन या भारतीय वंशाच्या त्रिनिदादमधील लेखकाने लिहिलेल्या ‘द लोन्ली लंडनर्स’ (१९५६) या कादंबरीपासून. लंडनमधील गरीब वस्त्यांमध्ये राहून हलकी कामे करीत आपली आर्थिक-सामाजिक स्थिती सुधारण्याची स्वप्ने पाहणाऱ्या कृष्णवंशीय व्यक्तींची साखळी सेल्वन यांनी आपल्या कादंबरीमध्ये गुंफली होती. व्ही. एस. नायपॉल यांची ‘मिमिक मॅन’ त्यानंतर एक तपाने आली. त्यानंतर दर दशकात अनेक कृष्णवंशीय साहित्यिकांनी आपले ब्रिटिशपण कथा-कादंबऱ्यांतून सिद्ध केले. झेडी स्मिथ सध्याच्या सर्वात गाजत असलेल्या आफ्रो-ब्रिटिश कादंबरीकार आहेत. त्यांच्याइतकेच साहित्य लिहिणाऱ्या बर्नार्डिन एव्हरिस्टो बुकरच्या लघुयादीत स्थान मिळाल्यामुळे पहिल्यांदाच जगभरात चर्चेत आल्या आहेत.

ब्रिटनमधील कृष्णवंशीय, त्यातही डझनभर स्त्रियांमध्ये चार आई, त्यांच्या चार मुली आणि या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात आत्यंतिक महत्त्वाच्या असलेल्या इतर चार महिला, अशा मिळून बारा जणींच्या या गोष्टी आहेत. अन् त्या सर्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ‘स्त्री जन्मा.. तुझी कहाणी..’ छापाचे अन्यायरुदन मांडण्यासाठी त्या लिहिल्या गेलेल्या नाहीत. तर एकसुरी बाण्यातून बाहेर पडून स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती आणि स्त्रीमौजवाद या संकल्पनांकडे तटस्थ दृष्टीने पाहण्याचा धाडसी प्रयोग म्हणून आलेल्या आहेत. सॅम्युअल सेल्वन यांच्या ‘द लोन्ली लंडनर्स’मध्ये स्वप्न पाहणाऱ्या पिढीची अनेक स्वप्ने पूर्ण झालेल्या व्यक्तिरेखा ‘गर्ल, वुमन, अदर’चा भाग आहेत. आफ्रिकेतील घाना, सोमालिया, नायजेरिया या देशांसह कॅरेबियन बेटांवरून लंडनमध्ये नशीब अजमावण्यासाठी आलेल्या लोकांचा इथल्या समाजात सामावण्याचा इतिहास खूपच रंजक शैलीमध्ये उतरलेला आहे.

कादंबरीला सुरुवात होते अ‍ॅमा या प्रथितयश नाटककारापासून. ४० वर्षांमध्ये आफ्रिकी मुळांना शोधणारी १५ नाटके तिने लिहिली असून २५ दिग्दर्शित केली आहेत. तिच्या नव्या नाटकाचा प्रयोग नॅशनल अकादमीमध्ये सुरू होणार असून ते त्यापूर्वीचा तिच्या आत्मविकासाच्या प्रवासाकडे पाहताना दिसते. सत्तरीच्या दशकातील स्त्रीवादी विचारसरणी अंगीकारलेली आकर्षक अ‍ॅमा समलिंगी असून तिने तिच्या समविचारी कृष्णवंशीय मैत्रिणींची भलीमोठी फौज तिच्यासोबत कायम ठेवली आहे. ५१व्या वर्षी तिचा सुधारक विचारांच्या ‘गे’ नवऱ्यासोबत संसार सुरळीत सुरू आहे. ज्या स्त्रीमुक्तीच्या विचारांवर तिच्या जगण्याचे तत्त्वज्ञान अवलंबून आहे, ते आपल्या मुलीच्या बाबत वापरताना ती काहीशी कंजुषी करीत असल्यासारखे भासते. याझ या १९ वर्षीय मुलीच्या कपडय़ांच्या निवडीपासून ते जगण्यापर्यंत तिचे काहीसे आक्षेप आहेत. तिचे जगणे नियंत्रणात आणण्याची तिची तीव्र इच्छा आहे. रंगभूमीवर प्रचंड अनुभव असतानाही नव्या नाटकाचे लोक कसे स्वागत करतील, याबाबत ती पहिल्या नाटकाच्या वेळेसारखी भेदरलेली दिसते. शाळेच्या शेवटच्या वर्षांपासून कृष्णवंशीय मुलींच्या हक्कांसाठी संघटना उभारणारी अ‍ॅमा कृष्णवंशीय महिलांच्या जगभरातील साहित्य-विचारांचा अर्क घेऊन मोठी झालेली असते. डॉमनिक या तिच्या लाडक्या मैत्रिणीसह लंडनमधील प्रायोगिक रंगभूमीचा इतिहास आणि मुक्तछंदात जगणाऱ्या व्यक्तींची बरीच माहिती अ‍ॅमाच्या कथेमध्ये येते. जे स्वातंत्र्य घेऊन आपण प्रगल्भ झालो, ते आपली मुलगी उपभोगत असलेला विचारही तिला खपत नाही. हा कथेतील व्यक्तीचा वैचारिक विरोधाभास एव्हरिस्टो यांनी अचूक नोंदविला आहे.

