|| शशिकांत सावंत

  • ‘लेफ्ट बँक : आर्ट, पॅशन अ‍ॅण्ड द रीबर्थ ऑफ पॅरिस १९४०-१९५०’
  • लेखिका : अ‍ॅग्नेस पॉरियर
  • प्रकाशक : ब्लूम्सबरी
  • पृष्ठे : ३७७, किंमत : ५९९ रुपये

‘पॅरिस ही एक निरंतर चालणारी मेजवानी आहे,’ असं अर्नेस्ट हेमिंग्वे म्हणायचा.  विसाव्या शतकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दशकांत पाब्लो पिकासो- हेन्री मातीस यांसारखे चित्रकार, गट्र्रय़ूड स्टाइनसारखी लेखिका, अर्नेस्ट हेमिंग्वे-जेम्स जॉइस सारखे लेखक, अपोलोनीएर, एझरा पाउंड, टी. एस. एलियटसारखे कवी, स्ट्राव्हिन्स्कीसारखा संगीतकार हे सारे पॅरिसमध्ये होते. त्यामुळे पॅरिसच्या समृद्ध अशा या दशकांबद्दल बरंच लिहिलं गेलं आहे. मात्र, तितक्याच महत्त्वाच्या असणाऱ्या महायुद्धकालीन आणि युद्धोत्तर परिस्थितीतल्या चौथ्या-पाचव्या दशकातील पॅरिसच्या सांस्कृतिक जगण्याविषयी फारसं लेखन प्रसिद्ध झालेलं नाही.

अलीकडे आलेली ‘एग्झिस्टेन्शिअल कॅफे’ आणि ‘लेफ्ट बँक’ ही पुस्तकं या काळाचं ‘डॉक्युमेंटेशन’ करतात. सीन नदीकडच्या ‘लेफ्ट बँक’ म्हटल्या जाणाऱ्या भागात जवळपास छत्तीसेक कवी, लेखक, चित्रकार मंडळी केवळ पाच-सहा किलोमीटर अंतराच्या परिघात एकाच वेळी राहात होती. आणि थोडं दूरवर सॅम्युएल बेकेटसारखा लेखक राहात होता. या मंडळींमध्ये जाँ पॉल सात्र्, अल्बेर काम्यू, सिमोन द बोव्हुआर, आर्थर कोस्लर हे लेखक-विचारवंत, नॉर्मन मेलरसारखा अमेरिकी लेखक, जेम्स जॉइस-रिचर्ड राइटसारखे लेखक, अल्बर्तो जियाकोमेतीसारखा शिल्पकार, जॅनेट फ्लॅनरसारखी ‘न्यू यॉर्कर’ची पत्रकार, अलेक्झांडर काल्डरसारखा ‘मोबाइल शिल्प’कार अशा अनेकांचा समावेश होता.

एकीकडे दुसरं महायुद्ध सुरू होतं, त्याचवेळेस अल्बेर काम्यू हा नाझीविरोधी काम करणाऱ्या एका फ्रेंच गटात सहभागी झाला होता. याच काळात त्याची भेट सात्र्शी झाली. दोघांच्या त्या पहिल्या भेटीचा प्रसंग होता- सात्र्च्या ‘द फ्लाइज’ या नाटकाची रंगीत तालीम! त्या वेळी सार्त् ‘सोशलिझम अ‍ॅण्ड लिबर्टी’ या गटात कार्यरत होता. पुढे तो ‘ले टेम्स मॉडेर्नस्’ (मॉडर्न टाइम्स) या नावाचं नियतकालिक चालवू लागला. चार्ली चॅप्लिनच्या ‘मॉडर्न टाइम्स’वरून ते नाव घेतलं होतं. त्यात अनेक लेखक त्यांची भूमिका मांडत होते.

युद्धकाळात पॅरिसमधले कॅफे, थिएटर्स चालू होते, मात्र काही आर्ट गॅलऱ्या बंद पडल्या होत्या. रेल्वे स्थानकं विजेअभावी बंद होती. ‘लूव्र संग्रहालया’मधून ‘मोनालिसा’ आणि शेकडो चित्रं नाझींच्या नजरेपासून सुरक्षित ठेवायची म्हणून काढून टाकण्यात आली होती. पॅरिसला चार र्वष नाझींचा विळखा पडला होता.

