10 December 2018

News Flash

२०१८ मधला वाचनसोहळा

दरवर्षी  शंभर- किंवा अधिकच- इंग्रजी पुस्तकांचा मराठीत आढावा घेणारं

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

दरवर्षी  शंभर- किंवा अधिकच- इंग्रजी पुस्तकांचा मराठीत आढावा घेणारं, त्यापैकी किमान ५० पुस्तकांचं सविस्तर समीक्षण करणारं ‘बुकमार्क’ हे पान आता सहाव्या वर्षांत पदार्पण करतंय! हे पान म्हणजे विचारांचं अभयारण्य असावं, हे ब्रीद यापुढेही कायम ठेवून २०१८ मध्ये या पानाची नवी घडी उलगडणार आहे.

या ‘नव्या घडी’त एक दरमहा एकदा, तर दुसरं दरमहा दोनदा, अशा प्रकारे प्रकटणारी दोन सदरं हे वैशिष्टय़ असेल. यापैकी महिन्यातून एकदा येणारं सदर आहे महाराष्ट्राविषयीच्या इंग्रजी पुस्तकांबद्दलचं. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या इतिहास विभागातील संशोधक-अभ्यासक राहुल सरवटे यांचं हे सदर मराठीभाषक समाज आणि राज्य, त्या राज्यातलं राजकारण आणि अर्थकारण यांचा ऊहापोह इंग्रजीत कसा झाला, यावर क्ष-किरण टाकणारं ठरेल. सरवटे यांच्याकडे अर्थशास्त्रातील पदवी, तर समाजशास्त्र  विषयात एम. फिल.पर्यंतच्या पदव्युत्तर पदव्या  आहेत. इंग्रजी पुस्तकांची मराठीतील समीक्षा मराठीकेंद्री  असावी, यादृष्टीनं सरवटे यांचं सदर  महत्त्वाचं ठरेल.

एरिक आर्थर ब्लेअर ऊर्फ ‘जॉर्ज ऑर्वेल’ यांचं २०१८ हे ११५ वं जन्मवर्ष. ऑर्वेलची किमान दोन पुस्तकं (१९८४ व अ‍ॅनिमल फार्म) सर्वपरिचित असतात, पण त्याचं निबंधलेखन भारतात दुर्लक्षित आहे. ‘आयआयटी-मुंबई’मधून ऑर्वेलवरच पीएच.डी. केलेले प्रा. मनोज पाथरकर हेऑर्वेलच्या निबंधांची ओळख करून देणारं  पाक्षिक सदर लिहिणार आहेत.

या सदरांखेरीज एक  नवं सदर ‘लोकसत्ता’त पत्रकारिता करणाऱ्यांची थेट-भेट ‘बुकमार्क’च्या वाचकांशी घालून देईल!  ‘लोकसत्ता’चे कर्मचारी ‘बुकमार्क’साठी एरवीही लिहीत असतात, पण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाची थोडक्यात ओळख करून देणारं हे सदर कदाचित, आवडीनिवडींचं वैविध्य जपणारं ठरेल.

पुस्तकाचं समीक्षण त्या-त्या पुस्तकाच्या विषयाचा किंवा लेखकाचा अभ्यास आणि आवड असणाऱ्यांनी करावं, पुस्तक वाचू  इच्छिणाऱ्यांनाच नव्हे तर फक्त समीक्षण वाचणाऱ्यांनाही त्यातून काही ना काही मिळावं, ही अपेक्षा पूर्ण होण्यासाठी विविध क्षेत्रांतल्या जाणकारांना, ज्येष्ठांना, तज्ज्ञांना (आणि बंडखोरांनासुद्धा) ‘बुकमार्क’कडून लिखाणाची खास निमंत्रणं- पुस्तकाच्या प्रतीसह- मिळत राहातीलच. प्रश्न एवढाच आहे की, ‘बुकबातमी आहेच’ हे सांगणं  हा भोचकपणा ठरेल का!

First Published on December 30, 2017 2:35 am

Web Title: loksatta book review