इंग्रजी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या याझला पत्रकार व्हायचे असून जगातला सर्वात वादग्रस्त स्तंभ लिहिण्याचा तिचा विचार आहे. कारण तिच्या मते, जगाने ऐकावे इतके सांगण्यासाठी तिच्याकडे भरपूर आहे. तिच्या विचारांची जडणघडण होण्याच्या कालावधीत अमेरिकेमध्ये पहिल्या कृष्णवंशीय अध्यक्षाच्या निवडीचा इतिहास घडला आहे. त्या घटनेने तिच्या भवताली बराक ओबामा यांना आदर्श ठेवून राजकारणात जाण्यासाठी अभ्यास करू लागलेल्या मुलींची उदाहरणे तिने पाहिली आहेत. समोरच्या परिस्थितीकडे व्यंगाने पाहणारी ही मुलगी आपल्या आईचा- म्हणजेच अ‍ॅमाचा स्त्रीवाद बेगडी ठरविते. सतत कोणत्या ना कोणत्या राजकीय विषयांवर मत-मतांतरे व्यक्त करण्यासाठी टीव्हीवर बोलावल्या जाणाऱ्या विचारवंत लेखक बापाची खिल्ली उडविते. ‘हाऊ वी लिव्ह्ड देन’ (२०००), ‘हाऊ वी लिव्ह नाऊ (२००८) आणि ‘हाऊ वी विल लिव्ह इन द फ्यूचर’ (२०१४) या तिच्या वडिलांच्या न्यू यॉर्क टाइम्स बेस्ट सेलर पुस्तकांची यादी सांगताना लेखिका आफ्रिकी वंशाच्या साहित्यिकांकडून एकसुरी होत चाललेल्या अन्यायकथांवर गमतीने टिप्पणी करते.

अ‍ॅमाच्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान एका व्यक्तीचे वर्णन करताना ती म्हणते, की सध्या रंगमंचावरील कोणत्याही नाटकापेक्षा जागतिक राजकीय पटलावर नाटय़ ओतप्रोत भरले असून ‘ब्रेग्झिट’ आणि ‘ट्रम्पक्वेक’ या दोन घटनांमध्ये आजच्या काळावर केलेला सर्वात मोठा विनोद आहे, अशी या व्यक्तीची धारणा असल्याने तो इतरांपासून वेगळा आहे. वारिस नावाच्या बुरखा घालणाऱ्या सोमाली मुस्लीम तरुणीशी याझची सर्वाधिक घसट आहे. अमेरिकेवर २००१ साली झालेल्या हल्ल्यानंतर ब्रिटनमधील मुस्लीम व्यक्तींना मिळणाऱ्या संशयास्पद वागणुकीने वारिसचे आयुष्य बदलून टाकलेले असते. तरीही बुरखा घालून वर स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट्स शिकणाऱ्या आपल्या समकालीन वारिसच्या आत्मविश्वासाचे व्यक्तिचित्र याझ सांगताना दिसते. आपल्या भोवतालच्या कृष्णवंशीय व्यक्तींमध्ये तिला एकही उत्तम प्रियकर सापडत नाही. पत्रकार बनण्यासाठी प्रचंड टोकदार व्यंगशैली असलेली याझ आपल्या उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल करताना दिसते.

डॉमनिक या अ‍ॅमाच्या सर्वात लाडक्या मैत्रिणीची कथा येते, ती आजच्या स्त्रीवादाबद्दल प्रश्न विचारते. झिंगा या आफ्रो-अमेरिकी मैत्रिणीच्या प्रेमात पडलेली डॉमनिक तिच्यासोबत लंडनमधील थिएटर सोडून अमेरिकेला जाते. तिथे फक्त महिलांनी महिलांसाठी वसविलेल्या शहरात हे समलैंगिक जोडपे राहू लागते. सुरुवातीच्या आनंदी सहवासानंतर झिंगा डॉमनिकवर पुरुषासारखे वर्चस्व गाजवते. इतर महिलांशी बोलण्या-चालण्यापासून तिच्या फेरफटक्यावर निर्बंध आणते. डॉमनिकला मीठरहित जेवणापासून ते मद्यमुक्त जगण्यापर्यंत भाग पाडते. तिच्या आज्ञांचे पालन न केल्यास डॉमनिकला मारहाणही करते. तीन वर्षे या मानसिक आणि शारीरिक जाचाला कंटाळून डॉमनिक त्या शहरातून पळ काढते. मात्र पुन्हा लंडनमध्ये न जाता अमेरिकेत स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सज्ज होते.

कॅरल या इन्व्हेस्टमेण्ट बँकरची गोष्टदेखील शून्यातून विश्व उभारणाऱ्या मुलीची आहे. १३व्या वर्षी सामूहिक बलात्कार झालेली कॅरल आपल्यावरील अत्याचाराच्या जखमांवर मात करीत गणिताच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करते. नायजेरियामधून स्थलांतरित झालेल्या आणि साफसफाईचे काम करणाऱ्या आईच्या पोटी जन्मलेली कॅरल गोऱ्यांच्या भूमीत कृष्णवंशीय म्हणून मिळणाऱ्या अपमान, दुय्यम वागणूक याविषयीच्या रागाचा शस्त्र म्हणून वापर करीत पुढे जाते. तिची आई बम्मी आपली आज्ञा मोडून कॅरलने गोऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय नुसता पचवतच नाही, तर घानामधून आलेल्या वृद्धाशी उतारवयात लग्न करताना दिसते.

मूळ देशातील प्रथा-परंपरांच्या पगडय़ातून मुक्त होऊन स्वातंत्र्य कमावलेल्या महिलांनी लंडनमध्ये तयार झालेल्या नव्या मूल्यजाणिवांचा डोलारा पुढल्या पिढीकडून मोडला जाण्याचा प्रवास जवळजवळ प्रत्येक कथेमध्ये आला आहे. इथल्या प्रत्येकाला उभे राहण्यासाठी आपापल्या पातळीवर तीव्र संघर्ष करावा लागला असून त्यात कुणीही मोडून पडले अथवा अयशस्वी झालेले नाही. प्रचंड विचित्र कुटुंबात जन्मलेली लतीशा १९व्या वर्षीच आई बनते. फूस लावून सोडून देणाऱ्या व्यक्तींची पुनरावृत्ती तिच्याबाबत ३०व्या वर्षी तीन बाळंतपणे उरकण्यापर्यंत संपत नाही. आपल्या आई आणि सावत्र बहिणीसोबत या मुलांना वाढवितानाही, ती एका मॉलमधील विक्री विभागात बढती मिळविण्यासाठी मर मर मेहनत करते. शर्ली किंग ही शिक्षिका आपल्या कृष्णवंशीयपणातून आलेल्या काहीशा न्यूनगंडावर मात करून शाळेत विद्यार्थ्यांची उत्तम पिढी घडविण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून देते. ब्रिटनमधील शिक्षण व्यवस्थेसोबत बदलत्या समाजाची नोंद तीव्रतेने शर्लीची कथा घेताना दिसते. विन्सम, पेनेलॉप, मेगन-मॉर्गन, हॅट्टी, ग्रेस यांच्या कथांमधूनही कृष्णवंशीयांच्या जगण्याचे संदर्भ आजच्या ब्रिटनला कवेत घेऊन येतात.

मुळांच्या शोधाऐवजी नव्या रुजलेल्या मुळांची देखरेख करणाऱ्या सलमान रश्दींच्या ‘किशॉट’प्रमाणेच इथे ब्रिटनबाहेरून आलेल्या व्यक्तींची अवस्था झालेली आहे. यातील एका पिढीने अभूतपूर्व संघर्षांद्वारे या देशात स्थिर होण्यासाठी धडपड केली आहे, तर दुसरी पिढी त्या संघर्षांच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधताना दिसत आहे.

दीन-दुबळ्यांचे जगणे युद्धानंतर गेल्या ७० वर्षांत बरेच बदलले. तो बदल हा आजच्या आफ्रो-अमेरिकी, आफ्रो-ब्रिटिश साहित्यामधून नुकताच डोकावू लागला आहे. याचे मोठे उदाहरण म्हणून ‘गर्ल, वुमन, अदर’ कादंबरीकडे पाहावे लागेल. फक्त असा बदल आपल्याकडच्या साहित्यामध्येही समोर यायला लागला, तर त्याचे जोरदार स्वागत होईल.

‘गर्ल, वुमन, अदर’

लेखिका : बर्नार्डिन एव्हरिस्टो

प्रकाशक : हॅमिश हॅमिल्टन

पृष्ठे: ३३६, किंमत : २,२९५ रुपये