‘चार खंडांच्या खास खोका-बांधणीत एकंदर २४३२ पानांचा ऐवज अधिक एक सीडी, तब्बल १४९४ ऐतिहासिक प्रतिमांसह एकंदर २२२१ छायाचित्रे.. ३० मार्च २०१६ पूर्वी नोंदणी केल्यास किंमत ३९९ युरो, प्रकाशनानंतरची किंमत ४९९ युरो, ट.ख. निराळा’ अशा वर्णनाचं हे पुस्तक अ‍ॅडॉल्फ हिटलरबद्दल आहे. या हिटलरनं १९४५ सालच्या ३० एप्रिल रोजी स्वतच्या डोक्यात गोळी झाडून भ्याडमरण पत्करलं, या घटनेला आज ७० र्वष पूर्ण होताहेत. या निमित्तानंच, या पुस्तकाच्या खंडांचं प्रकाशन २७ एप्रिल रोजी बर्लिनमध्ये करण्यात आलं. पुस्तक सध्या जर्मन भाषेतच उपलब्ध असलं तरी त्याचं नाव इंग्रजीत ‘हिटलर : ईटिनेररी, व्हेअरअबाउट्स अँड ट्रॅव्हल्स (१८८९-१९४५)’ असं सांगता येतं आहे. हिटलरचा प्रवास कुठून कुठे झाला, हे या पुस्तकात आहेच, पण पुढे, हिटलरशाही प्रस्थापित झाल्यावर हा नेता कुठेकुठे गेला, अनेक देशांत त्याचं कसं हृद्य किंवा जंगी स्वागत झालं, तोवरच्या कोणत्याही जर्मन नेत्याला मिळाला नसेल असा मान हिटलरलाच कसा मिळाला, वगैरे वर्णनंही इथं आहेत.
‘हिटलर जगला ते ११, ४३३ दिवस लोकांपुढे मांडायचा मी प्रयत्न केला. हिटलरबद्दल ८० अभ्यासपूर्ण पुस्तकं आहेत, पण माझं पुस्तक यापुढल्या अभ्यासकांना उपयोगी पडेल. हिटलरच्या मोटारीचे टायर कोण आणत असे? हिटलरने कोणते चित्रपट पाहिले, त्यापैकी कोणता आवडला? अशीही माहिती इथे मिळेल’ असं पुस्तकाचे संशोधक-लेखक हॅराल्ड सँडनर यांचं म्हणणं आहे. म्हणजे हे जंत्रीवजा संकलन आहे.. ही जंत्री वैयक्तिक आहे तसंच कार्यक्षमतेचा अंदाज देणारीही आहे. या संकलनामागे कोणत्याही लेखकीय भूमिकेचं बळ नाही. केवळ जर्मनीतच नव्हे तर अन्य युरोपीय देश आणि अमेरिका इथले खुले झालेले अभिलेख या पुस्तकातल्या माहितीचा पाया ठरले आहेत.
पुस्तकातली माहिती बिनतोड, चोख असल्याचा निर्वाळा काही तज्ज्ञ देताहेत. ती खरोखरच पुढल्या अभ्यासकांना उपयोगी पडू शकते. पण या अशा माहितीवरून कोणता निष्कर्ष काढणार? ‘तारीख अमुकअमुक – म्युनिककडे प्रयाण’ मग दुसऱ्या दिवशीची तारीख- ‘ सकाळी १० : कारखान्याला भेट, कामगारांशी हितगुज’ , ‘ दुपारी ४ : तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन’ असे तपशील या माहितीमधून मिळत राहातात. हिटलरने कोठे काही खास आवाहन केले असेल, त्यातून धोरणाची दिशा स्पष्ट झालेली असेल, तर त्याचीही नोंद या पुस्तकात घेतलेली आहे. हल्लीचे नेते ट्विटरवरून आपल्या कार्यक्रमांची माहिती देत असतात आणि भाषणांतील निवडक महत्त्वाचा तपशीलही सांगत असतात. त्याची आठवण हे पुस्तक वाचताना येऊ शकते, ती या वैशिष्टय़ांमुळे. पुस्तकातील पानाची प्रतिमा सोबत आहे, ती नीट पाहिल्यास परिच्छेद हे तारीख वा वेळेनुसार पाडले असल्याचे लक्षात येईल. हिटलरची काही दुर्मीळ म्हणावी अशी छायाचित्रेही आहेत.
अभ्याससाधन म्हणून ठीक, पण हिटलरला समजून घेण्यासाठी हे पुस्तक अपुरं ठरेल. मात्र या पुस्तकाचा आणखी एक उपयोग आहे- जगभरातील अनेक देशांत आज उदयाला येणाऱ्या नव्या ‘लोकप्रिय आणि ठाम’ नेत्यांच्या व्यक्तिमत्त्वांची विश्लेषणं करण्याआधी, हिटलरनं दाखवलेला अथक कामाचा झपाटा, त्याची लोकप्रियता, त्याचे दौरे यांची माहिती असलेली बरी!

narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा