News Flash

‘लाल भीती’ची अमेरिकी चित्तरकथा..

अमेरिकी ‘वाइल्ड वेस्ट’. काळ विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा.

 ‘हाय नून’ (१९५२) चित्रपटात गॅरी कूपर (शेरीफ) आणि ग्रेस केली (एमी)

|| नंदा खरे

ही गोष्ट चित्रपटातल्या ‘एकटय़ा’ शेरीफची नाही.. त्याची पटकथा लिहिणाऱ्या कार्ल फोरमनविषयी अनेक अप्रकाशित तपशील इथं आहेत, पण ती त्याचीही नाही. एकटंच लढावं लागणाऱ्या अनेकांची आहे ती..

अमेरिकी ‘वाइल्ड वेस्ट’. काळ विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा. गावांमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा दर्जा शेरीफच्या पिस्तूलबाजीतल्या चपळाईवर अवलंबून असणारा. शेरीफ गावकऱ्यांनी निवडून नोकरीवर ठेवलेला; सरकारी नव्हे. न्यायदान मात्र सरकारी; पण न्यायाधीश गावकऱ्यांनी निवडून नोकरीवर ठेवलेला. एक गाव हॅडलीव्हील्.

शेरीफ विल् केन सज्जन आणि कार्यक्षम; पण आता निवृत्त होऊन, लग्न करून गाव सोडायच्या तयारीत असलेला. त्याची भावी पत्नी एमी धार्मिक आणि शांतताप्रिय क्वेकरपंथी असते. लग्न लागते एका रविवारी, सकाळी साडेदहाला. दहाच मिनिटांत एक वाईट बातमी येते- शेरीफने तुरुंगात पाठवलेला फ्रँक मिलर हा गुंड सुटून दुपारी बाराच्या गाडीने येतो आहे. त्याचा धाकटा भाऊ  आणि इतर दोन गुंड पोहोचलेले आहेत. मिलर आला की, चौघे मिळून केनचा काटा काढणार!

एमी नव्या नवऱ्याला पटवू पाहत असते, की तत्काळ घोडागाडीने गाव सोडावे. शेरीफ मात्र ‘मी आजपर्यंत कशापासूनही पळालेलो नाही’ म्हणतो. मिलर-गँग शोधून काढून मारेल ही शक्यताही असतेच. पण उतारवयाचा शेरीफ चार-चार पिस्तूलबाजांशी एकटा लढणार कसा! तो साथीदार शोधू लागतो, तर एमी नाराजीने सामान आवरून बाराच्याच गाडीने गाव-नवरा सोडायचे ठरवून स्टेशनाशेजारच्या हॉटेलात थांबते.

मिलरला शिक्षा सुनावणारा न्यायाधीश पळायच्या तयारीत असतो. चर्चमध्ये सारा गाव असतो, पण शेरीफ-एमीचे लग्न चर्चबाहेरच झालेले असल्याने धर्मगुरू नाराज असतो. ‘हत्या करू नये’ अशी धर्माज्ञा असल्याचे सांगत तो मदत नाकारतो; आणि अर्धा गावही सुटकेचा श्वास सोडतो. शेरीफचा अपक्व, पोरकट सहायक अट घालतो की, शेरीफपद आपल्याला दिले तरच आपण लढायला उभे होऊ. शेरीफला मात्र हा सहायक नालायक वाटत असतो, आणि तसाही नवा शेरीफ निवडण्याचा अधिकार गावकऱ्यांचा असतो, शेरीफचा नाही.

यात एक उपकथानक असते की, एक अमेरिकी-मेक्सिकी मिश्रवंशी स्त्री आधी मिलरची, मग शेरीफची आणि शेरीफ एमीकडे वळल्यावर या सहायकाची ‘प्रेमिका’ असते, आणि आता मिलरच्या धाकाने गाव सोडायची तयारी करून हॉटेलात बसलेली असते; एमीशी बोलत! ती एमीचं मन विचलित करते. म्हणते, ‘मी नसतं माझ्या माणसाला सोडलं अशा वेळी.’ आता एमीही शेरीफला मदत करायच्या मानसिक तयारीला लागते!

शेवटचा प्रयत्न म्हणून ज्याने आपल्याला इथे आणले, जोपासले, त्या ‘माजी’ शेरीफकडे ‘आजी’ शेरीफ जातो. तोही वय, संधिवात वगैरे कारणे देत मदत नाकारतो.

भर मध्यान्ह.. ऌ्रॠँ ठल्ल! आगगाडी येते. मिलर साथीदारांना भेटतो. गावाचा मुख्य रस्ता मात्र निर्मनुष्य असतो. कोणीच घराबाहेर पडत नाही.

मिलरचा भाऊ   झ्याकीत पुढे होतो आणि शेरीफला बळी पडतो. एक साथीदार डावपेचांत चुकतो आणि मारला जातो. उरलेला साथीदार आणि शेरीफ एकमेकांवर गोळ्या झाडतात. शेरीफ जखमी होतो, तर गुंड मरतो. मिलर जखमी शेरीफला मारणार तोच एमी मधे पडायला जाते. मिलर तिचा ‘मानवी ढाली’सारखा उपयोग करून शेरीफला गोळी झाडण्यापासून थांबवू पाहतो, तर एमी वळून त्याचा चेहरा ओरबाडते. मिलर असा विचलित होत असताना शेरीफ त्याला मारतो. जखमी शेरीफ आणि एमी गाव सोडतात.

शेरीफ मात्र, पदाची खूण असलेली टिनाची ‘चांदणी’ रस्त्यावरच्या डबक्यात टाकून देतो.

ही आहे ‘हाय नून’ (१९५२) या हॉलीवूड चित्रपटाची गोष्ट. हा ‘लो बजेट’ (साडेसात लाख डॉलर्स) चित्रपट आजवर सव्वा कोटी डॉलर्स कमावून आहे! पुरस्कार आणि त्यासाठीची नामांकने यांचा चित्रपटावर वर्षांव झाला आहे. नव्वदेक मिनिटांची ‘रीअल टाइम’ नव्वदेक मिनिटांत दाखवणे अनेकांना अनुकरणीय वाटले आहे. समीक्षकांमध्ये मात्र भक्त आणि शत्रू असे विभाजन आहे! आज चित्रपटाचा इतिहास वाचताना तोंडात कडू चव येते, कारण तो अमेरिकी इतिहासातल्या एका काळ्या युगाची खूण मानला जातो.

‘रेड स्केअर’

साम्यवाद सुरुवातीपासून भांडवलवादाविरोधात आहे. १९१७ च्या रशियन क्रांतीनंतर कट्टर भांडवलवादी अमेरिकेत रशियाच्या नव्या राज्यकर्त्यांविषयी घृणा आणि भीती उपजली. परंतु काही अमेरिकी (आणि खूपसे युरोपीय!) लोक साम्यवादी झाले. त्यांचा ‘अमेरिकन कम्युनिस्ट पक्ष’ प्रस्थापित अमेरिकी व्यवस्थेला घाबरवू लागला. याला ‘रेड स्केअर’ (red scare) किंवा ‘लाल भीती’ म्हटले गेले. अमेरिकी राज्यघटनेच्या पहिल्या सुधारणेनुसार (फर्स्ट अमेन्डमेंट) कोणालाही कोणत्याही विचारधारेची संघटना घडवायची मोकळीक आहे; हा या कम्युनिस्ट पक्षाचा कायदेशीर आधार आहे.

दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि काही काळ जर्मनी-रशिया यांच्यात ‘ना-आक्रमण’ करार झाला. यामुळे अमेरिकी कम्युनिस्ट पक्षातून बहुतांश लोक बाहेर पडले, कारण फॅसिस्ट जर्मनीबद्दल लोकांत तीव्र नावड होती. परंतु लवकरच जर्मनीने रशियावर हल्ला केला, जपानने अमेरिकी पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिका इंग्लंड-रशियासोबत युद्धात उतरली. युद्धकाळात रशिया, अमेरिका सलोख्याने वागले. युद्धानंतर मात्र पुन्हा भांडू लागले. त्यातच अनेक लोक रशियातर्फे अमेरिकेवर हेरगिरी करतात हे उमजू लागले. आणि ‘रेड स्केअर’ नव्याने तीव्र झाली! अमेरिकी फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) साम्यवाद्यांवर जोमदार पाळत ठेवू लागली. पक्षाच्या सदस्यांपैकी अर्धेअधिक एफबीआय एजंट होते, अशी वदंता होती! याला सीनेटर जोसेफ मॅकार्थीचे पाठबळ होते. माजी सैनिकांसाठीची ‘अमेरिकन लीजन’, त्याची महिला शाखा असल्यासारखी ‘डॉटर्स ऑफ द अमेरिकन रेव्होल्यूशन’ ही संस्था, वगैरेही सक्रिय ‘लाल-शिकारी’त सामील झाले.