‘लेफ्ट बँक’ या पुस्तकात अ‍ॅग्नेस पॉरियर या लेखिकेने हाच काळ जिवंत केला आहे. १९४० ते १९५० असा दशकभराचा काळ यात येतो. पॉरियर ही मुळात पॅरिसमधील लेखिका. शिक्षण आणि पत्रकारितेसाठी ती अमेरिकेत राहिली. या पुस्तकात तिने बारीकसारीक तपशील तर दिले आहेतच, पण अगदी छोटय़ा छोटय़ा तपशिलांचेही पुरावे ती देते.

२३ जून १९४० रोजी हिटलरने पॅरिसमध्ये प्रवेश केला. त्याने आयफेल टॉवरच्या पाश्र्वभूमीवर फोटोही काढून घेतला. त्या वेळी त्याच्याबरोबर उमराव घराण्यातला फ्रान्झ मॅटर्निक हा चित्रकला अभ्यासक होता. याच मॅटर्निकवर फ्रान्समधील चित्रांचा खजिना राखण्याची जबाबदारी होती. एका भल्यामोठय़ा लिमोझिनमधून तो ‘लूव्र संग्रहालया’चा प्रमुख जाक जॉजार याला १६ ऑगस्ट रोजी भेटायला गेला होता. परंतु लूव्र रिकामे झाले होते. यामुळे मॅटर्निकला आश्चर्य वाटल्याचे दिसले. ‘मोनालिसा’सकट लूव्रचा सारा खजिना शेकडो कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी लपविला होता!

याच वेळी पिकासोसारखा चित्रकार व इतर काही जण अल्पकाळ पॅरिस सोडून गेले; पण यथावकाश परतलेही. जीविताबरोबरच पॅरिसचा सांस्कृतिक वारसा जपण्याचीही जबाबदारी साऱ्यांची होती. पिकासोने प्रसिद्ध छायाचित्रकार ब्रासाइ याला आपल्या स्टुडिओत बोलावले होते. जवळपास १७० शिल्पकृती स्टुडिओत होत्या. त्यांची छायाचित्रे काढायची होती. तो काळ कठीणच. तापमान तर शून्यावर आले होते, पण शेकोटीसाठी कोळसा नव्हता. तेव्हा आपल्या जुन्या चित्रांच्या प्रिंट वापरून ब्रासाइने खोलीतच तंबूवजा आसरा उभारला आणि त्या छोटय़ा जागेत स्टोव्ह व दिवा यांच्या धगीचा शेक घेत तो राहू लागला. अशा  या काळातल्या अनेक कहाण्या पुस्तकात तपशीलवार येतात.

नाझी सैनिकांनी अनेक पुस्तके जाळून टाकली, कडेकोट सेन्सॉरशिप लादली. युद्धकाळात सेन्सॉरशिपमुळे पुस्तके छापणे कठीण होते. तेव्हा यातील काहींनी दररोज हस्तलिखित पाने आणायची, छपाईसाठी त्यांचा ब्लॉक बनवायचा व मग पाने जाळून टाकायची आणि छपाईची प्रक्रिया पुढे न्यायची, या पद्धतीने काही पुस्तके छापली.  त्यांच्या इंग्रजी अनुवादातून ती जगभर पोहोचली. यापैकी एक कादंबरी जॉ ब्रूलार याने लिहिली होती. ती याच प्रकारे प्रकाशित झाली आणि लगेच इंग्रजीत अनुवादित झाली. तिचे कथानक विचारप्रवृत्त करणारे होते : एक फ्रेंच माणूस आणि त्याची पुतणी यांना एका जर्मन अधिकाऱ्याला आश्रय देणे भाग पडते. त्याला दुसरे काही नको असते तर ‘मैत्रीचा हात’ हवा असतो. पण दोघेही तो नाकारतात. निराश होऊन तो युद्धावर निघून जातो.. ‘लाइफ’सारख्या अमेरिकी मासिकाने ही कादंबरी क्रमश: छापली. हे वाचताना वाटते की, लेखणी हे जर शस्त्र असेल तर अशा कसोटीच्या काळातच या शस्त्राला धार येते!

