सरत्या वर्षभरात लक्षणीय ठरलेल्या, विस्मरणाच्या चाळणीतूनही शिल्लक राहावीत अशा काही निवडक पुस्तकांची ही धावती पुनर्भेट..

शशी थरूर यांचे ‘अ‍ॅन ईरा ऑफ डार्कनेस : द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया’ (प्रकाशक : अलेफ, पृष्ठे : ३६०, किंमत : ६९९ रु.) हे पुस्तक बरेच गाजले; त्याला यंदाचा मोठय़ा प्रतिष्ठेचा असा ‘रामनाथ गोएंका पुरस्कार’देखील मिळाला. परंतु काही कारणाने ‘बुकमार्क’च्या पानांतून त्याचा परामर्श घेणे राहिले. अत्यंत टोकाची मते संयतपणे कशी मांडावीत, हे थरूर यांच्या या पुस्तकातून शिकावे.. ब्रिटिशांनी भारतासाठी काही म्हणता काहीच केलेले नाही. दिला तो त्रासच, लाभ शून्यच, अशी हटवादी मांडणी थरूर कौशल्याने करतात. फाळणीपूर्व भारतीय उपखंडाची राजकीय एकसंधता हीसुद्धा ब्रिटिशांची देणगी मानण्यास थरूर तयार नाहीत. एरवीही भारत हळूहळू एकसंध किंवा (सत्ताकेंद्रीकरण नसते झाले तरीही) एकात्म झालाच असता, असे स्वप्नवत् विधान तार्किक पातळीला नेण्याचा प्रयत्न थरूर यांनी एका प्रकरणात केला आहे. अन्य प्रकरणांतील विवेचन मात्र साधार आहे. ब्रिटिश अधिकारी भ्रष्टाचारी होते, असेही थरूर दोन-तीन उदाहरणांतून ठसवू पाहतात. हे पुस्तक बाजारात येण्याच्या सुमारास थरूर यांच्या ‘ऑक्स्फर्ड डीबेट’चा व्हिडीओ समाजमाध्यमांतून सर्वदूर पसरत होता; त्याचा सूर पुस्तकापेक्षा निराळा नाही.

2024 25 is the last year for textbooks of I and II
राज्यात पहिली, दुसरीच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष… आता होणार काय?
once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
The order issued by Reserve Bank in February 2013 regarding private banks
अन्यथा: अनुलेखांचं औदार्य!
  • रघुराम राजन यांचे ‘आय डू व्हॉट आय डू’ हे संग्रही असायला हवे ते, रिझव्‍‌र्ह बँकेच्या या माजी गव्हर्नरांची विश्लेषक वृत्ती आणि त्यांचा विवेक यांचे प्रत्यंतर घेण्यासाठी. मुदतवाढ नाकारली, म्हणून राजन यांचे अभ्यासू आणि संवादी व्यक्तिमत्त्व नाकारता येत नाही, हे तर पुस्तकाच्या पानोपानी जाणवत राहते. ‘इन्फ्लेशन टार्गेटिंग’ म्हणजेच नियंत्रित भाववाढ, बँकांचे वैधानिक रोखता प्रमाण आणि संचितीप्रमाण तसेच बँकांच्या स्थितीवर ‘विलीनीकरणा’चा रामबाण उपाय, यांसारख्या विषयांवर राजन यांनी केलेले भाष्य आणि ‘सहिष्णुतेची भारतीय परंपरा’सारखे राजन यांनी कधीमधी हाताळलेले विषय यांचे हे संकलन आहे. या पुस्तकात राजन यांची अनेक भाषणेही आहेत, त्यांपैकी प्रत्येक भाषणाची बातमी त्या-त्या वेळी झाली होती आणि त्यामुळे काही प्रमाणात वादतरंगही उमटले होते, त्यांपैकी काही वादांचा अगदी ओझरता उल्लेख राजन यांनीच प्रत्येक विभागाच्या आरंभी केला आहे. ‘हार्पर बिझनेस’ने प्रकाशित केलेल्या (पृष्ठे : ३४४, किंमत : ३४९ रु.) या पुस्तकाचे परीक्षण आनंद मोरे यांनी केले होते.