१९५१ साली रोझेनबर्ग हे निर्वासित ज्यू दाम्पत्य रशियातर्फे हेरगिरी करताना पकडले गेले आणि ‘इलेक्ट्रिक चेअर’ वापरून त्यांना देहान्ताची शिक्षा ठोठावली गेली. लाल-भीती अमेरिकाभर पसरली! तिचे रूपही खास अमेरिकी होते. ज्यू, निर्वासित (तेही युरोपातून आलेले!) आपोआप साम्यवादी मानले जात. उदारमतवादी आणि साम्यवादी यांमधला फरक फारसा दखलपात्र मानला जात नसे! त्यातच अनेक लोक एखाद्दोन वर्षांपासून चार-सहा वर्षांपर्यंत कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेले होते.

हॉलीवूड आणि एचयूएसी

..आणि या वर्णनातल्या लोकांचा मोठा गट हॉलीवूड चित्रपटसृष्टीत होता- ज्यू उदारमतवादी, युरोपीय निर्वासित किंवा त्यांची पहिल्या पिढीतली प्रजा! हॉलीवूडही एका वेगळ्या आर्थिक अरिष्टातून जात होते. कलाकारांना माहवारी पगाराच्या कंत्राटांमध्ये बांधून ठेवणारे स्टुडिओज् आणि लहानसे स्वतंत्र निर्माते यांच्यात स्पर्धा होती. प्रस्थापित स्टुडिओज् आपल्या कंत्राटी नोकरांना एक ‘नीती-कलम’ (morals clause) वापरून बांधून ठेवत होते. यात नायक-नायिकांपासून ‘पोऱ्यां’पर्यंत सारेच दमात घेतले जात. आता ‘नीती’सोबत एक ‘निष्ठा-शपथ’ (loyalty oath) आली. ‘मी कम्युनिस्ट पक्षाचा/पक्षाची सदस्य नाही आणि देशविघातक असे काहीही केलेले नाही’- अशी लेखी शपथ वारंवार घेणे सक्तीचे झाले.

याला आधार होता सीनेटर मॅकार्थीच्या प्रेरणेतून घडलेल्या ‘हाउस अन्अमेरिकन अ‍ॅक्टिव्हिटीज् कमिटी’ (एचयूएसी)चा! ही संसदीय समिती खरे तर न्यायदान करू शकत नसे. अमेरिकी राज्यघटना विधिमंडळ, मंत्रिमंडळ आणि न्यायपालिका यांचे अधिकार स्पष्टपणे वेगळे ठेवावे असे सांगते. परंतु एचयूए कमिटी एफबीआयच्या मदतीने सारेच काही करू लागली. आणि कमिटीला विरोध म्हणजे देशद्रोह, असा व्यवहारात अर्थ निघू लागला. कमिटी निष्ठा-शपथेपुढे जाऊन ‘मी कम्युनिस्ट पक्षाचा/ पक्षाची सदस्य कधीही नव्हतो/ नव्हते’ असे म्हणायला सांगू लागली.

काही एफबीआय एजंटांनी पक्ष-कार्यालयांतून काही सदस्ययाद्या मिळवल्या. आता कमिटी चौकशांमध्ये ‘आणखी कोणी कम्युनिस्ट माहीत आहेत का?’ हा प्रश्न विचारला जाऊ  लागला. चुगलखोरी हेच देशप्रेम ठरू लागले! आजी-माजी साम्यवाद्यांची एक ‘ब्लॅक लिस्ट’ घडली. निर्माते अशी यादी वापरून संशयितांना नोकऱ्यांवरून कमी करू लागले. चौकशीत जरा जरी कायदेशीर चूक झाली तर शपथेवर खोटे बोलणे (perjury) हा आरोप देशद्रोहासोबत लावला जाऊ  लागला. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबतीत अपील करण्याचे अधिकार नाकारले, हे लक्षणीय आहे.

चित्रीकरण

स्टॅन्ली क्रेमर या सर्जनशील निर्मात्याने दिग्दर्शक फ्रेड झिनेमन, पटकथालेखक कार्ल फोरमन आणि इतर चांगले कलाकार-तंत्रज्ञ एकत्र करून स्टुडिओंना आव्हान देणारी एक लहानखुरी कंपनी घडवली होती. १९५१ साली फोरमनला एक ‘वाइल्ड वेस्ट’ गोष्ट सुचली. तिच्यावर चित्रपट काढायची क्रेमर-कंपनीची इच्छा होती. जवळपास तीच गोष्ट १९४७ साली जॉन कनिंघ्ॉमने ‘द टिन स्टार’ नावाने लिहिली होती, जिचे हक्क फोरमनने विकत घेतले.

नायक ठरला गॅरी कूपर हा ‘सुपर स्टार’. कूपर क्रेमर-कंपनीच्या डाव्या उदारमतवादापासून खूप दूर, खूप ‘उजवी’कडे होता. पण आता कूपर उतरणीवर होता. त्याला ‘हिरोगिरी’पेक्षा चरित्र भूमिकेला जवळचे काम आवडले. नायिका होती नवी कोरी सुंदरी ग्रेस केली! इतर भूमिकांसाठीही ओळखले जातीलसे सक्षम नट सापडले. एक पोवाडय़ासारखे सूत्रगीत रचायला दिमित्री टिओम्किन हा रशियन निर्वासित मिळाला, धड इंग्रजी न येणारा. पण अडचणीही होत्या. पैसे नगण्य होते. क्रेमर एका स्टुडिओशी वर्षांला दहा चित्रपटांचा करार करण्यात गुंतल्याने फोरमनच वास्तवात निर्माता होता.

..आणि तिकडे मार्टिन बर्कली या दुय्यम दर्जाच्या पटकथाकाराने ‘संभाव्य कम्युनिस्ट’ म्हणून फोरमनचे नाव घेतले! बर्कली नुसताच कम्युनिस्ट नव्हता, तर पक्षाच्या हॉलीवूड शाखेची स्थापनाच त्याच्या घरी झाली होती. आता मात्र पहिल्याच चौकशीत त्याने दीडशे ‘नावे घेतली’; जो आकडा पुढे १८९ ला गेला. पण बर्कली फोरमनला धड ओळखतही नव्हता. पुढे १९५२ सालाअखेरीला फोरमनने बर्कलीला ‘‘आपण एक-दोनदाच भेटलो, तेही पक्षबैठकींत नाही’’ असे सांगितले. बर्कलीला धड काहीच आठवेना!

फोरमन चौकशीत ‘‘आज मी कम्युनिस्ट पक्षात नाही’’ एवढेच म्हणायला तयार झाला. पूर्वी तो पक्षात होता का, यावर त्याने आपला ‘फर्स्ट अमेन्डमेंट’ अधिकार घोषित केला. नावे घ्यायला मात्र त्याने ठाम नकार दिला. चौकशीची सत्रे होत गेली. एकेक साथीदार गळत गेला. अनपेक्षितपणे खंबीर वाटणारे लोक ‘नावे सांगून’ शिक्षा सौम्य करवून घेऊ  लागले. फोरमन मात्र ना जुन्या सदस्यत्वाची कबुली देत होता, ना चुगली करत होता. अर्थातच तो ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये गेला. हॉलीवूडमध्ये काम मिळेनासे झाले. न्यू यॉर्कमध्ये नाटय़क्षेत्रानेही काम नाकारले. अखेर फोरमन लंडनला गेला. तिथे इतरही ‘ब्लॅक लिस्ट’वाले होते.

निनावी निर्वासित

सुरुवातीला या निर्वासितांना स्वत:च्या नावांवर काम करता येत नव्हते. परंतु ब्रिटन अमेरिकेइतका लालद्वेष्टा नव्हता. रोझेनबर्गापेक्षा जास्त महत्त्वाची अणु-गुहय़े रशियास देणाऱ्या क्लॉज फुक्सला ब्रिटनने दहा वर्षेही कैदेत ठेवले नाही; देहान्त तर सोडाच.

तिकडे ‘हाय नून’ प्रदर्शित होऊन अत्यंत यशस्वी झाला. परंतु यशाला अनेक आईबाप असतात, तर अपयश पोरके असते. क्रेमरचे नाव निर्माता म्हणून जाहीर झाले, तर फोरमनला फक्त पटकथेचे श्रेय दिले गेले. फिल्मसंपादक, संगीतकार, गीतकार, कूपर यांना ऑस्कर्स मिळाली. क्रेमर, फोरमन, झिनेमन यांना नामांकनावर बोळवले गेले.

ब्रिटिश लोकशाही!