ही सगळी कलावंत मंडळी वेगळी होती. त्यांच्या प्रतिभेची बीजं त्यांच्या जगण्या- बोलण्या- वागण्यावर खूप परिणाम करत होती. त्यामुळेच इतरांपेक्षा अधिक राग-लोभ, हेवे-दावे आणि त्याहीपेक्षा अधिक प्रेमप्रकरणं पुस्तकात आढळतात. त्यांचंही वर्णन लेखिकेने हात न राखता केलं आहे. विशेषत: काम्यूची प्रेयसी, किंवा सार्त् आणि काम्यूचं तरुण मुलींच्या प्रेमात पडणं अथवा त्या काळातल्या स्वतंत्र आणि तरुण स्त्रियांचे समलिंगी, विभिन्न लिंगी संबंध हे सारं ती लिहितेच. मुख्य म्हणजे, ती कोणालाही उच्चस्थानी बसवत नाही आणि स्पष्टपणे त्यांच्या चुकांवरही कोरडे ओढते. हा सारा युद्धाचा काळ होता, भोवताली हिंस्र संहार चालू होता; मात्र त्याची छाया पुस्तकावर पडलेली दिसून येत नाही. पण ‘युद्ध संपल्यावर पॅरिसमधील नोत्रेदाम चर्चची तेरा टन वजनाची घंटा वाजवण्यात आली आणि मैलोन्मैल त्याचा आवाज निनादत राहिला’ यासारखी पुस्तकातली वर्णनं इतिहासाचा एक तुकडा जिवंत करतात.

पुस्तकात अनेक उपकथानकं येतात. उदा. सॅम्युएल बेकेटचं नाटककार म्हणून ‘गवसणं’! युद्धकाळात बेकेट एका छोटय़ा घरात त्याच्या मैत्रिणीबरोबर राहात असे. जेवणखाणाची पंचाईत होतीच, पण शेजाऱ्यांच्या रेडिओचादेखील त्याला त्रास होत असे. त्याने रुग्णवाहिका चालवायचे काम युद्धकाळात केले होते. अशा परिस्थितीत हळूहळू त्याने ‘वेटिंग फॉर गोदो’ पूर्ण केलं आणि त्याने ते ब्लीन नावाच्या दिग्दर्शकाला दाखवलं. आधी ते रेडिओसाठी करायचं ठरवलं होतं. पण नंतर त्यांनी ते रंगमंचावर आणलं. दिग्दर्शक व त्याची मित्रमंडळी तगडी असल्याने बेकेटचं नाव सर्वतोमुखी झालं. त्याआधी जेव्हा बेकेटची कादंबरी फ्रेंचमध्ये प्रसिद्ध झाली होती तेव्हा, वर्षभरात तिच्या १२ प्रतीही खपल्या नव्हत्या! सात्र्चे ‘बीइंग अ‍ॅण्ड नथिंगनेस’, काम्यूची ‘प्लेग’ ही कादंबरी आणि बेकेटचे ‘वेटिंग फॉर गोदो’ – असे तिघांचेही अस्तित्ववादी लेखन युद्धकाळात कसे आकार घेत गेले, हा या पुस्तकातला महत्त्वाचा भाग!

पुस्तकात सर्वात तपशिलाने आढळणारी आणखी एक गोष्ट म्हणजे माणसामाणसांची वेगवेगळी नाती आणि त्याचा एकमेकांवर झालेला परिणाम! उदाहरणार्थ, आर्थर कोस्लरची एक भूतपूर्व मैत्रीण पॅरिसमध्येच राहणाऱ्या मॉरिस मल्र्यू-पाँटी या विचारवंताच्या प्रेमात पडली. तिने कोस्लर आपला कसा छळ करत असे आणि त्याने तिला गर्भपात करायला कसं भाग पाडलं, हे त्याला सांगितलं. यानंतर मल्र्यू-पाँटीने कोस्लरवर सडकून टीका करणारे चार लेख लिहिले. ते अर्थातच त्याच्या ‘डार्कनेस अ‍ॅट नून’वर आणि साम्यवादविरोधी विचारसरणीवर हल्ला करणारे होते. पण माणसामाणसांतील नाती त्यांच्या वैचारिक द्वंद्वावर कसं काम करतात, त्याचं हे उदाहरण आहे!

असे किती तरी नातेसंबंधांचे उल्लेख पुस्तकात आढळतात. अर्थातच युद्धकाळ आणि त्यानंतरच्या काळातील राजकारण, समाजकारण यांचं वर्णनही येतंच. उदाहरणार्थ, अमेरिकेने मार्शल प्लॅन आखून जवळपास हजारो कोटी डॉलर्सची मदत युरोपीय देशांना कशी दिली, हे तर यात कळतंच; पण याचबरोबर आपण ज्यांना डावे समजतो त्या सात्र्, कोस्लर, आदी मंडळींना मोरिन नावाच्या तेव्हाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यानेच कसे ‘देशद्रोही’ ठरवले होते, हेही पुस्तकात येतं.

पुस्तकात खरं तर दुसरं पुस्तकच होईल असं एक मोठं कथानक आहे ते पॅरिसमध्ये राहणाऱ्या, पण मूळच्या अमेरिकी लेखक व चित्रकारांचे. त्यांचे युद्ध आणि युद्धोत्तर काळातील दर्शन मनोज्ञ आहे. सॉल बेलो हा अमेरिकी लेखक पॅरिसमध्ये राहत होता. त्याला कादंबरी लिहायची होती, पण काही जमत नव्हते. रचनेसाठी योग्य घाट कसा असावा, यासाठी तो चाचपडत होता. एक दिवस सकाळी फेरफटका मारताना रस्ते धुण्यासाठीचे पाणी त्याला चमचमताना आणि ओघळताना दिसले, तेव्हा अचानक साक्षात्कार व्हावा तसा त्याला रचनेचा घाट सापडला.

अशीच कथा आहे ती लेखक आर्ट बुकवाल्ड, चित्रकार एल्स्वर्थ केली आणि जॉर्ज यंगर्मन अशा अमेरिकी तरुणांची. हे सारे लष्करी कार्यक्रमाचा भाग म्हणून तिथे आले होते. एल्स्वर्थ केलीच्या अगदी जवळच पिकासो, मातीस, जॉर्ज ब्राकसारखे चित्रकार राहत होते, पण कधी त्याला त्यांच्या स्टुडिओचे दार ठोठवायचे धैर्य झाले नव्हते. याच केलीला आपल्या कलेचे सत्त्व आणि स्वत्व इथे सापडले.

नॉर्मन मेलर, जेम्स बाल्डविन, रिचर्ड राइट असे लेखक आणि शिल्पकार अलेक्झांडर काल्डर असे अनेक अमेरिकी पॅरिसच्या संस्कृतीत मिसळून गेले. सात्र्ने दोनदा अमेरिकेचा दौरा केला, तर सिमॉन द बूव्हानेही अमेरिकी विद्यापीठांत व्याख्याने दिली. पॅरिसमध्ये लेखक-विचारवंत जसे समाजकारण व राजकारणात मिसळून गेलेले असतात तसे अमेरिकेत होत नाही, असे सात्र्चे निरीक्षण होते; तर अमेरिकी विद्यापीठीय जग कोरडे शुष्क आणि समाजापासून तुटलेले आहे, असे सिमॉन नोंदवते. सात्र्ने तो संपादित करीत असलेल्या ‘ल टेम्स मॉडेर्नस्’चा एक विशेषांकच अमेरिकेवर काढला व दोन्ही बाजूंच्या लेखकांनी त्यात लिहिले.

पानोपानी जवळपास आठ-दहा टिपा आणि जवळपास १५-२० नावं असणाऱ्या या पुस्तकाला अशा छोटय़ाशा परिचयलेखात पकडणं कठीण आहे. हे पुस्तक विचारवंतांच्या वादविवादांचं व जाहीर मतांचं दर्शन घडवतं तसंच अंतर्गत द्वंद्वाचंही!

ही सर्व मंडळी प्रचंड मद्यसेवन करीत, अमली पदार्थही घेत. सार्त् हा रोज अर्धी बाटली व्हिस्की पिऊन मग झोपेच्या चार गोळ्या घेत असे आणि ड्रग्जही घेत असे, अशा प्रकारचे तपशील यात आढळतात. पुस्तकातील नववे प्रकरण हे प्रेम, ड्रग्ज आणि एकाकीपणावर आहे. या सर्व मंडळींचा तरुणाईवर प्रभाव असल्यामुळे एक मोठी तरुण पिढी व्यसनाधीन झाली किंवा त्यांनी ती व्यसनाधीन केली असा त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळेच ही सारी मंडळी वैचारिक क्षेत्रातील देवदूत असली तरी त्यांचे पंख हे झडलेलेच होते, असं काहीसं लेखिकेच्या मांडणीतून वारंवार आलं आहे.

दीड इंच जाडीचं हे पुस्तक हॉटेलमध्ये बसून वाचत असताना एका वेटरने विचारलं की, बायबल वाचत आहात का? मी ‘नाही’ म्हटलं खरं, पण पुस्तक पूर्ण झाल्यावर वाटलं- अरे, खरंच! हे एक वेगळं बायबलच की!

shashibooks@gmail.com