अमेरिकी बुजुर्ग दिग्दर्शक, अभिनेते आणि लेखक वूडी अ‍ॅलन यांच्या नव्या पुस्तकाबद्दलच्या लागोपाठ दोन बातम्यांनी गत आठवडाभर अमेरिकी ग्रंथविश्वात बरीच घुसळण झाली. अ‍ॅलन यांचे ‘अप्रॉपस ऑफ नथिंग’ या शीर्षकाचे आत्मकथन ७ एप्रिलला प्रसिद्ध होणार, ही बातमी त्यांच्या चाहत्यांना कळते ना कळते तोच, ते प्रसिद्ध करणाऱ्या ‘हॅचेट बुक ग्रुप’ या प्रकाशन संस्थेने त्यातून माघार घेतल्याची बातमीही येऊन धडकली. गत वर्षी अ‍ॅलन यांच्याशी पुस्तकासाठीचा करार केल्यानंतर मागील आठवडय़ात त्याच्या प्रसिद्धीची घोषणा ‘हॅचेट’कडून झाली. मात्र त्याच आठवडय़ात माघार जाहीर करण्याची वेळ ‘हॅचेट’वर आली, ती का? त्याला कारण वूडी अ‍ॅलन यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप. ते आहेत १९९२ सालातले. त्यांच्या दत्तक मुलीने केलेले. त्याबाबत तेव्हा त्यांना न्यायालयीन चौकशीसही सामोरे जावे लागले होते. त्याची आठवण खुद्द अ‍ॅलन यांच्या मुलाने- रॉनन फरो यानेच ‘हॅचेट’ला करून दिली. रॉनन हाही ‘हॅचेट’चा लेखक. पेशाने पत्रकार. नामांकितांनी केलेल्या लैंगिक शोषणाची प्रकरणे रॉनन याने २०१७ साली ‘द न्यू यॉर्कर’मधील लेखांतून जगासमोर आणली होती. त्यावरचे त्याचे पुस्तकही गत वर्षी ‘हॅचेट’नेच प्रसिद्ध केले आहे. असे असताना, तसेच लैंगिक शोषणाचे आरोप असणाऱ्या अ‍ॅलन यांचे पुस्तक ‘हॅचेट’ने आणावे, यास रॉनन आणि त्याची बहीण डीलन हिनेही विरोध केला. इतकेच नव्हे, तर ‘हॅचेट’च्याच तब्बल ७५ कर्मचाऱ्यांनी आपल्या न्यू यॉर्कमधील कार्यालयावर निषेधमोर्चा काढला.. आणि अखेर ‘हॅचेट’ला माघार घ्यावीच लागली.