फोरमनला अमेरिकेने पारपत्र रद्द करण्याची धमकी दिली. तो वकील लावून न्यायालयात गेला व पुढे जिंकलाही. पण परतणे धोक्याचे होते. त्याचे लग्नही मोडले. ‘ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ची पटकथा माइक विल्सन व फोरमनची होती, पण ऑस्कर पिएर बूलला मिळाले. तो मूळ फ्रेंच कादंबरीचा लेखक होता, पण त्याला इंग्रजी येत नव्हते! तो समारंभाला गेला नाही. ऑस्कर पोस्टाने दिले गेले! पटकथाही डेव्हिड लीनच्या नावावर नोंदली गेली.

‘द माऊस दॅट रोअर्ड’ (१९५९), ‘गन्स ऑफ नॅव्हारोन’ (१९६१), ‘बॉर्न फ्री’ (१९६६), ‘मॅकेनाज् गोल्ड’ (१९६९), ‘यंग विन्स्टन’ (१९७२) अशा महत्त्वाच्या चित्रपटांच्या पटकथा फोरमनच्या आहेत. ‘यंग विन्स्टन’ या विन्स्टन चर्चिलच्या तरुणपणावरच्या चित्रपटासाठी फोरमन चर्चिलला भेटला. ‘‘मी अमेरिकेत ब्लॅक लिस्टवर आहे’’ हे त्याने सांगून टाकले. चर्चिल म्हणाला, ‘‘आम्हाला ब्लॅक लिस्टा आवडत नाहीत. चांगले काम कर म्हणजे झाले.’’ हा परिपक्व ब्रिटिश लोकशाहीचा अमेरिकी पोरवडय़ावरचा शेरा!

उदार  सर्जनशीलता

उदारमतवादात जबाबदारीची जाणीव अनुस्यूत आहे आणि बंधुभावही. मतभेद सहन करणे, त्यांचा आदर करत वाटा शोधणे हे स्थितिवाद्यांना रुचत नाही. ते सहज बंडखोरीचे, ‘डावेपणा’चे आरोप करतात. पण जग बदलते ते उदारमतातूनच. सर्जनशीलता, नवनवोन्मेष तिथेच आढळतो; स्थितिवादात नाही.

कार्ल फोरमनची कथाही काहीशी समांतर आहे. त्याच्यावर टीका करणाऱ्यांमध्ये भावी राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रीगन, पाश्चिमात्य चित्रपटांचे दैवत जॉन वेन, प्रसिद्ध ‘कुजबुज वार्ताहर’ हेडा हॉपर, वगैरे लोक होते. एके काळचा फोरमनचा मित्र स्टॅन्ली क्रेमरही ‘हाय नून’च्या निर्मातेपदाचे श्रेय घेताना फोरमनच्या विरोधातच गेला. अनेक जण सुचवत की, जाहीर झालेल्या नावांपैकीच काही ‘नावे सांगून’ स्वत:ची सुटका करून घ्यावी. फोरमन मात्र मित्रांशी निष्ठावान राहिला.

एक अपवाद गॅरी कूपरचा, ज्याने कधीही फोरमनवर टीका केली नाही. पुढे फोरमनने ‘गन्स ऑफ नॅव्हारोन’साठी कूपरचा विचार केला. पण कूपर शेवटच्या आजारात होता, आणि काम ग्रेगरी पेकला गेले. अखेर १९७३ च्या आसपास हवा बदलली. एचयूए कमिटी बंद पडली आणि फोरमन अमेरिकेला परतला. तर काय-

सगळीकडून मदत नाकारली गेलेला शेरीफ एकाकी रस्त्यावर चालत दुष्टाव्याला सामोरा जात राहतो. कधी कधी जिंकतोही!

  • ‘हाय नून : द हॉलीवूड ब्लॅकलिस्ट अ‍ॅण्ड द मेकिंग ऑफ अ‍ॅन अमेरिकन क्लासिक’
  • लेखक : ग्लेन फ्रँकेल
  • प्रकाशक : ब्लूम्सबरी
  • पृष्ठे : ४००, किंमत : सुमारे ९५० रुपये

 

nandakhare46@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 1:49 am

Web Title: high noon the hollywood blacklist and the making of an american classic
Next Stories
1 शुद्ध बफेबाजी!
2 राष्ट्रवाद की अतिराष्ट्रवाद?
3 चित्रपट-विरोधकांना ‘नक्षल’ ठरवण्यासाठी पुस्तक?
Just Now!
X