कन्नडमधले भैरप्पा जसे उमा विरूपाक्ष कुलकर्णीमुळे मराठीत आले, तसं काहीसं हान कँग आणि डेबोरा स्मिथ यांचं होणार आहे. यापैकी हान कँग ही दक्षिण कोरियातली लेखिका आणि डेबोरा स्मिथ ही ब्रिटिश अनुवादक. डेबोरानं हान कँगच्या ‘द व्हेजिटेरियन’ ‘ह्यूमन अ‍ॅक्टस्’ या कादंबरीचाही अनुवाद केलेला आहे आणि हानच्याच आणखी तिसऱ्या कादंबरीचा डेबोराकृत अनुवाद २०१७ सालात येतो आहे. अर्थात, ‘मॅन बुकर इंटरनॅशनल’ पारितोषिकाचं वलय या दोघींच्या पहिल्याच पुस्तकाला- म्हणजे २०१५ सालच्या ‘द व्हेजिटेरियन’ला मिळालं आहे.
हान कँगचं घरच साहित्यात रमलेलं. तिचे वडील हान सेउंग-वॉन हेही कादंबरीकार होते आणि मोठा भाऊ हान डाँग रिम हाही लेखक आहे. हान कँग आता पंचेचाळिशीची असली, तरी वयाच्या पंचविशीपासून तिच्या कविता वगैरे प्रकाशित होत राहिल्या होत्या.. लहानपणापासूनच लेखन सुरू केल्याची फळं तिला वेळोवेळी मिळत राहिली. अगदी पुरस्कारसुद्धा, २००५ सालापासून मिळत गेले.. फरक इतकाच की, ते सारे पुरस्कार प्रतिष्ठित मानले जात असले तरी दक्षिण कोरियापुरते होते. यामुळेही असेल, पण ‘हा तुमच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण आहे का? असं ‘मॅन बुकर इंटरनॅशनल पारितोषिक स्वीकारल्यानंतर हान कँगला विचारण्यात आलं तेव्हा ती डोळय़ांतला गोंधळ न लपवता म्हणाली- ‘‘तसे आनंदाचे क्षण बरेच आले, प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात ना तसे तर.. आणि ते सारे क्षण खासगीसुद्धा असतात.. पुरस्काराचा आनंद काय, विसरला जाईल कधीतरी.. पण मी लिहीत राहीन की नाही हे महत्त्वाचं ना? ’’
लिखाणामागची तिची प्रेरणा अगदी स्पष्ट आहे- ‘‘ जीवनातले प्रश्न मांडणे.. मानवी आयुष्याला भेडसावणारे प्रश्न- ते कितीही कठीण किंवा न सांगण्याजोगे असले तरी- सांगणे’’. मानवी आयुष्याचं स्वरूपच प्रश्न पडण्यातून बनलेलं आहे, असं ती मानते. अर्थात, तिच्या साहित्यातले प्रश्न हे ‘वादां’ची (इझम्सची) माहिती असलेला माणूस आणि याच माणसांनी बनलेला पण व्यवहारात कोणत्याही वादाची बूज न राखता जगणारा जागतिकीकरणोत्तर समाज यांबद्दलचेही आहेत.
डेबोरा स्मिथ यांना या प्रश्नांबद्दल आस्था असेलही, पण त्यांची खरी तगमग दोन्ही कोरियांमधलं- म्हणजे हुकुमशाही राजवटीखालच्या उत्तर कोरियातलं सुद्धा- साहित्य इंग्रजीत भाषांतरित व्हावं, ही असल्याचं दिसतं. दक्षिण कोरियन लेखकांची एकंदर पाच (त्यापैकी तीन हान कँगचीच) पुस्तकं अनुवादित करून झाल्यावर ‘बंडी’ या टोपणनावानं लिखाण करणाऱ्या आणि आजही उत्तर कोरियातच राहणाऱ्या एका लेखकाच्या कथांचा अनुवाद त्यांनी केला आहे. या ‘बंडी’च्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे तपशील मात्र अद्याप जाहीर झालेले नाहीत.
डेबोरा स्मिथ यांचं वैशिष्टय़ म्हणजे, हे सारं काम त्यांनी गेल्या पाच वर्षांतच केलं आहे. इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर कोरियन भाषा आणि कोरियन साहित्य यांचा अभ्यास त्यांनी सुरू केला, ते साल होतं २००९! त्यानंतर अल्पावधीत हा झपाटा स्मिथ यांनी दाखवला आहे. ब्रिटनमधल्या तरी, त्या एकमेव प्रकाशित कोरियन-इंग्रजी साहित्यानुवादक आहेत.