**********

  • ‘घाचर घोचर’ (पेंग्विन, पृष्ठे : १२८, किंमत : ३९९ रु.) ही विवेक शानभाग यांची इंग्रजी अनुवादित कादंबरी गेले वर्षभर कथात्म साहित्याच्या वाचकांत बरीच चर्चेत आहे. खरे तर ही शानभाग यांनी कानडीत लिहिलेली दीर्घकथाच. ती श्रीनाथ पेरूर यांनी इंग्रजीत अनुवादित केली आणि कादंबरी म्हणून प्रकाशित झाली. हेही कानडीतील परंपरेलाच धरून झाले. कानडीत अशा दीर्घकथांची, किंवा कथा आणि कविता यांचे मिश्रण असलेली अशी छोटी छोटी पुस्तके कादंबरी म्हणूनच गणली जातात.. तर, शानभाग यांची ही कादंबरी इंग्रजीत प्रकाशित झाली आणि भारतीयच, नव्हे तर जगभरच्या वाचक-समीक्षकांचे लक्ष तिने वेधून घेतले. असे काय आहे या कादंबरीत? गेल्या तिनेक दशकांत, म्हणजे उदारीकरणानंतरच्या काळात, भारतीय मध्यमवर्गात झालेले बदल ही कादंबरी टिपते. बंगळूरुमधील तीन दशकांपूर्वीचे एक कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. आधी आर्थिक कुतरओढीत जगणाऱ्या या कुटुंबाच्या जीवनशैलीत पुढे व्यावसायिक यशानंतर आलेल्या समृद्धीमुळे कसे बदल होत गेले याचे चित्रण ही कादंबरी करते. एका अर्थाने हे आजच्या भारतीय मध्यमवर्गाच्या घडणीचे प्रातिनिधिक उदाहरणच आहे. हे सामाजिक संक्रमण आणि शहरी जीवनातील गुंतागुंत अतिशय साध्या व संयमित निवेदनशैलीत ही १२८ पानी कादंबरी आपल्यापुढे ठेवते. ‘बुकमार्क’मध्ये या कादंबरीवर सरत्या वर्षांत लिहिणे आवश्यक होते, म्हणून घेतलेली ही नोंद. नव्या वर्षांत या कादंबरीचा सविस्तर परिचय वाचायला मिळेलच!

**********

  • विश्वसाहित्य ही संकल्पना आणि त्याभोवतीच्या सैद्धांतिक चर्चेला अनेक कंगोरे आहेत. पास्कल कॅसानोवा, डेविड दमरोश आणि फ्रँको मोरेट्टी यांसारख्या अभ्यासकांनी त्यांच्या मांडणीतून ते दाखवून दिले आहेच. ‘फरगेट इंग्लिश! – ओरिएंटॅलिझम्स अ‍ॅण्ड वर्ल्ड लिटरेचर्स’ (हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, पृष्ठे : २९२, किंमत : ९९५ रु.) हे आमिर मुफ्ती यांचे पुस्तकही विश्वसाहित्याच्या अभ्यासाविषयी अशाच काही पूरक बाबी सुचवू पाहणारे आहे. या पुस्तकाविषयी यंदा ‘बुकमार्क’मधून आपण जाणून घेतले आहेच. मात्र वर्ष सरले तरी काही पुस्तके उरतातच, त्यांत हेही पुस्तक जमा करावे लागते. कॅलिफोर्निया विद्यापीठात तौलनिक साहित्याचे प्राध्यापक असलेल्या मुफ्ती यांनी या पुस्तकात विश्वसाहित्य या संकल्पनेची चिकित्सा केली आहे. विश्वसाहित्य किंवा तौलनिक साहित्यविचारांचे मूळ हे प्राच्यविद्या शाखेत असल्याचे मुफ्ती यांचे म्हणणे आहे. वसाहतवादामुळे आणि पुढे जागतिकीकरणामुळे इंग्रजीचे धुरीणत्व व सत्ताकारण अधिक दृढ झाले असून तेच विश्वसाहित्य या संकल्पनेच्या गाभ्याशी आहे, अशी मांडणी मुफ्ती करतात. त्यासाठी ते उत्तर-वसाहतवादाचा आणि प्रामुख्याने एडवर्ड सैद यांच्या ‘ओरिएंटॅलिझम’चा आधार घेतात. मात्र हे करताना इंग्रजीने इतर भाषा-साहित्याला दिलेले देणेही ते नाकारत नाहीत. इंग्रजीचा सरधोपट स्वीकारही आहे आणि त्याला नकारही आहे, अशा काहीशा पेचात जगभरचे बिगरइंग्रजी साहित्य आणि समीक्षाविचार अडकला असल्याचे मुफ्ती दाखवून देतात. हीच या पुस्तकाची जमेची आणि इतर अभ्यासकांना पुढील मांडणीसाठी आवाहन करणारी बाजू आहे. त्यामुळे या पुस्तकाचे वाचन, विशेषत: अलीकडच्या देशीवादी म्हणवून घेणाऱ्या भारतीय(!) साहित्यिक-समीक्षकांनी अवश्य करायला हवे. त्यासाठीच या पुस्तकाची ही पुनर्आठवण!

**********

  • संरक्षणतज्ज्ञ आणि फोर्स या संरक्षणविषयक नियतकालिकाचे संपादक प्रवीण साहनी आणि गझाला वहाब यांच्या ‘ड्रॅगन ऑन अवर डोअरस्टेप – मॅनेजिंग चायना थ्रू मिलिटरी पॉवर’ (अलेफ बुक कंपनी, पृष्ठे : ४५८, किंमत : ७९९ रु.) या पुस्तकाला २०१७ साली उद्भवलेल्या डोकलाम प्रश्नामुळे तात्कालिक महत्त्व प्राप्त झाले होते, हे जरी खरे असले तरी या पुस्तकाची कालसुसंगतता अनेक वर्षे टिकणारी आहे. कारण त्यात केवळ पाकिस्तान आणि चीन यांच्याशी एकत्र युद्धप्रसंग ओढवला तर भारताची काय तयारी आहे, याच्या परखड मीमांसेसह ती परिस्थिती तशा वळणावर का आली याचेही विवेचन आहे. संरक्षण या मुद्दय़ाची चर्चा या पुस्तकाच्या केंद्रस्थानी असली, तरी भारत-चीन संबंधांतील राजकीय बाजू मात्र त्यातून दुर्लक्षिलेली नाही. भारत-चीन संबंधांत निर्माण झालेले प्रश्न लवकर मिटणारे नाहीत आणि भारताच्या युद्धसज्जतेपुढील आव्हानेही निदान काही काळ तरी बदलणार नाहीत. त्यामुळे आगामी काळातही या पुस्तकाची प्रस्तुतता संपणारी नाही.

**********

  • सध्या न्यू यॉर्क टाइम्ससाठी संयुक्त राष्ट्र विषयक वार्ताकन करणाऱ्या शौमिनी सेनगुप्ता २००५ सालापासून पुढील चारेक वर्षे न्यू यॉर्क टाइम्ससाठीच दिल्लीतून वार्ताकन करत होत्या. त्या काळात शौमिनी भारतभर फिरल्या. विविध स्तरांतल्या लोकांना भेटल्या. विशेषत: इथल्या युवावर्गाशी त्यांनी दीर्घ संवाद ठेवला, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून जे दिसले, जाणवले ते ‘दि एण्ड ऑफ कर्मा’ (हार्पर कॉलिन्स, पृष्ठे : २४४, किंमत : ५९९ रु.) या त्यांच्या पुस्तकात नोंदवून ठेवले आहे. पुस्तकात नऊ प्रकरणे असून त्यातील सात प्रकरणांत ११ तरुणांच्या कहाण्या मांडल्या आहेत. साधारणत: १९८०चे दशक व नंतर जन्मलेल्या पिढीचे हे प्रतिनिधी. त्यात सहा युवती व पाच युवक आहेत. अकरा जणांपैकी सात जण कनिष्ठ स्तरातून आलेले, तर उरलेले चार जण मध्यवर्गीय पाश्र्वभूमी असणारे आहेत. असे असले तरी या अकराही जणांना एकत्र गुंफणारे एक सूत्र आहे. ते म्हणजे या साऱ्यांनाच प्रगतीची आस आहे. त्यांना भूतकाळाशी काहीही देणे घेणे नाही. त्यांना स्वत:ची आर्थिक आणि सामाजिक प्रगती साधायची आहे. एकीकडे तंत्रज्ञानबदलाचा प्रचंड वेग, तर दुसरीकडे कालबा होत असलेल्या संस्थात्मक रचना असे विरोधाभासी वास्तव त्यांच्या जगण्याचा भाग आहे. त्यातूनच ही पिढी मार्ग काढणार आहे, असा आशावाद शौमिनी व्यक्त करतात. आजच्या भारताच्या समोर असलेल्या विकासाच्या, वैविध्याच्या प्रश्नांना हे पुस्तक स्पर्श करून जाते. ग्रामीण विरुद्ध शहरी, कायदा आणि सुव्यवस्था, परंपरा विरुद्ध आधुनिक मूल्ये, लिंगभेद, प्रादेशिक विकासाचा असमतोल, विविध समाजघटकांमधील भेदाभेद, जातिव्यवस्था, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि त्याची मर्यादा, हिंसा अशा अनेक मुद्दय़ांना हे पुस्तक कवेत घेते. आजच्या तरुणाईच्या मनाचा घेतलेला हा कानोसा उद्याच्या भारताची वाटचाल कशी असावी, हे सांगणारा आहे. त्यासाठीच ते वाचायला हवे.

**********

  • कुलभूषण जाधव प्रकरणानंतर पाकिस्तानबद्दल तमाम भारतीयांच्या मनात असलेली प्रतिमा अधिकच काळीकुट्ट झाली आहे. ते आपले शत्रुराष्ट्र. मागास, भ्रष्ट, प्रतिगामी, दहशतवादी आणि लष्कराची छुपी-उघड हुकूमशाही असलेले, सुधारण्याच्या पलीकडचे राष्ट्र. पण ही प्रतिमा पूर्ण आहे का? या प्रश्नाच्या उत्तरासाठी वाचायलाच हवे असे एक पुस्तक म्हणजे- पत्रकार मीना मेनन यांचे ‘रिपोर्टिग पाकिस्तान’ (पेंग्विन व्हायकिंग, पृष्ठे : ३८४, किंमत : ५९९ रु.). पाकिस्तानविषयक पत्रकाराचे पुस्तक म्हटले, की एक भीती असते. ती म्हणजे तेथील आगतस्वागताच्या आणि ‘आपल्यासारखेच सारे काही’ असण्याच्या प्रेमातच पडतात ते. त्यामुळे त्यांच्या लेखनातून खऱ्याचे तुकडे कमीच हाती लागतात. मीना मेनन यांचे अनुभव वेगळे ठरतात ते येथे. तेथील वास्तव जमेल तेवढे टिपणे, त्यातून माणसे, त्यांच्या प्रवृत्ती शोधणे हा त्यांचा छंद. त्याला वार्ताहरी दृष्टीची जोड. यामुळे या पुस्तकातून उभे राहणारे पाकिस्तान आपल्या दृष्टीच्या कक्षाही रुंदावण्यास साह्य़च करते..
  • जागतिकीकरणाचे बरे-वाईट अनुभव पचवल्यानंतरच्या काळात, म्हणजे मागील दशकभरात भारतीय मध्यमवर्गाविषयी आणि त्याच्यात झालेल्या मूल्यबदलाची चर्चा सातत्याने होत आहे. उदारीकरणाच्या प्रक्रियेत इथल्या मध्यमवर्गाचा आकार वाढला. त्याची जीवनशैली बदलली. राजकीयदष्टय़ाही ‘नागरी समाज’ म्हणून हा वर्ग राज्यसंस्थेत हस्तक्षेप करू पाहतो. अशा या भारतीय मध्यमवर्गाविषयी अभ्यासकांमध्येही कुतूहल वाढलेले दिसते. त्यामुळेच भारतीय आणि परदेशी अभ्यासकांची बरीच पुस्तके अलीकडच्या काळात बाजारात आली. अशात भारतीय मध्यमवर्ग, त्याच्यातील बदल, त्याची वाटचाल, घडण यांच्याविषयी थोडक्यात, पण मूलगामी विवेचन करणारे सुरिंदर एस. जोधका व असीम प्रकाश या अभ्यासकांनी संयुक्तरीत्या लिहिलेले ‘द इंडियन मिडल क्लास’ (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, पृष्ठे : २३२, किंमत : २९५ रु.) हे छोटेखानी पुस्तक वाचनयादीत असायलाच हवे. ऑक्स्फर्डच्या विषय-परिचय मालिकेत प्रकाशित झालेल्या या पुस्तकात भारतीय मध्यमवर्गाचा वसाहतकाळापासूनचा उदय, त्यात जन्मजात असलेल्या उच्चवर्णीयपणापासून आर्थिक अवलंबित्वापर्यंतचे प्रश्न, या वर्गातून ‘नागरी समाज’ बनण्याची प्रक्रिया असा विविधांगी अभ्यास मांडण्यात आला आहे. वसाहतिक काळापासून ते १९९० पर्यंतचा एक कालखंड आणि १९९० ते आजपर्यंतचा एक कालखंड, अशा दोन भागांत मध्यमवर्गाच्या वाटचालीची विभागणी या पुस्तकात केली आहे. मध्यमवर्गाची स्वातंत्र्य चळवळीतील भूमिका, स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीला नव्या राष्ट्रबांधणीच्या ध्येयाखाली व नेहरूपर्वातील सरकारी धोरणांमुळे या वर्गाचा झालेला विस्तार, पुढे १९९० नंतर खासगी क्षेत्राच्या वाढत्या प्रभावामुळे हा वर्ग बाजारपेठेवर अधिकाधिक विसंबला आणि त्याचे वर्गस्वरूपच कसे पालटून गेले याची चिकित्सा हे पुस्तक करते. ‘मध्यमवर्ग झाला कसा?’ आणि ‘मध्यमवर्गाचे काय झाले?’ या प्रश्नांची उत्तरे नेमकेपणाने देणारे लेख किशोर बेडकीहाळ यांनी लिहिले होते.

आणखीही पुस्तकं लक्षणीय होतीच, पण ही एवढी तरी विस्मरणाच्या चाळणीतूनही बाकी राहावीत!